सावरकर आमचे... पण - ६
हिंदुत्व हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडण्यापूर्वी तो शब्द फार कमी वेळा वापरला गेला असेल. अर्थात तो वापरताना हिंदु धर्म या अर्थाने वा त्या संबंधाने तो वापरला गेला. मुळात हिंदुत्व हे हिंदुमध्ये प्रचलित अशा कोणत्याही धर्ममतापेक्षा व्यापक आहे. त्याला बहुसंख्यांकाच्या धर्ममताशी समानार्थक समजल्याने अल्पसंख्याकांना हिंदु हा शब्द अप्रिय आणि अनिष्टही वाटू लागला. सावरकरांनी मात्र हा शब्द वा संकल्पना वापरताना केलेला विचार हा खूप व्यापक आहे, त्यामागे इतिहासाचा निष्कर्ष आहे, भौगोलिक जाण आहे, मानवी समाजाची जाणीव आहे,. संस्कृती- रिती-रिवाजांची जपणूक आहे, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, धर्म-पंथ, पूजा-प्रार्थना आणि त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे हिंदुस्थान या प्रांतातील माणसांवर झालेल्या अत्याचारांची, धर्मांतर आणि त्यासंबंधातून तयार झालेले प्रश्न तसेच गुलामगिरीच्या आणि सत्ताधारी आक्रमकांच्या राजवटीच्या प्रभावाची, स्वत्वातून बेघर करू पाहाणाऱ्या वैचारिक बलात्काराची, ब्रिटिश सत्तेमुळे व त्यांच्या कूटनीतीमुळे होत असलेल्या विविध दुष्परिणामांची अचूक जाण आहे व ती सावरकरांना होती. ...
हिंदुत्वाची भूमिनिष्ठ संकल्पना समाजरक्षणासाठी

स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्व ही संकल्पना अतिशय सखोल पद्धतीने मांडलेली दिसते. त्यांनी केवळ अंदमानात आलेल्या मुस्लीम आक्रमकतेवरून हिंदुत्व मांडले नाही की केवळ एक धर्म म्हणून हिंदुत्वाकडे पाहिले नाही. हिंदुत्व हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडण्यापूर्वी तो शब्द फार कमी वेळा वापरला गेला असेल. अर्थात तो वापरताना हिंदु धर्म या अर्थाने वा त्या संबंधाने तो वापरला गेला. सावरकरांनी मात्र हा शब्द वा संकल्पना वापरताना केलेला विचार हा खूप व्यापक आहे, त्यामागे इतिहासाचा निष्कर्ष आहे, भौगोलिक जाण आहे, मानवी समाजाची जाणीव आहे, संस्कृती- रिती-रिवाजांची जपणूक आहे, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, धर्म-पंथ, पूजा-प्रार्थना आणि त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे हिंदुस्थान या प्रांतातील माणसांवर झालेल्या अत्याचारांची, धर्मांतर आणि त्यासंबंधातून तयार झालेले प्रश्न तसेच गुलामगिरीच्या आणि सत्ताधारी आक्रमकांच्या राजवटीच्या प्रभावाची, स्वत्वातून बेघर करू पाहाणाऱ्या वैचारिक बलात्काराची, ब्रिटिश सत्तेमुळे व त्यांच्या कूटनीतीमुळे होत असलेल्या विविध दुष्परिणामांची अचूक जाण आहे व ती सावरकरांना होती. त्यामुळेच त्यांनी हिंदुत्व संकल्पना मांडताना हिंदु समाज, राष्ट्र, अहिंदु, हिंदु समाजामधील आणि धारणांमधील प्राचीन आधार, लिखाण, इतिहास यांचा मागोवा घेतला आहे. मूळ ‘सप्तसिंघु’ याच्याशी वेदकालीन संबंध असल्याचे सांगत तसेच हिंदु या शब्दाचा हिंदुत्वाशी निगडित असणारा अर्थ अतिशय अभ्यासूपणे स्पष्ट केला आहे. हा शब्द मुसलमानंनी काढलेला नाही. हिंदु, हिंदुस्थान, हिंद या प्राकृत शब्दाचा उगम हा सप्तसिंधु या आपल्या प्राचीन अशा संकल्पनेत आहे. सप्तसिंधु, सिंधुस्तान, सिंधु या संस्कृत आणि स्वकीय अशा आपल्या प्राचीन अभिधांचीच हिंदु, हिंदुस्थान ही रूपे आहेत, असे सांवरकर सांगतात. त्यात ते भविष्यपुराणाचाही आधार घेतात, अरब ग्रंथाचेही दाखले देतात. अपभ्रंश म्हणून होणारा ‘स’ चा ‘ह’ होतो ते सांगत त्यादृष्टीनेही सावरकरांनी हिंदु या शब्दाची उकल केली आहे. हे करीत असताना हिंदु हा शब्द राष्ट्रीय आहे. गुरु गोविंदसिंहांनीही त्या संबंधात काय सांगितले आहे, ते देखील ते आपल्या लेखातून सांगतात. अभ्यासपूर्णपणे ते सारे तपशील मांडतात. हे सांगण्याचे कारण म्हणजे हिंदु हे नाव कोणत्याही धर्मग्रंथावरून तयार झालेले नाही तर ते काही धर्ममत नव्हे. आसिंधुसिंधुपर्यंत विस्तारलेल्या भौगोलिक प्रांताचा वा देशाचा निर्देश करणारे आहे. अशा या प्रांताला आणि तेथे तयार झालेल्या विविध धर्म, संस्कृती, पंथ, यांना संलग्न करणाऱ्या या हिंदु शब्दाला सावरकरांनी अतिशय सुस्पष्ट करीत मांडले आहे. रुढार्थाने सध्या हिंदु हा धर्म म्हणून संबोधला जातो, तो शब्द या सावरकरांच्या हिंदुत्वामधील एक विविध धर्म, पंथ यातील गट आहे इतकेच नव्हे तर सावरकर सांगतात की, सुरुवातीपासून एक मोठी दिशाभूल झाली की, हिंदु शब्दाचा संबंध हिंदु धर्माशीच काय तो जोडला जाऊन हिंदुत्वाची व्याख्या न करता हिंदु धर्माची व्याख्या आम्ही करू लागलो. त्यातून हिंदुत्वाची सर्वांगीण अशी व्याख्या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक अशी केली गेली नाही. त्या मुख्य भागाकडेच दुर्लक्ष झाले. त्याची धार्मिक व्याख्याच जो तो करू लागला. हिंदु समाजातील अनेक लोक हे वेदांचा अनुनय करणारे असल्याने ती व्याख्या करताना वेदांचा अनुनय करणारे म्हणजे हिंदु, अशी ही व्याख्या करण्यात आली. …. मुळात हिंदुत्व हे हिंदुमध्ये प्रचलित अशा कोणत्याही धर्ममतापेक्षा व्यापक आहे. त्याला बहुसंख्यांकाच्या धर्ममताशी समानार्थक समजल्याने अल्पसंख्याकांना हिंदु हा शब्द अप्रिय आणि अनिष्टही वाटू लागला. येथे अल्पसंख्याक हा शब्द सावरकरांना त्यावेळी अभिप्रेत होता, तो वेदप्रामाण्य न मानणारे पंथ, धर्म यांना लक्षित होता. कारण त्यावेळी आर्यसमाज, ब्राह्मोसमाज, जैन, बौद्ध, शीख आजी धर्म-पंथ यांनी हिंदु शब्दाला अनेकदा मध्येमध्ये नाकारले होते. याचे मुख्य कारण हेच की, हिंदुत्वाची व्याख्या धार्मिक दृष्टिकोनातून केली गेली; ती दिशाभूल होती, असे सांवरकर स्पष्ट सांगतात. यातच सावरकरांना अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वाची स्पष्ट कल्पना येऊ लागते. वैदिक धर्माला हिंदु असे म्हणण्यामागे काही कुटील हेतू नव्हता, हे ही ते स्पष्ट करतात. मात्र त्याचा दुष्परिणाम मात्र त्यावेळी झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. हिंदुत्व हा त्यांचा ग्रंंथ आणि १९३६ मधील त्यांचा या संबंधातील सह्याद्रीमध्ये आलेला लेख यामध्ये सावरकरांच्या हिंदुत्वाचे पूर्ण आकलन खरे म्हणजे होऊ शकेल. पण लक्षात कोण घेतो, अशी स्थिती आजही आहे, हेच दुर्दैव.
हिंदु कोण आणि अहिंदु कोण याची व्याख्याही त्यांनी अतिशय बारकाईने केली आहे, ती करताना अपवादही असतात, हे ध्यानात घेत त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. मुळात हिंदुत्व ही संकल्पना त्यांनी असे विविध आधार घेऊन ज्या पद्धतीने मांडली आहे, त्यामागे असणारे उद्दिष्ट लक्षात घेतले गेले पाहिजे. ते केवळ धार्मिक नाही केवळ मुस्लिम आक्रमकांनी भारतात केलेल्या धर्मांतराचे पडसादही त्यांनी विचारात घेतले आहेत. या मुस्लिमांच्या पराभूत मानसिकतेमधून हिंंदुंविरोधात असलेल्या रोषामागे असणारी कारणेही त्यांनी ओळखली आहेत. त्यासाठी ब्रिटिशांनी कसे खतपाणी घातले तेही त्यांनी हेरले आहे. इतकेच नव्हे तर अंदमानातील अनुभव, खिलाफत आंदोलन, त्याला गांधीजींचा आणि काँग्रेसमधील हिंदुंमधील नेत्यांचाही मिळालेला पाठिंबा, केरळमधील मोपला हिंसाचार, हिंदुस्थानावर राज्य केलेल्या मुसलमानी राजवटीचा मराठ्यांनीही दिलेल्या चोख उत्तरानंतरही झालेला पराभव पण त्यांना ब्रिटिशांच्या आगमनामुळे वाटू लागलेली पुन्हा सत्तास्थानी येण्याची तगमग, मुस्लीम लीग वा अलीबंधूंनी केलेली स्वतंत्र मुस्लीम देशासाठीची लागवड आदी बाजूही त्यांनी पूर्णपणे विचारात घेतल्या. पॅन इस्लामिक चळवळ त्यांनी त्यावेळी हेरली. त्याच चळवळीला त्यांनी हिंदुत्वाद्वारे दिलेले हे उत्तर केवळ राजकीय नव्हते, केवळ सामाजिक नव्हते, केवळ भौगोलिक सीमा मर्यादित करीतही माघार सांगणारे नव्हते. संपूर्ण पृथ्वीवर असलेल्या देशांमध्ये आता हिंदुंचा असणारा प्रदेश, हा एकमेव असा हिंदुस्थान असल्याचे सांगत त्यासाठी हिंदुना त्यांचा ‘सातबारा’ स्पष्ट करीत सावरकरांनी हिंदुंना एकवटण्याचा प्रयत्न केला. या हिंदुंमध्ये वैदिक, सनातनी इतकीच मर्यादा नाही तर त्यात शीख, जैन, बौद्ध, आर्यसमाजी, देवसमाजी, निरीश्वरवादी, असे सारे पंथ-धर्म यातील लोक येतात. अशी व्यापक व्याख्या त्यांनी केली ती म्हणजे
► आसिंधु- सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका। पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:।।
खरे म्हणजे हिंदुस्थानची ही भूमी, तिची व्याप्ती आणि तिच्यावर असणारी या सर्व हिंदुंची मालकी नव्हे तर जबाबदारी त्यांनी यात स्पष्ट केली. ही जबाबदारी म्हणजेच या भूमीवर असणारा त्यांचा अधिकार हा पितृभूमी म्हणून, पुण्यभूमी म्हणून किती महत्त्वपूर्ण आहे, तेच सांगणारी ही व्याख्या आहे. याचे कारण या भूमीखेरीज जगामध्ये हिंदुंना आता स्वत:ची अशी भूमी नसल्याचे दिसत असल्यानेच आक्रमक नसणाऱ्या या हिंदुंना पुन्हा गुलामगिरीच्या जोखडाखाली, आक्रमकांच्या क्रूर राजवटीमध्ये गुलाम व्हावे लागू नये, असा स्पष्ट उद्देश असल्यानेच त्यांचे स्वत्व राखणारे हे हिंदुत्व आहे. त्या हिंदुत्वातून तयार होणारा हा हिंदुस्थान हा कसा असेल आणि तेथे अहिंदुनाही काय स्थान असेल हे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यातही त्यांचा भर हा हिंदुंच्या संघटनावर होता कारण संघटन हवे ते का तर स्वराज्यासाठीच. त्याचा हा दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यात स्वत्व राहते ते स्वराज्य आहे, असे त्यांचे मत हे किती बारकाईने आणि सखोल विचाराने मांडले गेले ते लक्षात यावे. त्या काळातील ब्रिटिशविरोधातील संघर्षात मुसलमान-हिंदु एैक्य आणि त्यासाठी वाटेल त्या पद्धतीने मुस्लीम नेत्यांच्या मागण्यांपुढे लाचार होणे किती अयोग्य आहे हे त्यांनी याच हिंदु संघटनेच्या बळकटीसाठी आणि स्वत्वासाठी स्पष्ट केले होते. विविध धर्मांसंबंधात त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता. मात्र त्यामागे असणारा उद्देश हा नव्या कालाप्रमामे समाज अद्ययावत व्हावा, धर्मांच्या रुढी रिवाजांना स्वीकारताना जुन्या ग्रंथामधील विचार अंधपणे स्वीकारू नयेत. त्यांचे अस्तित्त्व हे मानवाच्या वा माणसाच्या कल्याणासाठी असते, हे समजून घेत त्या दृष्टीने कालानुसार त्यांची उपयुक्तताही महत्त्वाची असते, हे मानणारे सावरकर हे समाजाने बुद्धिवादी व्हावे यासाठीच प्रयत्नशील राहिलेले व्यक्ती होते. विज्ञानानिष्ठता वा विज्ञानावर अधिष्ठान असणे सांगणे ही बाब खरे म्हणजे बुद्धिवादीच आहे. त्यावेळच्या मुस्लीम नेत्यांचा असणारा हट्टाग्रह, दुराग्रह तसेच अल्पसंख्याक असूनही बहुसंख्याक हिंदुंना आजही आपल्या नियंत्रणाखाली आणू पाहाणारी जुन्या काळातील सत्ताधारी मानसिकता मुस्लीम समाजातील अनेक नेत्यांमध्ये भिनली होती. धर्मवेड आणि धर्माची अन्य धर्मांचे अस्तित्तवही न मानण्याची शिकवण त्यातून ते बाहेर पडत नव्हते. त्यामुळे त्यांच्या अतिरेकी मागण्यांमुळे स्वातंत्र्य संघर्षात ब्रिटिशांपुढे हिंदु नेते मात्र हिंदु-मुस्लीम ऐक्यासाठी हतबल राहून लाचारीही करीत. हीच मानसिकता जी काँग्रेसमधील नेत्यांनी जोपासली आणि गांधीजींच्या विविध प्रयोगांपुढे नमते घेत काँग्रेसचे मुस्लीमधार्जीणे - लाचार धोरण म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्य असे समीकरण बनले गेले. याच समीकरणाला नीट समजून घेत सावरकरांनी हिंदुंमधील स्वत्त्व जागृत करण्याचा आणि त्यासाठी संघटन करण्याचा चंग बांधला, जागृकता आणण्याचा प्रयत्न केला. सावरकरांची हिंदुत्वाबद्दलची धारणा ही हिंदु समाजाला जागृत करण्याची होती, जागे करण्याचा प्रयत्न होता, मुस्लीमांच्या आक्रमकतेबद्दल असणारे प्रत्युत्तरही होते आणि त्यांनाही ब्रिटिश विरोधातील लढाईसाठी स्वाभिमानाने सामावून घेत त्यांना पोथिनिष्ठता सोडण्यास सांगणारे आणि त्यांनीही रितीरिवाजांना विज्ञानाच्या कसोटीवर पारखावे, असे सांगणारे त्यांचे उपदेश हे द्वेषातून नव्हे तर समाजाचा घटक असणाऱ्या भारतीयांसाठीच होते. त्यामुळेच त्यांचेही स्वत्व आहे हे त्यांना अमान्य नव्हते. पण त्यांचे म्हणजे मुस्लीम नेते आणि समाज यांचे अल्पसंख्याक असूनही असणारा अट्टाहास आणि त्यांचे स्वराज्यासाठी हवे असणारे सहकार्य वा कार्य यासाठी त्यांच्यापुढे लाचार व्हायचे नाही ही सावरकरांची भूमिका होती. जी काँग्रेसला व विशेष करून गांधीजींच्या विचारांना मान्य नव्हती. वास्तविक त्यामुळे होणारे तोटे सावरकरांना नेमके उमगले होते. यासाठीच आवश्यक होते ते हिंदुंचे संघटन. त्यादृष्टीने त्यांनी केलेला विचार अतिशय आग्रही आणि व्यवहारी आहे, हे स्पष्ट होते. स्वराज्यासाठीच संघटन हवे या लेखामध्ये त्यांनी ही भूमिका अतिशय बारकाईने आणि गांभीर्याने स्पष्ट केली आहे.
► त्यात ते म्हणतात की, “ स्वराज्य की संघटन हा प्रश्न नसून सध्याच्या परिस्थितीत संघटन केले तरच स्वराज्य मिळणें शक्य आहे. आम्हांस स्वराज्य आणि संघटन हीं दोन्हीहि हवीं आहेत. कारण आम्हां हिंदूस अभिप्रेत असलेले स्वराज्य, हिंदु संघटनावाचून मिळणे शक्यच नाही. हें पूर्वीही काही विचारवंत देशभक्तांच्या ध्यानात आलेलेच होतें - आज तें मध्याह्नीच्या दिवसाइतके सुस्पष्टपणे प्रत्येक हिंदूच्या प्रत्ययास येत आहे. कारण ज्या स्वराज्याकरिता आम्ही धडपडत आहो, ज्या स्वराज्याकरिता सत्तावनच्या क्रांतियुद्धापासून शेकडो, सहस्रो क्रांतिकारक हिंदु वीर सशस्त्र प्रतिकार करीत रणात मेले, फाशीवर लटकले, अंदमानात सडले, कारागारात पडले, देशोधडी लागले, ज्या स्वराज्याकरिता राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून तो असहयोगाच्या आंदोलनापर्यंत शेकडो नेमस्त आणि हिंदु पुढारी निःशस्त्र प्रतिकार करीत आणि लोकमान्यांपासून गांधीजींपर्यंत खटपटत आले तें स्वराज्य म्हणजे हिंदुस्थान देशाचे एकराष्ट्रीय, स्वायत्त, लोकसत्ताक आणि स्वतंत्र राज्य हेच होय. या स्वराज्यात हिंदी नागरिक असलेल्या प्रत्येक स्त्रीपुरुषाचें जातिपंथनिर्विशेष असलेले स्वत्व राखिलें जाईल, प्रत्येक धर्मास आणि जातीस, आपापल्या संख्येप्रमाणे जे न्याय अधिकार उपभोगिता येतात, ते समानत्वे बजावता येतील. हे स्वराज्य केवल हिंदू चेंही नसेल, तें अहिंदू चेंही नसेल; तर तें प्रत्येक हिंदी मनुष्याचे असेल आणि त्यात प्रत्येकास आपलें न्याय्य स्वत्व न गमावता नांदता येईल. ....”
► “स्वराज्याचें स्वरूप असें असले पाहिजे असें तुम्ही म्हणता ना की, त्यात हिंदु किंवा मुसलमान अशी कोणतीही धार्मिक भेदाभेदाची कल्पना न शिवता त्याचे स्वरूप केवळ हिंदीपणाचें असावें आणि त्यात मुसलमानादिक प्रत्येक धर्म-पंथ जातिमात्राचे स्वत्व समप्रमाणाने आणि यथान्याय राखिलें जावें ? ठीक तर, जर या स्वराज्यात प्रत्येक धर्मपंथाचें स्वत्व राखिलें जाणार आहे, तर मग त्यात हिंदुधर्मही स्वत्व योग्य प्रमाणाने आणि यथान्याय राखिलें गेलें पाहिजे, नाही काय? इतकेच नव्हे तर हिंदुस्थानातील लोकसंख्येचा दोन तृतीयांश भाग ज्या हिंदूंचा आहे. त्यांचे स्वत्व ज्या स्वराज्यात इतर अत्यल्प किंवा अल्प अशा अहिंदु समाजाच्या स्वत्वाच्या अतिरेकी मागण्यांस बळी दिलें जातें, तें स्वराज्यच नव्हे; तुम्ही म्हणता त्या व्याख्येप्रमाणेदेखील तें स्वराज्यचं नव्हे हें मानलेच पाहिजे, नाही काय ? तर मग या प्रमेयावरून दुसरें प्रमेयही आपोआपच अनुमानिलें जातें कीं नाही की, अशा रीतीने हिंदूचें स्वत्व इतर अहिंदु समाजाच्या अवास्तव आणि अवाच्या सवा मागण्यांस आम्ही बळी देऊ देणार नाही आणि उलटपक्षी त्या आमच्या अहिंदु राष्ट्रीयबंधूंच्या न्याय्य मागण्यांचा प्रतिकार न करिता जे पंथस्वातंत्र्याचे अधिकार आम्ही भोगू इच्छितो तेच इतरांसही अपभोगू दिल्यावाचून आम्ही राहणार म्हणून प्रतिज्ञाबद्ध असलेलें हिंदुसंघटन हें त्या स्वराज्याच्या विरुद्ध जात नाही; नाही इतकेंच नव्हे तर त्याच्या सिद्धीसाठी प्राणपणाने झटत आहे.”
