गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

भगवंताचे अधिष्ठान आणि भौतिक सामर्थ्य...

    कालप्रवाही सावरकर - ४   

‘ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय ?’ हा सावरकरांचा निबंध हिंदु समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारा आहे. काळाप्रमाणे बदल स्वीकारण्याची व पारलौकिक नव्हे तर भौतिक सामर्थ्याची आवश्यकता किती महत्त्वाची ठरली आहे, ते सांगत हिंदु समाजातील पारंपरिक व तथाकथित सनातन म्हणविणाऱ्या विचारसरणीवर स्वातंत्र्यवीराचा हा क्रांतिकारी हल्ला आहे. वैचारिक बदल हिंदु समाजात घडणे आवश्यक होते, तेव्हाही आणि आत्ताही हे स्पष्ट करणारे सावरकर आजही हवे आहेत. कारण आजही स्वातंत्र्यानंतर हिंदु समाजाची भगवंत प्रीति अनेक ठिकाणी १३०० ते १६०० च्या काळातील आहे. भगवंताचे नेमके अधिष्ठान समजून घेत राष्ट्र सबळ बनविण्यासाठी आपल्याच अंतरंगात पाहाण्याची आवश्यकता आजही आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ निबंधातील तार्किक युक्तिवाद हा केवळ तर्कापुरता असत नाही. त्याला तर्काबरोबरच तत्त्वाचे, शास्त्रशुद्ध विचारसरणीचे आणि परखड, कठोर, उपयुक्ततावादी तसेच पारलौकिकतेवर मात करून भौतिकतेच्या दृष्टिकोनाचे दिशादर्शन मिळालेले आहे. प्रत्यक्ष व्यवहार, व्यावहारिकता, शास्त्र यांना प्रोत्साहन देत प्रमाण मानण्याची सावरकरांची धारणा ही अधिकाधिक वास्तवतेला धरून आहे. याच निबंधामधील ' ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय ?' हा अतिशय सडेतोड विचारांचा परिपाक म्हणावा लागेल. रुढ धर्माला मानून चाललेली जीवनप्रणाली, रिती,रिवाजांना, संतांच्या कर्माना, शब्दांनाही पारंपरिकतेने स्वीकारणारी झापडबंद मानसिकता यावर अतिशय भेदक प्रहार सावरकरांनी केले आहेत. या निबंधाची सुरुवातच समर्थ रामदासस्वामींच्या ' सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे । या ओवीने होते. त्या ओळीच्या भावार्थाची विश्लेषणाने केलेली पृथ्थक समीक्षा म्हणजेच हा निबंध म्हणाला पाहिजे. सावरकरांनी या निबंधाचा उद्देश काय आहे, ते सांगतानाच सुरुवातीलाच म्हटले आहे की, त्या ओवीने त्या काळात एक मोठे तेजस्वी कार्य केले आहे. मात्र त्या ओवीतील 'परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे । ' या शब्दांचा रामदासांच्या मनातील अर्थ काय असू शकतो, ते सांगणे कठीण आहे. मात्र त्या ओवीचा आजच्या काळात जो अर्थ काढला जातो (आता येथे आजचा काळ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळ – अर्थात आजही त्यापेक्षा परिस्थिती फार वेगळी नाही, हे ही तितकेच खऱे. )… तो अर्थ किती अनर्थकारक आहे व त्यातील जे तत्त्व असते ते किती ऐतिहासिक व तात्विकदृष्ट्या अतथ्य आहे ते कसे ते स्वारकर या निबंधातून दाखवू इच्छितात.

यामध्ये सामर्थ्य म्हणजे ताकद, शक्ती ही कशात आहे तर चळवळीत आहे. चळवळ म्हमजे मानवी प्रयत्न असे सावरकर सांगतात. ते जरी किती वाढविले तरी ज्या चळवळीला भगवंताचा पाठिंबा नाही, ती चळवळ अयशस्वी झालीच पाहिजे या तत्त्वाचा अर्थ नक्की काय त्याचा शोध सावरकरांना घ्यावासा वाटतो. भगवंताचा पाठिंबा म्हणजे ईईश्वराचे अधिष्ठान, ते काय त्याचा उलगडा झाला पाहिजे, असे सांगत सावरकर या निबंधात उहापोह करतात. येथे भगवंताचे अधिष्ठान जे रुढार्थाने ईश्वर आहे किंवा

🔴 🔴 🔴

।। ऐहिक आणि मानवी उपायांच्या हातीच यशाची किल्ली नसलून मनुष्याच्या ज्ञानाच्या नि शक्तीच्या पलीकडे ज्या अनेक अज्ञात, अज्ञेय, प्रचंड अशा अमानुष विश्वशक्ति आहेत, त्यांच्या आघाताप्रत्याघातांच्या टकरीतही त्या यशाचा वा अपयशाचा संभवर असतो, तर तो अर्थ बरोबर आहे. ।।

🔴 🔴 🔴

हे सांगताना सावरकर माणसाला, विज्ञानाला वा माणसाच्या उपायांच्या पलीकडे असते ती अमानवीय शक्ती हे कारण असेल तर मग ते म्हणणे धर्माने सांगितलेल्या रिवाजी वा रितीने मानलेल्या विविध अर्थांना धरून असेल तर ते विश्वशक्तीची गुंतागुंत जी आकलनापलीकडे असते. त्याची बाब असते. म्हणजेच तात्विकतेच्या विविध तुलनांमधून सावरकर या शक्तीचा शोध घेतात. आणि मग मानवी चळवळीशी तिची सांगड घालण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जपतपादी पद्धतीचे वा धर्मकर्मकांडाचे संदर्भ त्यांना मान्य नसल्याचे ते स्पष्ट करीत जातात. भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हमजे ईश्वरी कृपा मिळवली पाहिजे, असा सर्वसाधारण अर्थ जो त्या काळी प्रचलीतपणे स्वीकारला गेला, त्याची फोड सावरकर अधिक बुद्धीवादी पद्धतीने करतात. इतकेच नव्हे रुढ रीती रिवाजाने मानल्या जाणाऱ्या विविध घटकांना भावनिक धक्का न देता ते आपल्या अर्थाची फोड अतिशय हळुवारपणे पण तरीही परखडपणे करतात. त्यामुळे भगवंताची वा ईश्वराची कृपा मिळवावी लागते हे सांगताना तो जे स्पष्टपणा दाखवितात, तो महत्त्वाचा आहे. लोकांना डोळे उघडायला लावणारा व त्याना वास्तववादाने विचार करायला लावणारा आहे.  त्यांच्या मतातून पारलौकिक आणि भौतिकता याचा स्पष्ट विचार ते करतात आणि भौतिकतावादाला ते अधिक महत्व देतात. किंबहुना त्यांची हीच विचारसरणी ही विज्ञानवादी वा विज्ञाननिष्ठ वा बुद्धीनिष्ठ स्वरूपात असल्याचे स्पष्ट जाणवते. त्यांचा धर्मासंबंधात सर्वसामान्य हिंदु काय विचार करतो त्यापक्षा त्याने काय विचार करायला हवा, कशा पद्धतीने धर्म संकल्पनेकडे आणि मानवी जीवनपद्धतीकडे पाहावयास हवे ते सांगतात. धर्मासंबंधात कोणी काय विचार करावा, त्याबद्दल त्याचे व्यक्तिस्वातंत्र्यही ते मान्य करतात, हेच येथेही दिसून येते. मात्र ते मान्य केले तरी त्यांचा शब्द, संकल्पना, वास्तव याविषयीचा शोध थांबत नाही, ते लोकांचे डोळे उघडावयाचे काम करीत राहातात, हीच त्यांची विज्ञाननिष्ठा, बुद्धीनिष्ठा आहे. ती किती हिंदुंना परवडणारी, रुचणारी व पटणारी आहे, हे ज्याचे त्याने ठरवावे.  

