रविवार, ३० जुलै, २०२३

कॅलिडोस्कोपसारखं हे सारं क्षणिक असते. सतत बदलत असते, जीवनातील रंगानुसार, सुख, दुःख अशा विविध भावभावनांचे संमिश्र असणारे हे निसर्गाचे भावविहीन तर कधी भावअंकित स्वरूप या कॅलिडोस्कोपमध्ये मिळते. हेच क्षणिक आयुष्य पण प्रत्येक क्षणाला बदलूनही नव नवे आकार दाखविणारे आणि आनंद देणारे; अनुभूती देणारे ते दृश्य भास आणि आभासात असणारे, हे निसर्गाचे रूप कॅलिडोस्कोपसारखेच आहे. आपण याच निसर्गाचे घटक असल्याने सतत बदलत राहून ते बदल स्वीकारणे आणि भविष्यात मी कोणाच्या लक्षात राहिन का याचाही विचार न करता केवळ रंगाचा, भावभावनांचा आकार घेत फिरत राहाणे इतकेच आपल्या हाती असते.  

 काळ येई काळ जाई...

काळ झपाट्याने पुढे सरकतो. जणू पॅकमॅनच्या खेळातील पॅकमॅनसारखी टिंबे गिळंकृत केली जातात, तसेच काहिसे काळाचे असते. तो पुढे सरकतो आणि पुढे सरकताना अनेक ठिकाणे, माणसे, रस्ते, घटना, इतिहास, संस्कृती, धर्म अशा अनेक घटकांना- टिंबांना तो गिळंकृत करत असतो. हीच त्या काळाची झेप असते, काळाची नीती असते. तो आपला, तो परका असे काही त्याच्यापाशी नसते. आपल्या चालीमध्ये तो वाटेत येणाऱ्या या सर्व घटकांना पोटात ढकलत असतो. पुन्हा त्या घटना परत येत नाहीत, ती माणसे पुन्हा होत नाहीत, तो इतिहास पुन्हा घडत नाही, त्या रस्त्यांचे, स्थानांचे रूपडेही संपुष्टात आलेले असते. तर अशा या काळाच्या झेपेत, त्याचा घास व्हायचे की लव्हाळे होऊन सरपटायचे ते ज्याचे त्यांनी ठरवायचे. त्यानुसार मिळणारे, वाट्यास येणारे भोगही जे चांगले किंवा वाईट... ते स्वीकारायचे असतात. नव्हे तर स्वीकारावेच लागतात. अशा या कालमहिम्याला नीट जाणून घेतले तर आपण काळाच्या गर्तेत लुप्त होणार असतोच, पण ते लुप्त होणेही आनंददायी वाटले पाहिजे.

काळ आणि त्याच्या झंझावाताबद्दल खरे म्हणजे आतापर्यंत अनेकांनी अनुभूतींद्वारे आपले मत, विचार मांडले आहेत. पण हे विचार प्रत्येकाने अनुभवलेले असतात आणि नसतातही. असे म्हणण्याचे कारण त्या अनुभूतीचा प्रत्यय तुम्ही कोणत्या दृष्टीने घेता- देता त्यावरही अभिव्यक्ती अवलंबून असते. एकंदर काळ हा असा अक्राळविक्राळ आहे. सारे काही गिळत जातो आपण तर त्याच्यादृष्टीने नगण्यच असतो. मग मी - अहं हे तर कुठल्याकुठे फेकून दिल्यासारखे घटक होतात. असे असूनही आपल्यातील मी पणा मोठा राहातो. मी हे करतो, मी ते करतो, मी ते केले ... सांगणे ठीक आहे पण प्रत्यक्षात आपण जे काही करत असतो, ते क्षणिक आहे. काही क्षणांनंतर मग ते क्षण खरोखरच क्षणाचे असतील तर काहीवेळा ते क्षण महिना, काळ, वर्ष असेही असतील, जे आपल्याला बऱ्याच काळासारखे वाटू शकतात. पण सर्व क्षणिकच आहे, ते नंतर लक्षात येते. 

आजच्या घडीला भारतीय स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेले, प्राणदान दिलेले, सर्वस्व गमावलेले अनेकजण आहेत. आजच्या घडीला देशातील कामासाठी काही ना काही काम करणारे अनेकजण आहेत. काळाच्या पटलावर देश, देव, धर्म, गट, पंथ, समाज, भाषा, संस्कृती अशा विविध घटकांसाठी, काम करणारे मोजके नेतृत्वही तयार होत असते. छोट्या छोट्या नेत्यांपासून, कार्यकर्त्यांपासून ते मोठमोठ्या नेते, राजे, महाराजे, संस्थानिक, शास्त्रज्ञ, अभ्यासक असे विविध स्तरीय व्यक्तिमत्त्व काळाच्या गर्तेत तयार झाली, आणि लोपही पावली. क्षणिकता हा निसर्ग जीवनाचा अविभाज्य भाग असतो. 

कॅलिडोस्कोपसारखं हे सारं क्षणिक असते. सतत बदलत असते, जीवनातील रंगानुसार, सुख, दुःख अशा विविध भावभावनांचे संमिश्र असणारे हे निसर्गाचे भावविहीन तर कधी भावअंकित स्वरूप या कॅलिडोस्कोपमध्ये मिळते. हेच क्षणिक आयुष्य पण प्रत्येक क्षणाला बदलूनही नव नवे आकार दाखविणारे आणि आनंद देणारे; अनुभूती देणारे ते दृश्य भास आणि आभासात असणारे, हे निसर्गाचे रूप कॅलिडोस्कोपसारखेच आहे. आपण याच निसर्गाचे घटक असल्याने सतत बदलत राहून ते बदल स्वीकारणे आणि भविष्यात मी कोणाच्या लक्षात राहिन का याचाही विचार न करता केवळ रंगाचा, भावभावनांचा आकार घेत फिरत राहाणे इतकेच आपल्या हाती असते.  प्रत्येक क्षणाला जगले ते जीवन क्षणिक असते की नाही, ते प्रत्येकाने ठरवायचे. उद्याची चिंता करत असतानाच बदल कधी होतो तेच कळत नाही आणि तो बदल का होतो, ते कळायच्या आत पुढचा बदलही सुरू झालेला असतो, यामुळेच काळ येई काळ जाई.... देव सर्वांभूता ठायी असे स्वसमज करून घेत जगावे, तेच हितकर .... त्यामुळे कसला देश, देव, धर्म, गट, पंथ इतकेच नव्हे तर कसला अहं, कोण मी, कोण आपण, कसली बायको, कसली मुलगी, कसला मुलगा, कसले माय-बाप आणि कसला गोतावळा... हे सारे उशिराने समजते.... याला अध्यात्म म्हणा, लौकिक म्हणा, पारलौकिक म्हणा वा अलौकिक म्हणा... काळचा वेग, दिशा, झोत, दृश्यमानता पकडणे अजूनही हाती आलेले नाही, हाती येणारही नाही. कारण अशाश्वतता हेच शाश्वत सत्य आहे.

- रवींद्र यशवंत बिवलकर


चिमणी पाखरं आपल्या पिल्लांना ती मोठी झाली की घरातून ढकलून देतात. यात त्या पिल्लांना मिळालेले बळ त्यांना उडायला ताकद देते पण त्याहीपेक्षा आता आपल्याला एकटंच वावरायचं आहे, याची कल्पनाही देते. त्यामुळे आपला जीवनसाथी निवडण्यासाठी ती तयार होऊ लागतात, तसा शोधही घेत असतात. त्यांच्यासारखेच असे जीवही त्यांना भेटतात हाच निसर्ग आहे. 

 नव्या पिढीचे पंख

अनेकदा नव्या आणि जुन्या पिढीतील संघर्ष, वाद वा मतभेद या नावाखाली होणारी चर्चा खरे म्हणजे माझ्यादृष्टीने विफल असते. विफल अशासाठी की, अशा प्रकारच्या चर्चेतून वादातून काही घडत नाही. वादानंतर जर दोन्ही पिढ्यांमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी स्वतःहून विचार केला आणि विचार बदलला तर वेगळे काही घडू लागते. ते वेगळे घडणे हे देखील तसे तात्कालिक असते. मुळात काळाच्या गर्तेत, कालौघात अनेक गोष्टी वाहून जातात, अनेक नामवंतही वाहून जातात, बुडून जातात. आपल्यालाच असे वाटत असते की मी सांगतो ते शाश्वत आहे. खरं म्हणजे शाश्वत काही नाही. प्रत्येक क्षणाला बदल होत असतात. शरिरात, मनात, पेशींमध्ये, विचारांमध्ये, नजरेमध्ये होणारे बदल हे स्वीकारण्याचे बळ मात्र पाहिजे. ते बळ हत्तीचे असते. तसे ते मिळाले तर तो जीव, तो माणूस प्राणी नशीबवान. बदल स्वीकारण्याची मानसिकता वा ताकद हवी. किमान सकृतदर्शनी तुम्ही ते बदल स्वीकारले असल्याचे दाखविले नाहीत, तरी चालेल पण मनाने जर ते सारे स्वीकारलेत, तर ते अधिक महत्त्वाचे. याचे कारण तुमच्या आयुष्यातील जगण्याची ती एक ऊर्जा असते. ती ऊर्जा तयार करावी लागते, तुमची तुम्हाला मिळवावी लागते. ती कोणी देऊ शकत नाही, दिली तरी तुम्ही ती घेऊ शकत नाही. त्यामुळे नव्या पिढीने काय करावे, काय करू नये, काय करत आहे आदी विचार करणे, विचारणेही सोडून देण्याचे बळ हवे. माझे वडील मला उदाहरण देताना सांगायचे की, चिमणी पाखरं आपल्या पिल्लांना ती मोठी झाली की घरातून ढकलून देतात. यात त्या पिल्लांना मिळालेले बळ त्यांना उडायला ताकद देते पण त्याहीपेक्षा आता आपल्याला एकटंच वावरायचं आहे, याची कल्पनाही देते. त्यामुळे आपला जीवनसाथी निवडण्यासाठी ती तयार होऊ लागतात, तसा शोधही घेत असतात. त्यांच्यासारखेच असे जीवही त्यांना भेटतात हाच निसर्ग आहे. 

केवळ इतकेच नव्हे तर त्यांना ढकलून देणाऱ्या त्यांच्या मायबापांनाही त्यामुळे एक मोठी जाणीव होऊ लागते. ती जाणीव म्हणजे आपण एकटेच आहोत, आपल्याला आता जगण्यासाठी स्वतःच्या क्षमतेवर जगून कमी होणाऱ्या शारिरीक ताकदीला सांभाळत, अजमावित मार्ग काढावयाचा आहे. पशू-पक्षी यांच्यातील भावभावना, संबंध आणि माणसाचे जीवन येथे यात फार मोठा फरक आहे. अनेकदा पशू-पक्षी नवीन जीव तयार करण्यासाठी सरसावतात. प्रजोत्पादन आणि आपली प्राणसृष्टी वाढवण्याचा त्यांचा नैसर्गिक मार्ग असतो. माणसाचं मात्र आता तसं राहिलेले नाही. हम दो हमारे दो हे देखील मागे राहिले गेले आहे. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हा काळही खूपच मागे गेला. आज अशी अनेक जोडपी आहेत, त्यांना पहिल्या प्रयत्नांचीही अपेक्षा वाटत नाही. त्यांना मूल काढणे हेच आता महाग वाटू लागते. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, भावनिक स्थितीमुळे मुलाला जन्माला घालून त्याला काय देतो, त्याच्यापुढे काय ताट वाढून ठेवतो, ते लक्षात घेता त्या नवजात अर्भकाला जन्माला येण्याच्या विचारापूर्वीच बाजूला ठेवले गेले जात आहे. काहींना झालेल्या मुला-मुलीला वेळ देता येत नाही म्हणून दुःख आहे. अशा या स्थितीत विद्यमान नागरी जीवनाच्या झपाट्यामध्ये जगणे हे देखील वैवाहिक, सहजीवनाचे वा वैयक्तिकतेचे सुखावह असे राहिलेले नाही. एकटेपणाची जाणीव नंतर होण्यापेक्षा सुरुवातीपासूनच भानाने स्वीकारली तर ती अधिक चांगली नाही का? 

गेल्या काही वर्षांमध्ये एकंदर सामाजिक स्थित्यंतर सर्व पातळ्यांवर झाले आहे. अर्थात त्याला अनेक कारणे आहेत, त्यामुळे नवीन पिढीला जगण्यासाठी विविध तडजोडी कराव्या लागत आहेत, त्याप्रमाणे त्या करत आहेत पण यातून स्थिरचित्त हा प्रकार जवळपास संपुष्टात आला आहे.  सर्वच गतिमान करू पाहात आहेत. राजकीय नेतृत्व असो की शास्त्रज्ञांनी लावलेले ऐहिक शोध असोत, त्यामुळे तुमचे आयुष्य विकासाच्या नावाने गतिमान करण्याचा कल वाढला आहे. या गतिमानतेच्या वेगात आपण आपला काळही कतिमान करत आहोत, जगण्याचा अनुभवही गतिमानतेने घेऊ लागलो आहोत. यामुळे जगण्याचा क्षणही झरकन सटकू लागला आहे. हे टाळायचे की नाही, ते मात्र प्रत्येकाच्या हातात आहे. मग ती पिढी नवी असो की जुनी. जगण्याची गती कशी असावी, ती आपल्याला झेपते की नाही, आपल्या आयुष्याचे नेमके गमक काय आहे, चंगळवाद मोठा, विज्ञानाच्याद्वारे तयार झालेल्या आधुनिक पण न परवडणाऱ्या सुविधा गरजेच्या की कसे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. प्रत्येकजण काही पंंतप्रधान बनू शकत नाही, त्याच्या मनातील इप्सित ध्येयही तो पूर्ण करू शकतोच असेही नाही. हे सांगण्याचे कारण इतके महत्त्वाचे आहे, की, त्यातून प्रत्येक नव्या पिढीला आपला मार्ग सुकर व सुखकर बनविणे भवितव्यासाठी गरजेचे आहे. त्यांच्या निर्णयावर देश, समाज, पिढी, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे आप्तसुहृद अशा अनेकांचे जीवन व भविष्यही अवलंबून असते. यासाठीच नव्या पिढीचे पंख गतिमानतेमध्ये सक्षम करायचे की दीर्घकालीन उपयोगासाठी सक्षम - बळकट करायचे ते त्या त्या पिढीतील प्रत्येक व्यक्तीवर आणि त्या तरुण व्यक्तीसमूहावर अवलंबून आहे. राज्यकर्ता म्हणून त्या पिढीला घडवण्याचे अधिकार दुर्दैवाने साऱ्याच पक्ष कार्यकर्ते व नेते यांनी गमावले आहेत, हे मात्र खरे.

- रवींद्र यशवंत बिवलकर

आयुष्यात प्रत्येक क्षण जगताना त्या त्या अनुभवांचे, घटकांचे, घटनांचे, कृती-अकृतींचे मूल्यमापन करण्याचा एक वेगळाच प्रयत्न द्वंद्वातून करणार आहे. मनाच्या प्रत्येक कप्प्यांमध्ये ही मानसिक स्तरावरील द्वंद्वे चालू असतात. एखादी व्यक्ती अशी का वा गते, तिचे अन्य व्यक्तीबद्दल असणारे मत तसे का असते, तिच्यात त्या दोन्ही व्यक्तींची बाजू नेमकी काय असते त्यात अपरिहार्यता कशी असते. काळाचा प्रभाव त्यामध्ये कसा पडतो, हे पाहाणे या मानसिक द्वंद्वात पाहाणे विचक्षण ठरेल, असे वाटते.

गंभीर आजाराचे गांभीर्य आणि नातेवाईकांच्या भेटी-गाठी

काही दिवसांपूर्वी  व्यक्तीच्या आजारपणामुळे विशेष करून असाध्य अशा आजारपणामुळे आजारी असलेल्या त्या व्यक्तीला पाहायला जावे असे मनात आले. खूप विचार केला तेव्हा माझ्या जाण्याने काय फरक पडेल, माझ्या जाण्याने त्यांना बरे वाटेल की त्रास होईल. भेटीने काही फरक पडेल की, केवळ गेल्याचे उपचार वा उपकार ठरतील, माझ्या जाण्याचा काही उपयोग होईल का, मी त्यापेक्षा काही अधिक मदत करू शकेन का, असे अनेक प्रश्न मनात उभे राहिले. एक प्रकारे मानसिक युद्धच सुरू झाले. यावर कधी मित्रांमध्ये तर कधी घरामध्येही चर्चा करताना ते युद्ध होते तर कधी स्वमनातील संघर्ष होता. अनेक मुद्दे त्यातून दिसून आले, निष्पन्न झाले.

आपण जाऊन भेटल्यामुळे आजारी व्यक्ती बरी होणार नाही किंवा तिला त्यामुळे मानसिक दृष्टीने तरी बरे वाटेल का, असा विचार केला तेव्हा एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचा असाध्य आजार होतो, ती झगडत असते, हे तिच्या आणि तिच्या निकटच्या व्यक्तींनाही माहिती असते. ते झगडणे सार्थक असेल असे वाटत असले तरी प्रत्यक्षात सत्य स्वीकार करण्यात मन डळमळत असते. ही बाब त्या रुग्णाची आणि त्याच्या नातेवाईकाचीही असते. अशावेळी आपण त्या रुग्ण वा आजारी व्यक्तीला भेटून काय साध्य करतो तर काही नाही. किंबहुना केवळ कर्तव्य साध्यता इतकेच त्या मागील उद्दिष्ट असते. मी जाऊन भेटलो, माझे कर्तव्य केले असे समाधान. दुसरी बाब आपण सक्षम विविध पद्धतीने विविध प्रकाराने असलो तरी त्या व्यक्तीला आपण सहाय्य काय प्रकाराने करू हे खरे म्हणजे ठरवावे आणि तसे असेल तरच त्या रुग्ण व्यक्तीप्रत वा तिच्या निकटवर्तींपर्यंत पोहोचून आपल्या भावना आणि आपली मदतीची वा सहकार्याची पुंजी त्यांच्यापुढे ठेवावी. ती स्वीकारावयाची की नाही, ते त्यांना ठरवू द्या, त्यासाठी ती पुढे करताना दबाव नको. त्यामुळे खुलेपणा स्पष्ट होईल. पण अनेकदा असे होते का, याचा विचार प्रत्येकाने करावा. खरे म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण विशेष करून नगरांच्या आत्यंतिक निर्मितीनंतर त्या पद्धतीचे नगरशैलीचे जीवन जगू लागलो आहोत. हे करताना प्रत्येकाच्या जीवनातील रॅटरेसमुळे परस्परांमधील भाव भावना मारल्या जात असल्याचे दिसत आहे. 

अनेकदा आजारी व्यक्तीला पाहायला जाणे त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही त्रासदायक होत असते. आजारी झाल्यानंतर अंथरुणावर असणाऱ्या व्यक्तीला पाहायला जावे आणि त्यामुळे कुटुंबीयांना तुमच्यासाठी मानसिक दबाव, ताणतणाव, आजार कथनाने होणारा त्रास, शारिरीक धावाधाव करावी लागणे असे घडणे हे खरे म्हणजे खूप हास्यास्पद वाटते. तुमचे रुग्णाविषयी वा आजारी व्यक्तीविषयी वाटणारे भाव अशा प्रकारे फलद्रुप होणारे असतील तर त्यामुळे त्या आजारी व्यक्ती वा कुटुंबीयांनाही त्यामुळे दिलासा मिळण्याऐवजी मनस्ताप होऊ शकतो. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये त्या आजारी व्यक्तीसाठी कुटुंबातील एक व्यक्ती स्पेअर करता येत असे, आज तसेही नाही. यासाठीच आजारी व्यक्तीला भेटायला जाणे हे कदाचित आजच्या जमान्यात उपकार केल्यासारखे अपकाराचे काम ठरू शकते. अशा या रिती-रिवाजांचा काळाप्रमाणे, जीवनशैलीप्रमाणे पुनर्विचार होणे आवश्यक आहे, असे वाटते. व्हॉट्सअप, व्हिडिओ कॉल, मोबाईल अशा समाजमाध्यमांचा वापरही या संदर्भात संपर्कासाठी केला जाऊ शकतो, नव्हे तो जरी अधिकाधिक पण आवश्यकतेनुसार संयत रूपात झाला तरी या संबंधात एक चांगले पाऊल टाकल्यासारखे होऊ शकते.

आजारी व्यक्तीचा आजार नेमका कसा आहे, कोणत्या प्रकारचा आहे, आपण त्याच्यासाठी काय मदत करू शकतो, रुग्णालयात असताना रात्रीच्यावेळी त्याच्या कुटुंबीयांचा ताण कमी करण्यासाठी रात्रसोबतीचे काम करू शकू का, हा देखील एक भाग महत्त्वाचा असतो. आपल्या हातून अशा प्रकारची मदत होणे वा त्यासाठी सर्व स्नेह्यांनी मिळून जरी काम केले तरी ते उपयुक्त आणि पैसे वाचवणारे कामही ठरू शकेल. आज सोबतीसाठी माणूस ठेवणाऱ्या संस्था आहेत, त्यामध्ये अनेकदा रुग्णाला पूर्ण उपचारात्मक सहकार्य करायची गरज असते तेव्हा नर्ससारखे काम करावे लागते पण ते करावे लागणार नसते विशेष करून अतिदक्षता विभागात असताना कुटुंबामधील व्यक्तीला केवळ बाहेर थांबावे लागते, परिचारकासारखे काम नसते अशा वेळी रुग्णांसाठी अतिदक्षता विभागाबाहेर थांबणे अनेक अंशी गरजेचे असते, अशावेळी त्याच्या कुटुंबीयांवरील ताण कमी करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईंनी, मित्रानी सहकार्य केल्यास खरे म्हणजे मोलाची मानवसेवाच ठरू शकेल.

- रवींद्र यशवंत बिवलकर

बुधवार, १२ जुलै, २०२३

  निमित्तमात्र   

चंगळवादाचे बंड 

व्यक्तिस्वातंत्र्याच्या तलम बुरख्याला पांघरलेल्या समाजाला चंगळवादाच्या कोषातून बाहेर पडण्याची इच्छाच होत नाही तरीही त्यातल्या त्यात कथित सनातनी चादर ओढून घेत विकासाच्या भ्रमात गुरफटणेच त्या भारतीयाचा वैैचारिक जिहाद बनले आहे. जोपर्यंत आधुनिक बनण्याचा वा अद्ययावत होत मन, भावना आणि बुद्धीतून स्थिर होण्याचा विकास साधला जात नाही तोपर्यंत हा विकास चंगळवादाचा समानार्थच राहाणार आहे.

जागतिकीकरण वा मुक्त अर्थव्यवस्था लागू झाल्यापासून भारतातील उर्वरित मध्यमवर्ग हा चंगळवाद नामक आभासी जीवनप्रणालीमध्ये पुरता अडकला गेला… किंबहुना १९७० च्या दशकात इंदिरा गांधी यांनी राज्य व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तफावत करून बुद्धिवादाकडे झुकू पाहाणाऱ्या तेव्हाच्या मध्यमवर्गात फूट पाडली;. तशीच या चंगळवादानेही फूट पाडली पण ही फूट मध्यमवर्गात नाही तर एकसंघ समाजातच पाडली… शहरी व ग्रामीण वा निमशहरी व अति दुर्बल गटकांमध्ये पाडली.... तशात तथाकथित पुरोगामी म्हणवणारे बुद्धिवादीही पुरते फसले आणि आता धर्माभिमान्यांच्या चक्रव्यूहात अडकून उजवे… डावे उभे-आडवे सारेच दुभंगले. त्यात स्वभलं करून घेणारा बडा सामाजिक वर्ण मात्र राजकीय… उद्योग… शिक्षण… प्रसारमाध्यमादी विविध क्षेत्रात स्थिरावला आहे तो पूर्वीच्या अनेक संस्थानिकांप्रमाणे रयत शब्दाचा पार चोथा चुराडा करून सुवर्ण वा सवर्ण झाला आहे. 

यामुळे रोजच्या कामातून पोट भरणारा. चाकरमानी बुद्धिजीवी वैचारिक… शैक्षणिक… आर्थिक तसेच सामाजिक अनिश्चिततेच्या मानसिकतेमध्ये पिळला जात आहे. उत्तर पेशवाईसारखी सामाजिक स्थिती आहे. आता ती फक्त जागतिक पार्श्वभूमीच्या आधारावर दुसरे १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध होण्याची प्रतीक्षा करीत आहे. ते शिपायांचे बंड म्हणून हिणवले गेले… दाबले गेले आणि त्यामुळे बिथरलेल्या ब्रिटिशांना जनमनाच्या भावनेच्या शांतीसाठी राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेस स्थापन करावी लागली. आज अशा प्रकारचे ब्रिटिशही भारतात नसल्याने ना क्रांती… ना बंड ना नवीन राष्ट्रीय सभा ना नवा प्रामाणिक उठाव होऊ शकत की ना कोणी राष्ट्र ही संकल्पना आधुनिकतेच्या शब्दामध्ये देणारा स्वातंत्र्यवीर निर्माण होऊ शकत. याचे कारण... 

⭕ ना कोणी  उसळून बोलत

⭕ ना कोणी  उन्मळून जगत

⭕ ना कोणी उत्स्फूर्त कृती करत 

⭕ ना कोणी ज्वलंत होत

⭕ ना कोणी जागृत राहात

⭕ ना कोणी जिवंत होत

सर्व समाजाच्या बोथट, बुभुक्षित, बनेल बुजगावण्याने मानवी भावनेवर मात केली आहे कारण व्यक्तिस्वातंत्र्याच्या तलम बुरख्याला पांघरलेल्या समाजाला चंगळवादाच्या कोषातून बाहेर पडण्याची इच्छाच होत नाही तरीही त्यातल्या त्यात कथित सनातनी चादर ओढून घेत विकासाच्या भ्रमात गुरफटणेच त्या भारतीयाचा वैैचारिक जिहाद बनले आहे. जोपर्यंत आधुनिक बनण्याचा वा अद्ययावत होत मन, भावना आणि बुद्धीतून स्थिर होण्याचा विकास साधला जात नाही तोपर्यंत हा विकास चंगळवादाचा समानार्थच राहाणार आहे. एकप्रकारे गेल्या काही वर्षांपासून हे बंड आहे पण ते चंगळवादाचे. 

- शल्य बोचरे

सोमवार, ३ जुलै, २०२३

  तत्वज्ञान सावरकरांचे - १४

सावरकर ... हिंदु बीजतत्त्वाचा प्रणेता

सावरकरी तत्त्वाला बाजूला सारत सर्व समाजाला समानतेच्या वागणुकीने प्रेरित करू पाहाणाऱ्या या सावरकरांच्या समाजक्रांतिला, धर्मक्रांतिला, राष्ट्रक्रांतिला समजून घेण्याची मानसिक सक्षमताच भारतातील समाजाने गमावली. ती का गमावली, याचा खरे म्हणजे प्रत्येक भारतीयाने तटस्थपणे विचार करायला हवा. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा पद्धतीने सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टीका करणाऱ्यांना, आरोप करणाऱ्यांना कधी तसा प्रकार हा देशाचा, भूमीचा, राज्याचा, माणुसकीचा वा राष्ट्रीयतेचा अवमान वाटला नाही, यासारखे करंटेपण या देशाला दुसरे कुठले ?सावरकरांवरील बेताल आरोपाना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी खरे म्हणजे सावरकरांसारख्या ज्वालामुखीसारख्या नेतृत्वाची आजही गरज वाटते ती यामुळेच. कारण आजही तसे नेतृत्व काही अंशाने तरी आहे, असे वाटत नाही.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव एका व्यक्तीचे, हिंदु संघटकाचे, पक्षप्रमुखाचे, क्रांतिकारकाचे वा समाजसुधारकाचे नाही. सावरकर हा विचार आहे, बीजतत्त्व देणारा मार्गदर्शक आहे, अद्ययावत बनू पाहाणारे आणि नव्या पिढीलाही वैचारिकदृष्टीने पुढे नेण्यासाठी ताित्त्वक विचार करायला लावणारे तत्त्वज्ञान आहे. विशेष म्हणजे ते तत्त्व पोथिनिष्ठ नाही तर प्रवाही आणि मानवी संवेदनांना, समजून घेत समाजाला कालाभिमुख करणारे, यंत्रादी आधुनिक शोध-संशोधी वृत्तीला सामावून घेणारे हे तत्त्व आजच्या समाजालाही समजून घेणे गरजेचे आहे. याचे कारण समाजाला, त्यातील प्रत्येक मानवाला साक्षरतेनंतर, समज आल्यानंतर प्रगल्भ करू पाहाणारे सावरकर हे भारतीय संस्कृतीला हिंदुभूमीचे नैतिक, व्यावहारिक, तात्विक, मानवी आणि राष्ट्रीयच नव्हे तर वैश्विक अधिष्ठान  प्राप्त करू देणारे विज्ञाननिष्ठ, संवादी आणि नैसर्गिक समानतेकडे माणसाला नेणारे सावरकर तत्त्व हे अद्ययावत राहाणारे आहे. ते लक्षात घेतले तर केवळ भारताचेच नव्हे, हिंदुंचेच नव्हे तर अखिल मानवजातीला स्वीकार्य ठरू शकेल इतके व्यापक आहे. फक्त त्यासाठी सारासार विचार तारतम्य भाव बाळगावा लागेल. राजकारणाचा स्वार्थी सत्तालोलूप अविष्कार बाजूला ठेवावा लागेल.
भारत भूमीला अनेक वर्षांपासून अनेक परकीय आक्रमकांना सामोरे जावे लागले. त्यात येथील समाजाकडून पाळला जाणारा धर्म हा ज्या पद्धतीने अनुकरणीय झाला त्याच अनुकरणीयतेमुळे तो स्वघातकी पद्धतीनेही स्वीकारला गेला. अशा या धर्मातील चांगले काही नीरक्षीर विवेकबुद्धीने स्वीकारणे गरजेचे होते. ते कसे ते सांगण्याचे काम आधुनिक काळातील सावरकर तत्त्वाने केले. त्या तत्त्वाने भारतातील हिंदुंना हिंदुभूमीचे स्वरूपाही सांगितले, तसे पाहायला गेले तर नवकालानुसार सावरकरांनी हिंदुभूमीला हिंदुत्वाच्या व्याख्येत मर्यादित केले असले तरी त्यात हिंदुहिताचाच भाग होता. मात्र हिंदुभूमीला मर्यादित करताना त्यांनी
आसिंधु- सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:।।

ही व्याख्या करून आहे त्या भारतभूमीला संरक्षित करण्यासाठी नव्हे तर हिंदुंना आपल्या भूमीला आपली मानून तिचे राष्ट्र म्हणून संवर्धन करण्याची दिशाच स्पष्ट केली. इतकेच नव्हे तर हे एकप्रकारे आक्रमक असणाऱ्या आणि भारतातील अनेकानेक मूळ भूधर्म धारण करणाऱ्या हिंदुंना बाटवून मुस्लीम करणाऱ्या आक्रमकांमुळे झालेल्या परिणामांनाही स्पष्ट करीत एकप्रकारे आव्हान आणि आवाहन केले होते. शुद्धीकरण हा त्यातीलच एक एका हिंदुने याच भूमीतील हिंदुंना दिलेली साद होती. पण दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी मुस्लीम आणि ख्रिश्चन बनलेल्या मूळच्या हिंदुंनाही त्याचे महत्त्व समजले नाही की आजही हिंदु हा भूधर्म स्वीकारणाऱ्यांनाही ते कळले नाही. पुरोगामीपणाच्या   कथित मानवतावादाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरणाऱ्यांनाच या भूमीचा राष्ट्रधर्म समजला नाही. यामुळे सावरकरी तत्त्वाला बाजूला सारत सर्व समाजाला समानतेच्या वागणुकीने प्रेरित करू पाहाणाऱ्या या सावरकरांच्या समाजक्रांतिला, धर्मक्रांतिला, राष्ट्रक्रांतिला समजून घेण्याची मानसिक सक्षमताच भारतातील समाजाने गमावली. ती का गमावली, याचा खरे म्हणजे प्रत्येक भारतीयाने तटस्थपणे विचार करायला हवा. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा पद्धतीने सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टीका करणाऱ्यांना, आरोप करणाऱ्यांना कधी तसा प्रकार हा देशाचा, भूमीचा, राज्याचा, माणुसकीचा वा राष्ट्रीयतेचा अवमान वाटला नाही, यासारखे करंटेपण या देशाला दुसरे कुठले ?सावरकरांवरील बेताल आरोपाना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी खरे म्हणजे सावरकरांसारख्या ज्वालामुखीसारख्या नेतृत्वाची आजही गरज वाटते ती यामुळेच. कारण आजही तसे नेतृत्व काही अंशाने तरी आहे, असे वाटत नाही.
या आधी सावरकरांच्या आर्थिक विचारांवर आधारित असलेले त्यांचे 'वर्गहिताचा राष्ट्रीय समन्वय' साधणारे सावरकर... हे तत्त्व सांगण्यामागे हाच उद्देश होता. साम्यवादी विचारांपेक्षाही राष्ट्रनिष्ठतेवर आधारित असे हे सावरकरी तत्वाचे सत्त्व भारतीय नागरिक आणि हिंदुनाही कळू नये, यासारखे बुद्धिशून्य आणि विवेकहीन अस्तित्त्व गेल्या ८० वर्षांमध्ये या हिंदुस्थानने जोपासले आहे, त्यामुळेच आजही वर्गहितांचा समन्वय नीट राहिला नसल्याने विषमतेचा प्रश्न - समस्या ही मानसिक, शारिरीक, आर्थिक, बौद्धिक, राजकीय स्तरावर पूर्णपणे पकड ठेवून आहे. विषमतेमुळे समाजव्यवस्था कोलमडलेली आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांमध्ये परिस्थिती याहूनही वेगळी नाही. त्यामुळेच  जोपर्यंत ही पकड वा विळखा सोडवला जात नाही तोपर्यंत या देशाच्या सीमांमध्ये असणारे राष्ट्र म्हणजे नेमके काय आहे, राष्ट्र या संज्ञेची व्याख्या नेमकी काय आहे, काय करावी लागणार आहे आणि त्यादृष्टीने प्रत्येक राजकीय नेत्याने काही चिंतन तरी कधी केले आहे का, तो ते करणार आहे का, असे अनेक चिंताजनक प्रश्न कायमच राहाणार आहेत. धर्म, पंथ, आर्थिक, भाषिक, प्रादेशिक या गटातटांवर, भेदांवर असणारी या भूमिनिष्ठ नसणाऱ्यांची पकड जोपर्यंत हिंदुभूमीनिष्ठ स्वरूपात जागृत होत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाचा, विचारसरणीच्या गटातटांचा परिणाम सकारात्मक सत्ताधारणेवर होणार नाही. तो व्हावा यासाठी सध्याचा कोणताही पक्ष परिपूर्ण नाही, ते पक्ष केवळ सत्तालोलुप राजकारणाने बरबटलेले आहेत. इतकेच नव्हे तर संस्था - संघटना यांच्यातीलही सत्तालोलुपता वाढल्याने सावरकरी तत्त्वाचा अंशात्मक स्पर्शही येथे होऊ शकलेला नाही.
सावरकरांचे केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक, धार्मिक, परराष्ट्रविषयक मतांना, विचारांना असणारा वैचारिक आधार समजून घेण्यासाठी प्रामाणिक वर्तनाची आवश्यकता आहे. मुळात देशाचे स्वातंत्र्य या बरोबरच देशाचे अस्तित्त्व, त्याची संकल्पना, देशातील जनता, तिचे अस्तित्त्व यासाठी सावरकरांनी जो विचार मांडला तो तार्किक होताच पण त्याबरोबरच हिंदुत्वनिष्ठ असूनही सर्वधर्मांना, सर्व प्रांताना एकाच तराजूने तोलणाऱ्या नागरी विचारांचा होता. नागरीकरणामुळे होणारे परिणाम त्यांनी पाहिले, अंदाजित केले आणि त्यामुळेच नागरी आणि कृषी आधारित असलेल्या या देशामध्ये विचारांना वाव देताना त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्यही तितक्याच प्रगल्भपणे स्वीकारले. किंबहुना त्यांची ही वृत्ती वा प्रगल्भता तत्कालिन हिंदुंमध्ये, सर्व अल्पसंख्याकांमध्ये आली असती तर भारतीय स्वातंत्र्याला अद्ययावत, विकसित राष्ट्र होण्यामध्ये इतका काळही लागला नसता. पण हे युगांतर होण्यासाठी सावरकरांसारख्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाला समंजस, विज्ञानवादी वृत्तीचे, समाजातील भेदाभेदशून्यता स्वीकारणारे आणि धर्माच्या पोथिवादालाही योग्य अंतरावर ठेवणारे नागरिक- भारतीय आणि हिंदुही मिळाले नाहीत. ऐहिकतेतून व्यावहारिक विकासाने मूठभरांचा बौद्धिक विकास झाला तरी संपूर्ण भारतीय समाजाला मात्र सावरकरांचे तत्त्वज्ञान समजू शकले नाही, पचविताही आले नाही, हाच यातून मिळणारा एक धडा आहे. सावरकर तत्त्व संबंधात उद्याचे म्हणजे भविष्यातील काय, ते ठरवणे मात्र आता सावरकरांना समजून घेण्यासाठी त्यांच्या मूलभूत, पायाभूत अशा क्रांतिकारक बीजतत्त्वाचा अभ्यास वैचारिक स्तरावर व्हायला हवा तर, प्रगल्भ राष्ट्रनिष्ठ हिंदुना विज्ञानवादी युगात ताठ मानेने वावरता येऊ शकेल....   तूर्तास इतकेच!
- शल्य बोचरे

(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक )

रविवार, २ जुलै, २०२३

  तत्वज्ञान सावरकरांचे - १३

'वर्गहिताचा राष्ट्रीय समन्वय' साधणारे सावरकर

कलकत्ता (कोलकाता) येथील हिंदुमहासभेच्या अधिवेशनात सावरकरांनी सांगितलेली आर्थिक धोरणांची मांडणी लक्षात घेता त्यांच्या हिंदुहितकारी साम्यवादापलीकडील दृष्टी स्पष्ट होऊ शकते, जी राष्ट्रनिष्ठ अधिक आहे. ... सावरकरांनी वर्ग कलहावर वा वर्गभेदावर नव्हे तर वर्गहितांवर आधारित आर्थिक- औद्योगिक धोरणाचे विश्लेषण केले होते. किंबहुना साम्यवादाच्या सर्वसाधारण व्याख्येलाही तडा देणारे आणि भारतीयत्वाच्या मुशीत बसविणारा त्यांचा वर्गहितांना प्राधान्य देणारा, त्याचबरोबर भारतातील  अनेक काळापासून असलेल्या धर्मामधील वर्णव्यवस्थेलाही जातिभेद गाडून अद्ययावत करू पाहाणारा सावरकरांचा हा आर्थिक दृष्टिकोन साम्यवादी विचारांना ‘हिंदु’ संकल्पनेच्या विचारातून ‘हिंदुत्व’ संकल्पनेला अधिक राष्ट्रवादी करणारा आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची देशाच्या आर्थिक, औद्योगिक धोरणाबद्दल स्पष्ट भूमिका होती. हिंदुत्त्व या संकल्पनेइतकीच त्यांची ही अर्थनीती स्पष्ट होती. हिंदुत्व असो की आर्थिक धोरणांसबंधातील दिशा... ती मांडताना स्वातंत्र्यवीरांनी मांडलेली भूमिका पूर्णपणे भूमिनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ अशी होती. परराष्ट्र धोरणासंबंधातही त्यांनी मांडलेली मते ही राष्ट्राला बलस्थान देणारी होती. एकूणच सावरकरांनी स्पष्ट केलेली हिंदुमहासभेची भूमिका आणि त्यांची तत्त्वनिष्ठा पाहाता राष्ट्र ही संकल्पना आधुनिकतेला लक्षात घेत आणि भारताच्या इतिहासातील गुणदोषांचा विचार करून राष्ट्रीयत्त्वाला साकारणारी होती. भूमिनिष्ठ होती. भूमिनिष्ठ राष्ट्राची मांडणी प्रखरतेने आणि प्रभावीपणे करणारी होती. त्यांची हिंदु या शब्दाची संकल्पना या आधी स्पष्ट केली आहे आता त्यांची आर्थिक, आणि परराष्ट्र स्तरावरील भूमिकाही लक्षात घेऊ. सावरकरांनी वर्ग कलहावर वा वर्गभेदावर नव्हे तर वर्गहितांवर आधारित आर्थिक- औद्योगिक धोरणाचे विश्लेषण केले होते. किंबहुना साम्यवादाच्या सर्वसाधारण व्याख्येलाही तडा देणारे आणि भारतीयत्वाच्या मुशीत बसविणारा त्यांचा वर्गहितांना प्राधान्य देणारा, त्याचबरोबर भारतातील  अनेक काळापासून असलेल्या धर्मामधील वर्णव्यवस्थेलाही जातिभेद गाडून अद्ययावत करू पाहाणारा सावरकरांचा हा आर्थिक दृष्टिकोन साम्यवादी विचारांना ‘हिंदु’ संकल्पनेच्या विचारातून ‘हिंदुत्व’ संकल्पनेला अधिक राष्ट्रवादी करणारा आहे.
मार्क्सवादासारखा केवळ आर्थिक आणि उत्पादनाधारित वाद त्यांनी येथे मांडलेला नाही तर या देशाला अद्ययावत करून विज्ञानाच्या सुधारणांना स्वीकारीत, कृषि व्यवस्थेलाही साकारीत आणि पुढे नेण्यासाठी दिशादर्शन करणारा सावरकरांचा हा अर्थवाद आहे. हिंदुत्वासारखाच तो वादही तितकाच भूमिनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. किंबहुना आज अनेक साम्यवादी वा डाव्या विचारांना स्वीकारणाऱ्या देशातील अर्थवादाच्या भूमिका तशा बाजूला पडल्यागत झाले असतानाच आणि साम्यवादी देशांमधील अनेक देशांना त्याचा पुनर्विचार करावा लागत असताना सावरकरांचा हा अर्थवादी दिशादर्शनाचा विचार प्रभावी ठरू शकेल असा आहे कारण तो आधुनिकतेलाही स्वीकारणारा आणि अद्ययावत होत राहाणारस, काळाला स्वीकारणारा आहे. त्यामुळेच प्रकांड पंडितांसारखे अर्थवादी पोथिनिष्ठ तत्त्वज्ञान सावरकरांनी मांडले नसावे, असे म्हणता येईल.
कलकत्ता (कोलकाता) येथील हिंदुमहासभेच्या अधिवेशनात सावरकरांनी सांगितलेली आर्थिक धोरणांची मांडणी लक्षात घेता त्यांच्या हिंदुहितकारी साम्यवादापलीकडील दृष्टी स्पष्ट होऊ शकते, जी राष्ट्रनिष्ठ अधिक आहे.
त्यांची एकूण विचारसरणी अत्याधुनिक, अद्ययावत शास्त्रीय प्रगतीवर आधारलेली होती हे त्यांचे विविध लेख वाचल्यावर लक्षात येते. औद्योगिक क्षेत्रात यांत्रिक सुधारणा होऊ लागल्यावर मनुष्यबळाचा उपयोग कमी होऊन बेरोजगारी वाढेल अशी ओरड जेव्हा होत होती तेव्हा  सावरकरांनी 'यंत्र' या विषयावर दोन लेख लिहिले. “यंत्र हे शाप नसून वरदान आहे.' यंत्राने का बेकारी वाढते ? हे अभ्यासपूर्ण लेख त्यांनी लिहून औद्योगिक आणि आर्थिक धोरणांबद्दलची आपली दिशाच काय असेल ते स्पष्ट केले होते. त्यांची ती दिशा अद्ययावत राष्ट्र म्हणूून विचार करणारी होती.
पोथिनिष्ठ साम्यवादी असणाऱ्या देशांमध्ये धर्म, वंश आदींच्या वादामुळे पोथिवादी साम्यवाद अपयशी ठरल्याचेच दिसून येत आहे. सावरकरांनी यामुळेच आर्थिक धोरणे, धर्म, देश या संबंधात केलेला विचार या त्या साम्यवादापेक्षाही प्रभावी वाटतो.   त्यांनी सर्वांच्या आर्थिक हितसंबंधाच्या ऐक्यावर भर दिला. मात्र हे सांगतानाच यामुळे सारे वैरभाव नाहीसे होतील अशा मृगजळाच्या मागे लागू नये तर हिंदूनी व्यावहारिक राजकारणी धोरण ठेवून आर्थिक कार्यक्रम ठरवावे. ते हितकारक होईल असेही सांगितले.  एक प्रकारे भारतातील विशिष्ट स्थिती काय आहे, ते त्यांनी लक्षात घेतले होते. त्या स्थितीचा आणि सामाजिक प्रगतीचा विचार करीत लोकांच्या - जनतेच्या आशा अपेक्षांशी जुळणारे सूत्र त्यांनी मांडले हे त्यांचे आर्थिक सूत्र - त्यांच्या आर्थिक धोरणाचा पायाच होता. ते सूत्र होते. 'वर्गहिताचा राष्ट्रीय समन्वय'.
सावरकर केवळ हिंदू आणि त्यांचे हिंदुत्त्व याच विषयात रमलेले नाहीत. त्यांनाना देश, राष्ट्र, त्यांचे हित, आर्थिक क्षेत्र याचीही योग्य जाणीव होती. स्वातंत्र्याच्या चळवळीत हिंदु या शब्दाला, समाजालाही मिळणारी ब्रिटिश सरकारी भेदक- भेदाभेद करण्याची वागणूक, वृत्ती आणि तत्कालीन राजकीय स्तरावरही देशी नेत्यांकडूनही धर्मनिरपेक्षतेच्या नावाने फुटणारे मुस्लीम लांगूलचालनाचे उमाळे लक्षात घेता  हिंदू आणि हिंदी राष्ट्रवादाची सावरकांनी केलेली व्याख्या अधिक तपशीलवार समाजाला समजणे गरजेचे होते. तेव्हगाच कशाला आजही सावरकरी हिंदुत्वाची संकल्पना येथील हिंदू, अहिंदू नेत्यानाच नव्हे तर जनतेलाही पुरी समजलेली नाही. भूमिनिष्ठ असणारे हिंदुत्व न समजल्यामुळेच सर्वधर्मसमभावाच्या नावाने सेक्युलर या शब्दाचे अवडंबर माजवणारे पुरोगामी, डावे यांचे विचारवंत म्हणून ‘काँग्रेस गवत’ फोफावले आहे. अर्थात ते वेळीच कापले गेले असते तर वैचारिकतेच्या नावाने चाललेला शिमगा टळला असता.
सावरकरांनी मांडलेल्या आर्थिक आराखड्याला जर परिपूर्ण आर्थिक रूप मिळाले असते, तर त्यांचे सूत्र असलेल्या 'वर्गहिताचा राष्ट्रीय समन्वय' या संकल्पनेला पोथिनिष्ठताही आली असती. मुळात बदलत्या कालप्रवाहानुसार असणारा स्वीकार्यतेचा दृष्टीकोन सावरकरांचा होता. त्यातही तो तसे पाहायला गेले तर भारतासाठी - हिंदुस्थानसाठी ‘कस्टमाईज्ड’ करून सावरकांनी मांडलेला असल्याने त्याचा विचार त्यावेळी जरी केला गेला नसला तरी आजही त्या विचाराला सूत्रबद्ध करता येऊ शकेल.
सावरकरांनी त्यावेळी  (कलकत्ता येथील १९३९ मध्ये झालेल्या हिंदुमहासभेच्या २१ व्या अधिवेशनात ) सांगितले होते की, आमचे आर्थिक धोरण वर्गहितांचा राष्ट्रीय समन्वय. त्यातील मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
१) आम्ही यंत्राचें स्वागतच करतों कारण हे यंत्रयुग आहे. हस्तव्यवसायांना देखील एक स्थान आहे आणि ते उत्तेजनार्हही आहे, मात्र  राष्ट्रीय उत्पादन हे शक्य तितक्या अधिकतम विस्तृत यांत्रिक प्रमाणाबरच चालेल.
२)  शेतकरी आणि कामकरी वर्ग हाच राष्ट्रीय संपन्नतेचा, शक्तीचा आणि आरोग्याचा मुख्य पाया आहे. कारण देशाला आरोग्य आणि संपत्ति पुरवणाऱ्या याच दोन वर्गावर बलिष्ठ सैन्याच्या भरतीची केंद्रे मुख्यत: अवलंबून असतात. म्हणून त्या वर्गांच्या शक्तीचे आणि त्यांचीं निवासस्थान म्हणून खेडेगावांचें पुनरुज्जीवन होणें अवश्य आहे.
या वर्गाला केवळ जीवनावश्यक वस्तू मिळायला हव्यात मात्र अन्य सुखसोयींचा लाभही व्हायलाच हवा. त्यासाठी  त्यांना समर्थ करण्याइतका राष्ट्रीय संपत्तीच्या वाटपास त्यांचा विभाग त्यांना मिळवतां येईल अशी व्यवस्था झाली पाहिजे.  तरीही  हें लक्षांत ठेवलें पाहिजे की, सर्वसामान्यपणे राष्ट्राचेंच ते अवयव आहेत आणि अर्थात् त्यांनी आपल्या कर्तव्याचा नि उत्तरदायित्वाचा वाटा उचलला पाहिजे. पाहिजे. म्हणून राष्ट्रीय उद्योगधंदे, उत्पादन नि संपत्ती यांची सुरक्षितता आणि सर्वसमाजाची प्रगति यांच्याशी सुसंगत होईल अशा रीतीनेंच त्यांना त्यांचा अंशभाग मिळेल.
३)  राष्ट्रीय उद्योग आणि उत्पादन त्यांच्यासाठी राष्ट्रीय भांडवल असणे अपरिहार्य असल्याने आणि ते भांडवल सद्य परिस्थितींत मुख्यतः वैयक्तिक असल्यानें त्यालाहि आजच्या परिस्थितींत उत्तेजन आणि पुरस्कार योग्यप्रकारें देण्यांत येईल.
४)  परंतु भांडवल आणि श्रम या दोहोंचें हितसंबंध सर्व राष्ट्राच्या सामान्य आवश्यकतेला पूरक म्हणूनच मानण्यांत येतील.
५)  एखादा उद्योग जर भरभराटीत असेल तर त्याच्या लाभांतून मोठा विभाग श्रमिकांना मिळेल. परंतु उलट जर तो उद्योग आर्थिक दृष्ट्या हानिकारक होईल तर केवळ भांडवलवाल्यालाच नव्हे तर कांहीं अंशी कामकऱ्यालाही  अल्पलाभावर संतुष्ट राहावें लागेल.
६)  व्यक्तिगत प्रयत्नांपेक्षां जे उद्योग अधिक कार्यक्षमतेनें चालवता येतील आणि जे उद्योग राष्ट्रीय राजसत्ता स्वतः चालवूं शकेल असे मुख्य उद्योगधंदे यांचे सर्वस्वीं राष्ट्रीयीकरण करण्यांत येईल.
७) असेच तत्त्व शेतीलाही लागू पडेल. कूळ किंवा शेतकरी आणि शेतांचे धनी यांच्या स्वार्थी वर्गविषयक हितसंबंधांचे द्वंद्व माजूं न देतां शेताचें घनी आणि शेतकरी यांच्या हितसंबंबंधांचा अशा रीतीनें समन्वय करण्यांत येईल की, एकंदर राष्ट्रीय शेतीच्या उत्पन्नाचे संवर्धन व्हावें.
८) मोठ्या यंत्रांच्या सहाय्यानें, मोठ्या प्रमाणांवर आणि शास्त्रीय पद्धतीनें राज्याकडूनही शेती विकत घेऊन कांहीं अंशीं चालवण्यांत येईल. यांत हेतू हा राहील की, याचा उपयोग शेतकऱ्यांना शेर्ताचे शिक्षण देण्यांकडे व्हावा.
९) राष्ट्राची आर्थिक शक्ति ज्यामुळे क्षीण होईल त्यामुळे   राष्ट्रीय उद्योग नि उत्पादन यांची हानि होणे अपरिहार्य होईल; अशा रीतीनें किंवा तशाच उद्देशानं जे संप किंवा टाळेबंद होतील त्यांचा निकाल राष्ट्रीय पंचायतीमार्फत करण्यांत येईल आणि गंभीर परिस्थिति उत्पन्न झाल्यास निग्रहानें त्यास प्रतिबंधही करण्यांत येईल.
१०) व्यक्तिगत मिळकत ही सामान्यतः सुरक्षित मानण्यांत येईल.
११) कोणत्याहि परिस्थितींत योग्यमूल्य दिल्यावांचून राजसत्ता अशा व्यक्तिगत मिळकतीचा अपहार करणार नाहीं.
१२)  विरोधी परकीय उद्योगधंद्यांपासून राष्ट्रीय उद्योगाच्या संरक्षणाचे कामी राज्याकडून सर्वप्रकार प्रयत्न होईल.
यामध्ये उद्योगांच्या राष्ट्रीयीकरणाचा मुद्दा लक्षात घेतला तर तो यशस्वी झालेला नाही, असे चित्र दिसते. मात्र त्याचे कारण त्यांची कल्पना अयोग्य होती असे नाही, तर सर्व स्तरावर भ्रष्टाचार झाल्यामुळे ती परिस्थिती निर्माण झाली आहे. सावरकरांच्या या आर्थिक धोरणांचा विचार करता, त्याचा लाभ मिळू शकला नाही. केवळ धोरण मांडल्याने काही परिपूर्णपणे त्याची फळे दिसत नाहीत, ते अंमलात आणण्यासाठी तशी राजसत्ता हवी, तशी सर्वांगीण विकास साधणारी माणसेही देशात सर्व स्तरावर हवीत. मात्र एक खरे की, सावरकरांची ही स्थुलमानाने मांडलेली दृष्टीही भूमिनिष्ठ आणि सर्वांगीण विकासाच्या मताची होती. भांडवलदार आणि कामगार, शेतकरी या दोन्ही वर्गांचा विचार करून तसेच त्या काळातील हिंदु- अहिंदु तसेच मुस्लीम नेत्यांच्या आक्रमक वृत्तीचा विचार करून त्यांनी या आर्थिक धोरणात धोक्याचे इशारेही दिले होते.
या धोरणामागे उद्दिष्ट काय होते तर राष्ट्राच्या आर्थिक शक्तीचे संवर्धन झाले पाहिजे आणि राष्ट्र आर्थिकदृष्टीने स्वावलंबीही होणे गरजेचे आहे, मात्र हे लक्षात घेऊनही त्यांनी तत्कालिन हिंदु- मुस्लिम यांच्यातील राजकीय, सामाजिक आदी स्थितीचाही विचार केला आणि त्यासाठी इशारा देतना त्यांनी सांगितले होते की, हिंदुंच्या आर्थिक हितसंबंधांना अहिंदुंच्या आर्थिक आक्रमणाची भीती निर्माण होईल तेव्हा मात्र अर्थशास्त्राचा हा भाग हिंदुसंघटनावादी असेल.  १९३९ मधील स्थितीचा विचार करताही सावरकरांनी मूळ आर्थिक धोरणांमध्ये असलेले उद्दिष्ट राष्ट्राच्या आर्थिक शक्तीच्या संवर्धनाचा  आणि राष्ट्र आर्थिकदृष्टीने स्वावलंबी व्हावे हे होते. तर त्यासाठी सूत्र होते 'वर्गहिताचा राष्ट्रीय समन्वय'  ... वर्गकलह नव्हे!
(क्रमश:)
- शल्य बोचरे 

शनिवार, १ जुलै, २०२३

  तत्वज्ञान सावरकरांचे -१२  

सावरकरांचे हिंदुत्व राष्ट्रनिष्ठ, भूमीनिष्ठ आणि अद्ययावत

स्वातंत्र्यवीर आणि त्यांचे हिंदुत्व हे हिंदु समाजाला पराभूत मानसिकतेमधून वर काढणारे होते.  सावरकरांची हिंदुसंबंधातील व्याख्या ही त्यांनी त्यावेळच्या राजकीय स्थितीचे, भारताच्या इतिहासातील गुण-दोषांचे अवलोकन करून, हिंदुंच्या एकजुटीसाठी मांडली. हे करताना हिंदु कोण ही बाब नीटपणे पाहिली तर लक्षात येते की, त्यांनी त्यासंबंधात हिंदुस्थानातील मूळ पंथांना, धर्माला, गटांना, ज्यांचे तत्त्व येथेच निर्माण झाले त्या धर्म-पंथांना हिंदु म्हटले. हिंदु म्हणजे केवळ सनातनी- वैदिक नव्हे. त्यामुळे सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये हिंदु हा धर्म केवळ प्रार्थना पद्धतीवरील नव्हे, केवळ पंथावरील नव्हे तर तो या भूमिशी एकरूप असलेला, वर्षानुवर्षे रुजलेला आणि अशा या होली लँड वा पुण्यभूमीमध्येच त्याचे सारसत्त्व असलेला तो हिंदु समाज अभिप्रेत आहे.

आसिंधु- सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:।।
ही हिंदुत्वाची व्याख्या सावरकरांनी मांडली. ज्या काळात मांडली त्या वेळी मुस्लिमांच्या नेत्यांचा मनमानीपणा वाढलेला होता, त्यांना ब्रिटिशच काय पण गांधीजींच्या अहिंसावादी तत्त्वज्ञानानेही पाठिशी घालीत लाचारी पत्करलेली होती. भारतात त्या आधी झालेली खिलाफत चळवळीची आफतही गांधीजींच्या धोरणामुळे ओढवून घेतलेली होती, तशातच केरळमध्ये झालेल्या मोपला बंडामुळेही हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारांची बाजू घ्यायला सोडा मांडायलाही काँग्रेस तयार नव्हती, गांधीजी तयार नव्हते. ना ब्रिटिश शासनाचे तसे धोरण होते. अशा प्रकारामुळे हिंदू हे  मूळचे या भूमीमधील अधिवासी असूनही एकप्रकारे देशापासून अलग पाडण्याचा घाटच जणू घातला गेला होता. यामुळेच सावरकरांनी सांगितलेले हिंदुत्व हे हिंदु समाजाच्यादृष्टीने खरे म्हणजे च्यवनप्राश होते. पण दुर्दैवाने  स्वातंत्र्यवीरांच्याच देशातील हिंदुंना गांधींच्या अहिंसेवर आणि काँग्रेसच्या धुंदीत गुंग होण्यावर अधिक विश्वास होता. आणि त्याचीच परिणती मुस्लिमांसाठी केल्या गेलेल्या गांधीजींच्या नेतृत्वाखालील काँंग्रेसने स्वीकारलेल्या भारत-पाकिस्तान फाळणीत झाली. बरे इतके होऊनही त्यावेळी फाळणीसाठी जीनांच्या पारड्यात बहुसंख्या मुस्लिमांनी मते टाकूनही त्यातील बहुतांश मुस्लीम हे भारतातच राहिले. तरीही त्यांना स्वीकारणाऱ्या हिंदुना दुखावून अल्पसंख्याकांना अधिक सवलती देण्याचा काँग्रेसचा ‘उदारहस्त’ हिंदुंच्याच मुळावर उठला आहे.
या सर्व स्थितीमध्ये स्वातंत्र्यवीर आणि त्यांचे हिंदुत्व हे हिंदु समाजाला पराभूत मानसिकतेमधून वर काढणारे होते.  सावरकरांची हिंदुसंबंधातील व्याख्या ही त्यांनी त्यावेळच्या राजकीय स्थितीचे, भारताच्या इतिहासातील गुण-दोषांचे अवलोकन करून, हिंदुंच्या एकजुटीसाठी मांडली. हे करताना हिंदु कोण ही बाब नीटपणे पाहिली तर लक्षात येते की, त्यांनी त्यासंबंधात हिंदुस्थानातील मूळ पंथांना, धर्माला, गटांना, ज्यांचे तत्त्व येथेच निर्माण झाले त्या धर्म-पंथांना हिंदु म्हटले. हिंदु म्हणजे केवळ सनातनी- वैदिक नव्हे. त्यामुळे सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये हिंदु हा धर्म केवळ प्रार्थना पद्धतीवरील नव्हे, केवळ पंथावरील नव्हे तर तो या भूमिशी एकरूप असलेला, वर्षानुवर्षे रुजलेला आणि अशा या होली लँड वा पुण्यभूमीमध्येच त्याचे सारसत्त्व असलेला तो हिंदु समाज अभिप्रेत आहे. त्यात आर्य आहे, द्रविड आहे, मराठी आहे, कन्नड आहे, तेलुगू, आहे, तामीळ आहे, आसामी आहे, उडीया आहे, बंगाली आहे, गुजराती आहे, हिंदी आहे. संस्कृत आहे, राज्य, भाषा यांचाही एकप्रकारे मूलभूत तत्त्वानुसार विचार करून सावरकरांनी या हिंदुत्व संकल्पनेला साकारले आहे. या भूमिनिष्ठ हिंदुत्वाला संलग्न असणारे सनातनी वैदिक, जैन, बौद्ध, आदिवासींचे पंथही अभिप्रेत आहेत कारण त्यांची व्याख्या नीट समजून घेतली तरच ते लक्षात येऊ शकते. यासंबंधातही त्यांनी हिंदुत्वाचती संकल्पना तयार करताना राष्ट्र या संकल्पनेचा भारताच्या भूमि संबंधात मांडलेला विचार अधिक परिपक्क्व होता, विज्ञाननिष्ठ आणि तर्कसंगत होता. इतकंच नव्हे तर त्यांनी हिंदुंप्रमाणेच अहिंदुनाही त्या काळात पोथिनिष्ठता सोडून विज्ञानाची कास धरण्यास सांगितले, ही बाब साम्यवाद्यांपेक्षाही आणि आजकालच्या पुरोगाम्यांपेक्षाही त्या काळातच मांडलेली अधिक पुढारलेली होती. त्यांच्या खेरीज अन्य कोणा राजकीय नेत्याने अन्य धर्मातील समाजाला असा सल्ला दिल्याची फारशी उदाहरणे दिसत नाहीत.
अल्पसंख्याक असूनही आक्रमक पार्श्वभूमी असणाऱ्या मुस्लीम समाजालाही सावरकरांनी नीट समजून घेतले आहे. ितकेच नव्हे तर त्यांच्या आक्रमकपणामुळे त्यांच्यापासून सावध राहाण्याचा हिंदुंना दिलेला इशारा वेळोवेळी देऊनही हिंदु समाज, हिंदुंचे काँग्रेसी नेतृत्व सुधारले नाही. मुस्लीमांच्या इस्लामी आत्यंतिकतेविरोधात सावध राहाण्यास सांगणे हे सावरकरांचे काम किती महत्त्वाचे आहे, होते, ते आजही लक्षात येऊ शकते. इतकेच नव्हे तर हिंदु समाजातील विविध अनिष्ट चाली रिती, रिवाज, प्रथा, कर्मकांडे आदींबद्दलही सात्त्याने दुरुस्त करण्यासाठी आटापीटा करणाऱ्या आणि त्यासाठी एक स्वतंत्रपणे समाजोद्धाराचे क्रांतिकारक काम करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना दुर्दैवाने हिंदुसमाज समजून घेऊ शकलेला नाही. या त्यांच्या हिंद समाजामध्ये भूमिवर निष्ठा असणारा सर्व अहिंदु समाजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामध्ये मुस्लीम समाजातील मुस्लीम लीग आणि त्यांच्यातील मुस्लीम कट्टरपंथी वगळता देशाशी समरूप होण्यासाठी त्या धर्माने किती मानसिकता बदलली हे पाहावे लागते. ते पाहिले म्हणजे सत्यार्थ लक्षात येतोच आणि सावरकरांची क्रांतिकारक वृत्ती ही वैचारिक, बौद्धिक स्तरावरही राष्ट्र आणि भूमिनिष्ठ धर्माला  मानणारी होती. अनेक संस्थानांच्या आणि राजवटींच्या एकत्रिकरणातून तयार होत असलेल्या भारताला सावरकरांनी ज्या पद्धतीने एकाच मुशीत बांधण्याचा मार्ग दाखवला, हिंदु आणि अहिंदु हे भेद करीतही सर्वांना नागरिक म्हणून समान अधिकार, हक्क आणि जबाबदाऱ्या असल्याचे स्पष्ट सांगितले, वाढत्या शहरांची स्थिती त्यावेळीच त्यांनी लक्षात घेऊन औद्योगिकीकरणाबरोबर, यांत्रिकीकरणाबरोबरच त्यांनी नवीन समाजरचनेला ऐतिहासिक अस्मितेच्या बंधाने घट्ट करीत विज्ञाननिष्ठ होत अद्ययावत करण्याचा त्यांचा हिंदुमार्ग, हिंदुनेस हा देश आणि व्यक्तीला, व्यक्तीसमूहाला अधिक बळकट करणारा होता. पण त्यांचे हे हिंदुपण मुस्लीमलाचार काँग्रेस नेत्यांच्या मृगजळामुळे हिंदु-अहिंदुंपर्यंत पोहोचले नाही. त्याची फळे आजही सारा समाज भोगत आहे. समानतेची फळे स्वातंत्र्यानंतर सर्वांना मिळावीत, ही भावनाच मुळात काँग्रेसच्या त्यावेळच्या एकांगी मुस्लीमअनुनयी विचारात वाहून गेली. ब्रिटिश सरकारने या काँग्रेसी अनुनयाला मौनपणे खतपाणीही दिले.
ऐतिहासिक सत्य लोकांपुढे मांडून हिंदु या शब्दाला अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी सावरकरांनी एक विचारांची मालिकाच मांडली होती. ती दिशादर्शी होती. प्रत्येकाने त्याचा विचार करून त्यात भर घालावी, अशा दृष्टीने लोकांना सामावून घेणारी होती. पण त्यावेळी आणि आजही दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. समाजात वैचारिक संघर्षासाठी लोकांना उद्युक्त करणाऱ्या सावरकरांसारख्या विचाराला समजून घेण्याची परिपक्क्वताच अद्याप निर्माण झालेली नाही.  हिंदुंच्या इतिहासातील पराभवाची मानसिकता बाजूला सारून जेत्यांची पार्श्वभूमीही त्यांनी मांडलेली आहे. यामुळेच याच राष्ट्रातील झालेल्या अत्याचारयुक्त वा आक्रमक परदेशी, धर्मांध राजकारण्यांनी, राज्यकर्त्यांनी वा धर्ममार्तंडांनीही केलेल्या धर्मांतरामुळे अनेक मूळ हिंदू बाटले गेले. त्यांनाही परत आपल्या धर्मात येण्यासाठी सावरकरांनी प्रयत्न केले. वरील व्याख्येत न बसणारे धर्म-पंथ हे अहिंदु म्हटले. मात्र त्यांना भारताच्या अखंडतेतून बाहेर जा म्हणून सांगितले नाही. त्यांना स्वतंत्र भारतात मिळणारा दर्जा हा सर्व नागरिकांना समान असणाराच मिळेल असे सांगितले असे असूनही लालची मुस्लीम नेत्यांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना, अहिंसावादात वाहावत चाललेल्या नेत्यांना सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली मुस्लिमांना अनेक सवलती बहुसंख्य हिंदुंपेक्षाही अधिक प्रमाणात बहाल कराव्याशा वाटल्या यातच हिंदु समाजाचा घात झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र सर्वांना समान अधिकार देऊ पाहाणाऱ्या सावरकरांना मात्र नको ती दूषणं देण्याचा राजकीय स्वार्थ स्वातंत्र्यापूर्वीपासून ते स्वातंत्र्यानंतर आजतागायत चालू आहे. ही दूषणं बाटलेल्या मुस्लिमांनी वा त्यांच्या नेत्यांनी दिली नाहीत तर तथाकथित पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी, धर्मनिरपेक्षतेचा कावेबाज आव आणणाऱ्यांनी, डाव्या विचारसरणीचे असल्याचा कावा करणाऱ्यांनी देऊन सावरकरांचे तत्त्वज्ञान, विचारही लोकांप्रत कसा पोहोचणार नाही, पोहोचलाच तर विखार कसा निर्माण होईल ते पाहात हिंदु संघटनांच्या हातात सत्ता जाऊ नये यासाठी प्रयत्न केले. तर दुसऱ्या बाजूला हिंदु संघटनांनीही सावरकरांचे परिपूर्ण विचार समाजापर्यंत नीट पोहोचविण्याचे काम केले नाही, हे देखील तितकेच खरे. हिंदु महासभेला धार्मिक नव्हे तर राष्ट्रीय सभा म्हणवून मोठी करू पाहाणाऱ्या सावरकरांनाच गांधीहत्येनंतर बदनाम करून हिंदुत्वाच्या खऱ्या प्रसारालाच रोखण्याचा नाकर्तेपणा या देशात बहुतांश राजकीय पक्षांनी मांडला हे देखील तितकेच सत्य आहे. यामुळेच हिंदु आणि अहिंदु समाजाला अद्ययावत करण्यासाठी, पोथिनिष्ठा सोडून विज्ञानाची कास धरून त्यावर आधारित सनातन सत्य सांगण्याचा, समजून घ्या तसेच काळाबरोबर सतत चाला आणि अद्यतनी म्हणजे अपटुडेट राहावे असे शिकवण देणाऱ्या सावरकरांना, त्यांच्या विचारांना पुसून टाकण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला हे हिंदुंचेही दुर्दैव आणि या देशातील अहिंदुंचेही दुर्दैव. कारण औद्योगिक क्रांतिनंतर बदललेल्या जगाच्या गतीबरोबर चालण्यास अजूनही भारतातील नागरिक सर्वार्थाने स्वतंत्र झाला आहे, असे म्हणता येत नाही.
(क्रमश:)
- शल्य बोचरे 

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...