बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या काळातही त्याच परिस्थितीवर लागू पडणारे आहे, हेच साहिर लुधियानवी यांच्या गीतरचनेचे वैशिष्ट्य. तर, परिस्थिती जैसे थेच असल्याचे लक्षात घेता असलेले दुर्दैवच... म्हणावे; तसे म्हटले तर अजिबात चुकीचे ठरणार नाही. नवीन पिढीला या परिस्थितीची बोच लागावी यासाठीच या गाण्याची रचना मांडत आहे. त्यावर वेगळे काही भाष्य करण्याची खरे म्हणजे आवश्यकता नाही. साहिर लुधियानवी यांची लेखणी आजही तितकीच प्रभावी आणि भेदक आहे.


फिर सुबह होगी हा १९५८ मधील हिंदी चित्रपट. याचे कथानक, त्याची गाणी आजच्या समाज आणि विशेष करून भारतीय समाजाला लागू पडतील अशीच आहेत. काळाप्रमाणे काही बाबी जरी बदललेल्या असल्या तरी गाण्याचा गाभा गंभीर आहे, आजही चिंता करायला लावणारा आहे.  साहिर लुधियानवी यांनी लिहिलेली ‘वो सुबह कभी तो आयेगी’ ही रचना आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीलाही लागू पडणारी आहे. म्हटलं तर आशावाद आणि म्डटलं तर निराशावाद अशा उंबरठ्यावर असणाऱ्या या रचनेने अस्वस्थ करायला लावण्याची ताकद यात आहे. नेहरूंच्याविचारसरणीवर व तत्कालीन भारतीय स्थितीवर व्यंगात्मक फटकारे ओढणारे हे या चित्रपटातील गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या काळातही त्याच परिस्थितीवर लागू पडणारे आहे, हेच साहिर लुधियानवी य़ांच्या गीचरचनेचे वैशिष्ट्य. तर, परिस्थिती जैसे थेच असल्याचे लक्षात घेता असलेले दुर्दैवच... म्हणावे; तसे म्हटले तर अजिबात चुकीचे ठरणार नाही. नवीन पिढीला या परिस्थितीची बोच लागावी यासाठीच या गाण्याची रचना मांडत आहे. त्यावर वेगळे काही भाष्य करण्याची खरे म्हणजे आवश्यकता नाही. साहिर लुधियानवी यांची लेखणी आजही तितकीच प्रभावी आणि भेदक आहे.
या गाण्यासंबंधात विकीपीडियावर असलेल्या एका नोंदीमध्ये असलेली माहिती विलक्षण आहे. त्यानुसार असे म्हटले आहे की, 

“भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या भाषणांमध्ये अनेकदा त्यांचे मित्र आणि सहकारी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत हा चित्रपट पाहण्याबद्दल सांगितले आहे . अडवाणी आठवतात की माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना चित्रपट पाहण्याची खूप आवड होती. त्यांनी १९५८ मध्ये दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते आणि वाजपेयी थेट चित्रपट पाहण्यासाठी गेले होते असा एक प्रसंग सांगितला. अडवाणी म्हणतात की तो चित्रपट 'फिर सुभा होगी' निघाला . अडवाणी म्हणतात की वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सांगितले की चित्रपटाचे शीर्षक भविष्यसूचक ठरले आहे आणि अखेर एक पहाट झाली.”

आता अडवाणी यांच्या भाष्यानुसारही असणारी परिस्थिती आजही पुन्हा एकगा नव्या सकाळची वाट पाहात आहे, असेच म्हणावे लागेल.

- रवींद्र यशवंत बिवलकर (शल्य बोचरे)


वो सुब्ह कभी तो आएगी - साहिर लुधियानवी
चित्रपट - फिर सुबह होगी (१९५८)

वो सुबह (सुब्ह) कभी तो आएगी

इन काली सदियों के सर से जब रात का आँचल ढलकेगा

जब दुख के बादल पिघलेंगे जब सुख का सागर छलकेगा

जब अम्बर झूम के नाचेगा जब धरती नग़्मे गाएगी

वो सुब्ह कभी तो आएगी


जिस सुब्ह की ख़ातिर जुग जुग से हम सब मर मर कर जीते हैं

जिस सुब्ह के अमृत की धुन में हम ज़हर के प्याले पीते हैं

इन भूकी प्यासी रूहों पर इक दिन तो करम फ़रमाएगी

वो सुब्ह कभी तो आएगी


माना कि अभी तेरे मेरे अरमानों की क़ीमत कुछ भी नहीं

मिट्टी का भी है कुछ मोल मगर इंसानों की क़ीमत कुछ भी नहीं

इंसानों की इज़्ज़त जब झूटे सिक्कों में न तौली जाएगी

वो सुब्ह कभी तो आएगी


दौलत के लिए जब औरत की इस्मत को न बेचा जाएगा

चाहत को न कुचला जाएगा ग़ैरत को न बेचा जाएगा

अपने काले करतूतों पर जब ये दुनिया शरमाएगी

वो सुब्ह कभी तो आएगी


बीतेंगे कभी तो दिन आख़िर ये भूक के और बेकारी के

टूटेंगे कभी तो बुत आख़िर दौलत की इजारा-दारी के

जब एक अनोखी दुनिया की बुनियाद उठाई जाएगी

वो सुब्ह कभी तो आएगी


मजबूर बुढ़ापा जब सूनी राहों की धूल न फाँकेगा

मासूम लड़कपन जब गंदी गलियों में भीक न माँगेगा

हक़ माँगने वालों को जिस दिन सूली न दिखाई जाएगी

वो सुब्ह कभी तो आएगी


फ़ाक़ों की चिताओं पर जिस दिन इंसाँ न जलाए जाएँगे

सीनों के दहकते दोज़ख़ में अरमाँ न जलाए जाएँगे

ये नरक से भी गंदी दुनिया जब स्वर्ग बनाई जाएगी

वो सुब्ह कभी तो आएगी

वो सुबह (सुब्ह हमीं से आएगी


जब धरती करवट बदलेगी जब क़ैद से क़ैदी छूटेंगे

जब पाप घरौंदे फूटेंगे जब ज़ुल्म के बंधन टूटेंगे

उस सुब्ह को हम ही लाएँगे वो सुब्ह हमीं से आएगी

वो सुब्ह हमीं से आएगी


मनहूस समाजी ढाँचों में जब ज़ुल्म न पाले जाएँगे

जब हाथ न काटे जाएँगे जब सर न उछाले जाएँगे

जेलों के बिना जब दुनिया की सरकार चलाई जाएगी

वो सुब्ह हमीं से आएगी


संसार के सारे मेहनत-कश खेतों से मिलों से निकलेंगे

बे-घर बे-दर बे-बस इंसाँ तारीक बिलों से निकलेंगे

दुनिया अम्न और ख़ुश-हाली के फूलों से सजाई जाएगी

वो सुब्ह हमीं से आएगी

(गीताच्या शब्दरचनेसाठी - सौजन्य इंटरनेट)



मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

निसर्गातून हरवलेला माणूस

पिल्लाच्या पंखात शक्ती आली, ताकद आली याची जाणीव झाली की पिल्लांना घरट्यातून ढकलून देतात. हाच निसर्गनियम असतो आणि तो कोणालाही चुकत नाही. वास्तविक ही घटना निसर्गाच्या स्वातंत्र्यबद्दलच्या जाणीवेला खूप मोठी करणारी आहे. 

खरे म्हणजे स्वातंत्र्य हे निसर्गानेच प्रत्येक प्राणीमात्राला दिलेले आहे. ते उपभोगायचे कसे, ते वापरावयाचे कसे हे  मात्र माणसाने शिकावयास हवे होते. ते न शिकल्याने आणि माणसाच्या स्वार्थी व सत्ता, अधिकार यांच्या मोहापायी स्वातंत्र्य म्हणजे काय? ते कशाशी खातात? हेच माणसाला उमगले नाही. साम्राज्यविस्तारापायी, धर्मविस्तारापायी माणसाने माणुसकीच गमावली आणि स्वातंत्र्यालाच गुलाम करण्याच्या नादाला माणूस लागला. ही खरी म्हणजे शोकांतिकाच आहे. कोणी कसे जगावे, कसे राहावे हे त्याच्या त्याच्या अंगभूत गुणांना व अवगुणांनाही अनुसरून ते स्वातंत्र्य उपभोगले जाते. निसर्गाने ते स्वातंत्र्य प्राणीमात्रांना देताना खरे म्हणजे काही भेदभाव केला नाही. स्त्री-पुरुष, नर- मादी वा अनैसर्गिक काही घडले गेले तर निर्माण होणारी संतती यांचाही काहीसा विचार निसर्गाने केला असेल. पण माणसाने मात्र त्या निसर्गावर मात करण्याच्या नादात निसर्गानेच सर्वांना दिलेल्या स्वातंत्र्याला गुलाम करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय हा प्रश्न खरे म्हणजे पक्ष्यांना पडला नाही, प्राणीमात्रांनाही पडला नाही. मात्र तो प्रशन माणसाला पडला. याचे कारण सत्ताधीश बनण्याच्या माणसातील वृत्तीला त्या माणसाने सामाजिकतेचा मुलामा देत सामूहीक बनविले. त्यामुळे प्रत्येक वर्तनामागे कार्यकारण तयार करण्याच्या कृतीला त्याने समाज, धर्म, नीति, रिती, रिवाज अशी नावे दिली. खरे म्हणजे त्यातून आजही काहीच साध्य झालेले नाही. संघर्ष चालूच आहे, तो संघर्ष आहे. दोन विचारांमधील, दोन पिढींमधील, दोन लिंगांमधील आणि अशा विभिन्न विभिन्न गट- बाजूंमधील. वास्तविक यातून स्वातंत्र्य मात्र गमावले गेले. त्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ मात्र गमावला गेला.
माझे वडील सांगत की, चिमणी पाखरं ही त्यांचे आयुष्य जगताना त्यांच्या पिल्लाच्या पंखात शक्ती आली, ताकद आली याची जाणीव झाली की पिल्लांना घरट्यातून ढकलून देतात. हाच निसर्गनियम असतो आणि तो कोणालाही चुकत नाही. वास्तविक ही घटना निसर्गाच्या स्वातंत्र्यबद्दलच्या जाणीवेला खूप मोठी करणारी आहे. हे वर्तन केवळ पिल्लाला स्वातंत्र्य बहाल करू पाहाणारे नाही, तर त्याच्या आईवडिलांनीही स्वतःला समजून स्वतःला स्वतंत्र करू पाहू इच्छिणारे आहे. त्यांनी निसर्गाचे एक प्रजननाचे काम केले आहे ती जाणीव ठेवीत त्यांनी त्यानंतर स्वतःचे स्वातंत्र्यही स्वीकारले आहे. आपण पिल्लांवर अवलंबून राहावयाचे नाही, ही देखील त्या पिल्लांच्या आईबाबांना जाणीव आहे. त्यांनीही त्यांचे स्वतःचे तंत्र शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याचे कारण प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे हे तत्त्व त्यांनी स्वीकारलेले आहे. त्यामुळेच एका विशिष्ट काळानंतर आपल्या मुलाबाळांना स्वातंत्र्य देणे हे देखील त्यांनी स्वीकारलेले आहे. भविष्याचा विचार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांनी करावयाचा आहे. पिल्लांनी आपले भविष्य कसे घडवावे हे त्यांनी ठरवावे व आपले भविष्य पिल्लाविना असेल हे लक्षात घेऊनही आपल्या भविष्यावर नजर ठेवीत त्या पिल्लांच्या आईबापांनी मार्गक्रमण करावयाचे आहे. निसर्गाचा हा नियम इतका सुस्पष्ट आहे तरीही माणसाला काही तो गावला नाही. किंबहुना यामुळेच निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याऐवजी तो निसर्गापासून दूर जात निसर्गावरही मात करण्याचा प्रयत्न करू लागला आहे. माणूस आणि त्याची पिल्ले या संबंधातील संबंध खरे म्हणजे प्रत्येकाने तपासून पाहिला तर तेच कटू सत्य आढळून येते. पण दुर्दैवाने माणूस काही निसर्गाला आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आजही सामावून घेऊ शकलेला नाही, हेच खरे.