🔴 🔴 🔴

।।  परंतु ह्या ओवीचा अर्थ अशा तात्त्विक अर्थी क्वचित्च कोणी घेत असेल! सामान्यतः तिचा अर्थ असाच घेण्यात येतो, की मनुष्य ज्याला ज्याच्या त्याच्यापरी नीति वा अनीति म्हणतो, न्याय नि अन्याय म्हणतो, दैवी संपत्वा असुरी संपत्म्हणतो, धर्म वा अधर्म म्हणतो, त्यापैकी पहिले ते सत्य नि दुसरे ते असत्य असून जी चळवळ त्या मानवी सत्याच्या पायावर उभारलेली असते, त्या मानवी न्यायाची पोषक असते, त्या मानवी धर्माचे ब्रीद मिरविते; तीच काय ती यशस्वी होते ! ईश्वर तिच्यावरच कृपा करतो अशा अर्थी ईश्वराचे अधिष्ठान जिला लाभत नाही, ती चळवळ कितीही प्रबळ असली तरी ती यशस्वी होत नाही. यास्तव चळवळ करणारांनी प्रथम ते भगवंताचे अधिष्ठान संपादिले पाहिजे. ईश्वराची कृपा अर्जिली पाहिजे. आणि ही ईश्वराची कृपा संपादिण्याचा मार्ग कोणता? तर अर्थातच पंचाग्निसाधन, पाण्यात उभे राहून द्वादशवार्षिक नामजप, योगसाधन, उपासतापास, एकशेआठ सत्यनारायण, एक कोटी रामनाम जप, संतत धारेची अनुष्ठाने, रेडे वा बोकड मारणारे नवस, हजार वाती लावणे, लक्ष दुर्वा वाहणे, स्नानसंध्या, जपजाप्य, नामसप्ताह, पुरश्चरणे-पारायणे, गोग्रास, ब्राह्मणभोजने, यज्ञयाग, दक्षिणादाने प्रभृती जे शतावधि उणाय श्रुतीपासून शनिमाहात्म्यापर्यंत देवास संतोषविण्यास्तव वर्णिलेले आहेत त्यास आचरणे हा होय. या अर्थी जिला तपस्या म्हणतात ती आधी, मग मानवी चळवळ. ।।

🔴 🔴 🔴

।। वरील मत खरे की खोटे हे पाहण्यापूर्वी इतके स्पष्ट सांगून टाकतो की, वर उल्लेखिलेल्या जपतपादि साधनांची आत्मशुद्धि वा पारलौकिक मोक्ष प्रभृती जी फळे आहेत त्यांचा ऊहापोह या लेखात आम्ही करीत नसून जो त्यांची फळे प्रत्यक्ष अनुभवात केव्हाही निश्चितपणे मिळालेली नाहीत ती त्यांची फळे नव्हेत इतकेच येथे विशदावयाचे आहे. त्या साधनांविषयी किंवा त्यांच्या आध्यामिक वा पारलौकिक परिणामांविषयी ज्यास जसा आदर नि निष्ठा असेल तसे त्यांनी त्यास सुखेनैव आचरावे. त्यापासून लाभणारा आत्मप्रसाद हा भौतिक अशा कोणत्याही आनंदाहून निरूपम आंतरिक सुखाची जोड ज्यास देऊ शकतो त्यांनी त्यास सुखेनैव आस्वादावे. परंतु तशा अर्थाच्या ईश्वरीअधिष्ठानावर, वरील ओळीत ज्या राष्ट्रीय उत्थानादिक भौतिक चळवळींच्या ऐहिक यशाचा उल्लेख केलेला आहे, ते यश वा अपयश बहुधा मुळीच अवलंबून नसते; तर मुख्यतः तिच्या भौतिक सामर्थ्यावर अधिष्ठित असते, इतकेच येथे दाखवावयाचे आहे. ।।

या निबंधातील वरील दोन परिच्छेद जे सावरकरांनी मांडलेले आहेत, ते लक्षात घेतले तर समर्थ रामदासांच्या या ओवीतील  'परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे' या शब्दांचा वा संकल्पनांची सावरकरांनी ज्या पद्धतीने केलेली आहे. त्यातील भगवंत त्यांनी जो पाहिला आहे, तो महत्त्वाचा आहे. त्यांच्या भगवंताच्या अधिष्ठानाचा अर्थ हा सर्वसाधारण विचार पारंपरिक मानसिकतेतून करणाऱ्यापेक्षा वेगळा आहे, वास्तव आहे आणि आधुनिक जगाला भौतिकतेच्या आवश्यकतेबद्दल त्या सामर्थ्याबद्दल सिद्ध करू पाहाणारा आहे.

याच निबंधामध्ये असलेला आणखी एक दृष्टिकोन म्हणजे सावरकरांनी महाराष्ट्राच्या इतिहासातून मिळालेल्या धड्याचे वा घटनांमधून काढलेला अन्वयार्थ. हा अन्वयार्थ अतिशय महत्त्वाचा आहे. मुसलमानांच्या हातून देशातील हिंदुंना जे सोसावे लागले, त्यामध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यातील संघर्षात हिंदुनी वा हिंदु समाजाने त्यावेळी काय केले, चमत्काराच्या वा दैवी शक्तींवर अवलंबून राहून त्यांनी दाखविलेली बेफिकिरी कशी घातक ठरली. भौतिक सामर्थ्य त्यामुळे कसे वरचढ ठरले गेले, ते सावरकरांनी उदाहरणांसह दाखविले आहे. यातून किती हिंदुंनी बोध घेतला, किती हिंदुत्वाचा सावरकरांना अभिप्रेत असणारा अर्थ किती तथाकथित हिंदुत्ववाद्यांनीही आजपर्यंत काढला की फक्त आपापल्या सोयीनुसार अगदी आजच्या स्वातंत्र्योत्तर भारतात राजकीय पटलावरील हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्यांनीही सावरकरांच्या हिंदुत्वाचा बोध घेतला का, की केवळ त्यांच्या काही विधानांमधून सोयीनुसार हिंदुत्व स्वीकारले याची प्रचिती दुर्दैवाने वर्तमानात येत आहे.

