आल्या निवडणुका
निवडणूक म्हणजे खर्चाला उधाण येत असते. यात कोण कोणासाठी किती, कसा, कुठे, काय खर्च करीत असतो, त्याचा पत्ता लावणे हे काम तसे सोपे राहिलेले नाही. वास्तविक निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कशासाठी असतो, त्यामागे उद्देश काय असते ते माहिती नाही. पण मुंबईत गणेशोत्सव आला की जसा बाजारा भरू लागतो, फुलू लागतो, त्यामुळे अनेकांना रोजगारही प्राप्त होत असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे पोटापाण्याला लोक लागतात असेही काही लोक सांगू लागतात, आणि एक प्रकारे गणेशोत्सव वा एकंदर धार्मिक सण आणि त्यामागे असलेले अर्थकारण अनेकांकडून समर्थनीय असल्याचे सांगत उत्सवाला एक महत्त्वपूर्ण सामाजिक साधन म्हणून मानले जाते. ते केवळ सामाजिक नव्हे तर आर्थिक, धार्मिक उत्थानालाही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. तसेच आता निवडणूक या सार्वजनिक उत्सवाचे झाले आहे. दर पाच वर्षांनी येणारा हा लोकसभेचा, विधानसभेचा उत्सव अधिक मोठा असतो. त्याशिवाय ग्रामपंचायत, नगरपरिषदा, महापालिका इतकेच कशाला भल्या भल्या संस्थांमध्येही या निवडणूक उत्सवाने आर्थिक संधी अनेकांना प्राप्त करून दिलेल्या असतात. असा हा निवडणूक उत्सव इतका नमुनेदार असतो की, गेल्या काही काळापासून विजय, पराजय आणि आयोजन या तीनही बाबींमध्ये निवडणुकीच्या उत्सवाने लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिलेले आहेत. हे रोजगार किती व्यापक आहेत ते प्रत्येकाला आढळून येत असते. अशाच प्रकारचा हा निवडणूक उत्सवातील रोजगार एका फलकाद्वारे आढळून आला. यातू त्यामागे कोण आहे, यापेक्षा सरकारने अशी जाहिरात न देतानाही किती बेरोजगारांना या कालावधीत रोजगार उपलब्ध करून देण्याचे पुण्यकर्म केले आहे, त्या संबंधितांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच. दक्षिण मुंबईतील हा फलक मुंबईतील, महाराष्ट्रातील व देशातील अन्य अनेक भागांमध्ये खुला वा गुप्त स्वरूपात लोकांना दिसून येत असेल. अशा या निवडणूक उत्सवाने मिळणाऱ्या रोजगाराला लोकशाहीत मुकावे का, असा प्रश्न प्रत्येक मतदारांनी स्वतःला विचारला तरी पुरे. सर्व निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या अट्टाहासालाही कदाचित यामुळे रोखले जाईल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
- शल्य बोचरे

vyavasthit darshan
उत्तर द्याहटवा