- रवींद्र यशवंत बिवलकर


सोमवार, २२ जुलै, २०२४

सावरकरांची 'ती' उडी

  🔹 अत्रे उवाच... (८)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी  मोरिया बोटीतून मारलेली उडी साऱ्या जगाचे लक्ष वेधून भारतातील ब्रिटिश सरकारच्या वृत्तीला दिलेला मोठा झटका होता. सावरकर यांचे ते धाडस खरे म्हणजे शब्द आणि भावनेत वर्णन करता येत नाही. त्यांची देशाविषयीची निष्ठा, स्वातंत्र्य मिळविण्यासाठीची तळमळ अशा भावनांचा तो उद्रेक होतो. हे सावरकर ज्यांना आमचे म्हणावेसे वाटतात, त्यालाच खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला समजून घेण्याची जाण येऊ शकते. अशा या सावरकरांच्या त्या उडीचे अत्रे यांनी मांडलेले सत्व म्हणजे सावरकरांच्या क्रांतिचे तत्त्वच उलगडणारे ठरावे.

२९ जुलै १९०९ ची ती रात्र. वीर सावरकर त्या रात्री 'ब्रायटन'च्या रम्य समुद्रकाठी गेले होते. त्यावेळी उन्हाळा होता. त्या ऋतूत रात्री सूर्य दहा किंवा अकरा वाजता मावळतो. समुद्राच्या किनाऱ्यावर असंख्य स्त्री-पुरुषांचे थवेच्या थवे अर्धनग्न गणवेशात हसतखिदळत हिंडत होते. पण सावरकरांच्या डोक्यावर असंख्य संकटे थैमान घालत होती. जेष्ठ बंधू बाबाराव सावरकरांना थोड्याच दिवसांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. एक जुलै रोजी 'कर्झन वायली'चा 'मदनलालजी धिंग्रा' यांनी खून केलेला होता. त्या खुनाच्या निषेधाची सभा लंडनमध्ये कॅक्स्टन हॉलमध्ये भरलेले असताना, त्या निषेधाच्या ठरावाला सावरकरांनी विरोध केला, तेव्हा त्यांच्यावर जो हल्ला झाला, त्याचे पडसादही सावरकरांच्या डोक्यात निनादत होते. अशा संत्रस्त मानसिक अवस्थेत त्या रात्री सावरकर त्या ब्राईटनच्या किनाऱ्यावर बसले असताना समोरच्या सागराकडे बघून ते रडू लागले, नि रडता रडता त्यांच्या ओठातून पुढील अमरकाव्य प्रकट झाले -
ने मजसी ने, परत मातृभूमीला,
सागरा प्राण तळमळला!

     आपल्या प्रिय मातृभूमीचे दर्शन या जन्मी आपल्याला फिरून होईल की नाही, अशा साशंक मन:स्थितीत सावरकर बसले असताना, मातृभूमीच्या प्रेमाचे नि सेवेचे असले हृदयद्रावक काव्य त्यांच्या मुखामधून प्रकट व्हावे, हा एक मानवी बुद्धीचा आश्चर्यकारक चमत्कार नव्हे काय? या कवितेच्या शेवटच्या कडव्यात--
जरि आंग्लभूमी भय भीता  रे
अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तीस आता  रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला 
सागरा प्राण तळमळला 