सावरकर सांगतात कीस १३०० ते १६०० पर्यंतच्या काळात महाराष्ट्राच्या वा  भारताच्या इतिहासात ईश्वरी अधिष्टानाच्या दृष्टिकोनातून केवढे आश्चर्य दिसून येते. यामध्ये ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई हे आपल्या अलौकिक दैवी संपत्तीची महाराष्ट्रभर नुसती लूट करवीत होते. जिकडे तिकडे दैवी चमत्कार होत होते. या संबंधात सावरकरांनी अगदी संतपरंपरेच्या त्या काळातील घटनांचा हवालाही दिला आहे. यामुळेच ।। महाराष्ट्र ही त्याकाळी माणसांची भूमि नसून देवांचीच भूमि झालेली होते. महाराष्ट्र हेच त्या काळी देवांचे राहाते घर झालेले होते. वैकुंठ तेव्हा घर नव्हते. असे उपहासाने म्हटले आहे. पण या दैवी चमत्कारात या देवाच्या अधिष्ठानाने सुसंपन्न काळातच महाराष्ट्राचे असलेले स्वातंत्र्य नि राज्य धुळीस मिळवून त्या देवाच्या अधिष्ठानावर  राक्षसांच्या राज्याची टोलेजंग उभारणी झालेली आढळते. ।।

🔴 🔴 🔴

हे अशा शब्दातील सावरकरांचे विश्लेषण नेमके काय सागू इच्छित होते, ते विचक्षणपणे जाणायला हवे. त्यात हिंदुत्वाच्या संबंधातील त्यांचा दृष्टिकोन वा ईश्वर किंवा भगवंत याचे अधिष्ठान या संबंधातील त्यांचे मत हे पारलौकिकत्वाला मानायला वा स्वीकारयला तयार नव्हते, असेच म्हणावे लागते. याचे कारण त्यांनी भौतिकतेवर अधिक भर दिला होता. मुसलमानांच्या त्या काळातील अत्याचारी राजवटीविरोधात सावरकरांनी लक्ष वेधले ते केवळ हिंदुंवर झालेल्या अत्याचारासंबंधात लक्ष वेधण्यासाठी नव्हेस तर हिंदुंच्या मानसिकतेला त्यांच्या धर्मभावनेविषयक भावनांना नवीन काळानुसार बदलण्याची कशी आवश्यकता आहे, हे सांगणारी भौतिक विकासाची दृष्टी देणारी सावरकरांची धारणा या ठिकाणी प्रतीत झालेली दिसून येते. हिंदु धर्माच्या सर्वधर्मसमभावी व अहिंसक वृत्तीलाही खतपाणी न घालता भौतिक सामर्थ्यशाली बनविण्याची मानसिकता हिंदुंमध्ये पर्यायाने हिंदुराष्ट्राने स्वीकारली पाहिजे, हेच सावरकरांना सुचवायचे होते. व्रत वैकल्य, उपास-तापास, चमत्कार यावर त्यांचा भर नव्हता, इतके स्पष्ट ‘हिंदुत्व’ सावरकरांनी मांडले आहे. काळानुसार पुढे जाणअयासाठी बौतिक सामर्थ्यवृद्धीची आवश्यकता त्यांनी नेहमी प्रतिपादली, त्यासाठीच विज्ञाननिष्ठता वा बुद्धीनिष्ठता हा त्यांच्या विचारांचा गाभा राहिलेला आहे. 

चमत्कारांना मानणारा हिंदुधर्मीय त्यावेळी मुसलमानी आक्रमाणाबद्दल जरी बोटचेपे धोरण वा लाचारत्व स्वीकारणारा ठरला तरी हिंदुच्या देवाला काही त्याची दया आलेली नाही. कर्मकांड करण्यास कोणी विसरला तर मात्र हिंदुंचा देव रागावे, असे सांगत सावरकरांनी या निबंधता केलेले वर्णन हे केवळ मुसलमानांनी त्या काळी केलेल्या अत्याचारावर आसूड ओढणारे नाही तर हिंदु धर्मातील - हिंदु समाजातील प्रथा, कुप्रथा, अतिचमत्कार व कर्मकांडावर भर देणाऱ्या घटना वा वर्तनावर सावरकर जाज्वल्य भूमिका मांडत आहेत. मुसलमानी आक्रमणाबरोबरच त्यांनी ख्रिस्ती पोर्तुगीजांच्या अत्याचाराकडेही लक्ष वेधले आहे. त्या दृष्टीने त्यांच्या या निबंधातून हिंदु समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे वाक्यनवाक्ये कायम लक्षात ठेवून अनुनय करावीत अशी आहेत. ते म्हणतात....

🔴 🔴 🔴

।। जी गोष्ट् मुसलमानांची तीच गोष्ट किरिस्तावी पोर्तुगीजांची ! आम्ही ज्यास भगवंताचे अधिष्ठान समजतो ते त्यांच्या चळवळीत कुठले असणार ! उलट आमच्या देवाचा विद्वेष ते ते त्यांच्या चळवळीचे अधिष्ठान ! पण यश त्यांना मिळाले ! कुढे पोर्तुगाल ! तेथून मूठभर लोक येतात काय, गोमांतकात घुसतात काय, आणि घोड्याच्या एका फेरफटक्यासरशी साऱ्या देशभर, नगरोनगरी त्यांच्या राज्याचे झेंडे लावतात काय ! मारहाण, जाळपोळ, धर की बाटीव, नाकारले की कर ठार अशी त्या चांडाळांनी हिंदुवर धार्मिक छळाची नुसती आग पाखडली  ! शेकडो पिती लेकरे, तरुण कन्या, दास करून युरोप आफ्रिकेच्या बाजारी भाजीसारखी विकली. मुंजी, लग्ने, पूजा सारे हिंदु संस्कार दंडनीय ठरले. जीव घेऊन लोकच नव्हेत तर देवही पल्या मूर्ती भंगू नयेत म्हमून, श्रीमंगेश, शांतादुर्गा, प्रभृती देवही पळाले, आणि ते ही आपल्या भक्तास सुरक्षितपणे आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या पायांनी नव्हे तर भक्तांच्याच खांद्यावर आपल्या पालख्या लादून ! ।।

🔴 🔴 🔴

हिंदु या शब्दाचा खरा अर्थ काय आहे, त्या हिंदु धर्मासंबंधात अशा घटनांनी सावरकरांनी केवळ वास्तवतेचे भान आणून दिलेले नाही, तर त्या काळातील हिंदु मानसिकता, हिंदु धर्माच्या कर्मकांडी व भाबड्या भक्तीमयतेची एकप्रकारे खिल्ली उडवून हिंदु धर्म म्हणजे काय, त्याची संस्कृती म्हणजे काय आणि बदलत्या काळानुसार, येणाऱया संकटांना तोंड देण्याची ते आव्हान स्वीकारून झगडण्याची शक्ती त्यांनी मिळावावी यासाठी तळमळून लिहिणारे सावरकर भगवंताच्या अधिष्ठानाची नेमकी व्याख्या करू पाहातात, त्याचा अर्थ शोधू पाहातात. ते     सावरकरांच्या तार्किक, तात्विक आणि विज्ञाननिष्ठ, बुद्धीवादी व्यक्तिमत्त्वाची धारणआच या निबंधातूनही दिसून येते. 

