आल्या निवडणुका
निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी सर्वांनाच वेध लागले आहेत. त्या त्या भागातील संभाव्य व विद्यमान उमेदवार हे आपल्याच घरातील असल्यासारखे काहींना वाटू लागते आणि मग ते त्यांचा प्रचार केल्यासारखे बोलू लागतात. अमूकने काम केले आहे, आपल्याकडे. त्यांच्या पक्षानेही नेहमीच मदत केली आहे आपल्या कॉलनीला.... असे विविध दावे होतात, पक्ष वा उमेदवारांबद्दल त्यांना तिकीट मिळो वा न मिळो आधीच सर्टिफिकेट देणारे अनेक भगतगण दिसू लागतात. टीका करणारे स्वयंघोषित समीक्षकही तयार होतात. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे हे सर्व मतदार व्यक्त होऊ लागतात.
खरे म्हणजे लोकप्रतिनिधीचे काम नेमके काय असते, काय असावे, विधानसभा, विधानपरिषद वा लोकसभा - राज्यसभा येथील लोकप्रतिनिधींबद्दल काय अपेक्षा असाव्यात, या बद्दल आपण जागरूक आहोत का? की त्यांनी आपल्या निधीतून करून दिलेल्या वा आपल्यावर थोपलेल्या कामाचा हिशेब ठेवून त्यांच्या कामाचे गुणवर्धन आपण करणार आहोत. मुळात त्यांच्याकडे उपलब्ध असणारा निधी हा आपल्याच खिशातून गेलेला असतो, हेच मतदारांना अनेकदा लक्षात येत नाही. हे लक्षात येण्यासाठी मतदार सक्षम असावा लागतो. सक्षम नागरिक असावा लागतो. सुशिक्षित, शिक्षित पण मला काय त्याचे किंवा माझा काय संबंध त्याच्याशी अशा बुर्झ्वा पद्धतीमध्ये जगणारा असेल तर देशाला नेत्यांच्या नव्हे तर मतदारांच्याही नव्हे तर नागरिकत्वाच्या शिक्षणाची गरज आहे. मुळात स्वातंत्र्याचा विशेष करून अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा इतका मोठ्या प्रमाणात प्रचार गेल्या काही वर्षांमध्ये होऊनही सक्षम नागरिक, शिक्षित नागरिक तयार करण्याकडे कोणत्याही मतदाराने, उमेदवाराने, नेत्याने, पक्षाने किंवा तथाकथित प्रशासकीय सेवेच्या परीक्षांमधून तावूनसुलाखून बाहेर पडलेल्या कोण्या अधिकाऱ्याने भरही दिलेला दिसत नाही. हो.... पण बक्कळ राजकीय कार्यकर्ते मात्र ५०० रुपयांत अनेकांनी तयार केले. हेच दुर्दैव.
- शल्य बोचरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा