सावरकर : काल, आज आणि उद्या
माझ्या नजरेतून -१०
बुद्धिवादी चिकित्सक
अमूक ऐहिक आचाराने परलोकी अमुक उपयोग होतो, असे सांगणाऱ्या कोणत्याही नियमास आज तरी सनातन धर्म म्हणजे शाश्वत व अपरिवर्तनीय नि अबाधित नियम असे मुळीच म्हणता येणार नाही. या पारलौकिक प्रकरणी नाना क्लृप्ति सांगणारे कोणतेही धर्मग्रंथ अपौरुषेय वा ईश्वरदत्त नसून मनुष्यकृत वा मनुष्यस्फूर्त आहेत. त्याच्या क्लृप्ति प्रमाणहीन असल्याने त्यास सनातन धर्म, शाश्वत सत्य असे म्हणता येत नाही.
सावरकरांचा बुद्धिवाद हा वरवरचा नव्हता, अंध नव्हता. तो सखोल- विचारपूर्वक होता. चिकित्सक असणारा त्यांचा बुद्धिवाद हा विविधांगी विचार करीत मांडला जाणारा होता. वैदिक तत्त्वज्ञानाचा सांगोपांग विचार करीत ते चिकित्सा करतात. आप्तवाक्य आणि शब्दप्रमाण या संबंधातही त्यांनी तावून सुलाखून विचार केला आहे. त्यामुळे काही वैदिक सिद्धांतांचे आधार घेतानाच ते कोणत्याही एका सिद्धांताला सत्य आहे, असे मानायला तयार नसतात. त्यावरील चर्चेमधून ते पारलौकिक वा तत्संबंधत विषयावरील सिद्धांत स्वीकारायला तयार नसतात. शब्दप्रामाण्याबद्दलही ते याच प्रकारची बाजू मांडतात. पारलौकिक वा तत्त्वज्ञानविषयांचे सिद्धांतही शाश्वत कसे नाहीत, हे यातून स्पष्ट होते. तसेच जगातील विविध धर्मांच्या संबंधातील त्यांचा वास्तववादी आणि तर्कबद्ध दृष्टिकोन दिसून येतो. त्यांची ही खाली दिलेली विधाने म्हणजे सावरकरांच्या बुद्धिवादी भाष्याची प्रचिती देणारी आहेत.
।। शब्दप्रामाण्याची स्थिती आप्तवाक्यासारखीच आहे. अपौरुषेय वेद ज्या कारणासाठी अपौरुषेय ठरले, त्याच कारणासाठी तौलिद, इंजिल, बायबल, कुराण, अवेस्ता, स्वर्णग्रंथ - एक ना दोन- जगात जवळजवळ जे पन्नास एक ग्रंथ तरी आजही ईश्वरप्रदत्त म्हणून प्रख्यात आहेत, तेही सर्व अपौरुषेय मानणे भाग पडते. आणि त्या प्रत्येकात देवाने प्रत्येक तदितर अपौरुषेय धर्मग्रंथातील पारलौकिक वस्तुस्थितीच्या दिलेल्या माहितीशी विभिन्न, विसंगत नि विरुद्ध माहिती दिलेली आहे. वेद सांगतात, स्वर्गाचा इंद्र हाच राजा! पण बायबलाच्या स्वर्गात इंद्राचा पत्ता टपालवाल्याला देखील माहीत नाही. देवपुत्र येशूंच्या कंबरेस साऱ्या स्वर्गाची किल्ली ! देव आणि देवपुत्र दोघे एकच. Trinty in unity, unity in trinty ! कुराणातील स्वर्गात ला अल्ला इल्लला आणि महंमद रसुलल्ला' तिसरी गोष्ट नाही. रेडइंडियनांच्या स्वर्गात डुकरेच डुकरे, घनदाट जंगले! पण मुस्लीम पुण्यवंतांच्या स्वर्गात असली 'नापाक चीज' औषधालाही सापडणार नाही ! आणि प्रत्येकाचे म्हणणे असे की स्वर्ग मी सांगतो तसाच आहे. प्रत्यक्ष देवाने ते सांगितले आहे; नव्हे महंमदादि पैगंबर तर वर जावून, राहून स्वतः ते पाहून परत आले नि त्यांनीही तेच सांगितले! तीच स्थिती नरकाची ! पुराणात मूर्तिपूजक नि याज्ञिकच काय पण यज्ञात मारलेले बोकड देखील स्वर्गातच जातात, असा त्याचा मेल्यानंतरचा पक्का पत्ता दिला आहे. पण कुराण तर शपथेवर सांगते की, नरकातल्या