सावरकरांना अगस्तीच्या समुद्र प्राशनाची पौराणिक कथा आठवावी हे पाहिले म्हणजे, त्यांच्या सर्वांगात मुरलेला भारतीय संस्कृती निष्ठेबद्दल आदर वाटू लागतो. १३ मार्च १९१० पर्यंत सावरकर फ्रान्समध्ये होते. त्या दिवशी संध्याकाळी पॅरिसहून सावरकर निघाले, ते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लंडनला पोहोचले. तेथे त्यांना अटक करण्यात आली. १३ मार्च १९१० पासून ते एक जुलै १९१० पर्यंत ते इंग्लंडमधल्या ब्रिक्सटन तुरुंगात होते. त्या रात्री त्यांना 'मोरिया' नावाच्या बोटीने हिंदुस्थानाकडे रवाना करण्यात आले. मोरिया बोट चालू लागल्यावर सावरकरांच्या विचारांनाही गती मिळाली. मोरिया बोटीशी यांत्रिक चक्रे जशी जशी जोर जोराने फिरू लागली, तशी तशी सावरकरांच्या विचारांची चक्रे ही जोरजोराने फिरू लागली. मोरिया बोटींचा प्रवास पहिले तीन-चार दिवस सुखाचा झाला. पण ती पोट 'बिस्के'च्या उपसागरात गेल्यानंतर वादळी वारे सुरू झाले. लाटांचे प्रचंड तडाखे बोटीच्या दोन्ही बाजूंना बसू लागले, आणि त्यामुळे बोट जोरजोराने डोलू लागली. त्याचवेळी साधेल त्या ठिकाणी बोटी मधून निसटून जाण्याचा प्रयत्न करण्याची कल्पना त्यांच्या मनामध्ये डोकावू लागली. मोरिया बोट बहुधा 'मार्सेलस' येथे थांबणार नाही , असे त्यांना कोणीतरी सांगितले होते. पण यदाकदाचीत जर ती बोट थांबलीच तर आपल्याला बोटीतून पळविण्याचा प्रयत्न आपले लंडनमध्ये काही क्रांतिकारक सहकारी मित्र केल्या वाचून राहणार नाही असा त्यांना विलक्षण विश्वास वाटत होता. बोटीतून निसटण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे त्यांच्या खोलीतल्या केबिन पोर्टहोल मधून. पण पोर्ट होल मधून आपले शरीर बाहेर निघण्याची शक्यता कितपत आहे, याचा आगाऊ अंदाज घेण्यासाठी बिस्केच्या उपसागरात बोट डावी उजवीकडे हेलकावे घेत असताना, सावरकर झोकांड्या खात-खात एका पोर्टफोलपाशी गेले, आणि हाताने आधार घेण्याच्या मिषाने त्यांनी निमिषार्धात 'पोर्टफोल'चे कच्चे मोजमाप घेतले. मंगळवार दि. ७ जुलै १९१०रोजी रात्री मोरिया बोट ही मार्सेलसला असल्या जाऊन पोहोचली. सावरकरांच्या सुदैवाने मार्सेलस बंदरात ती बोट आल्यानंतर तिच्यात काहीतरी यांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो दुरुस्त करण्यासाठी ती बोट बंदराच्या धक्क्यापासून फारच थोड्या अंतरावर उभी करण्यात आली. त्याचवेळी बोटीतून निसटून जाण्याविषयीचा त्यांच्या मनातला संकल्प फिरून प्रबळ झाला. पहाटेची वेळ जशी जशी जवळ येऊ लागली तस तसा सावरकरांच्या मनातला अस्वस्धपणा वाढू लागला. बोटी मधून निसटून पोहून सुरक्षित ठिकाणी जाऊन वर पोहोचावयाचे असेल, तर त्यावेळच्या इतकी सोयीची संधी फिरून आपल्याला कदापी मिळणार नाही, ही गोष्ट त्यांना स्पष्टपणे तेव्हाच कळून चुकली होती. लहानपणी नाशिक येथे असताना गोदावरी नदीत   त्यांनी पोहण्याचा सराव केला होता, तथापि समुद्रात पोहण्याचा त्यांना कधीही अनुभव नव्हता. पण आपल्याला पकडून हिंदुस्तानात नेल्यानंतर कदाचित आपल्याला काळ्या पाण्याची वा फाशीची शिक्षा झाली, तर कुत्र्याच्या मौतीने मरण्यापेक्षा अफाट दर्यात लाटांशी झगडता झगडता मरण आले, तर ते पत्करले, असा विचार करून त्यांनी त्या बोटीतून काय वाटेल ते झाले तरी बाहेर पडण्याचा निर्धार केला. एवढ्यात सकाळ झाली. यापुढे कसे करू आणि काय करू या विचारात वेळ घालवण्यापेक्षा जो काही सोक्षमोक्ष व्हायचा असेल तो आत्ताच्या आत्ता करून घेतलेला बरा, कारण 'Now or Never' असा निर्धार करून सावरकर आपल्या बिछान्यावरून हळूच उठले, आणि बाहेर पहार्यावर असलेल्या एका हिंदी शिपायाला त्यांनी अत्यंत आर्जवी स्वरात आपल्याला शौचकूपाकडे घेऊन जा अशी विनंती केली. सावरकर शौचकुपात शिरले आणि त्यांनी शौचकुपाचा दरवाजा आतून बंद करून घेतला. बाहेर पहारेकरी उभा होता, त्याला आतले काही दिसू नये म्हणून सावरकरांनी आपल्या अंगावरचा झोपण्याचा झगा लगबगीने काढून आरशाच्या वर असलेल्या हुकावर अडकवून ठेवला. अंगावरले उरलेले कपडे उतरून सावरकरांनी पोर्टहोलकडे उडी घेतली. पोर्टहोल मधून हळूहळू ते आपले शरीर बाहेर काढू लागले. आपले शरीर संकुचित करून त्या पोर्टहोलमधून बाहेर पडताना सावरकरांना केवढा प्रयास पडला असेल, त्यांचे शरीर किती ठिकाणी रक्तबंबाळ झाले असेल, आणि त्यांच्या अंगावरील कातडे केवढ्या मोठ्या प्रमाणात सोलून निघाले असेल याचे वर्णन मोठमोठ्या महाकवींना देखील शब्दाने करता येणार नाही. अखेर सावरकरांचे शरीर पोर्टहोलमधून सही सलामत बाहेर पडले. "स्वातंत्र्य लक्ष्मी की जय" असा घोष मनातल्या मनात करून अखेर सावरकर समुद्र पृष्ठावर येऊन आदळले. त्याचवेळी सावरकरांवर पहारा करणारा शिपाई शौचकूपाचे तावदान फोडून आत शिरला तेव्हा सावरकर पोर्टहोल मधून बाहेर पडल्याचे त्याला समजले. एवढ्यात खाली काय प्रकार घडला ते बोटीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी सावरकरांच्या मागोमात तशीच समुद्रात उडी मारली आणि तो पोहत पोहत सावरकरांचा पाठलाग करू लागला. तर दुसऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सावरकरांच्या रोखाने गोळ्या झाडायला सुरुवात केली. तेव्हा सावरकरांनी मधून मधून समुद्राच्या पृष्ठाखाली बुडी मारून अंतर्भागातून पोहण्यास सुरुवात केली. सावरकर मार्सेलसच्या धक्क्यावर जाऊन पोहोचले. बॅरिस्टरीचा अभ्यास करीत असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा सूक्ष्मपणे अभ्यास केलेला होता. म्हणून मार्सेलसच्या धक्क्याला हात लागताच आपण फ्रान्सला पोहोचलो असा विचार त्यांच्या मनात तक्षणी आला.  धक्क्याची भिंत चढता चढता दोनदा ते घसरून खाली पाण्यात पडले. पण अखेर शेवटाचा अचाट निर्धार करून ते धक्का चढून वरच्या जमिनीवर उभे राहिले. 'झालो फिरून स्वतंत्र झालो!' अशा चैतन्यवृत्त विचाराने उत्स्फूर्त होऊन त्यांनी भोवतालचा सुंदर देखावा एक वेळ नीट न्याहाळून पाहिला आणि ते एकदम थूम पळत सुटले. जवळ जवळ दोन अडीच फर्नांडिस ते पळाले. वाटेत त्यांना ट्रॅम दिसली. पण ते अर्धनग्न आणि भिजलेले असल्यामुळे त्यांना ट्रॅममध्ये चढून बसणे अशक्य होते. सावरकर पळत चालले आहेत नि ब्रिटिश पोलीस अधिकारी त्यांचा पाठलाग करीत चालले आहेत हे दृश्य तेव्हा रस्त्यातल्या काही फ्रेंच लोकांनी पाहिले. तेव्हा त्यानी चोर चोर म्हणून हाकाटी करून सावरकरांच्या मागे धावण्यास सुरुवात केली. अखेर सावरकर थकले, रात्रभर त्यांना झोप नव्हती. त्याखेरीस त्यांनी जो प्राणांतिक धोका पत्करला होता, त्याचा थकवाही त्यांच्या मनावर तरंगत होता. शेवटी रस्त्यातल्या एका फ्रेंच शिपायासमोर जाऊन ते उभे राहिले, आणि आपण यापुढे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कक्षेत आहोत, असे त्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तेवढात त्यांचा पाठलाग करणाऱ्या लोकांनी आणि ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना गाठले. फ्रेंच शिपायाने सावरकरांना त्यांच्या हवाली केले. अटक करून सावरकरांना पुन्हा मोरिया बोटीवर नेण्यात आले. बोटीवर पोहोचता क्षणीच पाहारेकर्यांने त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूस जोराने गुद्दा मारला, त्यानंतर सावरकरांना हातकड्या, पायकड्या घालून त्यांच्या केबिनमध्ये कोंडून टाकण्यात आले. दिनांक ९ जुलै रोजी सकाळी मोरिया बोटीने मार्सेलस सोडले. बोटीचा पुढचा प्रवास सुरू झाला. सावरकरांना पकडणे नि त्यांना ब्रिटिश पोलिसांच्या स्वाधिन करणे हे गैरवासाठी प्रकार झाले, हे हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मान्य केले. पण शेवटी सावरकरांसारख्या एका राष्ट्राच्या बंदीवानाला दुसऱ्या राष्ट्राच्या हस्तकाने चुकीने पकडल्यामुळे त्याला परत त्या राष्ट्राचा अधिकाऱ्यांच्या हवाली केले, हे योग्यच झाले, असा निर्णय हेगने दिला. या निर्णयाचा साऱ्या जगात निषेध झाला. पण ब्रिटिश सरकार त्यावेळी त्या टिकेचा विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हते. हेगचा प्रतिकूल निकाल जाहीर होऊन त्याचा साऱ्या जगाने धिक्कार केला तरी त्यांनी सावरकरांना ५० वर्षाची दोन काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. सावरकर फ्रेंच किनाऱ्यावर जेव्हा पोहोचले, तेव्हा त्यांचे फ्रान्समधले सहकारी त्यांना भेटले असते, आणि त्यांनी त्यांना आपल्या मोटारीत घालून पळवून नेले असते, तर काय घडले असते? असा विचार करायला कालिदास, भवभुती यांनाच आमंत्रण झाडायला पाहिजे. मग सावरकरांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा होऊन अंदमानात जावे लागले नसते, आणि मग मग काय काय झाले असते? ते कसे सांगू? कदाचित भारताचा इतिहास बदलला असता, आणि जाऊद्या..... पुढचा तर्कच नको!

       
४/३/१९६६.

सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे

(लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)

सावरकरांचे व्यक्तिमत्व

  🔹 अत्रे उवाच... (७)

व्यक्तिमत्त्व कसे होते व ते ही एका  असाधारण, असामान्य, अलौकिक, अद्भुत आणि लोकविलक्षण माणसाचे.... अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आचार्य अत्रे यांनी एका लेखात जे सादर केले आहे, ते सांगण्यासाठी अनेकांना शब्द पुरलेले नाहीत. त्यामुळेच सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व इतक्या कमी शब्दात मांडूनही सावरकर यांचे पूर्ण व्यक्तिमत्त्व व्यक्त करून अनेकांच्या मनातील अव्यक्त भावनांनाही हात घातला आहे, असे म्हणावे लागेल. स्वातंत्र्यवीरांविषयीचा हा लेख यामुळेच अतिशय महत्त्वाचा वाटतो.


एकाच वाक्यात सांगायचे झाल्यास सावरकरांचे व्यक्तिमत्व हे असाधारण, असामान्य, अलौकिक, अद्भुत आणि लोकविलक्षण होते. तथापि त्यांच्या व्यक्तिमत्वाला उजळा देणारे दोन पैलू दैदीप्यमान होते, ज्यामुळे त्यांच्या चरित्राकडे साऱ्या जगाचे लक्ष गेले. ते दोन पैलू म्हणजे अपारंपार देशभक्ती आणि परमोत्कट स्वातंत्र्यलालसा. जगामध्ये किंवा भारतामध्ये आजपर्यंत जे जे महान देशभक्त होऊन गेले, ते प्रसंगपरत्वे  आणि परिस्थितीपरत्वे देशभक्तीकडे वळले. पण सावरकरांच्या जीवनाचा उगमच मुळी देशभक्ती मधून झाला. ते जन्माला आले, तेव्हापासूनच ते देशभक्त आहेत. त्यामुळे त्यांची देशभक्ती इतर देशभक्तांपेक्षा वेगळी आहे. त्यांची देशभक्ती स्वातंत्र्यलालसेच्या अग्नीरसात निर्माण झाली आहे. त्यामुळे निर्भेळ स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना, त्यांनी मागेपुढे कधीही पाहिले नाही. त्यांनी तळहातावर शिर घेऊनच स्वातंत्र्याच्या समारांगणात उडी घेतली. स्वातंत्र्यासाठी मृत्यूची पर्वा न करणारा एवढा ज्वलंत देशभक्त केवळ भारतातच काय पण जगात उत्पन्न झालेला नाही. अगदी बालपणापासूनच असामान्य कोटीची काव्य स्फूर्ती आणि काव्य शक्ती त्यांच्या अंगी जी निर्माण झाली, त्याची प्रेरणा देशभक्ती आणि स्वातंत्र्य प्रीती हीच होती. विलायतेला ते जे गेले ते काही बॅरिस्टर होण्यासाठी गेले नाहीत, ते त्यांचे केवळ वेशांतर होते. तिकडे जाऊन भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एक जबरदस्त आंतरराष्ट्रीय संघटना उभारण्याचा त्यांचा मानस होता. वयाच्या तेवीसाव्या वर्षी त्यांनी "अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर" लिहून, भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एक 'सशस्त्र क्रांती'ची गीताच निर्माण करून ठेवली. मॅझिनीचे चरित्र लिहून सुद्धा अंतिम स्वरूपाचा राष्ट्रवादच त्यांनी प्रतिपादिला. भारतामधील क्रांतिकारक तरुणांना सावरकरांनी विलायतेहून काय काय पाठवले? तर बॉम्बगोळे आणि पिस्तुले. १९०५ पासून १९२० पर्यंत इंग्लंडात म्हणा मार्सेलसच्या बंदरात म्हणा व अंदमानात म्हणा, सावरकर नि मृत्यू हे एकमेकांसमोर दंड थोपटून एकमेकांना जणूकाही आव्हानच देत होते. मार्सेलस बंदरात पोहत असताना सावरकरांवर ज्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यापैकी एखादी गोळी जरी त्यांना लागली असती, तरी खचित त्यांचा मृत्यू झाला असता. गोळी लागली नाही हे त्यांचे नशीब. अंदमानातल्या छळांनी, हाल अपेष्टांनी, शरीरकष्टांनी, चाबकाच्या मारांनी, आजारांनी त्यांना मरण कसे आले नाही? हेच महत्त्वाचे होय. अंदमानच्या तुरुंगातल्या भिंतीवर सुद्धा त्यांनी देशभक्तीची आणि स्वातंत्र्यप्रीतीची उर्जस्वल काव्ये लिहिली आणि तुरुंगातील कैद्यांकडून पाठ करून ती मातृभूमीच्या दास्यमुक्ततेसाठी स्वदेशी पाठवली. देशभक्ती प्रभावी ठरावी आणि स्वातंत्र्यप्रेम सफल व्हावे म्हणूनच मृत्यूला न भिता त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग आपल्या वाणीतून आणि लेखणीतून छाती ठोकपणे प्रतिपादिला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा उघडपणे पुरस्कार करणारे सावरकर हे पहिले स्वातंत्र्यवीर आणि दुसरे नेताजी सुभाष चंद्र बोस. पण त्यांनाही सावरकरांच्या क्रांती गीतेने प्रेरणा दिली. नीती अनीतीचा आणि अहिंसेसा पगडा भारताच्या मनावर फारा दिवसापासून बसलेला आहे, म्हणून सशस्त्र क्रांतीचे नाव काढले, तर मोठ्या मोठ्या देशभक्तांच्या अंगाला घाम फुटतो. महात्मा गांधींनी 'सशस्त्र प्रतिकारा'ला अगदी सोयीस्करपणे पापाच्या सदरात घालून टाकले होते. राष्ट्रीय सशस्त्र प्रतिकाराला पाप ठरवू पाहणारा विपरीत वावदूक तत्त्ववादी आयर्लंडच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात एकही आढळणार नाही. शस्त्रशक्तीने संपन्न असलेल्या एका राष्ट्राने जर दुसऱ्या राष्ट्राला गुलाम आणि नि:शस्त्र केले असेल, तर सशस्त्र क्रांती ह्याच एका प्रभावी साधनाने नि मार्गाने नि:शस्त्र आणि पादक्रांत राष्ट्रे स्वातंत्र्यसंपन्न होऊ शकतात, हा सावरकरांचा ठाम सिद्धांत होता. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभापासून त्यांनी हिंदूंना लष्करीकरणाचा जो उपदेश धडाक्याने करावयाचा सपाटा लावला, त्याचे बीज हेच होते. हिंदू लोकांना शस्त्रे वापरण्याचे ज्ञान आणि शस्त्रे बनवण्याच्या शास्त्राचे ज्ञान मिळून, हिंदुराष्ट्र ह्या महायुद्धकाळात सज्ज झाले, तर उद्याच्या स्वातंत्र्यसंगरात त्या सज्जतेचा उपयोग झाल्याखेरीस राहणार नाही, असा त्यांचा अढळ विश्वास होता. याच भावनेने त्यांनी 'महाराष्ट्र साहित्य संमेलना'च्या अध्यक्ष स्थानावरून "लेखण्या मोडा नि बंदुका घ्या" असा एखाद्या झुंजार रणयुद्ध्याला साजेल असा आदेश दिला होता. शस्त्र पुरस्कारा इतकाच शास्त्र पुरस्कार किंवा विज्ञान पुरस्कार हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सावरकरांना सनातन किंवा प्रतिगामी म्हणणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावयाला पाहिजे होते की, ते शस्त्रविद्येचा पुरस्कार अत्यंत आधुनिक विज्ञानाच्या भूमिकेवरून करत असत. त्यांनी लिहिले आहे की,' महाभारतात शत्रूच्या छातीचा थरकाप उडवण्यासाठी श्रीकृष्णाचा पांचजन्य फुंकला जात होता, तसा पांचजन्य हल्लीच्या युद्धात कोणी फुंकीत गेले, तर त्याला पांचजन्य करतच परत यावे लागेल. महाभारतातले गांडीव धनुष्य आता भंग पावलेले आहे. आता 'मशीनगन्स'शी गाठ आहे." यांत्रिक आणि वैमानिक संस्कृती ही जगाच्या संस्कृतीचा एक अपरिहार्य भाग म्हणून इतउप्परच्या काळात सतत नांदणार आहे; तिच्याकडे पाठमोरे होणे हा शुद्ध बुद्धिभ्र॔श आहे. तिचा डोळसपणाने स्वीकार करणे, अन् तिचे आनंदाने स्वागत करणे, यातच भारतीय समाजाच्या उत्कर्षाची बिजे साठवलेली आहेत. तिचा उपहास करून समाजातील भोळसटपणाच्या वाढीला मदत करणे, हे राष्ट्रघातकीपणाचे कृत्य आहे. असे सावरकरांनी आपल्या लेखातून आणि व्याख्यानातून शेकडो वेळा प्रतिपादिलेले आहे. 'स्वातंत्र्यप्राप्तीस्तव सशस्त्र क्रांती' या तत्त्वासाठी सावरकरांनी जे जन्मभर आकाश पाताळ एक केले, ते लक्षात घेता सावरकरांनी हिंदू महासभेमध्ये प्रवेश न करता 'स्वातंत्र्यसैनिक पक्ष'(Freedom Fighter's Party) स्थापन केला असता आणि 'स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्यावेळी जी साधने वापरणे शक्य आणि आवश्यक होईल त्यांचा हा पक्ष बेधडकपणे वापर करेल!' असे जर त्याचे ब्रीत ठेवले असते तर प्रतिगामी अन् जातीयवादी म्हणून त्यांची भारतीय राजकारणात निर्भसना करण्याची आणि त्यांना डावलण्याची काँग्रेसची कधीही हिंमत झाली नसती, असे आम्हाला अनेक वेळा वाटते. अर्थात ही आमची स्वतःची धारणा आहे. सावरकरांना त्याची कल्पनाच नसेल असे आम्ही कसे म्हणावे? आधीच शतकानूशतके अडाणी, देवभोळ्या, वैराग्यप्रेमी असलेल्या सर्वसामान्य हिंदू समाजाच्या डोळ्यात आत्मबलाची, त्यागाची, ब्रह्मचर्याची, सत्याची आणि अहिंसेची धूळ टाकून स्वतःच्या बुवाबाजीची हंडी त्यांच्या डोक्यावर चढवण्याचा गांधीवादी उपद्व्याप सावरकरांनी कधीच केला नाही. उलट कित्येकदा तर हिंदू बहुजनाला न पचणारे आणि न पेलणारे पुरोगामी विचार त्यांनी आग्रहांनी मांडले. त्यामुळे कित्येकदा हिंदू समाजाने त्यांचा सार्वजनिक रीतीने निषेधही केलेला आहे. पण त्यांनी त्या निषेधांना  घाबरून स्वतःची तत्त्वनिष्ठा लवमात्र ढळू दिलेली नाही. कारण 'वरं जनहितं ध्येयं l केवला न जनस्तुति : - म्हणजे लोकांच्या स्तुतीनिंद्येची पर्वा न करता जनतेचे हित हे सर्वश्रेष्ठ मानायचे, हे सावरकरांच्या जीवनक्रमाचे बाणेदार ब्रिद असल्याने त्यांनी कारागृहातील हाल अपेष्टांचे आणि मुक्त झाल्यानंतर विरोधी राजकीय पक्षांच्या नींदेचे सारे हलाहल 'नीलकंठा' प्रमाणे धीरगंभीर अन् शांत वृत्तीने पचविले. रत्नागिरीहून निर्बंध मुक्त झाल्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. तेव्हापासून त्यांच्या लौकिक वर्तनाविरुद्ध अनेक आक्षेप घेण्यात येऊ लागले. सर्व सामान्य लोक तर राहू द्याच पण मोठमोठ्या लोकांना ते भेटत नाहीत, बाहेर कोणाकडे ते भोजनाला किंवा चहापानाला जात नाहीत, सामान्य सामाजिक संकेत किंवा शिष्टाचार त्यांच्याकडून पाळले जात नाहीत, असे अनेक अक्षेप चांगली चांगली माणसे त्यांच्याबद्दल घेत असत, आणि त्या आक्षेपात तथ्य नव्हते असे नाही. त्यामुळे अनेक मोठमोठे लोक दुखावले गेले असे आम्हाला माहित आहे. तथापि लौकिक व्यवहाराचा आणि शिष्टाचाराचा त्याग केल्यामुळे लोकप्रियता खर्ची पडली तरी बेहत्तर, पण भारतीय राजकारणात अज्ञ जनतेत सवंग लोकप्रियता मिळवण्याचे सारे मार्ग कटाक्षाने टाळावयाचे, असे सावरकर यांनी कर्तव्य बुद्धीने ठरविले होते. आणि ते त्यांच्या प्रखर व्यक्तिमत्वाचे एक प्रधान अंग होते, असेच आता म्हटले पाहिजे. इतिहासाचे सूक्ष्म अवलोकन, आकलन आणि तंत्रशुद्ध नि वास्तववादी विचारसरणी यामुळे मोठमोठ्या मुत्सद्यांवर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडे व क्रांतिकारक म्हटला की तो भडक वल्गना करणारा आणि सिंहासारख्या कारण नसताना डरकाळ्या फोडणारा, अशी जे कोणी सावरकरांना भेटण्याआधी त्यांच्याविषयी कल्पना करत असत, ते प्रत्यक्ष त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या शांत,संयमी पण सडेतोड आणि निश्चयी युक्तिवादाने मंत्रमुग्ध होत. याचे अनेक पुरावे देता येण्यासारखे आहेत. दोन काळ्या पाण्याच्या पोलादी ऐरणीवर देहदंडाचे राक्षसी वज्रप्रहार सोसूनसुद्धा ज्यांच्या देशभक्तीचा आणि स्वातंत्र्य प्रीतीचा हिरा अखेर अभंगच राहिला, त्यांच्या अमर व्यक्तिमत्वाचे अधिक काय वर्णन करावे?

१०/३/१९६६

सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे

(लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)


स्वातंत्र्यवीरांचे पहिले दर्शन

  🔹 अत्रे उवाच... (६)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे व्यक्तिमत्त्व आचार्य अत्रे यांनी त्यांना कसे वाटले, त्यातून त्यांनी ते कसे मांडले हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. एकेकाळी सुरुवातीला टीका करणाऱ्या व स्वातंत्र्यवीरांवर पराकोटीची टीका करणाऱ्या अत्रे यांना सावरकर यांना बघण्याची व भेटण्याची उत्कंठा लागली होती, ती रत्नागिरीमधील सावरकर यांच्या वास्तव्यात त्यांना पूर्ण करता आली, त्यातून अनुभवलेले सावरकर यांनी या सावरकर यांच्या पहिल्या दर्शनापासून मांडले आहे हे नव्या पिढीला वाचण्यासारखे आहे.

तेवीस-चोवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी चित्रपटाच्या कामासाठी मी कोल्हापूरला हंस पिक्चर्समध्ये काही दिवस जाऊन राहिलो होतो. त्यावेळी एक दिवस श्री. अनंतराव गद्रे अचानक येऊन माझ्या पुढे उभे राहिले. ते म्हणाले," चला आपण रत्नागिरीला जाऊ. सावरकर निर्बंध मुक्त झाले."

सावरकरांना बघण्याची आणि भेटण्याची मलाही अनिवार उत्कंठा होती. त्यांच्या कीर्तीचे चौघडे अगदी लहानपणापासून कानावर झडत होते. म्हणून अनंतरावांचे म्हणणे मी ताबडतोब मान्य केले. खेरीज सावरकरांशी थोडेसे नातेही त्या काळात आमचे जमले होते. अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यासाठी स्पृषास्पृश्यांच्या सहभोजनाचा संप्रदाय त्यांच्याच प्रेरणेने अनंतरावांनी महाराष्ट्रात सुरू केला होता. त्यात अनंतरावांचा मी एक सहकारी होतो.

