शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

  सावरकर आमचे... पण   -  ४  

बुद्धिवादाची तर्कसंगत परखड मांडणी स्वीकारीत सावरकरांनी रत्नागिरी येथील स्थानबद्धतेत असताना केलेले काम हे कृतिवीर सुधारकाचे होते. त्यातून समाजाशीच लढताना समानतेचे धडे किती महत्त्वाचे आहेत, ते स्पष्ट करण्यासाठी मांडलेले तत्त्वज्ञान हे जुने जोखड झुगारून द्या असे सांगणारे होते ते केवळ क्रांतिकारक वा बंडखोरी करणाऱ्या तरुणांसारखे नव्हे तर कृतिशील तत्त्वज्ञान्यासारखे ठरले. संस्था- संघटनांमधील त्यांचटा बैठकीतील वावर, त्यांची भाषणे आणि युक्तिवाद हा याच बुद्धिवादी विचारवंताची, सारासार विवेकाने मांडलेल्या आणि लोकांनाही विचारप्रवृत्त करणाऱ्या धर्म नव्हे तर कर्ममार्तंडासाऱखा आहे.

 बुद्धिवादी परंपरेचे पुढचे पाऊल


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हिंंदुत्ववादी आणि बुद्धिवादी होते. विज्ञानायुगाला आपले म्हणत नवीन काळाला सामोरे जाणारे आणि सतत कालनिहाय बदल करण्याचे अद्ययावत राहाणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होत. पेशवाईची अखेर १८१८ मध्ये झाली आणि ब्रिटिश सत्ता साऱ्या हिंदुस्थानात लादली गेली. धर्म, संस्थाने यांच्या मक्त्यामध्ये सारा समाज गुंतलेला होता. त्या ठिकाणी संपूर्ण राष्ट्र आणि ते कसे असावे, याची काही कल्पना मांडलेली नव्हती. स्वराज्य या छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेला पेशवाईमध्ये मोठ्या प्रमाणात रुजवले गेले. मोगलाई मुस्लीम राजवटीला अंकुश लावण्यात आणि जरब बसवण्यात पेशवाईमध्ये मराठा राजवटीने यश मिळवले होते. मात्र त्याचवेळी ब्रिटिशांची सत्ता आली. थोडक्यात एक राजवट संपवून हिंदवी स्वराज्याची कल्पना रुजण्यापूर्वीच पुन्हा एकदा पारतंत्र्याचा फटका भारताला बसला. मुस्लीम राजवटीमधून मराठेशाहीने पेशवाई काळात उत्तर भारतात जम बसवण्यास सुरुवात केली होती मात्र पेशवाईतील अंतस्थ हेवेदावे, कलह यामुळे पुन्हा ही स्वराज्याची जाण ठेवणारी सत्ता लयास गेली. उत्तर पेशवाईतील अनेक अयोग्य प्रथांनी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. समाजातील एकूणच आर्थिक ताकदही खचली होती, हे अमान्य करता येणार नाही. अशा स्थितीत ब्रिटिश येण्याचे दु:ख सर्वसामान्यांना फार होईल अशी अपेक्षाही खरे म्हणजे करणे योग्य ठरणार नाही. पेशवाईतील हा उत्तर कालखंड आणि त्याचबरोबर अन्य मुस्लीम आणि हिंदु राजवटींमधील - संस्थानांमधील कलह, आर्थिक स्थिती, ब्रिटिशांचे कवायती सैन्याचे जोखड, यामुळे आर्थिक ताणाचा मोठा दुष्परिणाम जनतेवरही झाला होता. त्यानंतर १८५७ चे स्वातंत्र्य समर होईपर्यंत तसेच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होईपर्यंतचा काळ हा भारतीय जनतेच्यादृष्टीने तसा अधांतर अवस्थेत, अनिश्चिततेच्या गर्तेतच बुडालेला होता. अशात सार्वत्रिक शिक्षणाच्या ब्रिटिशांच्या धोरणामुळे हळू हळू पुन्हा वेगळी दिशा समाजाला मिळू लागली. औद्योगिक क्रांतीचे परिणाम जगभरात होत होतेच ते भारतातही दिसू लागले होते. जगातील विविध राजकीय स्थित्त्यंतरे, फ्रेंच राज्यक्रांतीसारख्या घटना आणि त्यामुळे निर्माण झालेली एक वेगळी दृष्टी यामुळे हिंदुस्थानातील शिक्षितांमध्ये विचारप्रवाह वेगळ्या अंगाने वाहू लागला होता. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी, जांंभेकर, गोपाळ गणेश आगरकर, न्या. रानडे, नामदार गोखले,  लोकमान्य टिळक, काळकर्ते परांजपे, ज्योतिराव फुले आदी महाराष्ट्रातील विविध व्यक्तींच्या लेखनाने विचाराने लोकांमध्ये वैचारिक समज निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. या व्यक्तींच्या लेखनांनी समाजाचे डोळे उघडण्यासाठी झालेली वाटचाल ही मोठी होती. त्यातही विशेष करून काँग्रेसमध्ये असणारे जहाल व मवाळ गट, क्रांतिकारकांच्या बलिदानांच्या घटना यामुळे समाजावर मोठा परिणाम झाला. लोकमनामध्ये विचारांना चालना मिळत होती. केवळ ब्रिटिशांची सत्ता आणि त्यांच्याकडून होणारे अत्याचार, मग ते धार्मिक पद्धतीने असोत की, आर्थिक सामाजिक असो की राजकीय यामधील कच्चे दुवे शोधण्याची दृष्टी लोकांना मिळू लागली. पूर्वीच्या राजेरजवाड्यांच्या नंतरचा हा कालखंड लोकांचा होता, लोकांना त्याचे महत्त्व जरी पूर्ण कळले नसले तरी त्याचे अस्तित्त्व रुजण्यास सुरुवात झाली होती. पाश्चिमात्य शिक्षणामधूनही येथील सुशिक्षितांमध्ये, विचार करणाऱ्यांमध्ये तारतम्य शोधण्याची नजर तयार होऊ लागली होती. यातूनच समाजाबद्दल, धर्माबद्दल, पौर्वात्य आणि पाश्चिमात्यांबद्दल उहापोह होऊ लागला. चांगले आणि वाईट यामधील गुणदोषांचे मूल्यमापन करण्याची मानसिकता लेखकांमध्ये तयार होत होती. अशातूनच बुद्धिवादी परंपरेचे उदय झाला असे म्हणता येते. अशा या बुद्धिवादी परंपरेत समाजसुधारणा हा महत्त्वाचा घटक होता त्यात गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या परखड व्यक्तिमत्त्वाने लिहिलेले निबंध समाजाला वेगळी दिशा देऊ पाहाणारे होते. अशाच बुद्धिवादी परंपरेचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे पुढचे पाऊल होते. 

ब्रिटिशांविरोधातील सशस्त्र क्रांतिकारक म्हणून काम असो की, समाजाला काळाप्रमामाणे बदलण्यासाठी विज्ञानाची कास धरून अद्ययावत होण्याची तळमळ असो, इतिहासातील घटनांवरून लोकांना हिंदुपणाच्या अस्तित्त्वाची जाण करून देणारा लिखाणाचा धागा असो की धर्मग्रंथाना बाजूला सारून विज्ञानच्या कसोटीवर तावून सुलाखून एखादी बाब पारखून घ्या असे सांगत समाजाला विविधांगानी अद्ययावत मानसिकतेत आणण्यासाठी निबंध, भाषणे, लेख, ऐतिहासिक लिखाण यातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धारणेमधील हिंदुत्ववादी नव्हे तर बुद्धिवादी दृष्टिकोन व तळमळ दिसते. धर्माच्या संबंधात त्यांनी मुस्लिम समाजाची मीमांसा करताना कुराणाचा केलेला अभ्यास, ख्रिश्चनांच्या बायबलाचा आणि भारताताली सनातनी वैदिक धर्माचा आणि त्या आधारे रुढ असलेल्या हिंदु धर्माचा अभ्यास करून धर्मग्रंथांबद्दल व्यक्त केलेले ठाम प्रतिपादन पाहाता सावरकरांच्या बुद्धिवादाचाच प्रत्यय यावा. तार्किक आणि तात्त्विकतेने मुद्दे मांडत लोकांना शहाणे करून सोडण्याची त्यांची तळमळ ही स्वातंत्र्यापूर्वीपासून आहे आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढतानाही हिंदुस्थानातील लोकांना राष्ट्र म्हणून जाण करून देण्याची त्यांची पद्धतही सुस्पष्ट आहे. त्यांचे हिंदुत्व हे राष्ट्रनिष्ठ, भूनिष्ठ आणि मानवतेला स्वीकारणारे होते. आक्रमक मुस्लिमांनाही त्यांच्याच शब्दांमध्ये कठोरपणे सुनावणारे होते. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळावे म्हणून बहुसंंख्याक हिंदुंनी आपल्याच एकमेव अशा हिंदुभूमीत जगायचे आहे., त्यासाठी  अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिमाचे लांगूलचालन करण्याची गरज कशी नाही, हे सावरकरांनी परखडपणेच नव्हे तर बुद्धिने पटवूनही त्याचे महत्त्व हिंदुंना कळू शकले नाही, हा भाग वेगळा! 

बुद्धिवादाची तर्कसंगत परखड मांडणी स्वीकारीत सावरकरांनी रत्नागिरी येथील स्थानबद्धतेत असताना केलेले काम हे कृतिवीर सुधारकाचे होते. त्यातून समाजाशीच लढताना समानतेचे धडे किती महत्त्वाचे आहेत, ते स्पष्ट करण्यासाठी मांडलेले तत्त्वज्ञान हे जुने जोखड झुगारून द्या असे सांगणारे होते ते केवळ क्रांतिकारक वा बंडखोरी करणाऱ्या तरुणांसारखे नव्हे तर कृतिशील तत्त्वज्ञान्यासारखे ठरले. संस्था- संघटनांमधील त्यांचटा बैठकीतील वावर, त्यांची भाषणे आणि युक्तिवाद हा याच बुद्धिवादी विचारवंताची, सारासार विवेकाने मांडलेल्या आणि लोकांनाही विचारप्रवृत्त करणाऱ्या धर्म नव्हे तर कर्ममार्तंडासाऱखा आहे. रत्नागिरीतील त्यांचे काम, हिंदुत्व पुस्तकाची धारणा यातून त्यांनी देशाची घडण कशी असावी, यासाठी केलेली वाटचाल ही बुद्धिवादीच होती पण केवळ तात्त्विक नव्हे तर कर्म करीत कृतिवीरची होती. त्यात त्यांचे द्रष्टेपणही होते. आज ना उद्या आपल्याला देशापुढे भवितव्य कसे असेल हे सांगायचे आहे, याची कुढे तरी कळकळ त्यांना असल्याने पुढील काळात राजकारण करण्याची संधी मिळणारच आहे हे ही ज्ञान झाले असल्याने त्यांनी ज्यांच्यासाठी राजकारण करावयाचे त्यां हिंदु समाजाला घडवण्याचे, प्रातिनिधीक स्वरूपात हिंदुपणाची भावना लोकांना समजावत समानता, मानवता ही तत्त्वेही भविष्यात नगरे निर्माण होणार असल्याचे जाणून नागरिकत्त्वाचेच एक प्रकारे धडे देण्याचा हा चंग सावरकरांनी रत्नागिरीत बांधला होता. हाच त्यांच्या बुद्धिवादी व्यक्तिमत्त्वाचा एक अत्युच्च भाग होता. स्वातंंत्र्य म्हणजे केवळ ब्रिटिशांपासून मुक्तता इतकेच अभिप्रेत धरून चालणार नाही, तर त्यासाठी जे स्वातंत्र्य ब्रिटिशाच्या राजवटीतून मुक्त होऊन मिळणार आहे, ते उपभोगण्यासाठी समाजाची पात्रताही असावी लागेल, हेच ध्यानात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीच्या आपल्या स्थानबद्धतेमध्येही केलेले काम हे बुद्धिवादाचा कळस म्हणावा, असेच आहे. १९२४ ते १९३७ च्या दरम्यानचा रत्नागिरीतील त्यांचा कालखंड एखाद्या कर्ममार्तंडासारखा होता. धर्ममार्तंडांना कर्माने, विज्ञानाने, बुद्धिने जगण्यास प्रवत्त करीत देशाची भवितव्यातील वाटचाल कशी असू शकेल हे सांगणारा होता. आजही शंभर वर्षे होत असली तरी तितक्या ताकदीचा बुद्धिवादी कर्ममार्तंड हिंदुस्थानात दिसून येत नाही, हेच सावरकरांच्या बुद्धिवादी जीवनाचे यश म्हणावे की अपयश हे हिंदुस्थानी जनतेनेच ठरवावे.

(क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन)


शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३

  सावरकर आमचे... पण   -  ३  

 सावरकरांचे मत हे बुद्धिवादी, भविष्यदर्शक, सुधारकाच्या अंगाने जाणारे होते. त्यांचे समाजाविषयीचे विचार वा समाजरचनेचा पाया कोणता हवा, या विषयीची मते ही विज्ञाननिष्ठ, अद्ययावततेकडे जाणारी, उपयुक्ततावादाकडे लक्षकेद्रीत करणारी तसेच जात्युच्छेदक हिंदुत्वाला म्हणण्यापेक्षा भौगोलिक क्षेत्राधारित हिंदु समाजाला बौद्धिक, वास्तविक, भावनिक, कर्माधारित आणि चातुरवर्ण्याबद्दल तार्किक विचार करून सर्व हिंदु समाजाला जातिरहीत अशा समान पातळीवर आणू पाहाणारी होती. साम्यवादी विचारसरणीच्या तुलनेत त्यापेक्षाही सरस पद्धतीने हिंदुस्थान या भौगोलिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला हिंदुत्व असे नामाभिधान देणारी सावरकरी विचारसरणी होती. पारंपरिक सनातनी वृत्तीला वा चातुर्वर्ण्याधारित समाजरचनेला छेद देण्यासाठी वैचारिक स्तरावरच नव्हे तर कृतिशील स्तरावरही त्यांनी कामाला सुरुवात केली होती. 

सुधारकाच्या परंपरेतील विचारसरणी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारसरणी नेमकी कशा पद्धतीने तयार होत गेली, ते लक्षात घेणे गरजेचे आहे. लहानपणापासून त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांना ब्रिटिशांविरोधात असणारी भावना आणि त्यामागील पार्श्वभूमी ही बाब जशी महत्त्वाची आहे, तसेच त्यांचे त्या काळातील वागण्यामधील वर्तनामधील आणि कौटुंबिक पार्श्वभूमीमधील धागेदोरेही त्यांची विचारसरणी तयार होण्यामध्ये कारक ठरतात. त्यांच्यावर शि. म. परांजपे यांच्या ‘काळ’ने केलेले संस्कार हे अतिशय महत्त्वाचे वाटतात. युरोपामध्ये गेल्यानंतर त्यांनी तेथे पाहिलेली सामाजिक, धार्मिक, वैचारिक स्थिती ही देखील त्यांना भारतीय स्थितीशी तौलनिक विचार करायला लावणारी ठरली. केवळ युरोपातील धर्मच नव्हे तर अन्य धर्मांसबंधातही त्यांनी भौगोलिक अधिक्य, समाज रचना, धर्माचे महत्त्व, संख्याबळ आदी विविध बाबींचा विचार करताना विज्ञाननिष्ठतेला पायाभूत मानले, जातिव्यवस्थेला बाजूला करण्यासाठी चातुर्वर्ण व्यवस्थेलाही त्यांनी धुत्कारले होते. जात्युच्छेद करण्याचे महत्त्वाचे काम स्पष्ट करीत हिंदु या समाजात कोणतीही जात अभिप्रेत नसल्याचेच सतत स्पष्ट करीत राहिले किंबहुना त्या पद्धतीने विचारतर्क मांडत, युक्तिवाद करीत