या निबंधाच्या समारोपामध्ये असणारा परिच्छेद इतका बोलका आहे, की त्यासाठी वेगळे विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही. सावरकर लिहितात...

🔴 🔴 🔴

।। सारांश, ज्या महाराष्ट्रीय इतिहासाला उल्लेखून ही समर्थांची ओवी रचली गेली त्याच हिंदूमुसलमानांच्या महायुद्धाचा पुरावा असे दाखवितो की, 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे,' इतकेच काय ते खरे आहे. ऐहिक यश ज्या चळवळीस हवे तिने ऐहिक, भौतिक, प्रत्यक्ष सृष्टीत उपयोगी पडतील तेवढी साधने संपादून विपक्षावर 'सामर्थ्या’त मात केली की ती चळवळ बहुधा यशस्वी होते. मग तिला ज्याच्या त्याच्या धार्मिक पोथ्यांतील कल्पनाप्रमाणे न्यायाचा, पुण्याचा, स्नानसंध्याशील उपायांनी मिळविल्या जाणाऱ्या भगवंताच्या आध्यात्मिक अधिष्ठानाचा पाठिंबा असो वा नसो ! हीच गोष्ट जगातील पारशी, ख्रिस्ती, मुसलमानी, यहुदी प्रभृती यच्चयावत्धर्मग्रंथातील वचनांची नि त्यांच्या इतिहासांची आहे. ह्या प्रत्येक ग्रंथास ईश्वरदत्त म्हणून त्या त्या लोकानी मानले. त्यातल्या एकाचा देव तो दुसऱ्याचा राक्षसही असू शके. तो तो देव त्या त्या ग्रंथात वारंवार गर्जत राही की, मी माझ्याच भक्तांना 'काफरा'वर, 'पाखंडा'वर म्हणजेच त्या ग्रंथातील कर्मकाडाचे अनुसरण न करणारांवर सदोदित विजय देईन. ह्या आपल्या देवाच्या अधिष्ठानाचे साहाय्य आपापल्या उठावणीस मिळावे म्हणून  त्या त्या लोकानी त्या त्या ग्रंथातील, बहुधा अत्यंत परस्परविरुद्ध धार्मिक कृत्ये केली. कोणी गोवध करून भगवंताचे अधिष्ठान संपादू गेले, तर कोणी गाईला तर काय पण तिच्या गोमयगोमूत्रालाही पवित्र मानून! पण ऐहिक यश असे त्यापैकी कोणालाही अशा ह्या भगवंताच्या अधिष्ठानाने मिळू शकले नाही !! ज्याच्या चळवळीत इतरांहून अवश्य त्या भौतिक साधनांचे  'सामर्थ्य' अधिक होते ते त्यापुरते ऐहिक विजय मिळवू शकले. ते भौतिक समर्थ्य लोपताच त्यांच्या त्यांच्या देवांसुद्धा नाश पावले! ।।

।। ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय ?  ज्यांना ज्यांना आपल्या चळवळीस ऐहिक यश हवे त्याने आमच्या पक्षास न्याय आहे, आमच्या पक्षास देव आहे, सत्य आहे यास्तव तो आमचा पक्ष विजयी होणारच अशा वल्गना करण्याचे आणि आंधळ्या निष्ठेत निश्चिंत राहण्याचे सोडून धार्मिक अर्थी भगवंताच्या अधिष्ठानाच्या नादी न लागता 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे,' इतकेच काय तेखरे मानावे आणि वैज्ञानिक सामर्थ्यशाली, प्रत्यक्षनिष्ठ अशा ऐहिक साधनांनी विपक्षाहून वरचढ होण्याचा यत्न करावा. ऐहिक विजयाचा मार्ग हाच! अन्यायी, परोपद्रवी व्हावे असे नव्हे; तर न्याय झाला तरी तो 'समर्थ' नसेल तर व्यर्थ होय- समर्थ अन्याय त्याच्यावर कुरघोडी केल्यावाचून राहणार नाही. दुर्बल पुण्याईही पंगु होय, हे विसरू नये. नुसत्या एकशेआठ तर काय पण अकराशेआठ सत्यनारायणांच्या पूजा केल्या तरी ऐहिक यश मिळणार नाही. कारण ते चळवळीच्या भौतिक सामर्थ्यावरच काय ते अवलंबते! असत्यनारायणाचे पूजकही ह्या जगात वारंवार यशस्वी होतात. फार काय, सारे जग निर्देव करू निघालेला रशिया आज ऐहिक दृष्ट्या परम बलिष्ठ म्हणूनच यशस्वी झालेला आहे की नाही? 'निर्देव' म्हणून त्याचे वैभव टिकणार नाही म्हणाल तर ते 'सदेव' अशाही कोणाचे टिकले नाही!! श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली; प्रत्यक्ष मदिनेतील मशीद घोडशाळा बनली: 'जेहोवा' " चे सुवर्णमंदिर तडकले; जीजसला रोमने फाशी दिले- क्रुसिफाय केले!!!! 'अस्पृश्यता काढता म्हणून बिहारचा भूकंप झाला' म्हणणारा सनातनी समाज, आणि' अस्पृश्यता ठेवता म्हणून तो भूकंप झाला' असे बजाविणारा सुधारकी ढोंगीपणा हा जितका खुळचट आहे तितकाच कोटि रामनाम जपाने वा निमाजपढाईने राष्ट्रावरील भौतिक सर्वारिष्ट शांत करू निघालेला भाबडेपणाही खुळचट आहे! रामास हराम समजणारेही जे यश मिळवू शकतात ते ऐहिक यश ज्यास हवे, त्याने ते अद्ययावतवैज्ञानिक सामर्थ्य संपादावे. चळवळीत ते सामर्थ्य असले तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून काही अडत नाही. ते सामर्थ्य नसले तर भगवंताच्या अधिष्ठानासाठी कोटि कोटि जप केले तरी ऐहिक यश मिळत नाही, हाच सिद्धान्त! ।।

🔴 🔴 🔴

‘ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय ?’ हा सावरकरांचा निबंध हिंदु समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारा आहे. काळाप्रमाणे बदल स्वीकारण्याची व पारलौकिक नव्हे तर भौतिक सामर्थ्याची आवश्यकता किती महत्त्वाची ठरली आहे, ते सांगत हिंदु समाजातील पारंपरिक व तथाकथित सनातन म्हणविणाऱ्या विचारसरणीवर स्वातंत्र्यवीराचा हा क्रांतिकारी हल्ला आहे. वैचारिक बदल हिंदु समाजात घडणे आवश्यक होते, तेव्हाही आणि आत्ताही हे स्पष्ट करणारे सावरकर आजही हवे आहेत. कारण आजही स्वातंत्र्यानंतर हिंदु समाजाची भगवंत प्रीति अनेक ठिकाणी १३०० ते १६०० च्या काळातील आहे. भगवंताचे नेमके अधिष्ठान समजून घेत राष्ट्र सबळ बनविण्यासाठी आपल्याच अंतरंगात पाहाण्याची आवश्यकता आजही आहे, हेच यानिमित्ताने आवर्जून सांगावेसे वाटते. (क्रमशः)

- रवींद्र यशवंत बिवलकर

(संदर्भ - विज्ञाननिष्ठ निबंध - समग्र सावरकर वाड्मय खंड ६ प्रकाशन आवृत्ती २०००-२००१, मुद्रक प्रकाशक - पंडित बखले मुंबई व नाना गोडसे पुणे. मुद्रणस्थळ जॉली ऑफसेट १४ वडाळा उद्योग भवन, मुंबई ३१)

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

देव विश्वाचा की मनुष्याचा

    कालप्रवाही सावरकर - ३   


सावरकरांचा हा दृष्टिकोन, लक्षात घेतला की, रितीरिवाज, धर्म, धर्मग्रंथ,  ग्रंथातील लिखाण, त्याला मानणे वा न मानणे यापेक्षा व्यावहारिकतेला सावरकर महत्त्व देतात. इतकेच नव्हे तर विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही, असे सांगण्याची क्षमता बाळगूनही ते माणुसकीची खरी व्याख्या ज्या पद्धतीने सांगतात, ती विद्यमान सनातन धर्म अंधत्वाने, पोथिनिष्ठतेने स्वीकारणाऱ्यांना पटणारी आहे का, ते आधी त्या सर्वांनी ठरवावे, मगच आपण सावरकरवादी आहोत, सावरकरांना आपण मानतो असे सांगावे.

'मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव' हा निबंध सुरुवातीपासूनच इतक्या प्राथमिक बाबींचा विचार करतो, की जणू 'कोsहम'  असा प्रश्न विचारून जणू स्व चा शोध घेण्याची जी धडपड अध्यात्मिक स्तरावर माणूस करतो, त्याप्रमाणेच सावरकर या निबंधात माणसाच्या अस्तित्त्वाचाही विचार करताता, मात्र त्यांचा हा अस्तित्त्वाचा शोध अध्यात्मिकतेकडे झुकमारा नाही,. लौकिकतेकडे, ऐहिकतेकडे झुकणारा आहे. आधुनिक काळाची चाहुल त्यांना त्यांना त्याकाळात ज्या पद्धतीने लागलेली असावी, ती पाहाता, आजच्या आधुनिक काळातील बदलांबद्दल ते बऱ्याच अंशी वैचारिक स्तरावर आत्मशोध घेणारे होते. पण त्यांचा हा आत्मशोध स्वत:पुरता नव्हता तर एकंदर माणसाच्या समाजासाठी होता.  बदलत्या विश्वाला, बदलत्या काळाला समजून त्याला सामोरे जाण्याची त्यांची विचारसरणी यामधून दिसून येते.
मनुष्याचा देह, त्याची रचना याचा विचार करताना सावरकर बारकाईने विचार करतात, त्या त्या अवयवयवांचे महत्त्वही सांगतात.  केवळ मनुष्यच नव्हे तर जगाला निर्माण करणाऱ्या देवाने मनुष्यावर अमर्याद दया केली आहे, त्याचा मनुष्य कसा उतराई होणार, असेही विचारतता. हा प्रश्न जितका वाटतो तितका साधा नाही. यात अनेक बाबींना गुंफलेले आहे. निसर्गाचाही असाच विचार त्यांनी यामध्ये केला आहे. त्यामुळेच त्यांनी या निसर्गाचे माणसाशी असणारे नाते, त्यातील समतोल किती महत्त्वाचा असतो हे ओळखले आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे सावरकरांनी यंत्रयुगाला नेहमीच प्राधान्य दिले असले तरी त्यांनी निस्रग आणि माणूस यांचे नाते त्यातील समतोल हा देखील बारकाईने लक्षात घेतलेला होता. माणूस असो वा निसर्गातील जीव, पशू पक्षी, प्राणी, झाडे, फळे, फुले अशा सर्वांचा विचार करीत, त्यांची वैशिष्ट्ये लक्षात घेत सावरकरांनी मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव यांचे स्वरूप मांडले आहे. त्यातूनही ते महत्त्व मनुष्याला देतात कारण त्या मनुष्य, त्याचा समाज, त्याचे जगणे, त्याची इतिहास, संस्कृती, परंपरा, धर्म, अधर्म, चांगली व वाईट कृत्ये अशा सर्व बाबींचा विचार त्यांनी केला आहे. त्यामुळेच निसर्गाचा घटक असलेल्या मनुष्याला देवाने जे दिले आहे ते कसे पाहायचे ते या निबंधातून ते शिकवितात. त्यामुळेच चांगले आणि वाईट हा भेद ते मांडतात. यामुळेच देव या संकल्पनेला सांगताना असणारा त्यांचा दृष्टीकोन हा अतिशय वेगळा व स्वतंत्र आहे. त्यामुळेच त्या संबंधातील त्यांची वाक्ये नीट लक्षात घेण्यासारखी आहेत.
🔴 🔴 🔴
।। भोगात रुचि आहे, योगात समाधी आहे-देवा! ते हे जग ज्या तू आम्हा मनुजांना इतके सुखमय होऊ दिलेस, होऊ देत आहेस, ते तू आमच्या सुखासाठीस निर्मिले आहेस असे आम्हास का वाटू नये?…
।। आम्ही माणसे देवा तुझी लेकरे आहोत. तू आमची खरी आई आहेस! आईला देखील दूध येते तू दिलेस म्हणून! आम्ही मनुष्ये तुझे भक्त आहोत आणि देवा तू आम्हा मनुष्यांचा देव आहेस. इतकेच नव्हे तर तू आम्हा मनुष्यांचाच देव असून तुझ्यावाचून दुसरा देव नाही.
।। पृथ्वीवर जेव्हा नुसत्या प्रचंड सुसरीच सुसरी नांदत होत्या नि मनुष्याचा मागमूसही नव्हता तेव्हाही नद्या वाहात होत्या. झाडे फुलत होती, वेली फुलत होत्या. मनुष्यावाचून तर काय पृथ्वीही नव्हती तेव्हाही हा सूर्य असाच आकाशात भटकत फिरण्यास भीत नव्हता आणि आता हा सूर्यही जरी त्याच्या साऱ्या ग्रहोपग्रहांसुद्धा हरवला तरी एक काजवा मेला तर पृथ्वीला जितके चुकलेसे वाटते तितकेदेखील या सुविशाल विश्वाला चुकलेसे वाटणार नाही. या विश्वाच्या देवाला एक पलाचेही सुतक असे शंभर सूर्य एखाद्या साथीत एका दिवसात जरी मरू लागले तरी धरावे लागणार नाही !
।। परंतु त्यापलीकडे ह्या विश्वाच्या देवाशी, वाटच्या भिकारड्याने सम्राटाशी जोडू पाहावा तसा कोणचाही बादरायण संबंध जोडण्याची लाचार हाव मनुष्याने आमूलात्सोडून द्यावी हेच इष्ट ! कारण तेच सत्य आहे! आपले चांगले ते देव करील, देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन, ही आशा, हा अवलंब, अगदी खुळचट आहे ! कारण तो अगदी असत्य आहे. ज्या ज्या संकटातून आपणास सोडविले म्हणून आपण देवाचा सत्यनारायण करतो त्या त्या संकटात प्रथम आपणास ढकलतो कोण? तोच सत्यनारायण, तोच देव ! जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्यास मलम लावतो. त्याची मलम लावण्यासाठी पूजा करावयाची तर प्रथम गळा का कापलास म्हणून त्याची आधी यथेच्छ शोभाही करावयास नको काय? विश्वाच्या देवाच्या ठायी ह्या दोन्हीही भावना अनाठायी नि असमंजस आहेत.
।। ती विश्वाची आद्यशक्ति ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे. मनुष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट. अशी नीती अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत; कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही;फार फार थोड्या अशी ते आपणास अनुकूल आहे; विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही, फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे, असे जे आहेत ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा !!

🔴 🔴 🔴
हे सांगताना सावरकर विश्वातील सूर्य, समुद्र आणि त्यामुळे माणसावर होणारे उपकार आणि हानि यांचीही उदाहरणे देतात. नदी, पाणी यांचीही उदाहणे देतात. त्यामुळे असणारी उपयुक्तताही सतत सांगत सावरकर पुन्हा पुन्हा उपयुक्ततावादाला मांडत आहेत. त्यातून होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचे पडसाद त्यांनी मांडले आहेत. निसर्गातील नानाविध प्राणी त्यापासून मिळणारे मांस याचे वर्णनही सावरकरांनी ज्या पद्धतीने केले आहे, ते सुरवातीला इतके सहज, हळूवार वाटते ते नंतर उपयुक्ततावादाच्या आणि तार्किकतेच्या पटलावर जेव्हा स्पष्ट होते, तेव्हा त्या सर्व मांडणीचे महत्त्व कळते. त्यातून उमजते ते सावरकरांचे जीवनविषयक धोरण. या विश्वातील मनुष्य प्राण्याखेरीज असलेल्या सर्व घटकांना सावरकरांनी आपल्या वेगळ्या नजरेने पाहिले आहे. ही नजर विज्ञानाची कास धरणारी आहे, उपयुक्ततावादाला स्वीकारणारी, मांडणारी आणि बदलत्या काळाबरोबर अद्ययावत होऊ पाहाणारी आहे. देवाविषयीच्या सुस्पष्ट धारणा त्यांनी येथे मांडलेली आहे. अंधभक्ती, भाबडी भक्ती, वा दृष्टिकोन सावरकर ठेवू इच्छित नाहीत. सावरकरांचा हा दृष्टिकोन, लक्षात घेतला की, रितीरिवाज, धर्म, धर्मग्रंथ,  ग्रंथातील लिखाण, त्याला मानणे वा न मानणे यापेक्षा व्यावहारिकतेला सावरकर महत्त्व देतात. इतकेच नव्हे तर विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही, असे सांगण्याची क्षमता बाळगूनही ते माणुसकीची खरी व्याख्या ज्या पद्धतीने सांगतात, ती विद्यमान सनातन धर्म अंधत्वाने, पोथिनिष्ठतेने स्वीकारणाऱ्यांना पटणारी आहे का, ते आधी त्या सर्वांनी ठरवावे, मगच आपण सावरकरवादी आहोत, सावरकरांना आपण मानतो असे सांगावे. केवळ विशिष्ट हेतूंसाठी सावरकरांना जवळ करण्याऐवजी त्या सावरकरांचा देव करण्याऐवजी त्यांच्यातील माणूस नेमका काय सांगतो ते ऐकावे, पटले तर घ्यावे न पटले तर सोडून द्यावे. असे सांगण्याचे कारण म्हणजे आजच्या घडीला सावरकरांच्या संबंधात काहीही बरळले जाते. मुळात काळानुसार चालावे, जगावे असे सांगणारे सावरकरांचे हे तत्त्वज्ञान. ते प्रवाही आहे. त्यांनी सांगितलेलेा विचार पाहाता तुम्हीही प्रवाही राहावे, असाच त्याचा अर्थ निघतो. 'बाबा वाक्यंम प्रमाणाम' सारखे 'सावरकर वाक्य प्रमाणम' असेही मानून त्यांना पोथिनिष्ठ करू नये. किंबहुना प्रवाहीपणा हा बुद्धीनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ पद्धतीने प्रत्येक पिढ्यांनी स्वीकारला तर प्रत्येक पिढीत कालप्रवाही वि. दा. सावरकर तयार होऊ शकतात. त्यामुळेच कोणत्याही राजकीय पक्ष-प्रवृत्तीना आज सावरकरांचे हे कालप्रवाहीपण झेपणारे नाही, कारण राष्ट्र या संबंधातून त्यांनी मांडलेली प्रखर राष्ट्रनिष्ठाही त्यासाठी आधी समजून घेणे गरजेचे आहे. हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र या संबंधातील सध्याच्या राजकीय कल्पना तर खूप दूरच राहिल्या. (क्रमशः)

- रवींद्र यशवंत बिवलकर

(संदर्भ - विज्ञाननिष्ठ निबंध - समग्र सावरकर वाड्मय खंड ६ प्रकाशन आवृत्ती २०००-२००१, मुद्रक प्रकाशक - पंडित बखले मुंबई व नाना गोडसे पुणे. मुद्रणस्थळ जॉली ऑफसेट १४ वडाळा उद्योग भवन, मुंबई ३१)

 

बुधवार, ३ जानेवारी, २०२४

विश्वाचा शोध

   कालप्रवाही सावरकर - २   

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विज्ञाननिष्ट निबंधांमधून त्यांची वैचारिक दिशा, त्यांची मानवविषयक, धारणा, देव, धर्मविषयी धारणा, राष्ट्राबद्दलची प्रखर जाणीव, विश्वात्मकतेचे आकलन अशा सर्व घटकांना बुद्धीच्या - विज्ञानाच्या आधारावर तोलून मापून त्यांनी काळाबरोबर जाणाऱ्या जगाला आपले म्हटले आहे. हिंदुराष्ट्र या त्यांनी दिलेल्या संकल्पनेला खरा आधार हा याच बुद्धीनिष्ठ, विज्ञाननिष्ठ अशा धारणेतून त्यांनी घालून दिला आहे. सर्वसाधारणपणे त्यांच्या प्रत्येक निबंधांमधून मिळणारी ही जाणीव त्यांच्या विज्ञाननिष्ठ निबंधांमधून अतिशय तार्किक व तात्विक पद्धतीने मांडलेली दिसते.  

सावरकरांच्या निबंधामधून त्यांच्या विचारांच्या दिशेचा वेध घेणे हे ही सोपे काम नाही. त्यांची वाक्यरचना, त्यातून विषय समजून घेऊन तो मांडण्याची पद्धती, त्या काळातील त्यांच्या लांबलचक वाक्यांमुळे व संदर्भांमुळे तौलनिकदृष्टीनेही त्यांनी केलेली विषयांची मांडणी हे त्यांच्या निबंधांच्या शैलीचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागते. भाषा, शब्द यामुळे आजच्या नवकालातील मराठी माणसांनाही त्यांची माहिती व्हावी, यासाठी त्यांच्या विविध महत्त्वाच्या निबंधांचे हे विश्लेषण करण्याचा हा प्रयत्न वा धाडस आहे.

विश्व म्हणजे काय, सुख व दुःख किंवा चांगले वा वाईट या दोन संकल्पना माणसाच्यादृष्टीने कशा तयार झाल्या, हे सांगताना देव व राक्षस या दोन साध्या घटकांची माहिती सावरकर सुरुवातीपासून देतात. तात्विकतेतून व काहीशा सुलभ तार्किकतेतूनही ते त्याचे विश्लेषण करतात. विश्वाचे आकलन करण्यासाठी प्राचीन तत्त्वज्ञान्यांनी जे काही पृथ्थकरण केले आहे, ते करताना सावरकर अतिशय सोप्या शब्दात अभ्यासकांना किंवा चिकित्सक वृत्तीच्या लोकांना समजेल, अशा भाषेत विश्लेषण करतात पाच इंद्रियांनीच विश्वाचे आकलन होऊ शकते, असे सांगताना ते पंचीकरण असा शब्द वापरतात. तर विश्वातील शक्तीच्या वर्गीकरणाचा तो उत्तम मार्ग असल्याचे सांगत पंचमहाभूतांची माहिती देतात. पाच गुणांच्या तत्वांनीच विश्व घडलेले असेल, असे सांगताना तर्कशास्त्राने व तत्त्वज्ञान्याप्रमाणे सावरकरांनीही प्राचीन काळात मनुष्याने विश्वाचा शोध कसा घेतला असेल, त्याचे अस्तित्त्व कसे जाणण्याचा प्रयत्न केला असेल, त्याचे गुणधर्म पंचेंद्रियांच्या आधारे कसे समजून घेतले असतील हे ते सांगतात. त्यासाठी त्यांनी आस्तिकांना, धर्म मानणाऱ्यांनाही न दुखाविता सृष्टीच्या रचनेची माहिती कधी हळूवारपणे तर कधी परखडपणे व तौलनिक समतोल साधत निबंधातून उतरविली आहे. उदाहरणे देतानाही त्यांनी व्यावहारिक बाबींनाही लोकांसमोर मांडून विश्वाचे हे स्वरूप समजाविण्याचा केलेला प्रयत्न हा आधुनिक काळातील एखाद्या उत्तम शास्त्रशिक्षकाच्या हातोटीने केलेला आहे. विज्ञानवादी असणारे सावरकर त्यामुळे देव या शब्दालाही तितक्याच रितीरिवाजांना मानणाऱ्या तसेच रुढ अशा धर्म शब्दाला धरून चालणाऱ्या समाजाच्या मानसिकतेतून हळूवारपणे व देव या संकल्पनेची लोकांमधील जाणीव न दुखावता विश्वाचे शास्त्रीय पृथक्करण करू पाहातात.

केवळ इतकेच नव्हे तर विश्वातील प्राणीमात्रांची उदाहरणे आणि तुलना, त्यांची वैशिष्टये याचीही माहिती सांगत मनुष्याचे महत्त्व त्यांनी अधिकाधिक अधोरेखीत केले आहे. किंबहुना माणसाला केंद्रस्थानी मानून माणसांचे गुणविशेष, गुण व अवगुण अशा विविध बाबींनाही त्यांनी मोजक्या शब्दात स्पष्ट केले आहे.

'एक गव्हाचा दाणा पेरला की त्याचे शंभर दाणे या जगात होऊन उठतात; एक आंबा!  रसाने, स्वादाने, सत्वाने कोण भरपूर भरलेले ते देवफळ! पण तरीही ते इतके सुपीक की एक आंबा रुजवला की त्याचा वृक्ष होऊन प्रतिवर्षी हजार हजार आंबे त्याला लागावे नि असा क्रम वर्षानुवर्षे चालावा; फार काय सांगावे, एका आंब्याच्या फळापासून होणारी ती लाखो फळे, सगळीची सगळी जरी मनुष्यांनी खाल्ली  तर पुन्हा आंब्याचा तोटा म्हणून पडू नये, यासाठी आंब्याच्या झाडाच्या फांदीचीच कलमे करून त्यांच्या आंबरायांच्या आंबराया भरभराटण्याची सोय ज्या जगात देवाने केलेली आहे….' सावरकरांची ही विश्लेषण करण्याची पद्धत पाहाता त्यांनी तत्कालिन धार्मिकतेला न दुखाविता देवाने मनुष्यावर कसे कसे उपकार केले आहेत, ते सांगत मनुष्य त्याचा उतराई तरी कसा होणार, असे विचारीत मनुष्य देहाच्या रचनेवरही ते भाष्य करतात. सूक्ष्मातिसूक्ष्म पिंडानुपिंडापर्यंत शरीराची रचना इश्वराने केलेली आहे, त्या मनुष्याच्या देवाचेही गुणगान ते गातात. हे करताना प्रत्येक ठिकाणी त्यांनी विज्ञानविचारांना ज्या पद्धतीने सादर केले आहे, ते बारकाईने लक्षात घ्यावे असे आहे. सारे काही मनुष्यासाठी देवाने निर्माण केले आहे, त्याचे अगदी रसाळ वर्णन करत सावरकरांनी साऱ्या पृथ्वीवरील वस्तू, तरीही सर्व काही मनुष्यास पूर्णानुकूल नसल्याचे सांगतात. येथे 'उपयुक्ततावाद' ही सावरकरांची दृष्टी सुरू होते. ऐहिकतेला पुढे ठेवणारी व पारलौकिकतेला गौण ठरवणारी त्यांची विचारसरणी येथून अनेक तपशीलांचे विश्लेषण करणारी ठरते. 

 मग विज्ञानवादी विचारांमधून त्याची मीमांसा करीत निसर्गातील घटकही मनुष्यास कसे मारक असू शकतात, कसे मारक ठरतात ते सांगत धर्मग्रंथांचीही काही उदाहरणांनी माहिती देत भाबड्या भक्तीवर ते तुटून पडतात. निसर्गातीलच घटक कसे परस्परावर उठून बसलेले दिसतात. हे सांगताना बळी देण्याच्या प्रथांवर आसूड ओढतात व त्याचवेळी मनुष्याचे मांस खाण्यासही वाघ, चित्ते, लांडगे यांची देवाने निर्मिती केलेली आहे, हे सांगतात. एकंदर विश्व निर्मिती, त्यामागील स्थिती, प्रेरणा, हेतू वा उद्देश यांची विश्लेषणात्मक मीमांसा या 'मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव' निबंधांत केली आहे. कधी हळुवारपणा तर कधी परखडपणा व स्पष्टपणा तर कधी तार्किक व तात्विक पद्धतीने त्यांनी हे विश्लेषण केले आहे. थोडक्यात विश्व म्हणजे नेमके काय आहे, सत्य आणि असत्य या त्या संबंधात असणाऱ्या घटकांना कसे ओळखावयाचे, देवाला आवडते व नावडते असे काही नसते. अशा खुळचट समजुतींना दूर करा - बाजूला सारा हे सांगणारे सावरकर माणुसकीवर भर देतात व विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा असे सांगताना जो धडा देतात, तो पाहून सनातन धर्माचा हवाला देत 'बाबा वाक्यं प्रमाणंम्' सांगणारे हिंदू असोत वा कुराण, बायबल याचे 'श्रुती स्मृती पुराणोक्त' म्हणणारे आणखी कोणी असोत, त्यांचे डोळे उघडण्याचे काम सावरकरांच्या या विश्वाच्या देवाने केले आहेत. पण दुर्दैवाने आज त्यांच्या विश्वाचा देव ना मनुष्याला कळला आहे ना पृथ्वीवरील अविज्ञानी जनांना उमगला आहे. तरीही मी ही सावरकर म्हणविणारे भक्तगण टोप्या घालत आहेत. (क्रमशः)