दुसऱ्या दिवशी माझ्या मोटारीतून अनंतराव, मी, माझी पत्नी, आणि दोन मुली असे आम्ही कोल्हापूरहून निघालो. अकरा वाजता रत्नागिरीला पोहोचलो. रत्नागिरीला मी तत्पूर्वी कधीच आलो नव्हतो. त्यामुळे कोकणचे सृष्टी सौंदर्य आणि रमणीय वातावरण या गोष्टी मला नवीनच होत्या. आम्ही सावरकरांच्या घरीच उतरलो. त्यांचे घर लहानसे दुमजले होते. मागच्या अंगणात नारळी आणि केळी यांची गर्दी होती. पण आमचे लक्ष त्यांच्या घराकडे थोडेच होते?  सावरकर कधी दिसतील? हा एकच ध्यास मनात होता.
*तेजस्वी व्यक्तिमत्व *
दहा पंधरा मिनिटांनी नमस्कारसाठी हात छातीवर जोडलेले असे सस्मितवदन सावरकर एका दारातून प्रविष्ट झाले. त्यांचा सतेज गौर वर्ण आणि विलक्षण प्रभावी डोळे यांचा माझ्या अंत:करणावर जो परिणाम झाला, तो अद्यापही मी विसरलेलो नाही. त्यांची बोलण्याची पद्धत तर त्याहीपेक्षा चित्तवेधक होती. आवाज मऊ आणि लवचिक होता. पण त्याच्यात एक विलक्षण धार आणि ठसका भरलेला होता. दहा-पंधरा मिनिटेच आमची पहिली मुलाखत झाली, पण तेवढ्यात अनेक गोष्टींची चर्चा झाली. अनेक सुभाषितांची आणि संदर्भांची खैरात झाली. अगत्य, उत्कटता आणि आत्म्यियता यांनी त्यांचे हृदय तुडुंब भरलेले आहे असा मनोमन प्रत्यय आला. अंतरात्मा तृप्त झाल्यासारखे वाटले.
    सावरकरांच्या घरी आम्ही दोन दिवस राहिलो. सबंध दिवस त्यांचे वाचन आणि चिंतन चाललेले असे. त्यामुळे दिवसातून काही थोडा वेळ त्यांच्याशी बोलावयास मिळे. भोजनाला मात्र आम्ही सर्व एकत्र बसत असु. प्रकृतीसाठी त्यांना अनेक पथ्य पाळावी लागत. राजकारणाविषयी आम्ही विशेष बोललो नाही, पण जातीच्छेदन, अस्पृश्यता निवारण आणि मराठी भाषेचे शुद्धीकरण या विषयावर मात्र त्यांचे विचार आम्हाला विस्ताराने ऐकावयास मिळाले. 'हिंदू समाजाची कशी सुधारणा होणार?' या विषयावर अनंतरावांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्याच दिवशी माझे जाहीर भाषण झाले. त्या प्रसंगी सावरकरांनी हजर राहण्याचे कबूल केले होते, पण ऐनवेळी प्रकृती स्वास्थ्य बिघडल्यामुळे त्यांना येता आले नाही.
*चैतन्यदायी सहवास*
सावरकरांना भेटण्याचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी त्यांना आमंत्रण देणे हा होता. त्यांच्या दौऱ्याची रूपरेषा आखून आणि नक्की करून आम्ही त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर काही दिवसांनी ते कोल्हापुरात आले. त्यांचा मुक्काम हंस  पिक्चर्स मध्येच होता. सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य हे आहे की जेथे जेथे ते जात, तेथे तेथे आपल्या विचारांच्या प्रभावाने भोवतालचे वातावरण संपूर्ण बदलून टाकत. अवघ्या दोन दिवसात त्यांनी हंस पिक्चर्सचा परिसर संपूर्ण मराठी मय करून टाकला. आज भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये अनेक इंग्रजी शब्दांचे जे देशी पर्याय रूढ झालेले आढळतात, त्याचा प्रारंभ त्याचवेळी सावरकरांनी केला. कोल्हापुरात विविध विषयांवर त्यांची अनेक व्याख्याने झाली. सावरकरांचे वय त्यावेळी बावन त्रेपन वर्षाचे असेल. त्यांच्या ऐन तारुण्यातल्या व्याख्यानाच्या अनेक 'दंतकथा' आम्ही पूर्वी ऐकल्या होत्या. एखाद्या नागासारखे त्यांचे व्यक्तिमत्व चपल आणि प्रखर होते, आणि वाणीमध्ये विद्युलतेचा कडकडाट होता ,असे त्यांचे एक समकालिन पुण्यपुत्तनस्थ 'पुराणपुरुष' म्हणत असत. तो प्रत्यय संपूर्णतया यावेळी येणे अर्थातच शक्य नव्हते. पण त्यांच्या वाणी मधील विद्युलता मात्र पूर्वीच्याच दिमाखाने कडाडत होती, असा त्यावेळी भास झाला. लांब लांब उड्या मारीत जसा एखादा चित्ता जंगलातून धावतो तशी एक एकामागून एक लांब सडक आणि प्रभावी वाक्ये झपाट्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडत. त्यामध्ये एक शब्द किंवा एक अक्षर मागे पुढे किंवा इकडचे तिकडे होत नसे.  प्रत्येक वाक्यात प्राचीन इतिहास असे किंवा रोमहर्षक घटनांचे उल्लेख अगदी ठासून भरलेले असत. वाचनाचे आणि व्यासंगाचे एवढे प्रचंड ओझे पाठीवर घेऊन त्यांची वाक्ये एवढ्या वायूवेगाने कशी चालू शकत? या विचाराने श्रोतुवृंद थक्क होत असे.
    कोल्हापुरा नंतर काही दिवसांनी सावरकर पुण्यात आले. त्यावेळी काही दिवस त्यांचे वास्तव्य आमच्या बालमोहन नाट्यमंडळीच्या बिऱ्हाडी असल्याने त्यांचे यथास्थित सानिध्य आम्हाला लाभले. तेथे त्यांच्या पूर्व चरित्रामधल्या कित्येक अद्भुतरम्य गोष्टी आम्हाला खुद्द त्यांच्या तोंडूनच ऐकायला मिळाल्या. ते दिवस मला अद्याप आठवतात. सावरकरांच्या पराक्रमाची एक एक वर्णने ऐकून  डोके भणाणून जाई, पायापासून डोक्यापर्यंत रक्त उसळून जाई. त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या माणसांना आपणासारखे तत्काळ करून टाकण्याचे विलक्षण जबरदस्त सामर्थ्य सावरकरांच्या वाणीत आणि व्यक्तिमत्वात आहे, याचा त्यावेळी आम्हाला अनुभव आला. सावरकरांच्या सहवासामुळे त्यांचे समग्र साहित्य आणि चरित्र विषय ग्रंथ पुन्हा एकदा वाचून काढण्याची प्रेरणा मनात निर्माण झाली. आणि ते काम एका पंधरवड्याच्या आत मी झपाट्याने पूर्ण केले. सावरकरांच्या उत्तेजनामुळे मी आणि माझे मित्र नि ज्ञानप्रकाशचे लोकप्रिय संपादक काकासाहेब लिंमये यांनी 'हिंदू समाज सेवा संघ' आणि 'मराठी भाषा शुद्धीकरण मंडळ' अशा दोन संस्था स्थापन केल्या. काकासाहेबांच्या हाती दैनिक ज्ञानप्रकाश असल्यामुळे सावरकरी टाकसाळी मधील अनेक चलनी नाणी त्यांनी रोजच्या रोज आपल्या पत्रात वापरून लोकप्रिय करून टाकली. 'दिनांक' हा शब्द आज इतका परिचीत वाटतो पण तो शोधायचे श्रेय जसे सावरकरांना आहे, तसे तो रूढ करण्याचे काकासाहेबांनाही आहे. *काँग्रेसवाल्यांचा अपशकुन*
      सावरकरांचा पुण्यामधील पहिला  जाहीर सत्कार 'शिवाजी आखाड्यात' झाला. या समारंभाचा स्वागताध्यक्ष मी होतो. हा सत्कार होण्याचे पुण्यामध्ये जेव्हा जाहीर झाले, तेव्हा सदर सत्कार समारंभात कोणाही काँग्रेसवाल्याने भाग घेऊन नये असे काकासाहेब गाडगीळ यांनी एक पत्रक काढले. वस्तुतः सावरकर त्यावेळी कोणत्याही पक्षात नव्हते.  हिंदू महासभेचा आणि त्यांचा त्यावेळी काहीही संबंध नव्हता. असे असताना त्यांच्या पुण्यातील पहिल्या पहिल्या सत्काराला काँग्रेसने विरोध करायचे काही कारण नव्हते. असा विरोध करण्यासारखे निदान सावरकरांच्या हातून काही घडले नव्हते.
      शिवाजी आखाड्यातील सावरकरांची सभा प्रचंड झाली. त्याप्रसंगी त्यांचे स्वागत करताना "स्वातंत्र्यवीर" हे विशेषण मी प्रथम त्यांच्या मागे उपयोजिले. त्या दिवशी सावरकरांच्या अंगात पुष्कळ ताप होता. तरीही तशा स्थितीत त्यांनी दीड तास जे उस्फुर्त आणि तेजस्वी भाषण केले, ते ऐकून पुणेकर स्तिमीत झाले. जवळ जवळ 30/ 32 वर्षांनी सावरकर पुण्यामध्ये जाहीर रीतीने प्रकट झाले होते. त्यांचे समकालीन त्या सभेत किती उपस्थित होते? हे काही सांगता येत नाही. पण सावरकरांबद्दल पुणेकरांच्या मनात ज्या अद्भुतरम्य कल्पना आणि अपेक्षा वास्तव्य करून होत्या, त्या त्या दिवशी आपल्या प्रभावी वक्तव्याने सावरकरांनी यथास्थिक परिपूर्ण केल्या. त्यावेळी गायकवाडवाड्यात सावरकरांचा मुक्काम होता. डॉ. मुंजे, अण्णासाहेब भोपटकर, कर्मवीर राजवाडे, वालचंद कोठारी अन् मी अशी आम्ही सर्व मंडळी सावरकरांच्या भोवती त्यावेळी जमत असू आणि सावरकरांनी यापुढे कोणत्यातरी राजकीय पक्षात शिरावयास हवे असा एकंदर आमच्या चर्चेचा सूर असे. 'लोकशाही स्वराज्य पक्षाचा' जिर्णोद्धार सावरकरांनी करावा, अशी ही एक सूचना प्रामुख्याने त्यावेळी त्यांच्यापुढे मांडण्यात आली. सावरकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असा माझा आग्रह होता. पण गांधीजींचे नि आपले सुताराम जमणे शक्य नाही, असे सावरकर पुन्हा पुन्हा म्हणत. 1906 साली विलायतेत असताना Cult of Killing अथवा 'मारो- काटो का पंथ'  या नावाचे एक चोपडे गांधीजींनी लिहून आपल्या विरुद्ध ब्रिटिश सरकारकडे चहाड्या केल्या होत्या, त्याचा साध्यंत इतिहास सावरकरांनी त्यावेळी मला सांगितला. काँग्रेसचे पहिले मंत्रिमंडळ त्यावेळी मुंबई इलाख्यात नुकतेच अधिकारारूढ झाले होते. त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्याला विलक्षण धार चढली होती. म्हणून अशावेळी सावरकरांसारखा क्रांतिकारक जर काँग्रेसमध्ये प्रविष्ट झाला, तर त्या लढ्यामध्ये एक निराळे सामर्थ्य निर्माण होईल अशी माझी धारणा होती. पण सावरकरांच्या डोक्यामध्ये त्यावेळी निराळ्यास विचारांचे तांडव माजले होते.
 *काँग्रेसवाल्यांचा फजितवाडा*
     मध्यंतरी एक विलक्षण घटना घडून आली. पुण्यातील विद्यार्थ्यांनी सावरकरांना मानपत्र देण्यासाठी सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात एक सभा बोलावली. या सभेचे आमंत्रण श्री ग.वि. केतकर यांनी दिले होते. तथापि या मानपत्राच्या कल्पनेला काँग्रेस मधल्या काही समाजवादी विद्यार्थ्यांचा विरोध होता. त्यामुळे या सभेत काहीतरी गडबड होणार, अशी तातडीची बातमी कोणी मला येऊन सांगितली.  तेव्हा वस्तूत:   या प्रकरणाशी माझा काही संबंध नसताना मी सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यामध्ये लगबगिने केलं गेलो. मला पाहताच काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी गिल्ला केला. ते ओरडले ,"ही विद्यार्थ्यांची सभा असताना अत्रे येथे कसे?" तेव्हा मी उत्तरलो की," या सभेच्या अध्यक्षस्थानी जर श्री. ग. वि. केतकर हे बसू शकतात, तर माझ्या येथे येण्याबद्दल तुमची हरकत का असावी?" त्याबरोबर कोणीतरी एक विद्यार्थी किंचाळला की या सभेचे अध्यक्षस्थान आचार्य अत्रे यांनी स्वीकारावे. त्याला दुसऱ्या एका विद्यार्थ्याने अनुमोदन दिले. त्याबरोबर अनेकांनी टाळ्या वाजवल्या. मी सरळ व्यासपीठावर चालून गेलो व ग. वि. केतकर यांच्या जागी जाऊन बसलो. आता सभेला सुरुवात होणार, तोच कोणीतरी विजेचे दिवे बंद केले, आणि सभागृहात गडद अंधार पसरला आणि एकदम खुल्या मारामारीला सुरुवात झाली. काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी अर्थात चारी बाजुनी माझ्यावर हल्ला चढवला. मी हाताने एकेकाला जेव्हा मागे ढकलू लागलो, तेव्हा मग माझ्या भोवतालची गर्दी कमी झाली. एवढ्यात कोणीतरी पोलिसांना बोलावले. फरासखान्यांमधून शिपायांची एक तुकडी दाणदाण पाय आपटीत आत घुसली आणि मला पकडून त्यांनी सभागृहाबाहेर काढले.
      रस्त्यावर आणून पोलिसांनी मला सोडून दिले. तसाच मी ज्ञानाप्रकाशाच्या कार्यालयात गेलो. काकासाहेब लिमये चिंताक्रांत होऊन माझी वाट पाहत बसले होते. नंतर आम्ही दोघांनी या सर्व प्रकाराचा साध्यंत इतिहास ज्ञानप्रकाशात दुसऱ्या दिवसाच्या अंकात प्रसिद्ध करून काँग्रेसवाल्या विद्यार्थ्यांची न भूतो न भविष्यती अशी फटफजिती केली.
  *जीवनाची कृतार्थता*
     पुढे टिळक स्मारक मंदिरात पुण्यामधल्या विद्यार्थ्यांनी जेव्हा सावरकरांना जाहीर मानपत्र दिले, त्यावेळी 'आचार्य अत्रे' यांना तुम्ही येथे आणल्या वाचून या मानपत्राचा स्वीकार मी करणार नाही, असा सावरकरांनी हट्ट धरला. मी त्यावेळी कुठेतरी होतो. विद्यार्थ्यांची एक टोळी माझ्याकडे धावत आली, त्यांनी मला अक्षरशः पकडूनच त्या समारंभाला नेले  सभागृहात प्रवेश करता साऱ्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. व्यासपीठावर बसलेले सावरकर एकदम उठून उभे राहिले, आणि त्यांनी मला कडकडून मिठी मारली. माझ्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय असा तो क्षण होता. सावरकरांचे मला जेव्हा जेव्हा स्मरण होते, तेव्हा तेव्हा  ह्याच प्रसंगाची मला आठवण होते. त्यावेळी मला जी धन्यता वाटली, तीच आजही  वाटत आहे. जीवन कृतार्थ झाल्याचा त्या क्षणी मला भास झाला. एवढे सांगितल्यावर अधिक काय लिहावे बरे?
१३/३/१९६६

सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे

(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन/आंतरजालावरून साभार)


रविवार, ३० जून, २०२४

सावरकर आणि हिंदू सभा

  🔹 अत्रे उवाच... (५)

१९२४ साली हिंदू सभा ही मुख्यतः समाजसुधारणेचे नि धार्मिक कार्य करणारी एक संस्था म्हणून ओळखली जाई. पंडित मदन मोहन मालवीय यांच्यासारखे काँग्रेसचे नेते हिंदू सभेचेही नेते होते. हिंदू सभेची वार्षिक अधिवेशाने अनेकदा काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनांना जोडूनच त्यावेळी भरत असत. म्हणून राजकारणापासून अलिप्त राहण्याचा सरकारी निर्बंध पाळुनही सार्वजनिक कार्य करीत राहण्यासाठी हिंदू सभेच्या आंदोलनात भाग घेणे स्वातंत्र्यवीरांना भाग पडले. पण त्या क्षणापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा एवढा प्रचंड प्रभाव हिंदू सभेवर पडला की सावरकर म्हणजे हिंदू सभा आणि हिंदू सभा म्हणजे सावरकर असे जणू समीकरणच झाले.