काळकर्ते शि. म. परांजपे

राहिले. मात्र ते युक्तिवाद तत्कालिन समाजालाच नव्हे तर आजच्या समाजालाही कळले आहेत, झेपले आहेत, असे म्हणता येत नाही. बुद्धिवादाने जीवन जगण्याची प्रणाली ठरवली गेली पाहिजे, असेच मत त्यांनी समाजासमोर ठेवले. उपयुक्ततावाद हा त्यांचा सिद्धांत खरे म्हणजे त्या काळात त्यांनी मांडलेला अद्ययावततेकडे नेणारा मार्गच होता. व्यावहारिकता, वास्तवता यांचे हे निदर्शकच होते. यामुळेच त्यांनी ऐहिकतेबद्दल वा इहवादाबद्दल मांडलेले विचार हे भविष्यालाच उलगडणारे ठरले. त्यांच्या काळात इतके द्रष्टेपणाचे विचार वा आढावे फार कोणी मांडल्याचे दिसत नाही. किमान समकालीन राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात असणाऱ्या अनेकांकडून ते मांडले गेल्याचे म्हणता येत नाही. यामुळेच सावरकरांचे मत हे बुद्धिवादी, भविष्यदर्शक, सुधारकाच्या अंगाने जाणारे होते. त्यांचे समाजाविषयीचे विचार वा समाजरचनेचा पाया कोणता हवा, या विषयीची मते ही विज्ञाननिष्ठ, अद्ययावततेकडे जाणारी, उपयुक्ततावादाकडे लक्षकेद्रीत करणारी तसेच जात्युच्छेदक हिंदुत्वाला म्हणण्यापेक्षा भौगोलिक क्षेत्राधारित हिंदु समाजाला बौद्धिक, वास्तविक, भावनिक, कर्माधारित आणि चातुरवर्ण्याबद्दल तार्किक विचार करून सर्व हिंदु समाजाला जातिरहीत अशा समान पातळीवर आणू पाहाणारी होती. साम्यवादी विचारसरणीच्या तुलनेत त्यापेक्षाही सरस पद्धतीने हिंदुस्थान या भौगोलिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला हिंदुत्व असे नामाभिधान देणारी सावरकरी विचारसरणी होती. पारंपरिक सनातनी वृत्तीला वा चातुर्वर्ण्याधारित समाजरचनेला छेद देण्यासाठी वैचारिक स्तरावरच नव्हे तर कृतिशील स्तरावरही त्यांनी कामाला सुरुवात केली होती. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यातील टप्पे लक्षात घेतले तर त्यांनी विविध टप्प्यांमध्ये त्या त्या कालातील अनुभव आणि अनुभूतीनुसार विचार मांडले, त्यात आवश्यक ते बदलही केले आणि स्वीकारले मात्र ते करताना देश आणि देशातील लोकांना कायम केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या विशेष करून समाजाच्या भल्याचा विचार मांडला. ब्रिटनला जाईपर्यंतचा काळ, त्यानंतर अंदमानात रवानगी होईपर्यंतचा काळ आणि त्यानंतर रत्नागिरीतील स्थानबद्धतेचा काळ, स्थानबद्धतेमधून मुक्त झाल्यानंतर हिंदुमहासभेत प्रवेश करण्यापूर्वीपासून ते हिंदुमहासभेत प्रवेश  केल्यानंतर हिंदुमहासभेतील राजकारणाचा काळ, स्वातंत्र्यानंतरचा काळ, गांधी हत्येमुळे ठेवला गेलेला ठपका, त्यावेळी मांडलेले स्पष्ट विचार आणि त्यानंतर फाळणी होऊनही जरी स्वातंत्र्य मिळाले तरी त्याचा झालेला व्यक्त केलेला आनंद, भारत- चीन युद्ध, भारत पाकिस्तान युद्ध, कास्मीर प्रश्न, नेहरूंचे राजकारण यावरही त्यांनी व्यक्त केलेली सूचक मते या सर्व बाबींचा विचार करता विविध टप्पे आणि त्यात त्यांनी नेहमी केलेल्या वैचारिक सुधारणा, मांडणी याचा विचार करता सावरकर हे अद्ययावतच होते. पण दुर्दैवाने त्यांच्या या सुधारकी अद्ययावतपणाचा लाभ हिंदु समाजाला उठवता आला नाही. हिंदु नेत्यांनाही नीट स्वीकारता आला नाही. मग ते नेते हिंदु महासभेचे असो वा रा. स्व. संघाचे असोत   

सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध, वैचारिक-धार्मिक भेद करणारे निबंध काळाप्रमाणे लोकांनी जगायला पाहिजे, तत्त्व स्वीकारायला पाहिजेत, वर्तन करायला पाहिजे हे सांगण्यासाठी लिहिलेल बुद्धिवादी लिखाण लक्षात घेतले तर त्यांचे लिखाण हे सुधारकी, समाजक्रांति घडवण्याची इच्छा बाळगून केलेल्या वैचारिक तत्त्ववेत्त्याप्रमाणेच कृतिशील व्यक्तीचेही होते. त्यांच्या त्या वृत्ती, उक्ती आणि कृतीया अनुषंगाने नामवंतांनी केलेले त्यांच्याविषयीचे अभिप्राय यासाठीच लक्षात घेणे गरजेचे आहे. 

🔴 बुद्धिवादी विचारवंत डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी सावरकरांचा उल्लेख इहवादाचे थोर आचार्य असा केला आहे. आपल्या इहवादी

पु. ग. सहस्त्रबुद्धे
शासन या पुस्तकात समारोपाच्या लेखात ते म्हणतात की, …

► ‘गेल्या शंभर-दीडशे वर्षांमध्ये होऊन गेलेल्या भारतीय नेत्यांमध्ये इहवादाचे ते सर्वश्रेष्ठ पुरस्कर्ते होते. त्यांच्यातले ते मुकुटमणी होते.’

‘विज्ञानपूत, बुद्धिप्रामाण्यवाद असा हिंदुधर्म त्यांना अभिप्रेत होता.’

‘सावरकरांच्या तत्त्वज्ञानाविषयी हिंदुसमाजाची व त्यांच्या तथाकथित नेत्यांची ही उपेक्षावृत्ती जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत हा समाज इहवादी होणे शक्य नाही.’

🔹🔹

🔴 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र लेखक धनंजय कीर यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी
धनंजय कीर

सावरकरांची तुलना केली आहे. त्यांनी सावरकरांविषयी मांडलेली मते ही देखील सावरकरांचे सत्त्व नेमके काय आहे, तेच स्पष्ट करणारी आहेत. कीर म्हणतात की,...

► ‘बुद्धिनिष्ठ दृष्टिकोण आपल्या समाजाने स्वीकारावा आणि ही समाजक्रांती घडवून आणून नवीन समाजरचना करावी असा संदेश देणाऱ्या भारतीय बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत पुढाऱ्यांपैकी सावरकर हे एक होत.’

► ‘आगरकरांच्या या क्षेत्रातील वडिलकीच्या स्थानाला सन्मानूनही असे म्हणणे अयोग्य होणार नाही की, महाराष्ट्रातील विज्ञानवादी नि बुद्धिनिष्ठ वैचारिक प्रणालीचे नि आंदोलनाचे सावरकर हे पहिले कृतिशूर महापुरु। होत, विज्ञानेश्वर होत.’

► ‘सावरकरांची बुद्धिनिष्ठ नि विज्ञानवादी क्रांतिकारक विचारप्रणाली ही खरी आधुनिक नि पुरोगामी आहे.’

🔹🔹

🔴 सावरकर यांचे अनुयायी असणारे बाळ जेरे यांनी मांडलेले मतही सावरकरांचे खरे मर्म सांगणारे आहे. ते म्हणतात की, …

► ‘ स्वातंत्र्यवीर सावरकर हे पूर्णपणे ऐहिकवादी, विज्ञाननिष्ठ होते. ते अध्यात्मतशास्त्र मानीत पण ते वैयक्तिक स्वरूपाचे. त्याच्या आधारावर समाजाचे व्यवहार चालू नयेत, असे त्यांचे स्पष्ट मत होते.’

🔹🔹

🔴सावरकर अभ्यासक भा. कृ. केळकर यांनीही सांगितलेले सावरकर यांच्या वैचारिकतेचे मर्म लक्षात घेण्यासारखे आहे.  ते म्हणतात की, …

► ‘ सावरकर पारंपरिक अध्यात्मवादी नव्हते, ते ऐहिक जीवनाची नीती निर्मााण करू पाहात होते.’

🔹🔹

🔴 समाजवादी विचारवंत, बुद्धिवादी प्रा. नरहर कुरुंदकर यांनी सावरकरांबद्दल जे स्पष्ट सांगितले आहे, ते म्हणजे आजकालच्या

प्रा. नरहर कुरुंदकर

तथाकथित पुरोगामी म्हणवणाऱ्या आणि डाव्या विचारसरणींच्या आधारावर जगणाऱ्या पक्ष, नेते, संघटना यांच्या टीकांना आणि सावरकरांवर अन्यायकारी विरोध करणाऱ्यांना चपराकच आहे. तसेच सावरकरांच्या हिंदुत्वाला हिंदु मतांच्या ध्रुवीकरणासाठी मांडणाऱ्या विचारसरणीच्या पक्ष, संघटना यांनाही फटकार आहे. प्रा. कुरुंदकर म्हणतात की, … 

► ‘सावरकर कठोर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ व जडवादी होते. एकाही अंधश्रद्धेवर त्यांचा विश्वास नव्हता.’

🔹🔹

🔴

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सावरकर यांचे नीतिशास्त्र कसे नक्की केले आहे, त्याबद्दल मांडलेले मतही तितकेच म्हत्त्वाचे ठरते. तर्कतीर्थ जोशी म्हणतात की,...

► ‘बुद्धिप्रामाण्यवादाचा निकष स्पष्टपणे आणि निश्चितपणे वापरूनच सावरकरांनी आपले नीतिशास्त्र निश्चित केले होते. नीती-अनीतीची कसोटी धर्मग्रंथावर अवलंबून न ठेवता मनुष्याची विवेकबुद्धीच ठरवू शकते, अशा सिद्धांताप्रत सावरकर आले आहेत.’

► ‘सावरकरांची तत्वमीमांसा निरपवादपणे मानवतावादी आहे हिंदुत्ववादी नाही.’

🔹🔹

🔴 या प्रमाणेच तत्त्वज्ञ असे मे. पुं. रेगे यांनी सावरकरांच्या तत्त्वज्ञानाबद्दल मांडलेला निष्कर्ष अधिक सखोल आणि वास्तव आहे. रेगे म्हणतात की,...

मे. पुं. रेगे

► टिळकांनी पारंपरिक भारतीय तत्त्वज्ञानाला आधुनिक विद्या व आधुनिक समाजाच्या गरजा आणि आकांक्षा यांच्या आधारे एक वेगळी कलाटणी दिली. सावरकरांचे तत्त्वज्ञान असे भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेशी नाते जोडून तिच्या स्वत:साठी स्थान प्राप्त करून घेणारे नाही.भारतीय अध्यात्मिक साधना आणि तत्त्वज्ञान याचा खोल प्रभाव जरी त्यांच्या तत्वज्ञानावर झालेला असला, तरी त्यांचे तत्त्वज्ञान हे त्यांचे स्वत:चे असे तत्त्वज्ञान आहे. त्यादृष्टीने ते पूर्णपणे आधुनिक आहेत.’

🔹🔹

मे. पु. रेगे यांचे हे मत रा. स्व. संघाच्या नेत्यांकडून वा भाजपाच्या विविध नेत्यांच्याद्वारे सांगण्यात येणाऱ्या सावरकर यांच्या तत्त्वज्ञानाशी जवळीक साधू पाहाणाऱ्यांना फटकारणारे आहे. ते अतिशय मार्मिक आणि चपखलपणे मांडलेले आहे. विज्ञाननिष्ठा वा आधुनिक जीवनमूल्य यांचे अस्तित्त्व सावरकरांनी पूर्णपणे जाणले होते. त्यामुळेच भारतीय तत्वज्ञानाशी त्यांचा संबंध जोडण्याचा वा समन्वय साधण्याचा सावरकरांनी प्रयत्न केला नाही, असे अभ्यासपूर्ण आणि तार्किकपूर्ण मत रेगे यांनी मांडलेले आहे. 

गोपाळ गणेश आगरकर
महाराष्ट्रात सुधारकांची परंपरा ही नेमकी कोणती आहे, बुद्धिवादी
आगरकरांची की धर्माधारित राष्ट्रवादी अशा विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानी मार्गातील? सावरकर यांचे हेच सुधारक म्हणून असणारे व्यक्तिमत्त्व कसे स्वीकारले जाते, त्यावर सावरकर किती उमजले आहेत ते कळू शकेल. ते प्रत्येकाने सावरकरांचे हे सुधारकी, विज्ञाननिष्ठ, समानतावादी हिंदुत्वाचे तत्त्व समजून घेतले तर त्यांच्या अद्ययावत अशा जात्युच्छेदक हिंदुत्वाचा पाया - गाभा समजू शकेल. त्यात सावरकरांच्या हिंदुत्वाला रुढार्थाने समजल्या जाणाऱ्या हिंदु धर्माचा समावेश नसल्याचे दिसते. विशेष करून त्यांचे विचार- तत्व हे आधुनिक सामाजिक रचनेची सुरुवात होती, कृतिशीलता होती हेच स्पष्ट होते. त्यामुळेच हिंदुराष्ट्रवादाच्या वा हिंदुत्वाच्या रुढार्थाने स्वीकारलेल्या राजकीय - सामाजिक विचारांपेक्षा सावरकरांचे विचार हे सुधारकी, मानवतावादी, राष्ट्रवादी आणि तरीही साम्यवादाला समांतर स्वीकारणाऱ्या हिंदुत्ववादी तत्वज्ञानाने भारलेले होते, असेच म्हणावे लागेल.
स्वामी विवेकानंद

सावरकरांनी १९२४ च्या दरम्यान हिंदुत्व ग्रंथ लिहिला त्यापूर्वी त्या हिंदुत्व शब्दाला असणारा अर्थ हा प्रामुख्याने हिंदु धर्म वा रुढार्थाने स्वीकारला गेलेला हिंदु, सनातनी, वा चातुर्वर्ण्य मानणारा हिंदुधर्म याच कल्पनेने स्वीकारला गेलेला होता. मात्र सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ तत्वाने हिंदुत्व आणि हिंदुधर्म असे दोन स्वतंत्र अर्थही रुढ होऊ लागले. पण सावरकरांचे हिदुत्व हे हिंदुधर्म या रुढ अर्थापेक्षा अधिक व्यापक आणि अद्ययावत हिंदुनेस वा हिंदुसमाज घडवू पाहाणारे तंत्र वा तत्त्व होते. याच त्त्त्वाच्या आधारे त्यांनी राष्ट्र ही संकल्पनाही सिद्ध करीत हिंदु समाजाला असणारी भूमी ही तुमची आहे, तुमच्या संस्कृतीशी एकरूप झालेली आहे, तुमच्यावरील विविध आक्रमकांना आणि त्यांच्या आक्रमक धर्माला स्वीकारूनही त्या अहिंदु

माधव सदाशिव गोळवलकर

लोकांनाही नागरिक म्हणून सहजीवक या अर्थाने याच भूमीत स्थान देऊन समानतेची वागणूक देणारी आहे. मात्र ज्या अहिंदुंची म्हणजेच या भूमीत न जन्मलेल्या, न निर्माण झालेल्या धर्म-पंथ- तत्त्वज्ञान यांच्य़ाशी संलग्न नसणाऱ्यांची नाही कारण पुण्यभू हा शब्द हिंदु या व्याख्येत समाविष्ट करून सावरकरांनी हिंदुंना त्यांचा धर्म नव्हे तर हिंदुपण दिले वा हिंदुनेस दिला, इतके लक्षात घेतले तरी हिंदुत्वाची आणि हिंदुधर्माची मर्यादा लक्षात येऊ शकेल. यासाठीच सुधारकांच्या दृष्टीने सावरकर हे अध्यात्मिकता आणि हिंदुजीवनूल्ये यांच्याशी पारंपरिक प्रकारातील नाते न ठेवणारे तत्त्वज्ञान होते. त्यातूनच संघाचे तत्कालिन सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर अर्थात गोळवलकर गुरुजी यांनी सावरकरांच्या हिंदुत्वावर टीका केली. त्यांच्या हिंदुत्वाला त्यांनी प्रतिक्रियावादी वा नकारात्मक असे संबोधले. तरीही आज सावरकरांचे हिंदुत्व हिंदुमतध्रुवीकरणासाठी आमचेच मानले जात आहे, हे ही नसे थोडके… तूर्तास इतकेच!