- रवींद्र यशवंत बिवलकर

(संदर्भ - विज्ञाननिष्ठ निबंध - समग्र सावरकर वाड्मय खंड ६ प्रकाशन आवृत्ती २०००-२००१, मुद्रक प्रकाशक - पंडित बखले मुंबई व नाना गोडसे पुणे. मुद्रणस्थळ जॉली ऑफसेट १४ वडाळा उद्योग भवन, मुंबई ३१)


अद्ययावत व्यक्तिमत्त्व

   कालप्रवाही सावरकर - १  

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीचे नाही, सशस्त्र क्रांतिकारकांचे नेते म्हणूनही नाही किंवा केवळ समाजसुधारक, तत्त्ववेत्ते वा कायम एकाच तत्वज्ञानावर ठाम राहाणारेही नाही. सावरकर हे व्यक्तिमत्त्व अद्ययावत राहू पाहाणारे व विज्ञानवादाला- बुद्धिवादाला स्वीकारीत उपयुक्ततावादी जीवनशैलीलाही स्वीकारून राष्ट्र संकल्पनेला वर्गहित साधून आर्थिक दिशा देऊ पाहाणारे आहे. नवीन पिढीलाही पुढे जाण्यासाठी न अडविणारे वा त्यांना कोणत्याही एका विशिष्ट न बदलणाऱ्या ‘बाबा वाक्यं प्रमाणम’ प्रकारच्या वैचारिकतेत जखडून न ठेवणारे व्यक्तिमत्त्व होते. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निबंधामधून त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय सुस्पष्टपणे दिसते. त्यांच्या बुद्धिमत्तेबरोबरच त्यांच्या विचारांची दिशा, भविष्याचा मागोवा घेत वेध घेण्याची त्यांची तात्विक कृतिशीलता, त्यांचे सामाजिक, आर्थिक, तत्त्वज्ञानात्मक, तर्काधिष्ठित, धर्मविषयक दृष्टिकोन त्या काळात काय होते आणि त्यांना भविष्यातही काय अभिप्रेत होते, त्याचा सुस्पष्टपणा निबंधांमधून जाणवतो. विशेष म्हणजे देश, राष्ट्र, समाज, इतिहास, संस्कृती, धर्म आणि विज्ञानावर आधारित जीवनमूल्ये- धारणा यासह त्यांनी आपली तत्त्वप्रणाली मांडली. दुर्दैवाने त्यांच्या या विचारसरणीला पेलवेल, इतकी हिंदुस्थानातील हिंदु, मुस्लिमांची बौद्धिकता तेव्हाही नव्हती आणि दुर्दैवाने स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊनही ती धारणा पेलवण्याचीही बौद्धिक क्षमता आजही नाही. याचे कारण सतत काळाबरोबर वैचारिक, बौद्धिक, सामाजिक सुधारणा स्वीकारण्याची ताकद आजच्या समाजाकडे आहे की नाही, किती टक्के समाज प्रगल्भ आहे, साक्षरता आणि विवेकशील भान, विज्ञानाने प्रगती साधलेल्या समाजामध्ये वैज्ञानिक समज किती आहे, त्यानुसार आवश्यक असलेल सर्वस्तरीय बदल स्वीकारले गेले आहेत का, ऐहिकतेत व व्यक्तिस्वातंत्र्य, चंगळवाद यात आजचा समाज पार काळवंडून गेला आहे, हे लक्षात घेता समाजाची वैचारिक स्थिती परिपूर्ण नसल्याचे म्हणावे लागेल. अर्थात यामागे असणारी विविध कारणे ही संशोधनाचा विषय आहे. पण, त्याचबरोबर सावरकरांच्या तात्त्विकतेच्या व तर्काधिष्ठितपणाच्या पासंगालाही समाजमन पुरलेले नाही, समाजाची वैचारिक परिपक्वता ही ऐहिकतेत व अतिव्यक्तिस्वातंत्र्यात गाडली गेलेली आहे.

सावरकरांचे निबंधांमधील विचार, तत्कालिन काळ आणि मानसिकता याबरोबरच आजचा काळ आणि मानसिकता यामध्ये समाज व हिंदु कुठे आहेत, हिंदुंचे नेतृत्व कुठे आहे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वैचारिक मंथन नेमके काय सांगणारे आहे याचा तौलनिक तपशील मांडण्याचा या लिखाणात प्रयत्न करणार आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि वैचारिक पैलू या निमित्ताने मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीचे नाही, सशस्त्र क्रांतिकारकांचे नेते म्हणूनही नाही किंवा केवळ समाजसुधारक, तत्त्ववेत्ते वा कायम एकाच तत्वज्ञानावर ठाम राहाणारेही नाही. सावरकर हे व्यक्तिमत्त्व अद्ययावत राहू पाहाणारे व विज्ञानवादाला- बुद्धिवादाला स्वीकारीत उपयुक्ततावादी जीवनशैलीलाही स्वीकारून राष्ट्र संकल्पनेला वर्गहित साधून आर्थिक दिशा देऊ पाहाणारे आहे. नवीन पिढीलाही पुढे जाण्यासाठी न अडविणारे वा त्यांना कोणत्याही एका विशिष्ट न बदलणाऱ्या ‘बाबा वाक्यं प्रमाणम’ प्रकारच्या वैचारिकतेत जखडून न ठेवणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच इतके लवचिक व काळाची पावले ओळखून बदल स्वीकारणारे तत्त्व सांगत प्रत्येकाच्या मनात त्याचे त्याचे पिढीनुसार स्वत्व बाणवू पाहणारे सावरकर आज किती जणांना ओळखू आले आहेत, कितींना पचविता आले आहेत, कितींना समजू शकले आहेत, ते ज्याचे त्याने ठरवावे व मगच त्यांनी त्यांनी सावरकर अनुनय करीत असल्याचे सांगावे, ही वास्तवता सावरकरांच्या संबंधात स्पष्ट दिसून येते. त्यामुळेच त्यांची खरे म्हणजे मीमांसा करण्याचीही आपल्या पिढीची पात्रता आहे, असे मला अजिबात वाटत नाही. मात्र तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा त्यांच्या विज्ञानिष्ठ निबंधांच्या अनुषंगाने मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे.

- रवींद्र यशवंत बिवलकर

(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक )


फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...