मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

तीन माकडांची उद्याची गोष्ट (भाग ४)



माकड हा मानवाचा "पूर्वज" आहे. वंशज नाही. आणि हा सिद्धांत डार्विन च्या नावावर ठोकला जातो.  मूळ सिद्धांत : "कपी (गोरीला, चिंपांझी सारखे बिनशेपटाचे माकड) आणि मानव यांना एक सामायिक पूर्वज आहे." त्यामुळे म्हणायचेच असल्यास कपी ही आपली चुलत भावंडे आहेत. पूर्वज नाहीत. हा संदर्भही सर्वांनी नक्कीच लक्षात घेण्यासारखा आहे.


भविष्यकाळ सांगणे ही, ज्योतिषाची व्यावसायिकता आहे. ते खरे होईलच याची मात्र शाश्वती तो देऊ शकत नाही. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ व्या वर्षात वाटचाल करताना नेमके काय जाणवले असेल त्यापेक्षा विद्यमान भारतीय नागरिकांना चीन- जपान वा भारतातूनही उत्पत्ती झालेल्या या बुद्धिमान माकडांच्या संदेशातून काय घेता आले असेल आणि आजच्या घडीला त्याने त्यातून काय टाळले असेल वा त्याने काय टाळावयाचे ठरवले असेल, ते मात्र भविष्यातील सहाव्या माकडाला उमगेल का, हा प्रश्न आहे.

शेवटी माकड ते माकड आणि माणूस तो माणूस, मग भले कोणी माकडाला माणसाचा वंशज म्हणो वा माकड आपण माणसाचे वंशज असल्याचे मानो. विद्यमान घडीला अद्ययावत होत असलेल्या, सतत बुद्धिवादाच्या वा पुरोगामीत्वाच्या नादाने भारावलेल्या माणसाने माणसाचा गुणावगुण आत्मसात पूर्ण केला आहे. मात्र तरीही त्याच्या बुद्धिवादाला सध्याच्या माकडचाळ्यातून पडलेली बेडी त्याला तोडता येत नसेल तर त्याच्या बुद्धिवादाचा उपयोग काय? धर्म, जात, भाषा, देश अशा विविध भेदांप्रमाणेच, भांडवल, उद्योग, सत्ता अशा नशेच्या अधीन राहाणाऱ्या जगाने जर शेखचिल्लीसारखे हातात कुऱ्हाड घेऊन बसलेल्या फांदीवरच घाव घातला तर ती बाब त्या पूर्वीच्या तीन माकडांच्या भावी पिढीची रुपरेषा ठरू शकेल.! त्यासाठी गांधीजींची, जपान्यांची, चिन्यांची वा भारतीयांची तीन माकडे असण्याची गरज नाही. !
माझ्या एका स्नेह्यांनी दिलेल्या माहितीनुसार माकड हा मानवाचा "पूर्वज" आहे. वंशज नाही. आणि हा सिद्धांत डार्विन च्या नावावर ठोकला जातो.  मूळ सिद्धांत : "कपी (गोरीला, चिंपांझी सारखे बिनशेपटाचे माकड) आणि मानव यांना एक सामायिक पूर्वज आहे." त्यामुळे म्हणायचेच असल्यास कपी ही आपली चुलत भावंडे आहेत. पूर्वज नाहीत. हा संदर्भही सर्वांनी नक्कीच लक्षात घेण्यासारखा आहे.

काळानुसार अद्ययावत होण्याची, चंगळवादापेक्षा कर्तव्याने मानवी आणि निसर्गजीवन फुलवण्याची गरज आहे. मात्र सत्तेच्या आणि सत्तालोलूपांच्या हातचे माकड बनण्याचे जर भारतीयांनी ठरवले तर हिंदुस्थानातील संस्कृतीचे तोंडी गुणगान गाऊन काही बुद्धिमान माकड बनता येणार नाही. कारण तुम्ही माकड असाल तरी तुमचा मदारी मात्र बुद्धिमान माणूस नसेल तो सत्तालोलूप, राजकारण करणारा, सत्तेसाठी हिंस्त्र होणारा, उद्योगाला उद्याच्या फायद्यासाठी वापरणारा, भांडवली मदार सांभाळणारा दशमुखी रावणापेक्षा अधिक अहंकारी असू शकेल. आपलाच धर्म सर्वांपेक्षा श्रेष्ठ असल्याने त्यापुढे सर्वांनी मान तुकवावी असे फतवे काढणाराही असू शकेल. ज्याला सहजीवनाने देश फुलवण्याचे, माणसे जोडण्याचे तंत्र अनावश्यक वाटत असेल... असे हे तीन माकडांच्या उद्याच्या गोष्टीतील सहावे माकड कसे असेल ते प्रत्येकाने ठरवले पाहिजे.  शिक्षणाचा, साक्षरतेचा वापर करीत तारतम्याने 'स्व'ला अद्ययावत करण्याचे आणि कालानुरूप सक्षम बनवण्याचे ध्येय जर या सर्व माकडांच्या अंगी बाणवले नाही, तर सहाव्या माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखे होईल, यात शंका नाही. त्यातून काय काय पेटले जाईल, ते मात्र अंदाजितही करता येणार नाही, हे नक्की!


- रवींद्र यशवंत बिवलकर


सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

 तीन माकडांची सध्याची गोष्ट (भाग ३)


किंबहुना याच सध्याच्या माकडचाळ्यांद्वारे मिजारू, किकाजारू आणि इवाजारू यांना आंजारू- गोंजारू - बाजारू अशी नवीन नामाभिधाने प्राप्त झाली तर नवल वाटण्याचे कारण नाही. शिजारू हे माकड तर आता चांगलेच पिसाळल्यासारखे वागू लागले आहे तर हातात भांडे घेऊन आवश्यकतेपेक्षा अधिक खाऊ नका असे सांगणारे पाचवे माकड नेमके उलट करू लागले आहे.


मिजारू, किकाजारू आणि इवाजारू ही तीन बुद्धिमान माकडे सध्या मात्र केवळ मूर्त स्वरूपात बद्ध झाली आहेत. थोडक्यात या माकडांनी दिलेल्या संदेशाला केवळ मूर्तीतच बद्ध करण्यात समाजधुरिण यशस्वी झाले आहेत. या माकडांनी दिलेल्या बुद्धिमान संदेशाला आम्ही केवळ कागदावरच जखडून टाकले आहे. यामुळेच मानवाचा वंशज म्हणूनही माकडाकडे पाहाण्याचे धारिष्ट्य माणसाला होऊ शकणार नाही वा आम्ही माणसाचे वंशज आहोत, असे सांगण्याचे धैर्यही माकडांना राहाणार नाही. यामधील जे योग्य वाटते ते मानले तरी माकडाची सध्याची गोष्ट पार बदलून गेलेली आहे.

तीन बुद्धिमान अशा या माकडांना जपानमध्ये स्थान मानाचे असले तरी आता भारतात त्यांचा अर्थ बदलला आहे. चंगळवाद, जीवघेण्या रॅट - रेस, आत्यंतिक शहरीकरणाचे परिणाम, शालेय जीवनापासून द्याव्या लागणाऱ्या अनाठायी स्पर्धांमुळे होणारा मानसिक ताणतणाव यामुळे या माकडांचा संदेश बदलला आहे. बौद्ध भिख्खूंनी वा त्यांनी दिलेल्या सशक्त संदेशालाही आम्ही विसरलो आहोत. त्यामुळे सध्या माकडांच्या कृतीतून मिळणाऱ्या संदेशाचा अर्थ बदलून गेला आहे वा आम्ही माणसांनी पार बदलला आहे.

मिजारू, किकाजारू आणि इवाजारू यांच्या मते आता त्यांनी दर्शवलेली हस्तकृती कायम आहे फक्त त्यांचे संदेश बदलले आहे.  मिजारू म्हणजे दोन्ही हाताने आपले डोळे झाकून घेणारे माकड आहे. तर किकाजारू हे माकड दोन्ही हाताने आपले कान झाकून घेते, इवाजारू हे दोन्ही हाताने आपले तोंड बंद करत असते. 

यात मिजारू आपले दोन्ही डोळे हाताने झाकून घेत सांगते की, डोळे असून पाहायचे नाही. चांगले असो वा वाईट काहीच पाहायचे नाही.

किकाजारू दोन्ही हाताने आपले कान बंद करीत सांगते की, कान असून ऐकायचे नाही. चांगले असो की वाईट ऐकायची गरज नाही.

इवाजारू आपले दोन्ही हात तोंडावर ठेवून सांगते, की तोंड असून बोलावयचे नाही. चांगले वा वाईट काहीच बोलावयाचे नाही.

सध्या गांधीजींच्या या तीन माकडांची अवस्था यामुळेच बिकट झाली आहे. माकडच काय पण माणसालाही सुखी जीवनासाठी याच प्रकारच्या माकडकृतीचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे सरकार असो, प्रशासन असो, पोलीस असो, वाहतूक पोलीस असो, महापालिका- नगरपालिका आदी स्वराज्य संस्था असोत वा ग्रामपंचायतींपासून संसदेपर्यंतचा लोकप्रतिनिधी, पक्ष, कार्यकर्ता यांच्यासंबंधात बोलणाऱ्यांना सुखी जीवनाचा मूलमंत्र पाळण्यासाठी 'सध्याच्या' या 'तीन बुद्धिमान माकडांचा' सहारा घ्यावा लागत आहे. किंबहुना याच सध्याच्या माकडचाळ्यांद्वारे मिजारू, किकाजारू आणि इवाजारू यांना आंजारू- गोंजारू - बाजारू अशी नवीन नामाभिधाने प्राप्त झाली तर नवल वाटण्याचे कारण नाही. शिजारू हे माकड तर आता चांगलेच पिसाळल्यासारखे वागू लागले आहे तर हातात भांडे घेऊन आवश्यकतेपेक्षा अधिक खाऊ नका असे सांगणारे पाचवे माकड नेमके उलट करू लागले आहे. कदाचित सध्याच्या  तीन माकडांची सध्याची गोष्ट आता पाच माकडांपर्यंत अशा ‘विकसित’ स्वरूपात जाऊ लागल्याने सारासार विचार मात्र संपुष्टात आल्यासारखाच झाला आहे, हेच सारसत्त्व दिसू लागले आहे.


- रवींद्र यशवंत बिवलकर




ग्रंथसेवेत ८० व्या वर्षात पदार्पण

‘बलवन्त पुस्तक भाण्डार’ची अथक वाटचाल

आजच्या मराठी दिनाच्या निमित्ताने गिरगावातील ‘बलवन्त पुस्तक भाण्डार’च्या अथक वाटचालीचा घेतलेला छोटासा आढावा. आजची मराठी दिनाच्या दिवशी असणारी मराठी भाषा, साहित्य यांची अवस्था आपणा सर्वांपुढे असतानाच त्या मराठी दिनाविषयी 'दीन'पणे शुभेच्छा देणाऱ्या मराठी जनांच्या माहितीसाठी हा आढावा सादर करीत आहे.

ग्रंथ हेच गुरू असे म्हटले जाते, पण आज दुर्दैवाने पुस्तकांसाठी वाचक शोधावे लागत असल्याची स्थिती आहे. पुण्याच्या एका प्रकाशकाने चर्चेच्या ओघात खूपच विदारक सत्य सांगितले. त्यांचे ग्रंथालयही असून तेथे काय किंवा पुस्तक दुकानांमधूनही काय आता पुस्तक खरेदीसाठी वा पुस्तके वाचनासाठी असणारी पुणेकरांची रीघ- रांग आता नाहिशी झाली आहे. कदाचित यात काहीसे अतिवास्तव असेले तरी दुर्दैवाने ते खरे आहे. अशाही स्थितीत प्रकाशन आणि विक्री या दोन्ही घटकांना एका मिशनसारखे जपणारी माणसंही मराठी आहेत. काही का होईना पण तग धरून टिकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. विशेष करून एकेकाळी प्रसिद्ध पुस्तकांना प्रकाशित केलेल्या, नामांकित लेखक आणि कलावंतांनी गाजवलेल्या नाटकांच्या - संगीत नाटकांच्या पुस्तकांना लोकांप्रत नेणाऱ्या अशा मुंबईतील मराठमोळ्या, सुसंस्कृत अशा गिरगावातील 'बलवंत पुस्तक भांडार' या संस्थेने अलीकडेच ७९ व्या वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. गुरुवार दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी गिरगावात 'बलवंत पुस्तक भांडार' या प्रकाशक संस्थेने ८० व्या वर्षात पदार्पण केले आहे. आजही त्यांची पुस्तक विक्री त्यांनी चालू ठेवलेली आहे. अर्थात आजची त्यांची पुस्तके नाटकांची नाहीत. धार्मिक आहेत, हिंदु सण व व्रते यावर असणारी पुस्तकेही परंपरा, रिती, तसेच संस्कारादी माहितींना सादर करणारी असतात.

स्वातंत्र्यवीर सावरकर, कै. गणेशशास्त्री फाटक, गो. ब. देवल, न. चिं. केळकर, भा. वि. वरेरकर, य. ना. टिपणीस, स. अ. शुक्ल, प्रबोधनकार ठाकरे आदी अनेक नामवंत व्यक्ती, लेखक यांची पुस्तके ‘बलवन्त पुस्तक भाण्डार’ने प्रकाशित केली होती. सध्या ‘बलवन्त पुस्तक भाण्डार’चा व्याप मकरंद परचुरे हे पाहात असून त्यांचे वडील श्री. बापू परचुरे यांनी या आधी समर्थपणे ‘बलवन्त पुस्तक भाण्डार’ सांभाळले होते. त्यांनीही वयाची ९० पूर्ण केली आहे. एकंदर परचुरे कुटुंबीयांची ही ग्रंथसेवा ही नक्कीच मोलाची अशीच आहे.

- रवींद्र यशवंत बिवलकर

----------------------------


*** अरविंद परचुरे यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी शब्दांकित केलेला या प्रकाशन आणि प्रकाशक कुटुंबाबद्दलचा माहिती देणारा लेख नक्कीच वाचनीय आणि मननीय आहे.  ***


माधव त्रिंबक परचुरे - एक मराठी पुस्तक विक्रेते व प्रकाशक


बलवन्त... च्या एका धार्मिक
पुस्तकाचे मुखपृष्ठ
माधव त्रिंबक उर्फ बापू यांचे एक काका श्री. बलवन्त विष्णु परचुरे उर्फ नाना यांनी इ.स. १९०१ च्या सुमारास भागीदारीत परचुरे
पुराणिक आणि मंडळी या नावाने माधवबागेत पुस्तक व्यवसाय सुरू केला. नंतर नानांचे धाकटे बंधु श्री. त्रिंबक विष्णु उर्फ अण्णा वयाच्या १४व्या वर्षापासून आपल्या मोठ्या भावाला व्यवसायात मदत करू लागले. त्यामागून काही वर्षांनी नानांचे एक पुतणे, गजानन पांडुरंग (दादा) धंद्यात मदतीला आले. २३ फेब्रुवारी १९४४ ला नानांनी परचुरे पुराणिक या दुकानातील आपला भाग काढून घेतला व अण्णा आणि दादांच्या मदतीने गिरगावात 'बलवन्त पुस्तक भाण्डार' या नावाने पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. काही काळाने गजानन पांडुरंग (दादा) या व्यवसायातून वेगळे झाले व त्यांनी 'ग. पां. परचुरे प्रकाशन' ही संस्था सुरू केली. तेव्हापासून श्री. अण्णा स्वतंत्रपणे 'बलवन्त पुस्तक भाण्डार'चा व्यवहार बघू लागले. त्यावेळी अण्णांनी प्रकाशन व्यवसायही सुरू केला.

१९४६-४७ च्या दरम्यान शालेय शिक्षण चालू आतानाच वयाच्या १५ व्या वर्षीच श्री. माधव त्रिंबक उर्फ बापू आपल्या वडिलांना-अण्णांना व्यवसायात मदत करू लागले. श्री. अण्णांनी बापूंना बरोबर घेऊन वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत म्हणजे सुमारे ६० वर्षे व्यवसायाची जबाबदारी सांभाळली.
आजच्या रेडीमेड युगात स्पर्धेमुळे नैराश्य वाढले. धकाधकी व धावपळीच्या जीवनात भविष्य, तोडगे, स्तोत्रे, मंत्र, अध्यात्माकडे लोक
मन:शांतीकरिता वळू लागले म्हणून त्या संबंधित विषयावरील पुस्तके प्रकाशित करण्यावर बापू भर देऊ लागले. १९६८ साली त्यांनी 'मयुरेश प्रकाशन' ही संस्था सुरू केली. बापूंच्या दुकानामध्ये धार्मिक, आध्यात्मिक, संगीत, नाट्य, योग व ज्योतिष या विषयांवरील पुस्तके उपलब्ध असतात, वधुवर पत्रिकामेलन, कुंडलीरहस्यदर्पण या विषयींच्या पुस्तकांना विशेष मागणी असते.

जवळ जवळ ६५ वर्षे बापूंनी 'बलवन्त पुस्तक भाण्डार'ची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यांचे चिरंजीव श्री. मकरंद माधव उर्फराजू हे १९७४ पासून शिक्षण सांभाळून आपल्या वडिलांना धंद्यात मदत करीत आहेत. व्यवसाय सांभाळून ते बी. कॉम झाले. बापूंच्या दोन्ही डोळ्यांवर काचबिंदूची शस्त्रक्रिया झाली आहे. तरीही सुमारे १५ वर्षे म्हणजे वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत ते गिरगावातल्या दुकानात दादरहून नियमित जात असत. पुस्तके आणि ग्राहक यांच्यावरील प्रेमामुळे लहानपणापासून पुस्तकात रमलेले त्यांचे मन पुस्तकाविना रमत नाही. पुस्तकात गुंतवलेले पैसे हे सोन्यात गुंतवण्यासारखच आहेत असे त्यांचे मत. श्री. बापूंचे शिक्षण विशेष झालेले नव्हते तरीपण पुस्तक व्यवसाय या विषयात त्यांनी पी. एचडी केली आहे, म्हटल्यास वावगे ठरू नये, असे त्यांची भावजय सौ. ज्योत्स्ना अरविंद परचुरे या अभिमानाने सांगतात. बलवन्त पुस्तक भाण्डारची धुरा आज बापूंचा मुलगा श्री. मकरंद (राजू), तिसरी पिढी, समर्थपणे सांभाळत आहे. 

----


रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

 गांधीजींच्या तीन माकडांची गोष्ट ( भाग २)


गांधींना चीनचे एक प्रतिनिधी मंडळ भारतात आले असताना भेटले व त्यावेळी त्यांनी या तीन माकडांच्या प्रतिकृती त्यांना भेटीदाखल दिल्या होत्या. गांधीजी त्यांना नेहमी आपल्या जवळही ठेवीत असत. ही तीन माकडे ही शहाणी माकडे असल्याचे मानले जाते. जी अधिक प्रसिद्ध पावली आहेत मात्र आतापर्यंत एकंदर ६ माकडांचा उल्लेख  केला जातो. त्यात चौथे माकड शिजारू नावाचे असून  पाच आणि ६ क्रमांकाची माकडेही आहेत मात्र ती बनावट असल्याचे मानले जाते.


भारतात तीन माकडांचे पुन्हा आगमन झाले तेही स्वातंत्र्यपूर्व काळात. १९३३ मध्ये. साबरमतीच्या आश्रमात एक जपानी भिख्खूने भेट दिली.  तेव्हा त्यांनी गांधीजींना तेथे ही तीन माकडे भेट दिली. एका बातमीनुसार ती माकडे बापू, केतन आणि बंदर अशा नावाने ती तीन माकडे भारतात प्रसिद्ध पावली होती. गांधीजींना भेट दिलेली ही तीनही माकडे चिनी मातीच्या द्वारे तयार केलेल्या मूर्तीमध्ये भेट दिलेली होती. अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनाही त्यांच्या भारतभेटीमध्ये या माकडांची प्रतिकृती भेट दिली होती. गांधीजींना दिलेली ती तीन माकडे आता दिल्लीत राजघाटावरील गांधी संग्रहालयात ठेवलेली आहेत.

अन्य एका दाव्यानुसार गांधींना चीनचे एक प्रतिनिधी मंडळ भारतात आले असताना भेटले व त्यावेळी त्यांनी या तीन माकडांच्या प्रतिकृती त्यांना भेटीदाखल दिल्या होत्या. गांधीजी त्यांना नेहमी आपल्या जवळही ठेवीत असत. ही तीन माकडे ही शहाणी माकडे असल्याचे मानले जाते. जी अधिक प्रसिद्ध पावली आहेत मात्र आतापर्यंत एकंदर ६ माकडांचा उल्लेख  केला जातो. त्यात चौथे माकड शिजारू नावाचे असून  पाच आणि ६ क्रमांकाची माकडेही आहेत मात्र ती बनावट असल्याचे मानले जाते. तीन माकडांना संरक्षणाचे प्रतीक म्हणून घरांमध्ये, दुकानांमध्ये ठेवले जाते.  मिजारू, किकाजारू आणि इवाजारू या तीन माकडांनंतर येणारे शिजारू हे माकडे वाईट करू नये वाईट विचार करू नये, असे सांगणारे आहे.  ते आपल्या गुप्तांगावर हात ठेवून आहे. हा संदेश देणारे आहे. ही पाच माकडे तशी शहाणी आहेत. पाचवे माकड हे दोन्ही हातामध्ये भांडे पकडून आहे आणि ते आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊ नका असे सांगणारे असावे. सहावे माकड मात्र नेमके काही मूर्त स्वरूपात दिसत नाही.

या पहिल्या तीन माकडाना जपानमधील शिंटो संप्रदायात मोठे मानाचे स्थान आहे. काहींच्या मते कन्फ्युशियस या तत्त्ववेत्त्याने या माकडांचा शोध लावला व आठव्या शतकात चीनहून जपानमध्ये ही माकडे पोहोचली. युनेस्कोनेही वर्ल्ड हेरिटेजमध्ये त्यांना स्थान दिले आहे.

आज भारतात गांधींच्या या माकडांची अवस्था मात्र नक्कीच बिकट झालेली आहे. आदर्शवत अशा विविध बाबींना धाब्यावर बसवण्याची कला भारतातील राजकारणात असलेल्या आणि नसलेल्यांनीही सादर केली आहे. त्यामुळेच या सध्याच्या दिवसांमध्ये माकडांनी उच्छाद मांडला आहे की माणसांनी ते मात्र तमाम भारतवासींनीच ठरवायचे आहे.


- रवींद्र यशवंत बिवलकर


तीन माकडांची आधीची गोष्ट - (भाग १)


माणसामध्ये चांगले आणि वाईट गुण असे दोन्ही  घटक असतात. गुणावगुणांनीच माणूस बनलेलाल दिसतो. यामुळे आपण यातून चांगल्या गुणांचे शिक्षण घ्यावे वा चांगले गुण आत्मसात करावे, यामुळेच काय बघू नका तर वाईट बघू नका, काय ऐकू नका तर वाईट गोष्टी ऐकू नका, काय बोलू नका तर वाईट बोलू नका, असे उपदेशच या तीन माकडांमधून मिळतात.

माकड हा म्हणे मानवाचा वंशज आहे. डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले; ते काही असले तरी माकडाचा आणि माणसाचा संबंध असल्याचे त्याने दाखवले होते. अशा या माकडाची आधीची गोष्ट नेमकी काय होती याचे औत्सुक्य खरे म्हणजे सर्वांना असले पाहिजे. शेवटी आपला तो पूर्वज नव्हे का?...

भारतात तीन माकडांची एक प्राक्कथा प्रसिद्ध आहे. या तीन माकडांची उत्पत्तीही भारतातच झाली आहे, असेही एक म्हणणे आहे. त्यासाठी बौद्ध धर्माच्या भिख्खुंच्या कथनाचा आधार घेतला जातो. असे म्हणतात की, आठव्या शताब्दीच्या दरम्यान, एका बौद्ध भिख्खूने वाईट बघू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका अशी शिकवण चीनमध्ये आणली. वाईट गोष्टींबद्दल असणारी ही म्हण, जपानमध्ये मिजारू, किकाजारू आणि इवाजारू या स्वरूपात प्रसिद्ध पावली.

या मिजारू म्हणजे दोन्ही हाताने आपले डोळे झाकून घेणारे माकड आहे. तर किकाजारू हे माकड दोन्ही हाताने आपले कान झाकून घेते, इवाजारू हे दोन्ही हाताने आपले तोंड बंद करत असते. या अशा तीन प्रकारच्या माकडांच्या स्वरूपातून मिळणारा संदेश हा मोठा आहे.  ही तीनही माकडे बुद्धिमान आहेत. लहानपणापासून दिल्या जाणाऱ्या या माकडांच्या प्रतिकृतींमधील शिकवणुकीतून अनेकांचे जीवन साकारले आहे, हे खरे.

प्रत्येक माणसामध्ये चांगले आणि वाईट गुण असे दोन्ही  घटक असतात. गुणावगुणांनीच माणूस बनलेलाल दिसतो. यामुळे आपण यातून चांगल्या गुणांचे शिक्षण घ्यावे वा चांगले गुण आत्मसात करावे, यामुळेच काय बघू नका तर वाईट बघू नका, काय ऐकू नका तर वाईट गोष्टी ऐकू नका, काय बोलू नका तर वाईट बोलू नका, असे उपदेशच या तीन माकडांमधून मिळतात.

माकडांना दिलेली ही तीनही नावे जपानी भाषेतील आहेत. आता तरीही ही माकडे नेमकी कुठली आहेत भारतातील, चीनमधील की जपानमधील?  याबद्दल तीन मते व्यक्त केली जातात.

एका मतानुसार ही तीन माकडांची उत्पत्ती जपानमघील आहे. जपानमधील निक्को नावाच्या छोट्याशा गावातील तोशोगू उद्यानात लाकडात कोरलेली ही माकडे आहेत. जपानमधील कोशिन कालातही या माकडांच्या शिल्पांना साकारले गेले होते.  त्यांना संरक्षणाचे प्रतीक मानले जाई.

दुसऱ्या मतानुसार आठव्या शतकात एक जपानी बौद्ध तेंदाई शाळेशी संबंधित होता त्याला चीनमधील तान्ताई शाळेमध्ये बौद्ध धर्माच्या शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. त्याने या तीन माकडांद्वारे दिलेल्या संदेशाला तेथूनच आत्मसात केले आणि त्या संदेशाला माकडांच्या प्रतीकात त्याने साकारले  होते. जी आता माकडांची प्रतीके सर्व जगात पोहोचलेली आहेत

तिसऱ्या मतानुसार या माकडांची वा त्यांच्या संबंधातील प्रतीकात्मकतेची उत्पत्ती ही मूळ भारतातील आहे. ओशो रजनीश यांच्या दाव्यानुसार ही प्रतीकात्मक शिकवण आशियात बौद्ध भिख्खूंद्वारे प्रसारित केली गेली होती. त्यांची उत्पत्ती ही बौद्धकाळात झाली होती.

उत्पत्तीसंबंधात काही वाद असले तरी त्यातून मिळणारा  संदेश हा मात्र नक्कीच मोलाचा होता. पण त्याहीपेक्षा तो कालानुरूप आणि माणसागणिक बदलणाराही होता. किंबहुना त्यात माकडांबरोबरच माणसांची भरही पडली आहे. तुमचा त्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोनही बदलला जाऊ शकतो. यामुळेच या तीन माकडांची ही आधीची गोष्ट जितकी माहितीपूर्ण ठरू शकते, तितकीच नंतरच्याही गोष्टीत त्यात मोलाची भर पडणार आहे.


- रवींद्र यशवंत बिवलकर


बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

स्मरण

भावनेला आवाहन करणारे क्रांतिशाहीर कवि गोविंद

स्वातंत्र्यकवि गोविंद यांच्या कवितांनी त्यावेळचा काळ भारून गेला होता. स्वातंत्र्यासाठी तरुणांमध्ये चैतन्य आणण्याचे काम त्यांच्या कवितांनी केले होते. आज नवीन पिढीला आणि विशेष करून साहित्यक्षेत्रातील व्यक्ती साहित्याभ्यासक यांनी कवि गोविंद यांच्या कवितांचा अभ्यास करून नवीन पिढीपर्यंत त्यावेळी असणारी स्वातंत्र्यासाठीची ललकारी,
वास्तव, समाजस्थितीचे भान आणून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यापीठाने त्यांच्या कविता अभ्यासक्रमात लावायला हव्यात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीमध्ये खरे म्हणजे त्यांचा यथोचित सन्मान व्हायला हवा. समाजातील एका तळागाळातील व्यक्तीने काव्यक्षेत्रात दाखवलेली प्रतिभा स्वातंत्र्यानंतरच्या या काळातही पोहोचविण्याची आवश्यकता आहे. ९ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन त्यानिमित्ताने क्रांतिशाहीर गोविंद यांना ही आदरांजली...

------

स्वातंत्र्यकवि गोविंद यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सहवासात येताच एक महत्त्वपूर्ण अशी भूमिका निभावली. आपल्या काव्यप्रतिभेला त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या काव्यामधून साकारले त्यातून त्यांची काव्यप्रतिभा तर दिसतेच पण त्याबरोबरच त्यांच्या  काव्यातील जाज्ज्वल्य देशभक्ती, स्वातंत्र्याची दिलेली ललकारी याचे दर्शन घडते.  


स्वातंत्र्यकवि गोविंद या क्रांतिशाहिराचे पूर्ण नाव होते गोविंद त्र्यंबक तथा आबा दरेकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सहवासातील, अभिनव भारत संघटनेचे सदस्य असणारे स्वातंत्र्यकवि गोविंद यांच्या कवितांनी त्यावेळचा काळ भारून गेला होता. स्वातंत्र्यासाठी तरुणांमध्ये चैतन्य आणण्याचे काम त्यांच्या कवितांनी केले होते. आज नवीन पिढीला आणि विशेष करून साहित्यक्षेत्रातील व्यक्ती साहित्याभ्यासक यांनी कवि गोविंद यांच्या कवितांचा अभ्यास करून नवीन पिढीपर्यंत त्यावेळी असमारी स्वातंत्र्यासाठीची ललकारी, वास्तव, समाजस्थितीचे भान आणून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यापीठाने त्यांच्या कविता अभ्यासक्रमात लावायला हव्यात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीमध्ये खरे म्हणजे त्यांचा यथोचित सन्मान व्हायला हवा. समाजातील एका तळागाळातील व्यक्तीने काव्यक्षेत्रात दाखवलेली प्रतिभा स्वातंत्र्यानंतरच्या या काळातही पोहोचविण्याची आवश्यकता आहे.

आज कवि गोविंद यांचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म ९ फेब्रुवारी १८७४ तर त्यांचे निधन २८ फेब्रुवारी १९२६ रोजी झाले. कवी गोविंद याना बालपणी आलेल्या भयंकर तापामुळे त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले व ते कायमचे पांगळे झाले. सुरुवातीच्या काळात शृंगारिक लावण्यांची रचना करणाऱ्या या कवीस सावरकर बंधूंचा परिसस्पर्श लाभला व ते देशभक्तीपर पोवाडे व राजकीय चळवळीला उपयुक्त अशा कविता करू लागले. त्याकाळी लोकजागृतीसाठी गणेशोत्सव, शिवजयंती इ. उत्सवात मेळ्याचा कार्यक्रम होत असे. या मेळ्याच्या ठिकाणी व अन्य प्रसंगी सावरकर बंधू तसेच गुरुजींसारखे अन्य अभिनव भारताचे सदस्य त्यांना पाठीवर बसवून घेऊन जात. हळूहळू त्यांचे काव्य संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होऊ लागले. जनतेच्या मनात ब्रिटिश सत्तेविरूध्द रोष निर्माण होऊ लागला. त्यांच्या क्रांतिकारी कविता वाचून तरूणांची मने पेटून उठली. तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन त्यांच्या कविता मुखोद््गत होऊ लागल्या. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले.... या त्यांच्या ओळीने त्या काळातील तरुणांच्या अंगी जोश निर्माण केला गेला. ब्रिटिशविरोधात उभे राहाण्याची ताकद या प्रकारच्या कवितांमुळे मिळाली. 

लोकमान्य टिळक मंडाले (ब्रह्मदेश- म्यानमार) येथे तर सावरकर बंधू अंदमानच्या कारागृहात शिक्षा भोगत असतांना नासिकच्या 'अभिनव भारत' शाखेचे, शरीराने पंगू असलेल्या कवी गोविंदांनी खंबीरपणे नेतृत्व केले व तुरुंगात खितपत पडलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबियांना धीर देऊन सर्वतोपरी मदत केली. 

१९२३ ते १९२६ या तीन वर्षात गोविंदांचे आजारपण वाढत गेले त्यावेळी महाबळ गुरुजी व त्यांचे अन्य काही सहकारी यांनी त्यांचे औषधोपचार व अन्य सर्व प्रकारच्या सेवा केल्या. शारीरिक वेदना वाढत गेल्या. हातांनी लिहिणे अशक्य झाले तेव्हा आपली पत्रे व नवीन काव्य गोविंद कवी महाबळ गुरुजींना सांगत व गुरुजी ते लिहून घेत. अत्यवस्थ स्थिती झाली असता 'माइ काव्य संग्रहाची व्यवस्था तुम्ही करा. माझी जप्त झालेली चार पुस्तके आहेत त्यावरील बंधने दूर झाल्यावर तुम्ही त्या सर्व कविता पुस्तक रुपाने प्रसिध्द करा व त्याचे उत्पन्न यशवंत व्यायाम शाळेला द्या असे व्यवस्थापत्र कवी गोविदांनी करून ठेवले. (१९१७ साली गुरुजींनी नासिकला यशवंत व्यायाम शाळेची स्थापना केली. व्यायाम प्रचार व प्रसार करणारी शतक महोत्सव साजरा करणारी ही संस्था आज महाराष्ट्रातील एक अग्रगण्य व्यायाम संस्था आहे.)

मृत्यू समोर दिसू लागला तरी त्यांची काव्यप्रतिमा किंचितही कमी झाली नव्हती. मृत्यूपूर्वी १५ दिवस आधी 'सुंदर मी होणार, आता मरणाने मी जगणार, हासत मरणे गोविंदाचा प्रेमपंथ ठरणार' हे गोविंदांचे अमरकाव्य महाबळ गुरुजींनी लिहून घेतले. 'गोविंदाचे करुणागान' ही कविता मृत्यूपूर्वी दोन दिवस आधी गुरुजींनी लिहून घेतली. मरणापूर्वी आठतास आधी गुरुजींना ते क्षीण स्वरात म्हणाले ‘आता मला जास्त सांगवत नाही. करुणागान कवितेत 'देवा नमने तुज सहस्त्रदा । सहस्त्रदा । सर्वदा' असा शेवटच्या ओळीत बदल कर. २८ फेब्रुवारी १९२६ या दिवशी त्यांची जीवनसमाप्ती झाली. महाबळ गुरुजींनी त्यांचे अंत्यसंस्कार केले. स्मशानात 'सुंदर मी होणार' ही कविता म्हणतांना गुरुजींना शोक अनावर झाला. संध्याकाळी गोदावरी काठावरील श्री यशवंतराव महाराज पटांगणावर शोकसभा झाली. त्यांच्या दहाव्या दिवशी अनेक थोर मंडळी जमली होती. त्या सभेत गोविंद कवींचे मोठे स्मारक करावे, पेशवे वाड्यापुढे (सराफ बाजारातील सरकार वाडा) त्यांचा पुतळा उभारावा वगैरे योजना मांडल्या गेल्या. निधीचे आकडे जाहीर झाले. पण नंतरच्या काळात हे सर्व विचार हवेत विसरून गेले.

स्वातंत्र्य लढ्यातील आपल्या मित्राची इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने गोविंदांचे मिळेल ते काव्य एकत्र करून ते छापण्याचे गुरुजींनी ठरवले. त्यासाठी 'गोविंद काव्य प्रकाशन मंडळ' स्थापण्यात आले. त्यात महाबळ गुरुजींबरोबर डॉ. ना. दा. सावरकर, वैद्यभूषण वामनशास्त्री दातार, डॉ. वि. म. भट व श्री. र. वर्तक वकील हे सहकारी होते.

गोविंद कवींच्या तिथीप्रमाणे चतुर्थ स्मृती दिनी दि. १५/३/१९३० रोजी त्यांच्या सरकारने जप्त न केलेल्या कवितांचा काव्यसंग्रह महाबळ गुरुजींनी प्रकाशित केला. कवी गोविंदांना महाराष्ट्र विसरला नाही म्हणून की काय पहिली आवृत्ती संपून १५/२/१९३१ रोजी दुसरी आवृत्ती गुरुजींनी प्रकाशित केली. कवी गोविंदांची 'गोविंद गीते' बनारस विश्वविद्यालयाने (मराठी विभाग) त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली होती. मुंबई व नागपूर विद्यापीठाने गोविंदांच्या कविता एम. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या होत्या. त्यांची 'सरस्वतीची भूपाळी' महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा मंडळाने (जुनी ११ वी) मराठीच्या क्रमिक पुस्तकात समाविष्ट केली होती. १९२८ मध्ये लोकनायक मा. श्री. अणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्वाल्हेर येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या प्रारंभी कवी गोविंदांची 'सरस्वतीची भूपाळी' महाबळ गुरुजींनी गायली होती. १९४२ मधे नासिक येथील आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात ही भूपाळी जुन्या पिढीतील प्रसिध्द गायक पंडितराव नगरकर यांनी सादर केली होती.

त्यानंतरच्या काळात अभिनव भारत सदस्यांच्या प्रयत्नांमुळे कवी गोविंदांच्या लघु अभिनव मालेतील ६ वे ७ वे पुस्तक बंधमुक्त झाले. त्यावेळी दुसरे महायुध्द सुरू होते. महागाई व कागद टंचाई या सारख्या अडचणींना गुरुजींना सामोरे जावे लागले. तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनापूर्वी असा विचार झाला की या कवितांचा कालानुक्रम तसेच त्यांचा संदर्भ व कवीची भूमिका काय होती याचा शोध घ्यावा. त्यावेळी बाबाराव सावरकर सांगली येथे खूप आजारी होते. महाबळ गुरुजींनी सांगलीला जाऊन बाबारावांची भेट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार २२/८/१९४३ रोजी गुरुजींनी तिसरी आवृत्ती प्रकाशित केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या मंत्रीमंडळाने गोविंद कवींचे लघु अभिनव मालेतील ३रे, ८ वे व ९ वे पुष्प व अन्य साहित्य यावरील बंदी उठविली. त्यामुळे १९४७ साली विजयादशमीस ४ थी आवृत्ती महाबळ गुरुजींनी प्रकाशित केली. ही आवृत्ती म्हणजे गोविंदांची समग्र कविता होय. त्यात कोणताही बदल न करता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने गतवर्षी २६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी  ५ वी आवृत्ती जशीच्या तशी प्रकाशित केली आहे. त्यामुळे त्यावेळच्या असलेल्या शुध्द लेखनाच्या नियमांप्रमाणे ही आवृत्ती छापली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या आवृत्तीमुळे तब्बल ७५ वर्षांनी ही पाचवी आवृत्ती आणि त्यातील कविता लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

 साधारण वयाच्या १९ व्या वर्षानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहवासात कवि गोविंद आले आणि मित्रमेळ्याबरोबर त्यांची प्रतिभा ज्या पद्धतीने फुलली ती लक्षात घेण्यासारखी आणि स्वातंत्र्याचे स्फुलिंग चेतवणारी ठरली. सावरकर आणि कवि गोविंद यांच्यामध्ये प्रतिभा आणि स्फूर्ती यांच्यात असणारे सारखेपण लक्षात घेता त्यामुळेत काव्यातही ते साम्य दिसून येते. फरक होता तो दृष्टीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दृष्टी संस्कृतीकडे पाहाणारी आणि गोविंदाची दृष्टी भावनेकडे पाहाणारी असल्याने सावरकर यांची कविता सांस्कृतिक अधिक आहे तर गोविंदांची कविता भावनेला हात घालणारी आहे. नागरकाव्याबद्दल पाहाता सावरकर हे त्यांचे जणू गुरुच होते. केवळ इतकेच नव्हे तर पंगुत्वामुळे सावरकर त्यांना आपल्या खांद्यावर घेऊनही जात इतके मित्रप्रेम त्यांच्यावर सावरकर यांचे होते.  अशा या कवि गोविंदांच्या काव्याने क्रांतिकारकत्त्व स्वीकारले आणि त्यांनी त्यावेळी लोकांवर आपल्या काव्याची मोहिनीच घातली होती. 

कवि गोविंदाच्या कवितांच्या चौथ्या आवृत्तीमध्ये कृ. पां. कुळकर्णी यांनी म्हटल्याप्रमाणे गोविंदाचे काव्य हे क्रांतिकाव्य आहे. १९०० ते १९१० या दहा वर्षांच्या कालखंडात प्रत्यक्ष क्रांति त्यांनी घडवून आणली. .... त्या संबंधात समकालीन कविंच्या तुलनेत कुळकर्णी लिहितात की,  .... क्रांतिकारकत्व प्रतिपादण्याची आकांक्षा प्रत्येक कलावन्ताला असते. त्याची उरि्म केव्हांना केव्हांतरी प्रत्येक कलावन्ताला होत असतेच. सौंदर्यप्रसाधन हे कलावन्ताचे उच्च ध्येय खरें. तेच सौंदर्यप्रसाधन मानवी जीवितप्रसाधनास कारणीभूत झाले तर ते उच्चतरच होइल, तेंच सौंदर्य प्रसाधन पुनः क्रांतीचे माध्यम अथवा वाहन करून मानवी जीवित साफल्यास कारणीभूत झालें तर तेंच सौंदर्यप्रसाधन उच्चतम होईल. अशा उच्चतम सौंदर्यप्रसाधनाच्या प्रतिभेच्या अवस्थेत असतांना कोणी कवि तुतारी फुंकतो, कोणी रणशिंग वाजवितो, कोणी मुरली घुमवितो, कोणी नव्या मनूंतील नवा शिपाई होतो, कोणी रुद्रास आवाहन करतो, तर कोणी क्रांतीचा जयजयकार करतो. ह्या अवस्थेत कोणी रक्तानें काव्य लिहितो तर कोणी अंगारानें काव्यरचना करतो. आमच्या ह्या गोविंद कवीनें त्याच प्रतिभेच्या अवस्थेत 'अफजुलखानाचा पोवाडा' गायिला, ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें' असा रोकडा सवाल केला, 'भारत प्रशस्ति' केली, 'भारतस्तव' केला, 'अंगदशिष्टाई' केली, 'यमाचा दरबार ' दाखविला, कारागृहाचें भय कोणास ' असा प्रश्न केला, ‘ बोधपर पुरातन मौज ' सांगितली, ' स्वतंत्रता देवी'चे स्वरूप वर्णिलें, श्रीरामचंद्राची प्रार्थना ' केली, व ‘श्रीरामदासांची आरती केली. गोविंदांच्या ह्या काव्यांनीं तत्कालीन तरुणांचीं मनें हलवून सोडली. महाराष्ट्रातील दोन पिढ्या जाग्या केल्या. क्रांतीच्या विचारांनीं महा राष्ट्रांतील सर्व वातावरण धुंद करून सोडलें. वाड्.मयाने मर्यादित क्षेत्रांत व कालांत का होईना पण क्रांति होणे शक्य आहे, याचे उदाहरण म्हणून गोविंदांचे काव्याचा निर्देश करणे योग्य होईल.  या क्रांतिकारी कविच्या या पुस्तकाला नवीन पिढीलाही भावनेचा स्पर्श नक्कीच होऊ शकेल, त्यासाठी कवि गोविंदाचा हा भावस्पर्श अनुभवण्यासारखा आहे.

- रवींद्र यशवंत बिवलकर



फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...