(क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन)
(लेखातील छायाचित्र सौजन्य  - आंतरजालावरून साभार)


गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

  सावरकर आमचे... पण   -  २  

स्वातंंत्र्य म्हणजे नेमके काय, स्वातंत्र्याचे काही प्रकार आहेत का आदी विविध प्रश्न गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवरील चर्चेतून जाणवू लागले आहेत. यातच भारताचे स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे वीर, सैनिक, व्यक्ती, महात्मे, हुतात्मे असे अनेक आत्मे आज्या भारतीयांची मानसिकता पाहून खरे म्हणजे तळमळत असतील. ब्रिटिश राजवटीपासून मुक्तता मिळवण्यासाठी भारतातील स्वातंत्र्ययुद्धामध्ये अनेकांनी योगदान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे याच योगदानामधील महत्वाची व्यक्ती तर सशस्त्र क्रांतिचे ते एक अर्ध्वयूच होते. दुसऱ्या बाजूला अहिंसात्मक कामाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आणि त्याच अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले असल्याचा दावा करीत सुमारे ७० वर्षे भारतावर सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसने अहिंसात्मक मार्ग कितीदा चोखाळला होता, असाही प्रश्न उपस्थित होतो. कारण स्वातंत्र्य हा विषय काही ब्रिटिशांच्या जोखडातून बाहेर पडल्यानंतरही संपलेला नाही.

स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारक संकल्पनेची व्याप्ती


यामुळेच स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय, त्याचे काही प्रकार आहेत का आणि ते आपण किती अंगिकारले आहेत, त्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला कळाला आहे का आणि तो कळण्यासाठी आपण व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद या सर्व बाबींसाठी आजही पात्र वा लायक आहोत   स्वत: करायला हवा. स्वातंत्र्य म्हणजे अशी संकल्पना आहे की, व्यक्ती वा समूहाला त्यांच्या इच्छेनुसार, हक्कानुसार, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कार्य करण्याची मुक्तता अर्थात स्वातंत्र्य म्हटले की त्यात निर्धार, स्वत्व, गुलामगिरी वा दास्य यांना बाजूला फेकणे अशा विविध पैलूंचा समावेश जसा होतो तसाच त्या स्वातंत्र्यासंबंधातील विविध प्रकार व घटक यांचीही गणना होत असते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पूजेचे, धर्मपालनाचे स्वातंत्र्य, फिरण्याचे स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य, लिहिण्याचे स्वातंत्र्य, शिकण्याचे स्वातंत्र्य इतकेच काय तर चळवळ करणे, आंदोलन करणे याचेही स्वातंत्र्य, संघटन करण्याचे स्वातंत्र्य अशी यादीच या स्वातंत्र्याच्या प्रकारांमध्ये लागेल. मुळात हे स्वातंत्र्य असणे याबरोबरच जबाबदारीही येत असेत आणि त्यामुळेच स्वातंत्र्य उपभोगताना त्याची जबाबदारीही असते जी व्यक्ती, संघटना, समूह, गट, प्रांत या सर्वांवर बंधनकारक असते. आज त्यासाठी आपण पात्र आहोत का, असा प्रश्नही प्रत्येकाने मनाला विचारला पाहिजे आणि त्याचे प्रामाणिकपणे उत्तरही किमान स्वमनाला दिले पाहिजे. ते दिले तरी खरे म्हणजे खूप होईल, कारण त्यासाठी विचारही सर्वांगाने करावा लागेल. ब्रिटिश तत्त्वज्ञ सर आयझेया बर्लिन (१९०९–९७) यांनी स्वातंत्र्याचे 'नकारात्मक स्वातंत्र्य' आणि 'सकारात्मक स्वातंत्र्य' असे दोन प्रकारही वर्णिले आहेत.  अशा या स्वातंत्र्यासंबंधात विचार करता, स्वातंत्र्यवीर असा शब्द वापरताना तो किती अर्थाने व्यापक असू शकतो, त्यामागील प्रेरणा किती अनेक आयामी असू शकते, त्यात मानवतावादाचे महत्त्वही किती मोठे असते. मनशक्तीही त्यात येत असते. हा विचार करता स्वातंत्र्यवीर ही उपाधी तात्याराव तथा विनायक दामोदर सावरकर यांना दिली गेली ती नक्कीच परिपूर्ण आहे. 

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘द माइंड इज विदाऊट फिअर’ या कवितेची आठवण येते. स्वातंत्र्य उपभोगणे असो की माणसाने मुक्त जगणे असो त्या ठिकाणी टागोरांची ही कविता अतिशय बोलकी आणि अर्थपूर्ण आहे.

स्वातंत्र्य या शब्दाचा हा एकूणच व्यापक अर्थ आणि त्याबरोबर क्रांतिकारक या शब्दाचाही तितकाच सखोलपणा  लक्षात घेता सावरकर या व्यक्तिमत्त्वाने स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारक या दोन्ही शब्दांना, संकल्पनेला पूर्ण स्वीकारून आत्मसात केले होते. किमान तत्कालीन विविध राजकीय नेते, विचारसरणी यांच्या तुलनेत सावरकरांनी स्वीकारलेली स्वातंत्र्यांची संकल्पना, देश-राष्ट्र आणि त्याचे स्वातंत्र्य, मानवतेचा विचार, हिंदुपण वा हिंदुसमाजासाठी सांगितलेले हिंदुत्व यांचा अवलंब करताना स्वातंत्र्याला भक्कम अधिष्ठान दिलेले आहे. व्यक्ती, त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य याचा विचार करताना न्याय्य अंगाने त्यांनी केला होता. त्यांनी शुद्धिकरणाची मोहीम राबवण्याचा मांडण्याचा केलेला प्रयत्न हा बळजबरीने नव्हता तर तो लोकांना पटवून देऊन व्हायला हवा या अंगाने केला. इतकेच नव्हे तर रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असताना एका शुद्धिकरणानंतर हिंदु या रुढ धर्मामध्ये प्रवेश केलेल्या एका कुटुंबातील मुलाची मुंजही करण्यासाठी सावरकर स्वत: उभे राहिले. ज्या सावरकरांनी आपल्या मुलांच्या मुंजीही केल्या नव्हत्या म्हणजेच जेथे त्यांनी स्वत:च्या बाबतीत धर्म या संकल्पनेला दिलेले स्थान पाहाता अन्य समाजबंधुंसाठी मात्र त्यांनी आपल्या धारणा, मते बाजूला ठेवून त्या व्यक्तीच्या भावनेला न दुखावता मुंजीत सहभागी झाले. सत्यनारायणाचा प्रसादही त्यांनी खाल्ला. ही बाब ज्या काळात सावरकरांनी धर्मातील कर्मकांडावर, रुढी रिवाजांवर, अंधश्रद्धांवर, सात बेड्यावर प्रहार केले आणि तत्कालिन धर्मधुरिणांच्या रोषालाही सामोरे गेले, टीका सहन केली, त्याचवेळी त्यांनी सर्वसामान्य हिंदु बंधुंना एकत्र आणण्यासाठी सहभोजन आयोजित करणे, त्यात सहभागी होणे, आणि पतितपावन मंदिर प्रवेश आणि त्यातून साध्य केलेले स्वातंत्र्य, साध्य केलेली समाजक्रांति करतानाही व्यक्तीस्वातंत्र्याला, लोकभावनेचे असणारे महत्त्वही स्वीकारले होते. दुर्दैवाने इतके होऊनही रुढी-रिवाजांपासून पोथिनिष्ठ धर्मापासून स्वतंत्र होऊन स्वत: विज्ञानाधिष्ठित विचार करावयास सावरकर प्रयत्न करीत असूनही हिंदु समाज, त्यातील अनेक नेते, समाजधुरिण म्हणवणारी मंडळी यांनी मात्र काहीच बोध सावरकरांच्या धोरणांमधून, मतदर्शनातून, मार्गदर्शनातून, युक्तिवादातून वा तार्किक आणि तात्विकतेमधून घेतला नाही. खरे म्हणजे स्वातंत्र्य हे केवळ एखाद्या जेत्यापासून, त्याच्या अन्यायापासून, त्याच्या राजवटीपासून वा त्यांच्या धर्मापासून, धार्मिक बळजबरीपासूनच मुक्त होण्यात नव्हे, तर स्वत:च्या व्यक्तिस्वातंत्र्याला समजण्यामधून, जीवनशैली काळाबरोबर राखण्यासाठी नवीन विचार स्वीकारण्याचेही आणि जुन्या विचारदास्यामधून बाहेर पडण्याचेही काम महत्त्वाचे असते. जुन्या- जुनाट विचारसरणीतून, कर्मठ, कालबाह्य रुढींच्या कोषातून बाहेर पडणे, मुक्तपणे नवविचारांना समजणे- स्वीकारणे हे देखील स्वतंत्र होण्याचेच काम आहे. ते काम सोपे नाही, कारण त्याचा संबंध मनाशी, बुद्धीशी, भावनेशी येतो आणि हा संबंध पिढ्यांशी संघर्ष करण्यासाठीही प्रत्ययकारी आणि जुन्यांना प्रलंयकारी वाटू शकतो. यामुळेच स्वातंत्र्य हा शब्द इतका महत्त्वाचा आहे, की तो समजून घेणे आणि अंगी बाणवणे हे सोपे नाही ते क्रांति म्हणजेच बदल घडवणारे आहे. जसे कोषातून फुलपाखरू बाहेर पडते. जसा बुद्धाने राजकोषातून बाहेर पडून नवधर्म जागवला तसेच ती धर्माची वास्तवता लोकांप्रत नेण्याचे काम केले तेच क्रांतिकारक होते, स्वातंत्र्ययुद्धासारखेच होते. त्यामुळेच अशा विचारातून सावरकरांनी रत्नागिरीमधील आपल्या स्थानबद्धतेतही केलेेल काम हे क्रांतिकारक होते, स्वातंत्र्यासाठी केलेली वीरवाणी होती.  त्यांची ही वीरवाणी स्वातंत्र्यवीराचीच होती ती केवळ त्या स्थानबद्धतेमधून तयार झालेली नव्हती तर त्या कर्माचा मागोवा घेता ते त्यांच्या पूर्वायुष्यातील अनेक अनुभवांमधून तयार झालेली निष्पत्ती होती. त्यांचे क्रांतिकारकत्व हे केवळ ब्रिटिशांविरोधातील सशस्त्र क्रांतिच्या कार्याशीच संबंधित नव्हते तर समाजकारण, धर्मकारण, मानवतावाद, राष्ट्रवाद, गुलामगिरी, दास्य, मन, भावन, बुद्धी, आचार-विचार, समानता, समाजोद्धार, अशा विविधांगांना दिशादायी असे संलग्न होते. म्हणूनच स्वातंत्र्य आणि क्रांति या दोन घटकांना खऱ्या अर्थाने जीवनात सामावून घेणारे विनायक दामोदर सावरकर हे ‘स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक’ होते. ही प्रगल्भता हिंदुस्थानातील ना हिंदुंना समजली, ना मुस्लिमांना उमगली ना समकालीन आणि अनुनय करणाऱ्या अनेकांना कळली नाही वा तत्कालीन राजकीय- सामाजिक- धार्मिक- वैचारिक सहकारी, समविचारी, विरोधक यांनाही मानवली नाही, पेलली नाही हे या देशाचेच दुर्दैव आहे, असे आजच्या राजकीय अपरिपक्वतेतून आढळून येत आहे.

(क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)



गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

 सावरकर आमचे... पण   -  १  

स्वातंत्र्यवीर सावरकरांची जीवन म्हणजे विविध घटकांनी साकारलेले तत्त्वचिंतन, कृतिशीलता, यांनी भारलेले   क्रान्तिकारक तत्त्व आहे. हे तत्त्व कालाप्रमाणे प्रवाही असणारे आहे. ते तसे राहिले तर नवनागरी चेतनेलाही चैतन्य आज आणू शकेल, इतकी ताकद त्यात आहे याचे कारण बुद्धिवादाशी  ते संबंधित असल्याने नागरी जीवनातच नव्हे तर एकंदर सर्व स्तरावर शिक्षणाचे, विचारप्रवर्तनाचे महत्त्व अधोरेखित होते. यातील महत्त्वाचे हे घटक म्हणजे समाजकारण, बुद्धिवाद, धर्म, हिंदुपणाची वा हिंदुदुत्वाची व्याख्या, देशातील हिंदु समाजाला भौगोलिक मर्यादेची मालकी किती शिल्लक आहे ते सांगून शहाणे करण्याची व्याख्या, मुसलमांनाच्या आक्रमक कृत्यामुळे तयार झालेले प्रत्युत्तर देणारे हिंदुत्व आणि तितक्या च प्रभावीपणे हिंदुसमाजाप्रमाणेच मुस्लीम धर्मासह अन्य धर्मालाही पोथिनिष्ठ तत्त्वज्ञानातून बाहेर काढण्याची तळमळ, जात्युच्छेद आणि त्यामागील जाणीवा, राजकारण, त्रायातील जाण, परराष्ट्रीय धोरणे, राष्ट्राच्या  आर्थिक आणि सीमेवरील संरक्षणाच्यादृष्टीने तत्त्पर जाण अशा विविध घटकांचा नेमका अर्थ आणि निष्कर्ष यातून 'सावरकर आमचे... पण' यामधून निघून प्रत्येकाने 'सावरकर आमचेपण' असे म्हटले पाहिजे. इतकी ताकद या सावरकर तत्त्वज्ञानात आहे. किंबहुना मानवतावादी वाटचालीकडे जाणाराच त्यांचा राष्ट्रवाद आहे, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे. अन्य कोणाशीही फार तुलना न करता सावरकरांच्या या तत्त्वज्ञानाचा निष्कर्ष काढण्याचा हा आगावूपणा करावा लागत आहे.

भूमिका


गेल्या काही काळापासून   स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर विविधांगी वक्तव्ये, विधाने  राजकीय स्तरावरून केली जात असून त्यामुळे सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व हे समजून घेण्यात अनेकांनी केलेले स्वैरविचार  दिसू लागले. त्यामुळे सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वातून दिसणारे अनेक पैलू विसंगतपणाने दिसू लागले असे म्हणण्यापेक्षा ते विसंगत केले गेले परिणामी  सावरकर या व्यक्तिमत्त्वावर अन्यायच केला गेला. तरुण  पिढीसमोर त्यामुळे नक्कीच  सावरकर  हे व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार, त्यांचे तत्त्वज्ञान  हे विसंगत वा चुकीच्या  सूत्रांनी ठेवले गेले.  राजकीय वापराच्या दृष्टीने सावरकरांचे तत्त्वज्ञान व विचार हे  गैरपद्धतीने मांडले गेले किंवा काहींनी सोयीप्रमाणे मांडले. जसे काही विरोधकांनी सोयीप्रमाणे सावरकर हे व्यक्तिमत्त्व व विचार बदनाम करण्यासाठी वापरले गेले तसेच सावरकरांचे विचार सोयीप्रमाणे वापरून सावरकरांच्या तत्त्वज्ञानाला, अद्ययावतपणाला, खऱ्या अर्थाने असलेल्या  विज्ञानमार्गी आणि माणसाला पोथिनिष्ठ विचारधारणेतून बाहेर काढू पाहाणाऱ्या तत्त्वालाच बाजूला सारले गेले. त्यामुळे सावरकर यांच्या भविष्यवेधी अशा नागरी, राष्ट्रीय आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाला झुगारण्याचा प्रकारच केला गेला आहे. अर्थात हे माझे मत आहे, ते अनेकांना पटेल असेही नाही. व्यक्तिस्वातंत्र्यानुसार प्रत्येकाला आपला दृष्टिकोन मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठीच हा लेखनप्रपंच.

------------

प्रास्ताविक

न समजलेले सावरकरी तत्वज्ञान

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसच्या वैचारिक अपरिपक्व मंथनामुळे  नव्या पिढीसमोर तसेच देशातील आणि परदेशामधील अनेक लोकांपुढे, देशातील हिंदुंमध्येही ज्या नकारात्मक पद्धतीने ठेवले गेले त्यामुळे सावरकरांबद्दल नेमकेपण जाणून घेण्याचा प्रयत्नही सुरू झाला. अर्थात याबद्दल अशा  नकारात्मकतेतून वा अपरिपक्व मंथनातून स्वातंत्र्यवीरांचा अवमान करण्याचा मार्ग काही बरोबर नाही. यातून काँग्रेस वा तथाकथित डाव्या म्हणवणाऱ्या विचारसरणीच्या पक्ष आणि व्यक्ती वा कार्यकर्त्यांना विशेष करून व्या पिढीमधील या व्यक्तींमध्ये एक प्रकारे मतभेद, वैचारिक यादवी माजवण्याचा प्रकार सुरू झाला.  पन्नाशी ओलांडल्यानंतरही काँग्रेसच्या  तरुण असणाऱ्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाने आणि त्यांना बदसल्ला देणारे, त्यातून आपले हेतू साध्य करू पाहाणारे काँग्रेस नेते, डावे नेते आणि असा बदसल्ला स्वीकारणारे अपरिपक्व पात्र असे राहुल गांधी यांनी सर्व देशाचीच दिशाभूल केली आहे.

सावरकरांच्या संबंधातील पाटी अंदमानातून काढून टाकायला लावणारे काँग्रेसचे अद्वातद्वा अविचारसरणीच्या नेत्याने सुरू केलेली ही सावरकर विरोधाची वाट काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडायला लावणारी पळवाट वा पायवाट ठरली. कारण तेव्हापासून काँग्रेसने या वाटेचा इतका वापर केला की, त्या वाटेखेरीज सत्तास्पर्धा वा राजकारणात अन्य काही महत्त्वाचे घटक असतात हेच ते विसरले आणि २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या भाजपाला सत्ता साधण्यात यश मिळाले. त्यातूनही शहाणपण शिकता येते हे राहुल गांधींना सुचले नाही ना त्यांच्याबरोबरच्या अनेक अपरिपक्व अशा आणि त्यांना सावरकरविरोधात आवर घालण्यास अपयशी ठरलेल्या बदसल्लागारांनाही ते कळले नाही. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरही संस्थांनानी खंडित झालेल्या देशाला पाकिस्तान फाळणीनंतर एकत्रित झालेल्या भारताला पुन्हा आपल्या हातात ठेवण्यामध्ये काँग्रेसला अपयश येण्यास सुरुवात झाली. किंबहुना स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी त्यासाठी केलेल्या कामांबद्दल सतत काँग्रेसच कशी महत्त्वाची भूमिका वठवत होती हे सांगत देशवासींची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसला आता ७० वर्षांनी आपणच तयार केलेल्या त्या पळवाटेवरून सत्ताउतार होण्याची नामुष्की आलेली आहे. इतके होऊनही शहाणपण न शिकण्याची काँग्रेस नेतृत्वाची बेफिकीर वृत्ती काही गेलेली नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करून भाजपा सरकारला सत्तेवरून खाली खेचता येणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहेच पण त्याचबरोबर सावरकर तुमचे गांधी आमचे असे सांगणाऱ्या राहुल गांधी नामक काँग्रेस नेत्याला शहाणे करण्याचा सल्ला मात्र कोणीही दिला नाही.   मुळात या देशात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गांधीजी या दोन व्यक्तिमत्त्वांनी देशामध्ये स्वातंत्र्यासाठी केलेली कामे ही नाकारण्याचा अधिकार आत्ताच्या कोणाही राजकीय पक्षांना नाही. काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर त्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्याची नैतिक धारणाही आजच्या राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि कार्यकर्तेही यांनी गमावलेली आहे. मग ते नेते कोणत्याही विचारधारणेचे असोत. नवीन पिढीला पूर्वीच्या नेत्यांनी केलेल्या चुका सोडा पण त्यांची कामे किती मोठी होती, त्यांचे महत्त्व किती होते, हे सांगण्याची पात्रताही राजकीय पक्षांनी गमावलेली आहे.

गांधी काय किंवा सावरकर काय हे तुमचे आमचे असे म्हणणे केवळ अपरिपक्वतेचे लक्षण आहे. राहुल गांधी यांचे फार वाचन, अभ्यास या अनुषंगाने शून्य कर्तृत्व असेल पण त्यांना सल्ला देण्याचा मान मिळवणाऱ्यांनी मात्र या साऱ्या प्रकारांमुळे देशवासींच्या मनाचा विचार केलेला नाही. त्यांच्यामध्ये एक प्रकारे फूट पाडलेली आहे. 

सावरकर आणि गांधी यांच्यावरील त्या बेलगाम वक्तव्यानंतर भाजपच नव्हे अन्य राजकीय पक्षांनीही जर अशा वक्तव्याला बाजूला सारून सावरकर आणि गांधी यांच्याप्रती देशात असणारी भावना लक्षात घेऊन राहुल गांधी यांना सुधारले असते तर अधिक बरे झाले असते. पण तसे झालेले दिसत नाही. त्यामुळेच चेव चढलेल्या राहुल गांधी आणि त्यांच्या बदसल्लागारांनीही सावरकरांबद्दल अवमानकारक शब्द आणि भावना व्यक्त करीत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांच्या प्रतीही फुटीच्या भावनांना उभे केले. काँग्रेसशी संलग्न असलेल्या काही पत्रकार म्हणवणाऱ्या आणि विचारवंत लेबलाखाली (अहो रूपम अहो ध्वनि म्हणवणाऱ्या)  काही महाभागांनी सावरकरांविरोधात आघाडी उघडून बेलगाम, अपरिपक्व आणि द्वेषमूलक वक्तव्ये करून इतकेच नव्हे तर काहीही कागदपत्रे दाखवीत आपली कृतिशीलता दाखवत, माकडाच्या हातात कोलीत या न्यायाने निवडणुकीच्या हेतूने आत्तापासूनच लोकभावनांना आगी लावल्या आहेत.  मुळात आपल्या हेतूंसाठी (गैरफायदा) अशा प्रकारे राष्ट्रीय व्यक्ती, महापुरुष यांचा वापर करणेही अपरिपक्क्वतेचे, कुसंस्काराचे लक्षण आहे. चुकणाऱ्यांना वा जाणीवपूर्वक चुकणाऱ्यांनाही न सुधारणे आणि मौनं सर्वार्थ साधनम असे धोरण पत्करून सत्ताकेंद्रित, सत्तालोलूप वर्तन करणाऱ्यांनी देशाचे व नवीन पिढीचीही दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे.  गांधी आणि सावरकर यांच्या संबंधातील त्यांच्या विचारांमधून दिसणारी तुलना पाहून कोणी कोणते तत्त्वज्ञान स्वीकारावयाचे ते ठरवावे. राजकारण्यांप्रमाणे सत्तालोलूप तत्त्वज्ञान न स्वीकारता, प्रसारमाध्यमांनी वा सामाजिक प्रसारमाध्यमांवरही अतिरेकी अभिव्यक्ती न सादर करता लोकांनी या संबंधात वागायला हवे होते. पण तसे झालेले दिसत नाही.