हिंदु संघटित व्हावा हे किती गरजेचे आहे आणि त्यासाठी असलेल्या चळवळीवरही शंका-कुशंका व्यक्त करणाऱ्यांना सावरकरांनी हे दिलेले उत्तर अतिशय व्यवहारी, चोख आणि न्याय्य असेच होते. पण त्यांच्या या सुस्पष्ट अशा भूमिकेबद्दल किती मुस्लीम नेते आणि हिंदू नेते यांनी जाणून घेतले हाच प्रश्न आहे. त्यांची ही भूमिका लोकांपर्यंत का पोहोचू शकली नाही, हिंदु समाजही कोणत्या गुंगीत वा धुंदीत त्यावेळी राहिला, याची तसेच ज्या मुस्लीम नेत्यांनी आणि समज असलेल्या मुस्लिमांनी सावरकरांच्या या धारणेकडेही जर दुर्लक्ष केले असेल किंवा तर ती विचारसरणी त्यांना समजली नसेल तर त्यापेक्षा करंटेपण कोणते असाच सवाल निर्माण होतो.

राजकीय आणि सामाजिक नोंदीच्या दृष्टीनेही सावरकर जागे होते. निद्रिस्त हिंदुंना जागे करण्याचा प्रयत्न करीत होते. हिंदु आणि अहिंदु यामधील भेद स्पष्ट करतानाच हिंदुत्वाची व्याख्या सरकारकडेही नोंदवून घ्यावी असे सांगताना त्यामागील त्यांनी मांडलेली भूमिकाही दूरदृष्टीची होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या हिंदुत्वाच्या व्याख्येनुसार भूमीविषयी जागरुकता आणून हिंदूंचे संघटन हा महत्त्वाचा घटक त्यांनी हाती घेतला होता. केवळ अंदमानातील मुस्लीमांच्या अनुभवामुळे नव्हे किंवा ब्रिटिशांनी केलेल्या कूटनीतीतून हिंदु-मुस्लीम यांच्यात फूट पाडून आपले इप्सित साधण्याच्या कृत्यामुळे नव्हे तर हिंदुमधील सत्व आणि स्वत्त्व जागवण्यासाठी हिंदुत्वाची गरज होती ते हिंदुत्व हे वैदिक नव्हे तर राष्ट्रीय होते ते हिंदुत्व भूमिनिष्ठ समूहाला संघटित करणारे तत्त्व होते. हिंदु समाजामधील आणि विशेष करून सनातनी, वैदिक समाजामधील दरी दूर होणे कसे गरजेचे आहे, ती बाब हिंदुंच्साठी म्हणजे या संपूर्ण भूमीसाठी किती गरजेची आहे, हे सांगताना रत्नागिरीतील त्यांचे जात्युच्छेदनाचे कार्य, सात बेड्यांना संपुष्टात आणण्याचे काम हे काळाबरोबर हिंदु समाजाला प्रवाही करणाचे होते. शुद्धिकरणाची मोहीम हा देखील त्यांच्या पद्धतीने केला जाणारा बुद्धिवादी कार्यभाग होता. त्यासाठी त्यांनी रितीरिवाज रुढी यांनाही समाजाच्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार करून सामावून घेत तर कधी वेळप्रसंगी जोरदार कठोर ताशेरे मारीत समाजाला बुद्धिवादी स्तरावर विचारप्रवृत्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रत्नागिरीतील एकूणच त्यांचे प्रत्येक कार्य हे या समाजाला नवकालाच्या आव्हानांना भवितव्यात सामोरे जाण्यासाठी सज्ज करणारी मानसिकता, बौद्धिकता विकसित करणारे होते. त्यांचे हे कार्य आणि बुद्धिवाद समाजाला त्यावेळी किती झेपला, त्यांच्या विरोधकांना व अनुयायांनाही किती झेपला, किती कळला, इतकेच नव्हे तर आजही तो प्रत्ययास येत असतानाही तो स्वीकारण्याची मानसिकता - क्षमता समाजात आहे का, ते ज्याचे त्याने ठरवावे. एक मात्र खरे की सावरकरांचे हे हिंदु संघटन हे धर्माधिष्टित नाही तर समाज आणि राष्ट्राधिष्ठित होते. तेवढे जरी आपल्याला कळले तरी भविष्यातील वाटचालीमध्ये अजूनही बदल करण्यासाठी सावरकरांच्याच विचारांच्या बीजाचा उपयोग होऊ शकेल. सावरकरांचा विचार हा कालप्रवाहाप्रमाणे पुढे सरकणारा आणि बदल करीत, बदल स्वीकारीत जाणाऱ्या समाजासाठी आहे.
(क्रमशः)
- शल्य बोचरे
(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन)