रविवार, ३० जून, २०२४

सावरकर आणि हिंदू सभा

  🔹 अत्रे उवाच... (५)

१९२४ साली हिंदू सभा ही मुख्यतः समाजसुधारणेचे नि धार्मिक कार्य करणारी एक संस्था म्हणून ओळखली जाई. पंडित मदन मोहन मालवीय यांच्यासारखे काँग्रेसचे नेते हिंदू सभेचेही नेते होते. हिंदू सभेची वार्षिक अधिवेशाने अनेकदा काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनांना जोडूनच त्यावेळी भरत असत. म्हणून राजकारणापासून अलिप्त राहण्याचा सरकारी निर्बंध पाळुनही सार्वजनिक कार्य करीत राहण्यासाठी हिंदू सभेच्या आंदोलनात भाग घेणे स्वातंत्र्यवीरांना भाग पडले. पण त्या क्षणापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा एवढा प्रचंड प्रभाव हिंदू सभेवर पडला की सावरकर म्हणजे हिंदू सभा आणि हिंदू सभा म्हणजे सावरकर असे जणू समीकरणच झाले.


स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदू सभेचे नेतृत्व जे लाभले ते काही प्रमाणात तरी योगायोगानेच होय असे म्हणणे आश्चर्यकारक वाटले, तरी ते खरे आहे. इंग्रज सरकारला भारतीय जनतेपुढे मान तुकवत स्वातंत्र्यवीरांच्या जन्मठेपेची मुदत संपण्याआधीच त्यांना अंदमानच्या तुरुंगातून मुक्त करावे लागले, आणि रत्नागिरी येथे आणून ठेवावे लागले. मात्र त्यांनी रत्नागिरी बाहेर जाता कामा नये, आणि राजकारणात भाग घेता कामा नये, असे दोन निर्बंध त्यांच्यावर सरकारने लादले. या निर्बंधांचा ते भंग करीत नसल्याची खातरजमा करण्यासाठी त्यांच्यावर गुप्तचरांची अहोरात्र कडक पाळत ठेवण्यात आली. अशा स्थितीत स्वातंत्र्यवीरांनी ते निर्बंध मोडले असते तर तुरुंगांमध्ये आमरण पिचत पडण्याखेरीज आणखी काही करणे त्यांना शक्य नव्हते. पण त्याचबरोबर राष्ट्रासाठी झटल्याशिवाय स्वस्थ बसणे हा स्वातंत्र्यवीरांचा पिंड नव्हता. म्हणून निदान उघडपणे तरी राजकारणाशी संबंधित नसलेल्या सामाजिक कार्यात भाग घेण्याचा उद्देश त्यांनी जाहीर केला. त्या काळात म्हणजे १९२४ साली हिंदू सभा ही मुख्यतः समाजसुधारणेचे नि धार्मिक कार्य करणारी एक संस्था म्हणून ओळखली जाई. पंडित मदन मोहन मालवीय यांच्यासारखे काँग्रेसचे नेते हिंदू सभेचेही नेते होते. हिंदू सभेची वार्षिक अधिवेशाने अनेकदा काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनांना जोडूनच त्यावेळी भरत असत. म्हणून राजकारणापासून अलिप्त राहण्याचा सरकारी निर्बंध पाळुनही सार्वजनिक कार्य करीत राहण्यासाठी हिंदू सभेच्या आंदोलनात भाग घेणे स्वातंत्र्यवीरांना भाग पडले. पण त्या क्षणापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा एवढा प्रचंड प्रभाव हिंदू सभेवर पडला की सावरकर म्हणजे हिंदू सभा आणि हिंदू सभा म्हणजे सावरकर असे जणू समीकरणच झाले. त्यानंतर  इंग्रज सरकारने १९३६ मध्ये अमलात आणलेल्या प्रांतिक स्वायत्ततेच्या कायद्यानुसार मुंबई इलाख्यात अधिकारारूढ झालेल्या 'जमनादास मेहता' मंत्रिमंडळाने १९३७ मध्ये सावरकरांवरील सर्व निर्बंध रद्द केल्यावर त्यांच्याच नेतृत्वाखाली हिंदू सभा एक पक्ष म्हणून प्रत्यक्ष राजकारणाच्या आखाड्यात उतरली. या सावरकरांनी इंग्रज साम्राज्यवाद्यांची राजवट भारतामधून नष्ट करून राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 'अभिनव भारत' या क्रांतीकारक संघटनेची स्थापना करण्यात एकेकाळी पुढाकार घेतला होता, आणि त्यांनी इंग्लंडमध्ये स्थापलेल्या त्या संघटनेच्या शाखेत बॅरिस्टर असफअली नि सिकंदर हयात खान हे मुसलमान कार्यकर्तेही होते, त्या सावरकरांनी निर्बंध मुक्त झाल्यावर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होण्या ऐवजी हिंदू सभे सारख्या धर्माधिष्ठित पक्षाचे नेतृत्व स्वीकारल्यामुळे त्यांच्याविषयी तोवर आधार बाळगणारे अनेक प्रामाणिक काँग्रेसवादी देशभक्त आणि अनेक क्रांतिकारकही त्यांच्यापासून दुरावले. पण सावरकरांच्या या भूमिकेमागे एक निश्चित तात्विक दृष्टिकोन होता.

आसिंधूसिंधूपर्यंता यस्य भारतभूमिका ।
पितृभू:पुण्यभूश्चैव स वै हिंदू: इति स्मृत: ।।


अशी सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या होती. "हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या सिंधू नदीपासून कन्याकुमारीच्या सागर तीरापर्यंत पसरलेल्या भारताच्या भूमीला जो जो आपले पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू ." अशी सावरकरांची भूमिका होती. "मुसलमान, ख्रिस्ती, यहुदी इत्यादी भारतामधल्या लोकांची पितृभूमी भारत जरी असली तरी त्यांची धार्मिक श्रद्धास्थाने भारताबाहेर असल्याने ते भारताला आपली पुण्यभूमी मानत नाहीत, आणि म्हणून ते हिंदू राष्ट्राचे घटक नव्हेत. तसेच आशिया खंडातल्या चीन, जपान आदी देशांमधले बौद्ध धर्मीय लोक भारताला आपली पुण्यभूमी मानीत जरी असले तरी त्यांची पितृभूमी वेगळी असल्यामुळे तेही हिंदू नव्हेत", असे सावरकरांचे म्हणणे होते. "मात्र भारतामध्ये बौद्ध, जैन, शीख इत्यादी धर्मश्रद्धा अनुसरणारे लोक आपला धर्म हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे असे सरी मानीत असले तरी भारत हीच त्यांची पितृभूमी आणि पुण्यभूमी असल्यामुळे ते हिंदूच होत.",असे सावरकर प्रतिपादन करीत. भारतामधल्या परिस्थितीत धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा एकमेकांपासून सर्वस्वी वेगळ्या काढणे अशक्य आहे, या भूमिकेतून सावरकरांची ही विचारसरणी निर्माण झाली होती. इंग्रज साम्राज्यवाद्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात फूट पाडण्यासाठी मुस्लिम जातीयवादाचा जो सवतासुभा उभा केला होता, त्याचा सावरकरांवर झालेला परिणामच त्यांच्या या विचारसरणीत व्यक्त झाला होता. मुस्लिम पुढाऱ्यांना काँग्रेसच्या चळवळीत आणण्यासाठी लोकमान्य टिळकांना त्यांच्याशी लखनौ करार करून स्वराज्यामध्ये मुसलमानांना वेगळ्या सवलती देण्याचे मान्य करावे लागले. तुर्कस्तानच्या खलिफा या मुस्लिम धर्मगुरूचे राज्याधिकार इंग्रजांनी काढून घेतल्यामुळे त्या विरुद्धची चळवळ झाली तिची सांगड गांधीजींनी स्वराज्याच्या चळवळीशी जेव्हा घातली, तेव्हाच काँग्रेसच्या सत्याग्रहात महंमद अली, शौकात अली इत्यादी मुस्लिम पुढारी सामील झाले. अखेर तर मुसलमानांसाठी भारताची फाळणी करून पाकिस्तान हे वेगळे राष्ट्र निर्माण केले पाहिजे, असा जात्यंध आग्रह जिनांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने धरला, आणि धर्मांध यादवीत रक्ताचे पाट वाहून तो तडीस नेला.  धर्मभेदावर आधारलेल्या हा वेगळेपणाचा हट्ट जे जे धरतात त्यांना स्वतःला या राष्ट्राचे नागरिक म्हणून घेण्याचा अधिकार नाही, अशी सावरकरांची निष्ठा होती. म्हणूनच हिंदुत्वनिष्ठा राष्ट्रनिष्ठेची मुळीच विसंगत नाही, असा सावरकरांचा ठाम सिद्धांत होता. गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मुस्लिम जातीयवाद, त्यांची मनधरणी करण्याचे धोरण स्वीकारले, ते राष्ट्राच्या ऐक्याला , स्वातंत्र्याला, सुरक्षिततेला, प्रगतीला नि स्थैऱ्याला मारक ठरल्याखेरीच राहणार नाही, असा खणखणीत इशारा या देशांमध्ये सगळ्यात प्रथम जर कोणी दिला असेल, तर तो सावरकरांनीच होय! पण अशी वेगळेपणाची भावना न बाळगता भारताशी जो जो एकनिष्ठ राहील ,त्याच्या विरुद्ध केवळ धार्मिक कारणांसाठी कोणताही भेदभाव करता कामा नये, असेही सावरकर निक्षून सांगत. सावरकरांच्या हिंदुत्वनिष्ठेची घडण जी होती ती अशा प्रकारची होती.
९/३/१९६६.

सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे

सावरकर आणि राष्ट्ररक्षण

 🔹 अत्रे उवाच... (४) 

पण अजूनही राष्ट्राला संरक्षण दृष्ट्या समर्थ नि स्वयंपूर्ण करण्याच्या कार्यामध्ये काँग्रेस राजवटी मधील बेपर्वाई, दिरंगाई, नि ढिलाई संपूर्णपणे दूर झालेली नाही. देशामधल्या प्रत्येक तरुणाला लष्करी शिक्षण देऊन राष्ट्राचे सैनिकीकरण करण्याची आवश्यकता तर राज्यकर्ते अद्याप अमान्य करीत आहेत. पण राष्ट्राचे स्वातंत्र्य जर टिकवायचे असेल तर त्यासाठी राष्ट्राचे सैनिकीकरण करण्याची सावरकरांची भूमिका प्रत्यक्षात उतरल्याखेरीस गत्यंतर नाही. तसे घडेल तेव्हाच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऋणाचे राष्ट्र खरोखर उतराई झाले असे म्हणता येईल. 

 स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मठेपेतून बंधमुक्त झाले ,तेव्हा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व गांधीजींच्या हाती गेले होते. सावरकर सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते तर गांधीजी अहिंसेचे उपासक होते. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या देशाभिमानी भारतीय तरुणांनी इंग्रज साम्राज्य सत्तेच्या सैन्यात सामील होऊन आधुनिक युद्धतंत्राचे आणि अद्ययावत शस्त्रास्त्रे वापरण्याचे शिक्षण घेतले पाहिजे. त्याचवेळी सैन्यात स्वातंत्र्याभिमानी गुप्त संघटना उभारली पाहिजे, देशामधल्या इतर तरुणांनीही सैनिक शिक्षण देणाऱ्या स्वयंसेवक संघटना सर्वत्र उभारल्या पाहिजेत आणि अखेर त्या भारतीय सैनिकांनी, स्वयंसेवकांनी एवढेच काय पण सर्व भारतीय जनतेने देशव्यापी संघटित सशस्त्र उठाव करून इंग्रजांची सत्ता उलथून पडली पाहिजे आणि भारताचे क्रांतिकारक स्वतंत्र सरकार स्थापन केले पाहिजे अशी सावरकरांची स्वातंत्र्य प्राप्तीची योजना होती. याउलट स्वातंत्र्यलढ्यासाठी कसलीही सशस्त्र संघटना उभारायला गांधीजींचा विरोध होता. निशस्त्र सत्याग्रहाच्या मार्गाने इंग्रजांचा हृदयपालट करून नि त्याला प्रेमाने जिंकून स्वराज्य मिळवता येईल असे गांधीजींचे म्हणणे होते. यावरही कळस हा की इंग्रज सरकारच्या नोकरीतील भारतीय सैनिकांनी आणि पोलिसांनी त्या सरकारविरुद्ध निशस्त्र असहकार सुद्धा करता कामा नयेत, असे गांधीजींचे म्हणणे होते. १९३०-३२ च्या सत्याग्रहात वायव्य सीमा प्रांतातील पठाण सत्याग्रहींवर गोळ्या झाडायला इंग्रज सरकारच्या गढवाली राजपूत पलटणीने नकार दिला, तेव्हा त्या सरकारने त्या पलटणीवर लष्करी खटला भरून त्या पलटणीच्या कॅप्टन चंद्रसिंह आदी प्रमुखांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. गांधीजींचा 'निशस्त्र प्रतिकारा'चा मार्गच त्या राष्ट्राभिमानी गढवाली सैनिकांनी अनुसरला असल्यामुळे गांधीजींनी त्यांच्या सुटकेची मागणी करावी, अशी विनंती केली असता, गांधीजींनी उत्तर दिले," सैनिकांनी अथवा पोलिसांनी शिस्त मोडायला मी उत्तेजन देऊ शकत नाही." गढवाली सैनिकांनी त्यांच्या सरकारचा हुकूम पाळायला हवा होता. इंग्रज साम्राज्यवाद्यांच्या नोकरीतील भारतीय सैनिकांनी आणि पोलिसांनी शिस्तीच्या नावाखाली आपल्या देशाला गुलाम ठेवण्यासाठी आपल्या भारतीय देशबांधवांवर हिंसक दडपशाही करून त्यांचे प्राण घेणेच योग्य होय." ही गांधीजींची अहिंसात्मक स्वातंत्र्य लढ्याची व्याख्या वाचून त्यावेळी सगळे देशाभिमानी लोक हतबुद्ध झाले होते. अखेर भारताला स्वराज्य जे मिळाले ते गांधीजींच्या अहिंसेमुळे नव्हे, तर १९४२ मध्ये सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केलेल्या सशस्त्र क्रांतीमुळे, देशामधल्या ठिकठिकाणीच्या देशभक्तांनी केलेल्या सशस्त्र उठावामुळे, नेताजी सुभाष बोस यांनी 'आझाद हिंद सेना' उभारून चेतावलेल्या क्रांती यज्ञामुळे! १८ ते २२ फेब्रुवारी १९४६ रोजी हजारो भारतीय आरमारी नाविकांनी इंग्रज सत्तेविरुद्ध केलेल्या सशस्त्र बंडामुळे, आणि त्या युद्धोत्तर काळात देशावर पेटलेल्या लढ्यामुळेच होय. हे ऐतिहासिक सत्य आहे. काँग्रेसच्या गांधीवादी नेत्यांनी या सशस्त्र क्रांतीचे नेतृत्व करण्याऐवजी अहिंसेच्या नावाने इंग्रजांची आणि मुस्लिम लीगशी स्वराज्यासाठी सौदा पटवण्याचे मार्ग पत्करल्यामुळे भारताला जर काय मिळाले असेल, तर ते म्हणजे राष्ट्राची फाळणी, पाकिस्तानची स्थापना, भयानक जातीय यादवी आणि काश्मीरचा झगडा हेच होय. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सावरकरांनी दाखवलेला सैनिकीकरणाचा आणि सशस्त्र क्रांतीचा मार्ग किती योग्य होता याची साक्ष अशा रीतीने इतिहासाने दिलेली आहे. पण सावरकरांच्या द्रष्टेपणा केवळ स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वीच्या कालापुरतास मर्यादित नव्हता. भारताला स्वराज्य मिळाल्यावरही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वराज्याच्या राज्यकर्त्यांना आणि भारतीय जनतेला पुन्हा बजावले की," या स्वराज्याचे रक्षण जर करायचे असेल, तर त्यासाठी दोन उपाय तत्काळ योजले पाहिजेत. पहिला उपाय म्हणजे राष्ट्राच्या सीमा केवळ नकाशावर नव्हे, तर प्रत्यक्ष भूमीवर तात्काळ आखून निश्चित केल्या पाहिजेत. दुसरा उपाय म्हणजे राष्ट्राला संरक्षण दृष्ट्या समर्थ नि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी देशांमध्ये शस्त्रास्त्रांचे कारखाने प्रचंड प्रमाणावर उभारले पाहिजेत. तसेच देशाचे सैन्य बळ वाढवले पाहिजे, नि सर्व तरुणांना सैनिकी शिक्षण दिले पाहिजे. पण स्वराज्याचे काँग्रेसवाले राज्यकर्ते राष्ट्ररक्षणाकडे दुर्लक्ष करून दारूबंदी, अंबर चरखा ,खादी इत्यादी खुळांवर अब्जावधी रुपयांचा चुराडा करण्यात एवढे दंग झाले होते आणि स्वतंत्र शांततावादी परराष्ट्रीय धोरणाच्या मूलतः योग्य सिद्धांतामध्ये गांधीजींच्या अहिंसावादाची भेसळ या राज्यकर्त्यांनी केल्यामुळे आक्रमणाच्या धोक्याविषयी ते इतके गाफील बनले होते, की स्वातंत्र्यवीरांच्या इशाऱ्याकडे त्यांनी सपशेल दुर्लक्ष केले. चीनला आणि पाकिस्तानला भिडलेल्या भारताच्या सीमा नकाशावर आखल्या गेल्या आहेत, एवढ्यावरच या राज्यकर्त्यांनी समाधान मानले. प्रत्यक्ष भूमीवर या सीमा आखण्याचा आणि त्यांच्या रक्षणासाठी सैनिकांच्या चौक्या ठाई ठाई उभारण्याचा प्रयत्नही राज्यकर्त्यांनी केला नाही. याचा परिणाम असा झाला की चिनी राज्यकर्त्यांनी या सीमा विषयी १९५४ पासून सतत कुरापती काढून नि सशस्त्र हल्ल्ले चढवून अखेर १९६१ मध्ये भारतावर आक्रमण केले. आणि पाकिस्ताननेही गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये निम्म्या कच्छवर हक्क सांगून कच्छमध्ये सेना घुसवल्या. १९६२ मधील चिनी आक्रमणानंतर काय ती काँग्रेसवाल्या राज्यकर्त्यांना राष्ट्राचे संरक्षण सामर्थ्य वाढवण्याची गरज पडली, आणि त्या दिशेने त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा फायदा पाकिस्तानने गेल्या ऑगस्टमध्ये काश्मीरवर केलेल्या आक्रमणाच्या वेळी राष्ट्राला मिळून त्या आक्रमणाचा पराजय करता आला. पण अजूनही राष्ट्राला संरक्षण दृष्ट्या समर्थ नि स्वयंपूर्ण करण्याच्या कार्यामध्ये काँग्रेस राजवटी मधील बेपर्वाई, दिरंगाई, नि ढिलाई संपूर्णपणे दूर झालेली नाही. देशामधल्या प्रत्येक तरुणाला लष्करी शिक्षण देऊन राष्ट्राचे सैनिकीकरण करण्याची आवश्यकता तर राज्यकर्ते अद्याप अमान्य करीत आहेत. पण राष्ट्राचे स्वातंत्र्य जर टिकवायचे असेल तर त्यासाठी राष्ट्राचे सैनिकीकरण करण्याची सावरकरांची भूमिका प्रत्यक्षात उतरल्याखेरीस गत्यंतर नाही. तसे घडेल तेव्हाच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऋणाचे राष्ट्र खरोखर उतराई झाले असे म्हणता येईल .         


५/३/१९६६

सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे
(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक )

सावरकर साहित्याचे तेजस्वी पैलू

 🔹 अत्रे उवाच... (३)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी केलेले लिखाण हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची पूर्णत्वाने ओळख करून देण्याचा त्याकाळातील महत्त्वाचा यशस्वी प्रयत्न होता. आजही त्यांच्या त्या लिखाणातून सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व किती बहुआयामी होते, किती राष्ट्रनिष्ठ होते, किती व्यासंगी , अभ्यासू होते, किती राष्ट्रनिष्ठ व देशभक्त होते याची प्रचिती येते. काळाच्या पडद्याआड जरी अत्रे आणि सावरकर अशी दोन्ही व्यक्तिमत्त्वे गेली असली तरी त्यांची त्यांच्या या लिखाणाच्या निमित्ताने आठवण करण्याचा हा प्रयत्न आहे.   आचार्य अत्रे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या लिखाणाला उजाळा देण्यासाठी व नवीन पिढीला अत्रे यांच्या लिखाणाची आणि सावरकर यांच्या व्यक्तित्वाची ओळख व्हावी यासाठी व्हॉट्सअपच्यामाध्यमातून ओळख करून देत आहोत. संगीता महाजन- बेहेरे यांनी हे सारे लेख स्वत: वाचून टाईप व संपादित केले आहे.  आचार्य अत्रे यांचे सावरकर यांच्यावरील लेख जे पूर्वी दैनिक मराठातून प्रसिद्ध झाले व नंतर त्यांचे परचुरे प्रकाशनने पुस्तकरूपाने प्रकाशित केले, ते जुने पुस्तक घेऊन त्यातील लिखाण लोकांपर्यंत पोहोचविले. 'प्रज्वलंत' या सावरकर विचारांना लोकांप्रत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वेबसाइटनेही ते अधिका लोकांप्रत जावे म्हणून साईटवर प्रकाशित करण्याचे ठरविले आहे.  आचार्य अत्रे यांच्या त्या लेखांची मालिका त्यानिमित्ताने प्रज्वलंतवर देत आहे. 

सावरकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ओजस्वी  पर्वच आहे.देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या सर्वस्वाचा जो होम केला आणि जे दैदिप्यमान पराक्रम केले त्याला तुलना नाही. त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूला मूर्तिमंत आव्हानच होय. श्रीशिवछत्रपतींपासून स्वातंत्र्यवीरांची जी उर्जस्वल परंपरा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि ज्या परंपरेत गेल्या चार शतकात अनेक महान  नरनारी रत्ने निर्माण झाली, त्या परंपरेमध्ये सावरकर एखाद्या कोहिनूर हिऱ्यासारखे चमकत राहतील. त्यांचे साहित्य म्हणजे स्वातंत्र्यप्रीतीचे आणि देशभक्तीचे धगधगते अग्नीकुंडच होय. त्यांच्या वाणी मधून आणि लेखणी मधून 'ज्वाला आणि ठिणग्यां'चे खेरीज दुसरे काहीच बाहेर पडले नाही. त्यांचा एकेक शब्द म्हणजे आगगाडीच्या इंजिनामधला लाल रसरशीत दगडी कोळसा. त्याच्या धगीनेच सर्वांगाचा भडका उडवायचा. सारा समाज नव्हे, सारा देश पेटवण्याची ज्यांच्या वाङ्मयामध्ये विलक्षण दाहाकता आहे, असा सावरकरांखेरीज दुसरा लेखक या भारतात क्वचितच होऊन गेला असेल. आमच्या लहानपणी तर त्यांच्या 'सिंहगडाच्या पोवाड्याने' साऱ्या महाराष्ट्राला आग लावली होती याचे स्मरण अद्याप आम्हाला आहे.

ते धन्य मराठे गडी,
घेती रणी उडी
करुनि तातडी
देशार्थ मृत्यूही वरिला
शाहिस्ता चरचर चिरीला! गनिमांनी वचक बहु धरीला


किंवा
निर्जीव अन्न का रुचेल
उदर शत्रूचे
फोड  तेथिचे
आतड्यांनि भूक शमवावी
रक्तानी भूक शमवावी
मासानी भूक शमवावी घ्या गड कडकड चावुनि अधरा
धाव ये काजी
प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गा जी


या त्यांच्या ओळीच्या संथा महाराष्ट्रात तरुण त्यावेळी घरोघर घोकीत बसले होते. त्यांच्या 'जोसेफ मॅझिनी'ची प्रस्तावना तर पहिल्या ओळी पासून तो शेवटच्या ओळीपर्यंत घडघड म्हणून दाखवणारे कितीतरी तरुण त्यावेळी आढळले असते." स्वातंत्र्य हे फायद्याचे आहे, म्हणून नव्हे, तर ते मर्दाचे कर्तव्य आहे म्हणून ते मिळवले पाहिजे! भाकर स्वस्त आहे किंवा महाग आहे, हा प्रश्न नाही त्या भाकरीवर गुलामगिरीचा शिक्का आहे की नाही हा मुख्य प्रश्न आहे." ही त्या प्रस्तावने मधील सावरकरांची अमर सुभाषिते त्या वेळेपासून आमच्या डोक्यात घुसून बसली आहेत. आणि त्यांचा 'अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर' हा ग्रंथ तर भारतीय क्रांतीचे अमरगीतच होऊन बसला आहे. ब्रिटिश राज्य उलथून पाडण्यासाठी प्रचंड सैनिकी युद्ध कसे उभारावे ह्याचा तो ज्वलंत इतिहासच आहे. गेल्या पन्नास वर्षात ह्या देशात किंवा देशाबाहेर भारताच्या सशस्त्र क्रांतीचे जेवढे म्हणून काही प्रयत्न झाले, त्या सर्वांची प्रेरणा म्हणजे हा एकच ग्रंथ. हिंदुस्थानच्या अगदी कानाकोपऱ्यात ह्या ग्रंथाचा गुप्तपणे प्रचार झाला. अमेरिकेमधल्या 'गदर पक्षा'ने त्याचे पंजाबी, हिंदी आणि उर्दू भाषांतून भाषांतर करविले. भगतसिंहाने आणि त्याच्या सहकार्यानी या ग्रंथाच्या दोन इंग्रजी आवृत्ती छापून काढल्या. आणि नेताजी सुभाषचंद्रांनी तर आपल्या 'आझाद हिंद फौजे' मधील प्रत्येक सैनिकाला पाठ्यपुस्तकाप्रमाणे ह्या ग्रंथाचा अभ्यास करायला लावला. सारांश गेल्या अर्धशतकातील बहुतेक सर्व भारतीय क्रांतिकारकांना क्रांतीचा गुरुमंत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याने दिलेला आहे. या दृष्टीने भारतीय क्रांतीच्या आणि स्वातंत्र्याच्या भव्य आणि जाज्वल्य इतिहासात सावरकरसाहित्याचे अनन्य साधारण स्थान आहे.
      मराठी साहित्यामध्ये असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्यामध्ये सावरकरांची लेखणी दिमाखाने संचार करत नाही. कथा, कादंबरी, नाट्य, निबंध आणि काव्य या वाग्मयाच्या सर्व दालनात त्यांच्या प्रतिभेने आणि कल्पनेने एकाही पेक्षा एक भव्य आणि दिव्य विलास करून दाखविलेले आहेत. त्यांची भाषा म्हणजे एखाद्या ज्वालामुखीच्या तोंडातून वाहणाऱ्या लाव्हारसाच्या प्रवाहासारखी वाटते. विचार ,भावना आणि भाषा यांचे जळजळीत रसायन बनवून ते पराकाष्ठीच्या द्वेषाने, आवेशाने आणि झपाट्याने उधळणारा त्यांच्यासारखा गोलंदाज लेखक निदान आम्ही तरी पाहिला नाही. स्वतंत्र भारतामध्ये आमच्या राष्ट्रीय पुण्यसरीता मुक्त झाल्या. पण त्या पुण्य सरितांमधील पुण्यतम सरिता जी सिंधू ती मात्र अद्याप आमच्या महाराज्यात सामावलेली नाही. हा हृदयभेदक विचार व्यक्त करताना त्यांची भाषा जे तेजपुंज रूप धारण करते, ते पाहून अक्षरशः डोळे दिपतात. ते सर्वच सिंधू स्तोत्र येथे देण्याचा मोह आम्हाला आवरत नाही.
     "सिंधूस आम्ही विसरू? सिंधू वाचून हिंदू? अर्था वाचून शब्द! प्राणा वाचून कुडी! अशक्य! अशक्य! अशक्य! जोवर एक तरी हिंदू जिवंत आहे तोवर तो सिंधूस विसरणे शक्य नाही. जिच्या काठावर आमच्या प्राचीनतम वेदर्शींनी ऋचांची पहिली सामगायने गायली, जिच्या पुण्यसलीलांनी आपल्या संध्यावंदनांनी अर्ध्ये दिली आणि जिला अत्यादराने वेदातील देवतांमध्ये स्थान देऊन तिच्यावर सुंदरातील सुंदर सुक्ते रचली ,त्या तुला,-   हे अंबितमे, नदीतमे, देवितमे, सिंधू, आम्ही कधीही विसरणार नाही. तुझ्या परिसरामध्ये आमच्या प्राचीनतम राजर्षींनी, ब्रम्हश्रींनी केलेल्या यज्ञांच्या प्रदीप्त हुताशनात जेव्हा हवी समर्पिले, तेव्हा अंतराळात उंच उंच दरवळत गेलेल्या त्यांच्या सुगंधांनी लालाईत होऊन इंद्र,वरूण, मरूतादी देव त्यांचे त्यांचे हविर्भाग स्वीकारण्यास तुझ्या तीरी येत आणि सोमरसासमावेतच तुझे सुमधुर सलिल पिऊन प्रसन्न होत ,त्या तुला हे सुरसरीते सिंधू, आम्ही कधीही विसरणार नाही. तुला इतर कोणीही जरी एक वेळ विसरले तरी हे स्तोत्र:स्विनी सिंधू हा आमचा एकटा महाराष्ट्र उठून तुला पुन्हा विमुक्त केल्यापासून राहणार नाही.
      मॅझिनीचरित्राच्या 'प्रस्तावने'चा शेवट करताना सावरकरांच्या भाषेचा हा दाहक दिमाख पाहा :
    ज्याचा जन्म परतंत्रित झालेला आहे, परंतु जे आपल्या पराक्रमाने त्या परतंत्रेचे निर्दालन करून आपला स्वदेश स्वतंत्र झालेला पाहतात व त्या स्वतःच्या कर्तबगारिने दास्यमुक्त केलेल्या भूदेवीच्या अंकावर आपले शुभ्र मस्तक ठेवून चिन्मय होतात, त्यांच्या आनंदाला सीमा नाही. मग जगात काही निर्मल सुखाचे क्षण असतील तर त्यांच्यात तो क्षण शुद्ध सुखाची परम सीमा करणारा होय, की ज्या क्षणी आपल्या अत्यंत प्रिय देशजननीला ज्याने असह्य दुःख दिले, तो शत्रू मार खात खात देशाच्या हद्दीबाहेर पळून चाललेला आहे, हे पाहता येते. जर निर्मळ धन्यतेचा एखादा दिवस असेल तर तोच होय, की ज्या दिवशी देशजननीला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून रणांगणातून देशभक्त परतत आहेत व त्या स्वातंत्र्यासाठी पतन पावलेल्या देशवीरांच्या आत्म्यांना संबोधून अशी गर्जना करीत आहेत की, "देशवीरहो! आपला देश स्वतंत्र झाला आहे! तुमच्या रक्ताचा सूड उगवला आहे!"
      सावरकरांच्या प्रतिभेचे सव्यसाचित्व हे आहे की क्रांतीचा अंगार ती जितक्या प्रखरतेने उधळते, तितक्याच कोमलतेने काव्याचीही कारंजी तिच्यामधून उचंबळू शकतात. हा नमुना बघा :  'ज्या जगात रात्री चांदणे आहे, उषःकाल गुलाबी आहेत, तारुण्य टवटवीत आहे, निद्रा गाढ आहे, भोगात रुची आहे, योगात समाधी आहे.--- तेव्हा ते हे जगत् तू आमच्या सुखासाठीच निर्मिलेस असे आम्हाला का वाटू नये? देवा, तू आमची खरी आई आहेस --आईला देखील दूध येते-- तू दिलेस म्हणून गौरवाची एवढी सुमनांजली देवाच्या मस्तकावर वाहिल्यानंतर त्याच हाताने उधळलेली ही 'लाखोली' आता वाचा.: ही सुगंधी फुले, हे सुस्वर पक्षी, तो मनोहर पिसारा पसरून नाचणारे हे सुंदर मोरांचे थवे, रानचे रान अकस्मात पेटून भडकलेल्या वणव्यात, चुलीत वांगे भाजावे तसे फडफड करतात न करतात तोच भाजून राख करून टाकतो. तो कोण? गाय दिली तो दयाळू, तर त्याच गायीचे दूध पिऊन तिच्याच गोठ्यात बिळ करून राहणारा तो विषारी साप, त्या गायीचे दूध देवाच्या नैवेद्यासाठी काढायला येणाऱ्या व्रतस्थ साध्वीला कडकडून डसून तिचा जीव घेणारा तो साप, तो ज्याने दिला तो कोण? प्रत्येक भोगामागे रोग, केसागणित ठणठणारे केसतोड, नखानखाचे रोग, दाता दातांचे रोग, ते कण्हणे, त्या कळा, ती आग, त्या साथी, ती महामारी, ते प्लेग,ती अतिवृष्टी, ती अनावृष्टी, ते उल्कापात, हे कोणी केले? हे जगडव्याळ विश्व परमेश्वराने कोणत्या हेतूने वा हेतूवाचून निर्माण केले, त्याच्याबद्दल माणसाने निष्कारण तर्ककुतर्क करीत बसू नये. हा एक तात्विक विचार चित्रमय स्वरूपात प्रकट करण्यात सावरकरांचे कौशल्य पहा:  पृथ्वीवर जेव्हा नुसत्या प्रचंड सुसरीच नांदत होत्या, नि मनुष्याचा मागमुसही नव्हता, तेव्हाही नद्या वाहत होत्या, झाडे फुलत होती, वेली फुलत होत्या. मनुष्या वाचून तर काय, पृथ्वी नव्हती, तेव्हाही हा सूर्य असाच आकाशात भटकत फिरण्यास भीत नव्हता. आणि हा सूर्यही जरी त्याचा साधा ग्रहोपग्रहां सुद्धा हरवला, तरी एक काजवा मेला तर पृथ्वीला जितके चुकलेसे वाटते, तितके देखील या सुविशाल विश्वाला चुकलेसे वाटणार नाही. या विश्वाच्या देवाला एक पलाचे सुतक असे शंभर सूर्य एखाद्या साथीत एका दिवसात जरी मरू लागले, तरी धरावे लागणार नाही!"
       स्वातंत्र्याइतकाच शुद्ध बुद्धिवादाचा अत्यंत निकराने पुरस्कार करताना सावरकरांनी समाजाच्या रोषा, लोभाची सुतराम पर्वा केली नाही. पारतंत्र्यावर हल्ला चढवताना त्यांनी जसे अक्षरशः तळहातावर शीर घेतले होते, त्याप्रमाणे समाजातील जुलमी अन अन्यायी रुढीवर आणि दूधखुळ्या देवभोळेपणावर मारा करताना त्यामुळे आपल्या लोकप्रियतेला आपल्याला मुकावे लागेल याची त्यांनी बिलकुल पर्वा केली नाही. राजकीय दृष्ट्या सावरकर जेवढे क्रांतिकारक होते, तेवढेच सामाजिक बाबतीतही ते बंडखोर होते. गाईला देवता समजून हिंदू लोकांनी तिची पूजा करावी या रुढाचाराचे त्यांनी जेवढे वाभाडे काढले, तेवढे कोणीही काढले नसते. "गोठ्यात उभ्या-उभ्या गवत कडबा खात असलेल्या एकीकडे खाता खातास उभ्या-उभ्या दुसरीकडे मूलमूत्रोत्सर्ग स्वेच्छ्या बैठक मारून बसणाऱ्या, शेपटीच्या फटकार्याने स्वतःच्या शेणमुत्राचा तो चिखल अंगभर उडवून घेणाऱ्या, दावे सुटून थोडा फेरफटका करण्याची संधी मिळताच अनेक समयी कुठेतरी जाऊन घाणीत तोंड घालणाऱ्या, नि तसेच ओठ चाटीत  गोठ्यात आणून बांधल्या जाणाऱ्या त्या गाईस, शुद्ध नि निर्मळ वसने नेसलेल्या सोज्वळ ब्राह्मणाने व महिलेने हाती पूजापात्र घेऊन गोठ्यात पुजावयास जावे आणि तिच्या शेपटीस स्पर्शून आपले सोवळे न विटाळता उलट अधिक सोज्वळले आणि तिचे ते शेण नि ते मूत्र चांदीच्या पेल्यात घोळून पिताना आपले जीवन अधिक निर्मळले असे मानावे!"
        उपयुक्ततेच्या दृष्टीने कुत्रा हा गायीपेक्षा अधिक उपकारक असताना त्याची आपण जी अक्षम्य विटंबना करतो, त्याचे किती प्रभावी चित्र सावरकरांनी रेखाटले आहे ते पहा. गायीने दूध दिले तर कुत्र्याने अनेक प्रसंगी मनुष्यास जीवदान दिलेले आहे. मुलांचा मित्र मृगयेची बंदूक, घराचे कुलूप, पडतो दाराशी, खातो भाकरीचे तूकडे, करून घेतो साऱ्यांची हडहड, नुसते यु म्हटले की चटकन त्याने पाय चाटू लागावे इतका विनम्र, संकटात जीवास जीव देण्या इतका कृतज्ञ, शिवाय शेतकऱ्यापासून शाहू सम्राटापर्यंत ज्याचा त्याचा एकनिष्ठ चाकर. त्या कुत्र्यास सन्मान कोणता? वेतन काय? तर त्याचे नावही एक शिवी.
       हिंदू समाजास 'अभक्ष' आणि 'अपेय' यांचे जे ब्राह्मणीत थोतांड अनेक शतकांपासून माजून राहिले आहे, त्यावरही सावरकरांनी कडकडून हल्ला चढवलेला आहे. त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की काय खावे, नि काय प्यावे हा प्रश्न धर्मशास्त्राचा नसून तो वैद्यकशास्त्राचा असल्याने जे रुचेल नि पचेल ते, वैद्यकशास्त्र दृष्ट्या स्वच्छ आणि आरोग्य्स अनुकूल असलेल्या कोणत्याही माणसाच्या हातून किंवा पंक्तीत बसून खाण्यास काहीही प्रत्यवाव नाही. ब्रोंकायटिस झाला तर थोडी ब्रँडी सुद्धा घेतलीच पाहिजे. त्यावेळी ती आवश्यकच असते. मिळेल ते नि पचेल ते खाऊन जगात मानाने जगायला शिकले पाहिजे. तोच आहे आजचा धर्म.
       महात्मा गांधी आणि गांधीवाद या नावाने ओळखले जाणारे त्यांचे यंत्रविरोधी आणि अहिंसावादी तत्त्वज्ञान यांची तर सावरकरांनी संधी सापडेल तेव्हा तेव्हा अशी काही टर उडवली आहे की काही विचारू नका. मनुष्य हा शरीराने अत्यंत दुबळा आहे. कोणत्याही श्वापदा पुढे टिकाव धरणे त्याला अशक्य आहे. माणसाला सुळे नाहीत, शिंगे नाहीत, राट किंवा केसाळ कातडे नाही, पंख नाहीत, चोच नाही, नखे नाहीत ,द्रंष्ट्रा नाही, दंश नाही, नांगीही नाही. इंग्रजांनी नि:शस्त्र करण्याच्या आधी कितीतरी युगे माणसाला सृष्टीने निशस्त्र केले आहे. असे असून मनुष्य आज साऱ्या प्राण्यांचा राजा, शास्ता आणि जेता म्हणून मिरवतो आहे. कशाच्या बळावर? कळीच्या हत्याराच्या, यंत्राच्या! यंत्राने मनुष्य दुबळा होत नाही. उलट त्याने आपली दुर्बलता यंत्राच्या सामर्थ्यावर मारून टाकून तो सर्व प्राण्यात आज प्रबळतम झालेला आहे. मंत्रबळे नव्हे तर यंत्रबळे. यंत्र हा शाप नसून मनुष्याला अतिमानूश करणारे विज्ञानाचे वरदान आहे.' यंत्राच्या या सावरकरी समर्थनाला गांधीवादाजवळ काहीही उत्तर नाही.
       स्वामी श्रद्धांनंदांची हत्या करणाऱ्या रशीदला जे महात्मा गांधी 'भाई' म्हणाले. त्यांनीच एका इंग्रजांचा वध करणाऱ्या गोपीनाथ सहाला हिंसक या विशेषणाचे निषेधले. यावेळी ढोंगाने आणि विसंगतीने भरलेल्या महात्माजींच्या अहिंसा तत्त्वज्ञानाची सावरकरांनी अशी काही भंबेरी उडवली म्हणता! भयानक उपरोधाने भरलेल्या आपल्या या लेखाची अखेर त्यांनी अशी केली आहे:' प्रत्यक्ष बहिणीवरही बलात्कार करावयास येणाऱ्या पाप्यावरही निरुपायाने शस्त्र चालवणे ही हिंसा असल्याने, ती करू नये म्हणून म्हणणारे महात्माजी, इंग्रजांचा पक्ष घेऊन जर्मन लोकांची कत्तल उडवण्यासाठी इंग्रजी सैन्यात भरती व्हा म्हणून हिंदी तरुणास उपदेश करीत, आजारी पडेतो अट्टाहासाने प्रयत्न करते झाले. ते का? आपल्या 'संन्यास्त खड्ग' या नाटकात एका पात्राच्या तोंडून "वाटेल त्या संन्यासाश्रमात येणाऱ्या आणि अशा रीतीने लाखो लोकांस शस्त्र संन्यासाच्या प्रतिज्ञाने हतविर्य करून ठेवणाऱ्या या भयंकर भूलीचे भीषण परिणाम पंचविसाव्या पिढीपर्यंत या भारतात भोगावे लागतील!" हा जो सावरकरांनी अहिंसेला शाप देऊन ठेवलेला आहे, तो फाळणीच्या वेळी महात्माजींच्या वारसदारांनी घडवून आणलेल्या नरमेधयज्ञाने  खराच ठरलेला आहे.
      राष्ट्रातील तरुणांत स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती आणि स्वाभिमान या सद्गुणांचा कसा विकास होईल आणि त्याचबरोबर समाजातील ढोंग आणि अंधश्रद्धा यांचा नायनाट होऊन शुद्ध बुद्धिवादाची आणि पौरुषाची उपासना देशातील तरुण पिढी कशी करू लागेल? या एकाच ध्येयाचा आपल्या आयुष्यात सावरकरांनी निदीध्यास धरला. 'राष्ट्रीय जीवनाचे संरक्षण हीच साहित्याची आद्य चिंता असावी.' असे मुंबईच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मुळी सांगूनच ठेवलेले आहे.त्यात ते म्हणाले, "राष्ट्रीय साहित्य म्हणजे शस्त्रबळ. शास्त्रचर्चा नव्हे. शिवछत्रपतींनी लेखणी टाकून भवानी उचलली म्हणून तर आज 'महाराष्ट्र सारस्वत' जिवंत राहिले आहेत. "शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते."
      विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक यांच्याप्रमाणेच आजच्या महाराष्ट्रीय जीवनाचा, मराठी भाषेच्या आणि मराठी साहित्याच्या शिल्पीकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जो मोठा भाग आहे असे त्यांचा शत्रू सुद्धा कबूल करील.

सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे

सावरकर नि त्यांचे वक्तृत्व...

 🔹 अत्रे उवाच... (२)

देशाचे एकत्व सांगताना ते एकदा म्हणाले, "हिमालयाला आग लागली, तर सिंधूसागराने भिजवायला धावले पाहिजे. माझ्या हृदयात अखंड भारताचा आलेख कोरला गेला आहे. त्यातला कोणता प्रात मी तोडून देऊ? पेशावर देईन तर त्या प्रांतात पाणिनी आपल्या गिर्वाणवाणीचा मोठ्यात मोठा व्याकरणकार होऊन गेला, द्वारका देईन तर साक्षात श्रीकृष्णाच्या अवतार तेथे झाला, बंगालमध्ये कालीमातेची चैतन्याची पूजा होते, महाराष्ट्र म्हणाल तर मी माझे हृदयच तोडून दिल्यासारखे होईल. व्यास, वाल्मिकी, पराशर अशा महान तपस्व्यांनी पावन केलेल्या देशाचे या अखंड भारताचे तुकडे करण्यास कोणता हाडाचा हिंदू सिद्ध होईल? वक्ता दशसहस्रेशु अशा कोटीतले ते महान वक्ते होते. गंगेचे पाणी नि सावरकरांची वाणी यांची तुलना विशालतेत, वेगात नि पावित्र्यात यथार्थपणे करता येईल.


केवढाही मोठा समाज असो त्याला नागाप्रमाणे डोलावयाला लावण्याची किमया सावरकरांच्या वक्तृत्वात होती. सभास्थानी सावरकरांचा प्रवेश झाला रे झाला, की श्रोत्यांच्या सर्वांगावर विद्युत् कंप उठे. सावरकरांची मध्यम उंचीची, गौरवर्णाची, कृष बांध्याची तेजस्वी मूर्ती व्यासपीठावर उभी राहिली की, श्रोते आपले देहभान विसरत असत. त्यांच्या भाषणाची सुरुवात जितकी सामान्य तितकीच श्रोत्यांच्या काळजांना भिडणारी अशी असे. "हिंदू बांधव हो!" किंवा "हिंदू बंधूंनो!" अशा कोमल आणि लाघवी स्वरात जेव्हा ते आपल्या श्रोत्यांना संबोधित असत, तेव्हा श्रोत्यांच्या काळजात ज्या सद्भावनेच्या संवेदना उठत, त्याचे वर्णन करायला आमच्याजवळ शब्द नसत. यशस्वी वक्त्यांच्या अंगी अनेक गुण असावे लागतात. कारण भिन्नभिन्न मतांच्या बहुरंगी समुदायाची नाडी वक्त्याला चटकन ओळखावी लागते. अंतरीची तळमळ, बिनतोड युक्तिवाद,  प्रसंगावधान, प्रत्युत्त्पन्नमती या सर्व गुणांचे पाठबळ वक्त्याला असल्याखेरीज श्रोते सहजासहजी त्याच्या काबुत येत नाहीत. रत्नागिरीच्या स्थानाबद्धतेतून सावरकरांची जेव्हा सुटका झाली, तेव्हा महाराष्ट्रात किती माणसे त्यांच्या पाठीशी उभी होती बरे? केवळ आपल्या असामान्य वक्तृत्वाच्या सामर्थ्यावर सारा महाराष्ट्र सावरकरांनी आपल्या मागे उभा केला. सावरकरांनी आपले व्याख्यान सुरू केले, की अगदी पहिल्याच वाक्यात ते श्रोतृसमाजाच्या काळजाला हात घालत असत. ज्या शहरात किंवा ज्या वास्तू समोर ते बोलायला उभे राहत त्याचा ते पहिल्याच वाक्यात इतका अचूक उल्लेख करीत की श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहत. उमरावतीला ते एकदा व्याख्यानाला गेले असताना त्यांनी आपल्या भाषणाचा प्रारंभ कोणाच्या नावाने करावा? अर्थात, दादासाहेब खापर्ड्यांच्या! ते म्हणाले, "ज्यांना प्रति टिळक असे म्हटले जात असे, त्या दादासाहेब खापर्डे यांच्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत मी आज व्याख्यानाला उभा राहिलेलो आहे." भागानगरच्या म्हणजे दक्षिण हैदराबादच्या लढ्यासंबंधी पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर व्याख्यान देत असताना त्या वाड्याच्या दिंडी दरवाजाकडे एकदम हात फेकून ते म्हणाले की, "अरे नाना फडणविसांनी काढलेल्या निजामाच्या नाड्या आखडणाऱ्या राजाज्ञा ह्याच वाड्याच्या आतल्या तालनातून सुटल्या ना?" जमनादास मेहतांच्या उमेदवारीला पाठिंबा देणाऱ्या एका सभेत पायाला काही दुखणे झाले असताना सावरकरांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली की "आज एक पाय रुग्णाईत आहे. असे असताना सुद्धा मी आज येथे व्याख्यानाला आलेलो आहे. त्याअर्थी जमनादासांना पाठिंबा द्यायला मी एका पायावर उभा आहे. हे आपल्याला दिसून येईल." मुंबईमध्ये सावरकरांचा एकसष्टी समारंभ सर रघुनाथ परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. त्यावेळी प्रारंभीच्या भाषणात आप्पासाहेब परांजपे यांनी सावरकरांची खूपच स्तुती केली. मागाहून सत्काराला उत्तर देताना सावरकर म्हणाले की, "मी अप्पारावांचा महाविद्यालयातल्या विद्यार्थी. माझे गणित फारच कच्चे. अप्पारावांनी माझ्या उत्तर पत्रिकेवर चूक म्हणून कितीतरी फुल्या मारल्या होत्या. तेव्हा मला वाईट वाटे. पण आज तेच माझे गुरुवर्य माझे राजकारणातले गणित तंतोतंत बरोबर असल्याचे कबूल करतात, याचा मला अत्यंत आनंद होत आहे." मुंबईच्या आंग्रेवाडीत त्यांचे व्याख्यान झाले तेव्हा ते म्हणाले," इंग्रजांना नौयुद्धात जरब बसवणाऱ्या या आंग्ऱ्यांच्या वाड्यात मी आज बोलतो आहे." एक काळ असा होता की, सावरकर कुठेही जावोत त्यांच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडला नाही असे कधीही झाले नाही. सिंधच्या दौऱ्यानंतर 'सिंध ओब्सर्वर' पत्राने सावरकरांबद्दल पुढील अभिप्राय व्यक्त केला होता "He came, He spoke, He conquered!" उपहास नि उपरोध हि सावरकरांची अत्यंत आवडती शस्त्रे असत. लाठीधारी तरुणांच्या मेळाव्या पुढे भाषण करताना एकदा ते हसत हसत म्हणाले, "आजकाल पोरी सुद्धा लाठी फिरवू लागल्या आहेत. आता निदान बंदुका तरी हातात घ्या. नाहीतर पोरीच तुमची डोकी शेकून काढतील." मुंबईच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून त्यांनी सैनिकीकरणाचा दिलेला संदेश म्हणजे वक्तृत्व कलेचा एक उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. जे राष्ट्र खुरटे आणि दुबळे त्याचे साहित्यही कसे खुरटे व दुबळे असते, ते तुम्ही नालंदेला विचारा, तक्षशिलेला विचारा. असे सांगून त्यांनी श्रोत्यांना सवाल केला की, "ऑस्ट्रियाच्या मरणाची किंकाळी ऐकलीत ना? परवा त्याच्या शेवटच्या अध्यक्षांनी शेवटचे वाक्य हे उच्चारले की ' We yield under German swords and not under German Sounets!' आपल्या विरोधकांच्या वर्मी  घाव घालण्याची कला सावरकरांना उत्तम साधलेली होती. डॉक्टर पट्टाभी सितारामय्यानी लिहिलेल्या काँग्रेसच्या इतिहासात क्रांतिकारकांच्या कार्याचा त्यांनी अनुल्लेख केला आहे. त्याला उद्देशून सावरकर एकदा कडाडून म्हणाले की,"अरे तुम्ही खूप दडवाल. पण तुमचे बाप आम्ही येथे जिवंत आहोत ना? आम्ही येथे जिवंत असताना राष्ट्रात खरीखुरी चळवळ वीस सालापासून सुरू झाली असे तुम्हाला म्हणवले तरी कसे?"  दुर्दम्य आत्मविश्वास हे सावरकरांच्या वक्तृत्वाचे एक अविस्मरणीय वैशिष्ट्य आहे. नागपूरच्या एका दौऱ्यात एका कम्युनिस्टाने त्यांना विचारले की तुम्ही मार्क्स वाचला आहे काय? तेव्हा सावरकरांनी ताडकन त्यांना विचारले की "मार्क्सने सावरकर वाचला होता काय?" त्यांच्या आत्मविश्वासाचा निदर्शक असा 'च' हा त्यांच्या व्याख्यानात पदोपदी आढळून येत असे.' घडवून आलेच पाहिजे', 'करतीलच', 'नाहीच नाही', 'शंकाच नको',' करणारच', 'होणारच', असे प्रयोग त्यांच्या तोंडी वारंवार येत असत. या 'च' मुळे सावरकरांचे वक्तृत्व अतिशय परिणामकारक होत असे. 'याल तर तुमच्यासह' या सावरकर सूत्राचा जनक हा 'च' आहे. त्यांच्या वाणीला ठाशिवपणाचा आणि सिद्धांत वाणीचा पीळ हा च भरीत असे. गवयाची जशी सम, तसा हा सावरकरांचा च होता. त्याला हटकून टाळी मिळत असे.  विशिष्ट शब्दांवर जोर देणे, उपरोधगर्भ वाक्य स्वर हेलावीत आणि माना डोलावीत म्हणणे, क्वचित मध्येच स्वर खाली आणणे, प्रश्नांमागून प्रश्नांची फैर झाडणे, साभिप्राय थांबणे, अशा बारीक सारीक गोष्टींनी ते आपल्या वक्तृत्वाचे नाट्य उभे करीत असत. 'स्वातंत्र्य' 'हिंदुत्व' 'दायित्व' 'मानबिंदू' 'एकमेव' 'स्वयमेव' 'सुखेनैव' 'अवश्यमेव' 'हिंदूजग् त','तथाकथित' 'संचालन', 'संघटन', 'भूदल', 'नौदल', 'वायुदल', 'आसेतु हिमाचल', 'आसिंधुसिंधू' हे वाक्प्रयोग त्यांच्या भाषणात वारंवार येत असत. आणि ते शब्द त्यांच्या तोंडून अशा ठसक्याने बाहेर पडत असत, की त्यांचा उच्चार श्रोत्यांच्या कानावर पडताच त्यांच्या अंतःकरणातून एक नादमय लहर उमटून जाई. कधीकधी तर त्यांच्या वाणीला परतत्वाचा स्पर्श होत असे. त्यावेळी अंतरीच्या जिव्हाळ्याने ते स्वतः भारून जात आणि श्रोत्यांना भरून टाकीत. एकदा हिंसाअहिंसेची चर्चा करताना ते म्हणाले, "ही आपली सृष्टी हरिण बालकांचा वध करून स्वतःच्या पिल्लांना ममतेने पाजणारी एखादी व्याघ्री आहे."  देशाचे एकत्व सांगताना ते एकदा म्हणाले, "हिमालयाला आग लागली, तर सिंधूसागराने भिजवायला धावले पाहिजे. माझ्या हृदयात अखंड भारताचा आलेख कोरला गेला आहे. त्यातला कोणता प्रात मी तोडून देऊ? पेशावर देईन तर त्या प्रांतात पाणिनी आपल्या गिर्वाणवाणीचा मोठ्यात मोठा व्याकरणकार होऊन गेला, द्वारका देईन तर साक्षात श्रीकृष्णाच्या अवतार तेथे झाला, बंगालमध्ये कालीमातेची चैतन्याची पूजा होते, महाराष्ट्र म्हणाल तर मी माझे हृदयच तोडून दिल्यासारखे होईल. व्यास, वाल्मिकी, पराशर अशा महान तपस्व्यांनी पावन केलेल्या देशाचे या अखंड भारताचे तुकडे करण्यास कोणता हाडाचा हिंदू सिद्ध होईल? वक्ता दशसहस्रेशु अशा कोटीतले ते महान वक्ते होते. गंगेचे पाणी नि सावरकरांची वाणी यांची तुलना विशालतेत, वेगात नि पावित्र्यात यथार्थपणे करता येईल.

सात तीन १९६६
[ वक्तृत्वावरील हे लेख श्री.शि.ल. करंदीकर आणि प्रा. स. गं. मालशे यांच्या लेखनावर सर्वस्वी आधारलेले आहेत.]

सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे

सोमवार, १७ जून, २०२४

सावरकर नि त्यांचे वक्तृत्व

 🔹 अत्रे उवाच... (१)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी केलेले लिखाण हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची पूर्णत्वाने ओळख करून देण्याचा त्याकाळातील महत्त्वाचा यशस्वी प्रयत्न होता. आजही त्यांच्या त्या लिखाणातून सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व किती बहुआयामी होते, किती राष्ट्रनिष्ठ होते, किती व्यासंगी , अभ्यासू होते, किती राष्ट्रनिष्ठ व देशभक्त होते याची प्रचिती येते. काळाच्या पडद्याआड जरी अत्रे आणि सावरकर अशी दोन्ही व्यक्तिमत्त्वे गेली असली तरी त्यांची त्यांच्या या लिखाणाच्या निमित्ताने आठवण करण्याचा हा प्रयत्न आहे. आमच्या स्नेही आणि साहित्याच्या अभ्यासक संगीता महाजन- बेहेरे यांनी अलीकडेच यासाठी आचार्य अत्रे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या लिखाणाला उजाळा देण्यासाठी व नवीन पिढीला अत्रे यांच्या लिखाणाची आणि सावरकर यांच्या व्यक्तित्वाची ओळख व्हावी यासाठी व्हॉट्सअपच्यामाध्यमातून ओळख करून दिली. संगीता महाजन- बेहेरे यांनी हे सारे लेख स्वत: वाचून टाईप व संपादित केले आहे.  आचार्य अत्रे यांचे सावरकर यांच्यावरील लेख जे पूर्वी दैनिक मराठातून प्रसिद्ध झाले व नंतर त्यांचे परचुरे प्रकाशनने पुस्तकरूपाने प्रकाशित केले, ते जुने पुस्तक घेऊन त्यातील लिखाण लोकांपर्यंत पोहोचविले. 'प्रज्वलंत' या सावरकर विचारांना लोकांप्रत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वेबसाइटनेही ते अधिका लोकांप्रत जावे म्हणून साईटवर प्रकाशित करण्याचे ठरविले आहे.  आचार्य अत्रे यांच्या त्या लेखांची मालिका त्यानिमित्ताने प्रज्वलंतवर देत आहे.  

 वीर सावरकरांचे वक्तृत्व हा त्यांच्या प्रचंड व्यक्तिमत्वामधला एक विराट भाग होता. इंग्रजी,
हिंदी नि मराठी या तिन्ही भाषांत सावरकर हे वक्तृत्व करीत असत. आम्ही त्यांचे इंग्रजी वा हिंदी वक्तृत्व फारसे ऐकलेले नव्हते. थोडेसे ऐकले, पण त्यांच्या इंग्रजी नि हिंदी वक्तृत्वाबद्दल आमच्या मनात फारसा आदर नव्हता. सावरकर मराठी भाषा जितक्या वेगाने बोलत तितक्याच वेगाने ते इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलत असत. त्यांचे समकालीन 'बिपीन चंद्र पाल' यांचे इंग्रजी वक्तृत्व त्यांच्या भरदार आवाजांनी एकदम उठून दिसत असे. सरोजिनी नायडूंच्या इंग्रजी वक्तृत्वाला काव्यात्मकता अन्  शब्दश्रीमंती यांचे तेज चढे. ह्या प्रसिद्ध  वक्त्यांचे वक्तृत्वशयक विशेष सावरकरांच्या इंग्रजी वक्तृत्वात आढळत नसत, हे खरे. पण त्यांच्या मराठी वक्तृत्वात जे विशेष होते तेच त्यांच्या इंग्रजी वक्तृत्वाला शोभा देत असत. सावरकरांचे हिंदी वक्तृत्व अगदी सामान्य होते, पण त्यांचे मराठी वक्तृत्व मात्र असामान्य होते. सावरकरांचे वक्तृत्व हे सावरकरांसारखेच होते, असे म्हटले पाहिजे. वक्तृत्वाचा अपूर्वक गुण आपल्याला लाभलेला आहे याची जाणीव सावरकरांना आपल्या १२-१३ वर्षाच्या वयातच आली. होती १९६५ साली पुण्यामध्ये विदेशी कपड्यांची होळी लकडी पुलाच्या पलीकडे एका शेतामध्ये झाली. त्यावेळी दे. शिवरामपंत परांजपे, भालाकार भोपटकर आणि लोकमान्य टिळक हे हजर होते. ज्या ठिकाणी विदेशी कपड्यांची होळी व्हावी त्या ठिकाणी व्याख्याने मुळी होऊच नयेत, ती दुसरीकडे व्हावी, असे लोकमान्य टिळकांनी सुचवले. पण सावरकरांना ती गोष्ट पसंत पडली नाही. जळणाऱ्या होळीला रसरसणाऱ्या वक्तृत्वाची साथ मिळाली, तर विदेशी वस्तु बद्दलचा द्वेष लोकांच्या मनात पक्केपणी रुजेल, असा मुद्दा सावरकरांनी त्या व्याख्यानात मांडला. 'होळीशेजारी व्याख्याने करावयाची नाही, तर काय मंडईपाशी कोरडी व्याख्याने करून लकडी पुलापाशी होळी पेटवायची? असा सवाल तरुण सावरकरांनी टिळकांना जेव्हा केला, तेव्हा तरुणांच्या भावना जाणणाऱ्या टिळकांनी अखेर सावरकरांचे म्हणणे मान्य केले. काळकर्ते परांजपे यांचे व्याख्यान यावेळी अत्यंत बहारीचे झाले. एका पेटलेल्या परदेशी कापडाचा कोट हातात धरून त्यांनी लोकांना चेतवीत म्हटले की,' याच परदेशी कोटाच्या खिशातून व्यापाऱ्याच्या मिषाने ते खिसे भरभरून हिंदुस्तान लुटणाऱ्या इंग्रजांचा हा पातकी कोट मी आता अग्निसमर्पण करतो.'  त्यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. याप्रसंगी सावरकरांनी जे जहाल भाषण केले, त्याबद्दल त्यांना दहा रुपये दंड करण्यात आला आणि त्यांची कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली. सावरकरांचे वक्तृत्व हा त्यांच्या महान व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. आम्ही स्वतः सावरकरांचे वक्तृत्व अनेक वेळी ऐकलेले आहे. त्याप्रमाणे भारतातल्या लोकमान्य टिळकांपासून तो पंडित मदन मोहन मालवीय पर्यंत अन् ॲनी बेझंट पर्यंतच्या अनेक वक्त्यांची व्याख्याने आम्ही पुण्यात ऐकलेली आहेत. पण ज्या काळी 'ध्वनिक्षेपक'यंत्र नव्हते, त्याकाळी इंग्लंडमध्ये जाऊन इंग्रजी भाषेत सावरकरांनी ८-१० हजाराच्या सभा मंत्रमुग्ध केलेल्या होत्या. पुढे ध्वनिक्षेपक यंत्र आले. त्या यंत्राचा आणि सावरकरांच्या वक्तृत्वाचा संयोग इतका बेमालून बसून गेला की ते यंत्र केवळ सावरकरांच्या वक्तृत्वाच्या लहरी वातावरणात उठवण्यासाठीच जणू काही निर्माण झालेले असावे, असे श्रोत्यांना वाटत असे. सावरकरांच्या आवाजाचे चढउतार, त्यांच्या वक्तृत्वाची गती, त्यांच्या वाणीची गोडी हे सर्व गुण त्या यंत्राच्या वैशिष्ट्यापाशी जणूकाही मिलाफ होण्यासाठी सिद्ध झालेले असावेत, असा त्याकाळी श्रोत्यांना भास होत असे. सहचरणीप्रमाणे आपल्याबरोबर असणारी छत्री आपल्या समोरच्या टेबलावर ठेवून, अत्यंत संथ आवाजात सावरकर आपल्या भाषणाला नेहमी सुरुवात करीत असत. ते हातवारे करीत नसत. आपल्या आवाजाची विनाकारण धडपड ते करीत नसत, शब्दांची उतरंड लावण्याचा आटापिटा ते करीत नसत, खोट्या उपमा, अलंकार वगैरे साधण्याचा हव्यास त्यांना नव्हता, तथापि हे सर्व गुण अंगात नसताना सुद्धा सावरकरांनी बोलावयाला सुरुवात केली की हा वक्ता आता आपल्यावर हळूहळू मोहिनी पसरत चाललेला आहे, अशा विचारात श्रोते जो निमग्न आहेत, तो सावरकरांच्या भावना उद्दीपित होत असत, आणि त्यामुळे त्यांचा आवेश, वाणीची गती, मुद्रेचा आविष्कार यांना पराकाष्ठेने उत्कर्ष होत जाई. सावरकरांच्या वक्तृत्वात नाटकीपणा होता असा काही लोकांचा त्यांच्यावर आक्षेप होता. पण तो त्यांच्या बोलण्यातला नाटकीपणा नसून ती त्यांच्या मनातील अपरंपार तळमळ होती. १९०८ साली लंडनच्या भारत भवनात एका तथाकथित राष्ट्रीय मुसलमानाशी त्यांची वक्तृत्वाच्या बाबतीत झटापट झाली. त्यावेळी बॅरिस्टर असफअल्ली हजर होते. त्यांनी सावरकरांच्या वक्तृत्वाचे पुढील प्रमाणे वर्णन केले: ' Fragile as an anemic girl, restless as a mountain torrent and as keen as the edge of a Toledo blade.'

( रक्तशून्य मुलीसारखे नाजूक, डोंगरातून खळखळणाऱ्या जलप्रवाहासारखे अस्वस्थ अन् टोलेडो तलवारीच्या पात्याप्रमाणे धारदार असे सावरकरांचे वक्तृत्व होते.) व्याख्यानाच्या आधी किंवा व्याख्यानाच्या सुरुवातीला सावरकरांना कोणी डीवचले, की सावरकरांचे व्याख्यान प्रारंभापासूनच वरच्या पट्टीत सुरू होई आणि मग पुढे श्रोत्यांना अक्षरशः पंचपक्वान्नाची मेजवानी मिळे. गाण्याच्या मैफिलीत रंगणारे रसिक जसे सांगतात की खऱ्या अर्थाने रंगलेली बैठक जेव्हा समाप्त होते, तेव्हा गाणारा गवई नि ऐकणारे श्रोते यांची अशी काही लय लागते, की बैठक संपल्यानंतरही बराच वेळ त्या गाण्याचे पडसाद श्रोत्यांच्या अंतःकरणात घुमत राहतात. सावरकरांच्या उत्कृष्ट व्याख्यानाच्या शेवटी हीच स्थिती होत असे. एकोणचाळीस साली मे महिन्यात पुण्याच्या 'वसंत व्याख्यानमाले'त सावरकरांनी 'लाला हरदयाळां'वर व्याख्यान दिले. यावेळी या महान देशभक्ताच्या बाबत काँग्रेसने दाखवलेल्या उपेक्षा वृत्तीवर टीका करताना सावरकर कडाडले की, ' अरे इकडे कोणी उंदीर मेला तरी तुम्ही स्तंभच्या स्तंभ खरडता नि तिकडे 'लाला हरदयाळ' देशासाठी फकीरी पत्करून वणवण करीत पतन पावला, तरी त्याच्यासाठी साध्या दोन ओळी ही तुम्हाला लिहावत नाही का?' सावरकरांचे ते व्याख्यान ऐकल्यानंतर नादब्रम्हाचा साक्षात्कार व्हावा, अशी पुणेकर श्रोत्यांची स्थिती झाली. पुढे त्याच वर्षी ऑगस्टच्या पहिल्या तारखेला 'टिळक स्मारक मंदिरात' त्यांचे व्याख्यान झाले  त्याचा समारोप करताना सावरकर म्हणाले,'कवी श्रेष्ठ गटेच्या काळी प्रशियाचे तुकडे तुकडे होऊन ते राज्य नेपोलियनच्या हाती गेलेले होते. तेव्हा गटेने कविता रचली की मी माझ्या राज्याच्या सिंहासनावर माझा राजा परत बसलेला पाहीपर्यंत मी भीक मागत हिंडेन.' गटेचे ते स्वप्न चार पाच पिढ्यानंतर साकार झाले. आज हिटलरच्या नेतृत्वाखाली सारे जर्मन राष्ट्र एका निशाणाखाली एकत्र झालेले आहे. वटवृक्षाचे बीज मोहरीहूनही लहान असते, पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते, ती वाढता वाढता तिचा प्रचंड वृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात. उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो. मलाही अशीच एक वल्गना करू द्या. माझे गाणे मला जाऊ द्या. या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे, आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या पिढीत नाही तर पुढील पिढीत ही वल्गना खरी ठरेल. माझी ही वल्गना खोटी ठरली, तर मी वेडा ठरेल, माझी ही वल्गना खरी ठरली, तर मी प्रॉफिट ठरेल. हा माझा वारसा आज मी तुम्हाला देतो आहे. त्या सभेचे अध्यक्ष तात्यासाहेब केळकर होते. सावरकरांच्या व्याख्यानाचा हा समारोप जसजसा रंगत चालला, तसतसे केळकर आनंदाने डोलू लागले, आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ठिपकू लागले.

६/३/१९६६

  आचार्य अत्रे

(लेखातील छायाचित्र सौजन्य  - आंतरजालावरून साभार)

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...