सावरकर समजून घेण्यातही अद्याप एक वाक्यता नाही. त्यांच्या हिंदुत्वाचा अर्थ, त्यांची राष्ट्रीयत्वाची धारणा, सामाजिक क्रांतिकारक भूमिका आणि विज्ञाननिष्ठतेबरोबरच नव्या कालाप्रमाणे जाण्यासाठी अद्ययावतपणा ठेवण्याची शिकवण नव्या नागरी संस्कृतीलाह पोषक होती अगदी त्यावेळी त्यांची असणारी ही दृष्टी आजही तितकीच गरजेची आणि त्यांनीच सांगितलेल्या प्रवाही राहाण्याच्या दिग्दर्शनाला साजेशी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे क्रांतिकारक तत्त्व हे यासाठीच पूर्णपणे समजून घेण्याची  अजूनही गरज आहे. त्यांच्या विविध लेखांमधून, लेखनामधून, भाषणांमधून, कृतिशील वर्तनामधून आणि वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमधून हिंदु समाजाला दिलेल्या दिशादर्शनाला डोळसपणे पाहाण्याचा हा प्रयत्न परत परत करावासा वाटतो, अशीच त्यांच्या तत्त्वज्ञानाची ताकद आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व हे सर्वांगीण अशा विविध अनुभूतींमधून जाणारे आहे. त्यांना अध्यात्मिक, धर्मभावुक, धार्मिक ठरवणे योग्य नाही. त्यांना केवळ ऐहिक ठरवणेही योग्य नाही. क्रांतिकारक या शब्दाला ते अधिक साजेसे आहेत. क्रांतिकारक हा शब्द स्वातंत्र्यवीर या शब्दापेक्षाही व्यापक आहे. किंबहुना त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारक असे दोन्ही घटक हे त्यांचे तत्त्वज्ञान व्यापून टाकणारे आहेत. याचे कारण त्यांना या दोन्ही संकल्पनांनीच सामावून घेतले होते. यामुळेच ते द्रष्टे वाटतात, काळाच्या पुढे पाऊल असणारे दिसतात. त्यासाठी त्यांनी धर्म, समाज, विविध राष्ट्रे, त्यांचा इतिहास, तेथील व्यक्ती, युरोपातील राष्ट्रे, तेथील इतिहास, त्यांचे राष्ट्रपुरुष वा क्रांतिकारक, तेथील विज्ञाननिष्ठा अशा विविध बाबींचा अभ्यास, उहापोह करून सावरकरांनी आपली विचारधारणा अधिक प्रगल्भ केली. अनेकदा अंदमानानंतर सावरकर वेगळे जाणवले असल्याचे काहींना वाटते, पण यातही एक विचार करण्यासारखी बाब आहे ती म्हणजे अंदमानात जाण्याआधी त्यांनी स्वातंत्र्यकार्यात आणि क्रांतिकारकांमध्ये ज्या प्रकारे झोकून देऊन काम केले होते, त्यांना आपल्या देशासंबंधात १८५७ च्या स्वातंत्र्यसमराबाबत, मॅझिनीच्या चरित्राबाबत लिखाण करताना जो स्त्रोत आणि शक्ती लाभली होती त्यामुळे त्यांची भारतातील क्रांतिकारकांचे आणि राष्ट्राच्या संकल्पनेचे महत्त्वही लक्षात आले होते. शिक्षेमुळे अंमदानत गेल्यानंतर आलेले अनुभव आणि आधीच्या विविध अनुभूतीमुळे मिळालेली प्रेरणा यातून काळ्या पाण्याच्या शिक्षेने स्वातंत्र्याचा विचार अधिक प्रगल्भपणे सुचला देश म्हणजे केवळ क्रांतिकार्य नव्हे, त्याच्याशी संलग्न असणारा समाज हा देखील महत्त्वाचा आहे. त्यासाठी समाजाची धारणा कशी असायला हवी, त्याची गरज कदाचित त्यांना अंदमानातील शिक्षेच्यावेळी मिळालेल्या काळामध्ये लक्षात आली असेल कारण तेवढा वेळ त्यासाठी त्यांना तेथे मिळू शकला. तसेच तेथे इंग्रजांनी मुस्लीम कैद्यांना आणि पर्यायाने मुस्लीम समाजाला दिलेली वागणूक ही हिंदु समाजापासून कशी मुस्लीमांना वेगळी करणारी आहे आणि त्याने काय दुष्परिणाम होणार आहेत, हे समजून घेण्यात सावरकर नक्कीच कमी पडणारे नव्हते कारण ते केवळ  ब्रिटिशांविरोधात लढणारे क्रांतिकार्यातील नेते राहिले नव्हते. ब्रिटिशांचा जुलूम जगाच्या पटलावर उघड करणारे स्वातंत्र्यवीर होते क्रांतिकारक होते, अभ्यासाने जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींना त्यांनी अधिक बारकाईने अभ्यासलेले होते, त्यावर विचार केलेला होता. त्यामुळेच त्यांच्यातील सशस्त्र क्रांतिकार्याचा देशभक्त हा केवळ तितका मर्यादित नव्हता. त्याने स्वातंत्र्याचा खरा अर्थ ओळखला होता. त्यातूनच ब्रिटिशांनी हिंदु आणि मुस्लिमांमध्ये केलेला दजाभाव त्यांनी अधिक बारकाव्याने ओळखला होता, इस्लामच्या आणि अन्य धर्माच्या अभ्यासातूनही त्यांनी इस्लाममधील कच्चे धागे जाणले होते. यामुळेच हिंदुत्व सांगताना त्यांनी हिंदुस्थानचा आणि जगामधील हिंदुना भविष्यकाळात काय स्थितीला तोंड द्यावे लागू शकते, त्याची पूर्ण जाणीव ठेवून हिंदुंना त्यांच्या पुण्यभूची जाणीव करून देणे त्यांना अगत्याचे वाटले, महत्त्वाचे वाटले. हे करीत असताना त्यांनी लिहिलेल्या निबंधांमधून सामाजिक क्रांतिकारक तत्वही त्यांनी स्पष्टपणे मांडण्यास सुरुवात केली होती. यामुळेच त्यांचे चरित्र अभ्यासताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारक असे दोन्ही घटक हे त्यांचे तत्त्वज्ञान व्यापून टाकणारे आहेत, असे प्रबळपणे जाणवते. किंबहुना यातूनच त्यांच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा उगम झाला असावा. भारतात प्रामुख्याने असणाऱ्या हिंदुधर्माच्या व हिंदु समाजाच्या व्यक्तींमधील संत, पंत आणि तंत हे त्यांनी पुरते जाणले होते त्यामुळेच रत्नागिरीतील वास्तव्यात त्यांचे समाजकार्य हे राष्ट्रवादी क्रांतिकारक दिशेने जाणारे होते. त्याचे पुढचे पाऊल हे हिंदु महासभेकडे जाणारे होते, हे स्पष्ट होते. त्यामागील राजकीय प्रेरणा ही केवळ हिंदुंचीच नव्हे तर या हिंदुस्थानच्या भूमीसाठी झगडणाऱ्या नेतृत्वाची होती. अशा या विविधांगी घटकांद्वारे सावरकर या व्यक्तिमत्त्वाला शोधणे अधिक तार्किक आणि संयुक्तिक ठरेल असे वाटते. त्यातून सावरकर हे एक कालाबरोबर जायला शिकवणारे तत्त्वज्ञान असल्याचे जाणवते, त्याचे प्रवाहीपण शोधण्याचाही हा एक छोटा प्रयत्न आहे.

(क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...