स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदू सभेचे नेतृत्व जे लाभले ते काही प्रमाणात तरी योगायोगानेच होय असे म्हणणे आश्चर्यकारक वाटले, तरी ते खरे आहे. इंग्रज सरकारला भारतीय जनतेपुढे मान तुकवत स्वातंत्र्यवीरांच्या जन्मठेपेची मुदत संपण्याआधीच त्यांना अंदमानच्या तुरुंगातून मुक्त करावे लागले, आणि रत्नागिरी येथे आणून ठेवावे लागले. मात्र त्यांनी रत्नागिरी बाहेर जाता कामा नये, आणि राजकारणात भाग घेता कामा नये, असे दोन निर्बंध त्यांच्यावर सरकारने लादले. या निर्बंधांचा ते भंग करीत नसल्याची खातरजमा करण्यासाठी त्यांच्यावर गुप्तचरांची अहोरात्र कडक पाळत ठेवण्यात आली. अशा स्थितीत स्वातंत्र्यवीरांनी ते निर्बंध मोडले असते तर तुरुंगांमध्ये आमरण पिचत पडण्याखेरीज आणखी काही करणे त्यांना शक्य नव्हते. पण त्याचबरोबर राष्ट्रासाठी झटल्याशिवाय स्वस्थ बसणे हा स्वातंत्र्यवीरांचा पिंड नव्हता. म्हणून निदान उघडपणे तरी राजकारणाशी संबंधित नसलेल्या सामाजिक कार्यात भाग घेण्याचा उद्देश त्यांनी जाहीर केला. त्या काळात म्हणजे १९२४ साली हिंदू सभा ही मुख्यतः समाजसुधारणेचे नि धार्मिक कार्य करणारी एक संस्था म्हणून ओळखली जाई. पंडित मदन मोहन मालवीय यांच्यासारखे काँग्रेसचे नेते हिंदू सभेचेही नेते होते. हिंदू सभेची वार्षिक अधिवेशाने अनेकदा काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनांना जोडूनच त्यावेळी भरत असत. म्हणून राजकारणापासून अलिप्त राहण्याचा सरकारी निर्बंध पाळुनही सार्वजनिक कार्य करीत राहण्यासाठी हिंदू सभेच्या आंदोलनात भाग घेणे स्वातंत्र्यवीरांना भाग पडले. पण त्या क्षणापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा एवढा प्रचंड प्रभाव हिंदू सभेवर पडला की सावरकर म्हणजे हिंदू सभा आणि हिंदू सभा म्हणजे सावरकर असे जणू समीकरणच झाले. त्यानंतर  इंग्रज सरकारने १९३६ मध्ये अमलात आणलेल्या प्रांतिक स्वायत्ततेच्या कायद्यानुसार मुंबई इलाख्यात अधिकारारूढ झालेल्या 'जमनादास मेहता' मंत्रिमंडळाने १९३७ मध्ये सावरकरांवरील सर्व निर्बंध रद्द केल्यावर त्यांच्याच नेतृत्वाखाली हिंदू सभा एक पक्ष म्हणून प्रत्यक्ष राजकारणाच्या आखाड्यात उतरली. या सावरकरांनी इंग्रज साम्राज्यवाद्यांची राजवट भारतामधून नष्ट करून राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 'अभिनव भारत' या क्रांतीकारक संघटनेची स्थापना करण्यात एकेकाळी पुढाकार घेतला होता, आणि त्यांनी इंग्लंडमध्ये स्थापलेल्या त्या संघटनेच्या शाखेत बॅरिस्टर असफअली नि सिकंदर हयात खान हे मुसलमान कार्यकर्तेही होते, त्या सावरकरांनी निर्बंध मुक्त झाल्यावर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होण्या ऐवजी हिंदू सभे सारख्या धर्माधिष्ठित पक्षाचे नेतृत्व स्वीकारल्यामुळे त्यांच्याविषयी तोवर आधार बाळगणारे अनेक प्रामाणिक काँग्रेसवादी देशभक्त आणि अनेक क्रांतिकारकही त्यांच्यापासून दुरावले. पण सावरकरांच्या या भूमिकेमागे एक निश्चित तात्विक दृष्टिकोन होता.

आसिंधूसिंधूपर्यंता यस्य भारतभूमिका ।
पितृभू:पुण्यभूश्चैव स वै हिंदू: इति स्मृत: ।।


अशी सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या होती. "हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या सिंधू नदीपासून कन्याकुमारीच्या सागर तीरापर्यंत पसरलेल्या भारताच्या भूमीला जो जो आपले पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू ." अशी सावरकरांची भूमिका होती. "मुसलमान, ख्रिस्ती, यहुदी इत्यादी भारतामधल्या लोकांची पितृभूमी भारत जरी असली तरी त्यांची धार्मिक श्रद्धास्थाने भारताबाहेर असल्याने ते भारताला आपली पुण्यभूमी मानत नाहीत, आणि म्हणून ते हिंदू राष्ट्राचे घटक नव्हेत. तसेच आशिया खंडातल्या चीन, जपान आदी देशांमधले बौद्ध धर्मीय लोक भारताला आपली पुण्यभूमी मानीत जरी असले तरी त्यांची पितृभूमी वेगळी असल्यामुळे तेही हिंदू नव्हेत", असे सावरकरांचे म्हणणे होते. "मात्र भारतामध्ये बौद्ध, जैन, शीख इत्यादी धर्मश्रद्धा अनुसरणारे लोक आपला धर्म हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे असे सरी मानीत असले तरी भारत हीच त्यांची पितृभूमी आणि पुण्यभूमी असल्यामुळे ते हिंदूच होत.",असे सावरकर प्रतिपादन करीत. भारतामधल्या परिस्थितीत धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा एकमेकांपासून सर्वस्वी वेगळ्या काढणे अशक्य आहे, या भूमिकेतून सावरकरांची ही विचारसरणी निर्माण झाली होती. इंग्रज साम्राज्यवाद्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात फूट पाडण्यासाठी मुस्लिम जातीयवादाचा जो सवतासुभा उभा केला होता, त्याचा सावरकरांवर झालेला परिणामच त्यांच्या या विचारसरणीत व्यक्त झाला होता. मुस्लिम पुढाऱ्यांना काँग्रेसच्या चळवळीत आणण्यासाठी लोकमान्य टिळकांना त्यांच्याशी लखनौ करार करून स्वराज्यामध्ये मुसलमानांना वेगळ्या सवलती देण्याचे मान्य करावे लागले. तुर्कस्तानच्या खलिफा या मुस्लिम धर्मगुरूचे राज्याधिकार इंग्रजांनी काढून घेतल्यामुळे त्या विरुद्धची चळवळ झाली तिची सांगड गांधीजींनी स्वराज्याच्या चळवळीशी जेव्हा घातली, तेव्हाच काँग्रेसच्या सत्याग्रहात महंमद अली, शौकात अली इत्यादी मुस्लिम पुढारी सामील झाले. अखेर तर मुसलमानांसाठी भारताची फाळणी करून पाकिस्तान हे वेगळे राष्ट्र निर्माण केले पाहिजे, असा जात्यंध आग्रह जिनांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने धरला, आणि धर्मांध यादवीत रक्ताचे पाट वाहून तो तडीस नेला.  धर्मभेदावर आधारलेल्या हा वेगळेपणाचा हट्ट जे जे धरतात त्यांना स्वतःला या राष्ट्राचे नागरिक म्हणून घेण्याचा अधिकार नाही, अशी सावरकरांची निष्ठा होती. म्हणूनच हिंदुत्वनिष्ठा राष्ट्रनिष्ठेची मुळीच विसंगत नाही, असा सावरकरांचा ठाम सिद्धांत होता. गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मुस्लिम जातीयवाद, त्यांची मनधरणी करण्याचे धोरण स्वीकारले, ते राष्ट्राच्या ऐक्याला , स्वातंत्र्याला, सुरक्षिततेला, प्रगतीला नि स्थैऱ्याला मारक ठरल्याखेरीच राहणार नाही, असा खणखणीत इशारा या देशांमध्ये सगळ्यात प्रथम जर कोणी दिला असेल, तर तो सावरकरांनीच होय! पण अशी वेगळेपणाची भावना न बाळगता भारताशी जो जो एकनिष्ठ राहील ,त्याच्या विरुद्ध केवळ धार्मिक कारणांसाठी कोणताही भेदभाव करता कामा नये, असेही सावरकर निक्षून सांगत. सावरकरांच्या हिंदुत्वनिष्ठेची घडण जी होती ती अशा प्रकारची होती.
९/३/१९६६.

सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे

सावरकर आणि राष्ट्ररक्षण

 🔹 अत्रे उवाच... (४) 

पण अजूनही राष्ट्राला संरक्षण दृष्ट्या समर्थ नि स्वयंपूर्ण करण्याच्या कार्यामध्ये काँग्रेस राजवटी मधील बेपर्वाई, दिरंगाई, नि ढिलाई संपूर्णपणे दूर झालेली नाही. देशामधल्या प्रत्येक तरुणाला लष्करी शिक्षण देऊन राष्ट्राचे सैनिकीकरण करण्याची आवश्यकता तर राज्यकर्ते अद्याप अमान्य करीत आहेत. पण राष्ट्राचे स्वातंत्र्य जर टिकवायचे असेल तर त्यासाठी राष्ट्राचे सैनिकीकरण करण्याची सावरकरांची भूमिका प्रत्यक्षात उतरल्याखेरीस गत्यंतर नाही. तसे घडेल तेव्हाच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऋणाचे राष्ट्र खरोखर उतराई झाले असे म्हणता येईल. 

 स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मठेपेतून बंधमुक्त झाले ,तेव्हा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व गांधीजींच्या हाती गेले होते. सावरकर सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते तर गांधीजी अहिंसेचे उपासक होते. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या देशाभिमानी भारतीय तरुणांनी इंग्रज साम्राज्य सत्तेच्या सैन्यात सामील होऊन आधुनिक युद्धतंत्राचे आणि अद्ययावत शस्त्रास्त्रे वापरण्याचे शिक्षण घेतले पाहिजे. त्याचवेळी सैन्यात स्वातंत्र्याभिमानी गुप्त संघटना उभारली पाहिजे, देशामधल्या इतर तरुणांनीही सैनिक शिक्षण देणाऱ्या स्वयंसेवक संघटना सर्वत्र उभारल्या पाहिजेत आणि अखेर त्या भारतीय सैनिकांनी, स्वयंसेवकांनी एवढेच काय पण सर्व भारतीय जनतेने देशव्यापी संघटित सशस्त्र उठाव करून इंग्रजांची सत्ता उलथून पडली पाहिजे आणि भारताचे क्रांतिकारक स्वतंत्र सरकार स्थापन केले पाहिजे अशी सावरकरांची स्वातंत्र्य प्राप्तीची योजना होती. याउलट स्वातंत्र्यलढ्यासाठी कसलीही सशस्त्र संघटना उभारायला गांधीजींचा विरोध होता. निशस्त्र सत्याग्रहाच्या मार्गाने इंग्रजांचा हृदयपालट करून नि त्याला प्रेमाने जिंकून स्वराज्य मिळवता येईल असे गांधीजींचे म्हणणे होते. यावरही कळस हा की इंग्रज सरकारच्या नोकरीतील भारतीय सैनिकांनी आणि पोलिसांनी त्या सरकारविरुद्ध निशस्त्र असहकार सुद्धा करता कामा नयेत, असे गांधीजींचे म्हणणे होते. १९३०-३२ च्या सत्याग्रहात वायव्य सीमा प्रांतातील पठाण सत्याग्रहींवर गोळ्या झाडायला इंग्रज सरकारच्या गढवाली राजपूत पलटणीने नकार दिला, तेव्हा त्या सरकारने त्या पलटणीवर लष्करी खटला भरून त्या पलटणीच्या कॅप्टन चंद्रसिंह आदी प्रमुखांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. गांधीजींचा 'निशस्त्र प्रतिकारा'चा मार्गच त्या राष्ट्राभिमानी गढवाली सैनिकांनी अनुसरला असल्यामुळे गांधीजींनी त्यांच्या सुटकेची मागणी करावी, अशी विनंती केली असता, गांधीजींनी उत्तर दिले," सैनिकांनी अथवा पोलिसांनी शिस्त मोडायला मी उत्तेजन देऊ शकत नाही." गढवाली सैनिकांनी त्यांच्या सरकारचा हुकूम पाळायला हवा होता. इंग्रज साम्राज्यवाद्यांच्या नोकरीतील भारतीय सैनिकांनी आणि पोलिसांनी शिस्तीच्या नावाखाली आपल्या देशाला गुलाम ठेवण्यासाठी आपल्या भारतीय देशबांधवांवर हिंसक दडपशाही करून त्यांचे प्राण घेणेच योग्य होय." ही गांधीजींची अहिंसात्मक स्वातंत्र्य लढ्याची व्याख्या वाचून त्यावेळी सगळे देशाभिमानी लोक हतबुद्ध झाले होते. अखेर भारताला स्वराज्य जे मिळाले ते गांधीजींच्या अहिंसेमुळे नव्हे, तर १९४२ मध्ये सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केलेल्या सशस्त्र क्रांतीमुळे, देशामधल्या ठिकठिकाणीच्या देशभक्तांनी केलेल्या सशस्त्र उठावामुळे, नेताजी सुभाष बोस यांनी 'आझाद हिंद सेना' उभारून चेतावलेल्या क्रांती यज्ञामुळे! १८ ते २२ फेब्रुवारी १९४६ रोजी हजारो भारतीय आरमारी नाविकांनी इंग्रज सत्तेविरुद्ध केलेल्या सशस्त्र बंडामुळे, आणि त्या युद्धोत्तर काळात देशावर पेटलेल्या लढ्यामुळेच होय. हे ऐतिहासिक सत्य आहे. काँग्रेसच्या गांधीवादी नेत्यांनी या सशस्त्र क्रांतीचे नेतृत्व करण्याऐवजी अहिंसेच्या नावाने इंग्रजांची आणि मुस्लिम लीगशी स्वराज्यासाठी सौदा पटवण्याचे मार्ग पत्करल्यामुळे भारताला जर काय मिळाले असेल, तर ते म्हणजे राष्ट्राची फाळणी, पाकिस्तानची स्थापना, भयानक जातीय यादवी आणि काश्मीरचा झगडा हेच होय. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सावरकरांनी दाखवलेला सैनिकीकरणाचा आणि सशस्त्र क्रांतीचा मार्ग किती योग्य होता याची साक्ष अशा रीतीने इतिहासाने दिलेली आहे. पण सावरकरांच्या द्रष्टेपणा केवळ स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वीच्या कालापुरतास मर्यादित नव्हता. भारताला स्वराज्य मिळाल्यावरही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वराज्याच्या राज्यकर्त्यांना आणि भारतीय जनतेला पुन्हा बजावले की," या स्वराज्याचे रक्षण जर करायचे असेल, तर त्यासाठी दोन उपाय तत्काळ योजले पाहिजेत. पहिला उपाय म्हणजे राष्ट्राच्या सीमा केवळ नकाशावर नव्हे, तर प्रत्यक्ष भूमीवर तात्काळ आखून निश्चित केल्या पाहिजेत. दुसरा उपाय म्हणजे राष्ट्राला संरक्षण दृष्ट्या समर्थ नि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी देशांमध्ये शस्त्रास्त्रांचे कारखाने प्रचंड प्रमाणावर उभारले पाहिजेत. तसेच देशाचे सैन्य बळ वाढवले पाहिजे, नि सर्व तरुणांना सैनिकी शिक्षण दिले पाहिजे. पण स्वराज्याचे काँग्रेसवाले राज्यकर्ते राष्ट्ररक्षणाकडे दुर्लक्ष करून दारूबंदी, अंबर चरखा ,खादी इत्यादी खुळांवर अब्जावधी रुपयांचा चुराडा करण्यात एवढे दंग झाले होते आणि स्वतंत्र शांततावादी परराष्ट्रीय धोरणाच्या मूलतः योग्य सिद्धांतामध्ये गांधीजींच्या अहिंसावादाची भेसळ या राज्यकर्त्यांनी केल्यामुळे आक्रमणाच्या धोक्याविषयी ते इतके गाफील बनले होते, की स्वातंत्र्यवीरांच्या इशाऱ्याकडे त्यांनी सपशेल दुर्लक्ष केले. चीनला आणि पाकिस्तानला भिडलेल्या भारताच्या सीमा नकाशावर आखल्या गेल्या आहेत, एवढ्यावरच या राज्यकर्त्यांनी समाधान मानले. प्रत्यक्ष भूमीवर या सीमा आखण्याचा आणि त्यांच्या रक्षणासाठी सैनिकांच्या चौक्या ठाई ठाई उभारण्याचा प्रयत्नही राज्यकर्त्यांनी केला नाही. याचा परिणाम असा झाला की चिनी राज्यकर्त्यांनी या सीमा विषयी १९५४ पासून सतत कुरापती काढून नि सशस्त्र हल्ल्ले चढवून अखेर १९६१ मध्ये भारतावर आक्रमण केले. आणि पाकिस्ताननेही गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये निम्म्या कच्छवर हक्क सांगून कच्छमध्ये सेना घुसवल्या. १९६२ मधील चिनी आक्रमणानंतर काय ती काँग्रेसवाल्या राज्यकर्त्यांना राष्ट्राचे संरक्षण सामर्थ्य वाढवण्याची गरज पडली, आणि त्या दिशेने त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा फायदा पाकिस्तानने गेल्या ऑगस्टमध्ये काश्मीरवर केलेल्या आक्रमणाच्या वेळी राष्ट्राला मिळून त्या आक्रमणाचा पराजय करता आला. पण अजूनही राष्ट्राला संरक्षण दृष्ट्या समर्थ नि स्वयंपूर्ण करण्याच्या कार्यामध्ये काँग्रेस राजवटी मधील बेपर्वाई, दिरंगाई, नि ढिलाई संपूर्णपणे दूर झालेली नाही. देशामधल्या प्रत्येक तरुणाला लष्करी शिक्षण देऊन राष्ट्राचे सैनिकीकरण करण्याची आवश्यकता तर राज्यकर्ते अद्याप अमान्य करीत आहेत. पण राष्ट्राचे स्वातंत्र्य जर टिकवायचे असेल तर त्यासाठी राष्ट्राचे सैनिकीकरण करण्याची सावरकरांची भूमिका प्रत्यक्षात उतरल्याखेरीस गत्यंतर नाही. तसे घडेल तेव्हाच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऋणाचे राष्ट्र खरोखर उतराई झाले असे म्हणता येईल .         


५/३/१९६६

सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे
(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक )

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...