जागा कितीही दाटी झाली तरी जर कोणाकरिता राखून ठेवल्या असतील तर त्या ह्या मूर्तिपूजक आणि अग्निपूजक सज्जनांसाठीच होत! मेल्यानंतरचा पक्का पत्ता नरक! हे सारे धर्मग्रंथ अपौरुषेय यास्तव खरे धरावे तरीही त्यात सांगितलेली वस्तुस्थिती शब्दप्रामाण्याने देखील सिद्धांतभूत ठरत नाहीअन्योन्यव्याद्यातात! ते सारे मनुष्यकल्पित खोटे मानले तर ती सिद्धांतभूत ठरत नाहीच नाही - वदतोव्याघातात! आणि काही खोटे मानावे तर तरीही ते तसे नि हे असे कां, हे ठरविण्यास त्यांच्या स्वतःच्या शब्दावाचून दुसरे प्रमाण नसल्या मुळे ती सिद्धांत ठरत नाही ती नाहीच - स्वतंत्र प्रमाणाभावात.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या तार्किक आणि परखड अशा युक्तिवादावर वास्तविक काही उत्तर वा सारवासारवही करता येण्यासारखी नाही इतकी ती टीका अचूक, चपखल अशी मर्मभेदी आहे. कोणाही एका धर्मग्रंथाबद्दल त्यांनी असा युक्तिवाद मांडलेला नाही तर तो सर्वच पौरुषेय अशा धर्मग्रंथांबद्दलच स्पष्टपणे मांडला आहे. एकांगीपणा नाही तर तटस्थ आणि तारतम्यपूर्ण असा हा त्यांचा दावा भेदक आहे. मार्क्सवादी म्हणवणाऱ्यांनाही त्यांनी अशा प्रकारच्या विचारांमधून नमवले आहे. धर्माचे अस्तित्त्व ज्या धर्मग्रंथांवर अवलंबून ठेवून सांगितले जाते, त्या धर्मग्रंथांबद्दलच त्यांनी इतके सत्यकथन करणारे विचार स्पष्ट केले आहेत, यातच त्यांची विचारसरणी स्पष्ट होते. ती कितींना झेपते ते त्यांचे त्यांनी ठरवावे मात्र सावरकरांवर जातीयतेचा शिक्का मूर्खपणाने मारण्याचे धाडस करू नये हे नक्की.
।। मनुष्याचे जे ऐहिक व्यवहार त्याच्या पारलौकिक जीवनास उपकारक आहेत असे समजले जाओ, त्यास आम्ही आचार हा शब्द योजतो. अर्थात् वर दर्शविल्याप्रमाणे पारलौकिक जीवनासंबंधी आस्तिपक्षी वा नास्तिपक्षी अजून कोणताही नक्की सिद्धांत मनुष्यास कळलेला नसल्यामुळे त्याला कोणता ऐहिक आचार उपकारक होईल हे ठरविणे अशक्य आहे. हिंदूंच्याच नव्हे तर मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी यहुदी प्रभृति झाडून सान्या धर्म ग्रंथातील कर्मकांडाचा पाया अशा वाळूच्या ढिगावर उभारलेला आहे. 'क्ष' हे बेट की गांव, रान की वैराण, पूर्वेस की उत्तरेस, आहेच की नाही हेच जिथे निश्चित केले नाही; तिथे 'क्ष' भूमध्ये सुखाने नांदता यावे म्हणून कोणत्या दिशेने जावे आणि कोणती शिधा-शिदोरी तिथे उपयोगी पडेल, यावे बारीकसारीक अपरिवर्तनीय नियम बनविणे किती अनमानधपक्याचे काम? तसेच हे यास्तव अमूक ऐहिक आचाराने परलोकी अमुक उपयोग होतो, असे सांगणाऱ्या कोणत्याही नियमास आज तरी सनातन धर्म म्हणजे शाश्वत व अपरिवर्तनीय नि अबाधित नियम असे मुळीच म्हणता येणार नाही. या पारलौकिक प्रकरणी नाना क्लृप्ति सांगणारे कोणतेही धर्मग्रंथ अपौरुषेय वा ईश्वरदत्त नसून मनुष्यकृत वा मनुष्यस्फूर्त आहेत. त्याच्या क्लृप्ति प्रमाणहीन असल्याने त्यास सनातन धर्म, शाश्वत सत्य असे म्हणता येत नाही.
(क्रमश:)
- रवींद्र यशवंत बिवलकर




